मनोगत : सिद्ध योग्यांची गुरुपरंपरा

प्रिय वाचकांनो,

मानवी जन्माचं सार्थक करण्याचे जे अध्यात्म मार्ग भारतवर्षात विकसित झाले त्यातील एक प्रमुख मार्ग म्हणजे कुंडलिनी योग. मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग अशा चार प्रकारांत विभागलेला हा मार्ग खरंतर आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्गच आहे. अजपा योग हा ह्या सगळ्यांचा मुकुटमणी आहे. प्राचीन योगग्रंथांनी एकमुखाने गौरवलेली ही "न भूतो न भविष्यति" अशी साधना पध्दती आहे. ताणतणावांनी आणि नाना प्रकारच्या चिंतांनी ग्रस्त करणाऱ्या आधुनिक जीवनशैलीसाठी तर अजपा योग वरदान स्वरूप आहे. तुम्हाला ह्या मार्गावर यावं अशी इच्छा होत आहे हा तुमच्या दृष्टीने मोठा शुभसंकेतच आहे. विषयाच्या खोलात जाण्याआधी अंतरीचे दोन शब्द सांगावे म्हणून हा "मनोगत" प्रपंच.

भगवान शिव ते संत श्रीज्ञानेश्वर महाराज

ज्या ग्रंथामुळे मी १९९५ साली कुंडलिनी योगमार्गावर पदार्पण केले त्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात संत ज्ञानेश्वरांनी आपली नाथ संप्रदायी गुरुपरंपरा अशी दिलेली आहे :

क्षीरसिंधु परिसरीं | शक्तीच्या कर्णकुहरीं | नेणों कैं श्रीत्रिपुरारीं | सांगितलें जें ||१७५२||
तें क्षीरकल्लोळाआंतु | मकरोदरीं गुप्तु | होता तयाचा हातु | पैठें जालें ||१७५३||
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं | भग्नावयवा चौरंगी | भेटला कीं तो सर्वांगीं | संपूर्ण जाला ||१७५४||
मग समाधि अव्युत्थया | भोगावी वासना यया | ते मुद्रा श्रीगोरक्षराया | दिधली मीनीं ||१७५५||
तेणें योगाब्जिनीसरोवरु | विषयविध्वंसैकवीरु | तिये पदीं कां सर्वेश्वरु | अभिषेकिला ||१७५६||
मग तिहीं तें शांभव | अद्वयानंदवैभव | संपादिलें सप्रभव | श्रीगहिनीनाथा ||१७५७||
तेणें कळिकळितु भूतां | आला देखोनि निरुता | ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा | दिधली ऐसी ||१७५८||
ना आदिगुरु शंकरा | लागोनि शिष्यपरंपरा | बोधाचा हा संसरा | जाला जो आमुतें ||१७५९||
तो हा तूं घेऊनि आघवा | कळीं गिळितयां जीवां | सर्व प्रकारीं धांवा | करीं पां वेगीं ||१७६०||
आधींच तंव तो कृपाळु | वरी गुरुआज्ञेचा बोलू | जाला जैसा वर्षाकाळू | खवळणें मेघां ||१७६१||
मग आर्ताचेनि वोरसें | गीतार्थग्रंथनमिसें | वर्षला शांतरसें | तो हा ग्रंथु ||१७६२||
तेथ पुढां मी बापिया | मांडला आर्ती आपुलिया | कीं यासाठीं येवढिया | आणिलों यशा ||१७६३||
एवं गुरुक्रमें लाधलें | समाधिधन जें आपुलें| तें ग्रंथें बोधौनि दिधलें| गोसावी मज ||१७६४||

वरील ओव्यांचा थोडक्यात सारांश असा की...

समुद्रकिनारी भगवान श्रीशंकराने शक्ती अर्थात पार्वतीच्या कानात गुह्य असे योगज्ञान सांगितले. ते समुद्रात माशाच्या गर्भात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले. त्या ज्ञानाने परिपूर्ण झालेले मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीवर गेले असता त्यांना अवयव भंग केलेला चौरंगी दिसला. मच्छिंद्रनाथांच्या कृपेने त्याचे अवयव परत आले आणि तो योगविद्येत परिपूर्ण झाला. आपण आता समाधीसुख उपभोगावे या अभिलाषेने मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना "मुद्रा" अर्थात योगदिक्षा दिली. योगरूप कमलिनी धारण करणारे सरोवर आणि विषयवासनांचा विध्वंस करणारे असे वीर जे गोरक्षनाथ त्यांना मच्छिंद्रनाथांनी योगेश्वर पदावर बसवून अभिषेक केला. गोरक्षकृपेने शंकरापासून चालत आलेले ते अद्वय आनंदाचे वैभव मग गहिनीनाथांना प्राप्त झाले. मग कलियुग आले आहे असे पाहून गहिनीनाथांनी श्रीनिवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की कलियुग जीवांना गिळंकृत करत आहे तेव्हा तू हे ज्ञान लोकांना देऊन त्यांना दु:खमुक्त कर. आधीच कृपाळू असलेल्या निवृत्तीनाथांनी मेघाप्रमाणे शांत रसाचा वर्षाव करणारा हा ग्रंथ रचला. गुरुपरंपरेने लाभलेले समाधीधन निवृत्तीनाथांनी मला (म्हणजे ज्ञानेश्वरांना) ग्रंथात बांधून दिले. त्यांच्याच कृपेने मला (म्हणजे ज्ञानेश्वरांना) हे यश मिळाले.

वरील ओव्यांवरून हे उघड आहे की ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा आदिनाथ > मच्छिंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तीनाथ > ज्ञाननाथ अशी आहे.

वरील ओव्यांमध्येच ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी योगशास्त्राचा सिद्धांत एका शब्दात सांगून टाकला आहे - अद्वय आनंद. कुंडलिनी योग मूलतः शिव आणि शक्ती यांची उपासना पद्धती आहे. त्यात शिव आणि शक्ती यांचे अतूट नाते आहे. चंद्र आणि चंद्रिका, दिव्याची वात आणि ज्योत यांप्रमाणे हे नाते आहे. शिव आणि शक्ती भिन्न नाहीत. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यालाच अद्वय असे म्हणतात. या शिव-शक्ती अभेद भावाचा आनंद हा कुंडलिनी योगाचा परमोच्च बिंदू आहे. हेच परमपद. परमपदाची प्राप्ती गुरुकृपेने आणि कुंडलिनी योगाच्या (मंत्र-हठ-लय-राज) सहाय्याने होत असते. अन्य तरणोपाय नाही.

भगवान श्रीदत्तात्रेय अवधूत

भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूप अर्थात त्रिगुणात्मक त्रैमूर्ती मानले जाते. अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया यांच्या घरी दत्तात्रेयांनी अवतार धारण केला. अवधूत दत्तात्रेयांची शिकवण ही अत्यंत गूढ आणि योगगर्भ आहे. जाबालदर्शन उपनिषद, अवधूत गीता, त्रिपुरा रहस्य अशा अनेक ग्रंथांमधून ती प्रकट झालेली आहे. महाराष्ट्रात गुरुचरित्राच्या रूपाने दत्त संप्रदायी परंपरा आजही समृद्ध आहे. भगवान शिव, शैव विचारसरणी, शिव-शक्ती उपासना, आणि अवधूत वृत्तीचे दत्तात्रेय यांचा घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट दिसून येते. भगवान दत्तात्रेय अवधुतांना योग-अध्यात्म मार्गावर सद्गुरूचे अढळ स्थान आहे.

संत ज्ञानेश्वर आणि दत्तात्रेय अवधूत यांचा थेट संबंध फारसा ज्ञात नसला तरी स्वतः ज्ञानेश्वरांनी दत्तत्रेयांविषयीचा नितांत आदर खालील अभंगातून व्यक्त केला आहे :

पैल मेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी । मुद्रा लावुनी खेचरी । ब्रह्मपदी बैसला ॥1॥
तेणे सांडियेली माया । त्यजियेली कंथा-काया । मन गेले विलया । ब्रह्मानंदा माझारी ॥2॥
अनुहत ध्वनी नाद । तो पावला परमपद । उन्मनी तुर्या विनोदे । छंदे छंदे डोलुतसे ॥3॥
ज्ञान गोदावरीच्या तीरी । स्नान केले पांचाळेश्वरी । ज्ञानदेवाच्या अंतरी । दत्तात्रेय योगिया ॥4॥

वरील अभंगात कुंडलिनी योग साधनेची परमोच्च अवस्था कशी सुंदरपणे वर्णन केली आहे पहा. ज्ञानेश्वरांना दत्तात्रेय अवधूत कसे दिसले?

पर्वताच्या शिखरावर एक योगी (दत्तात्रेय अवधूत) खेचरी मुद्रा लाऊन बसला होता. त्याचे मन परमपदी लीन झालेले होते. मायेच्या पलीकडे पोहोचलेल्या आणि देहभान हरपलेल्या त्या योग्याने कंथा-काया यांचाही त्याग केलेला होता. त्याचे मन ब्रह्मानंदात विलीन झाले होते. अनाहत नाद श्रवण करता करता तो उन्मनी अवस्था प्राप्त होऊन आत्मसुखाने डोलत होता. गोदावरी तीरावर ज्ञानरुपी आत्मातीर्थ प्राशन करणारा आणि पांचाळेश्वरी स्नान करणारा दत्तात्रेय अवधूत ज्ञानदेवांचे अंतरंग व्यापून राहिला.

मला मिळालेला स्वप्नदृष्टांत, शक्तिपात आणि उपदेश

मी योगमार्गावर आलो ते काही विलक्षण प्रसंगांमुळे. त्या अद्भुत प्रसंगाने माझी ज्ञानेश्वरीशी गाढ ओळख झाली आणि मी कुंडलिनी योग अंगिकारला. मी देवाच्या डाव्या हातीमध्ये त्या विषयी विस्ताराने लिहिले आहेत. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही. परमेश्वरी इच्छेनुसार मला जडदेहधारी गुरु कधी करावा लागला नाही. माझ्या उपास्य दैवताकडून आणि वरील परंपरेतील सिद्धांकडून वेळोवेळी दृष्टांत आणि मार्गदर्शन मिळत गेले. या मार्गावरील वाटचाल केवळ या सिद्धांच्या आशीर्वादानेच शक्य आहे. अन्य तरणोपाय नाही.

ज्या वाचकांनी माझे देवाच्या डाव्या हाती वाचले आहे त्यांना ठाऊक असेल की त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात माझी कुंडलिनी जागृत झाली. त्यानंतर स्वप्नदृष्टांतात आदिनाथाने शक्तिपात, मंत्र आणि उपदेशही दिला. या अनुभवांतील सर्वच गोष्टी काही मला प्रकट करता येणार नाहीत. मला मिळालेला उपदेश थोडक्यात असा होता :

"आज तुझा नवा जन्म झालाय. या शरीरातच सारी ज्योतीर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. मी देवळांमधे नाही, या देहातच आहे. स्वत:शी प्रामाणीक रहा. मग कोठलेच यम-नियम पाळावे लागणार नाहीत. जगात परत जा, पण कमलपत्रावरच्या पाण्यासारखा अलिप्तपणे जग. आता दिलेली साधना सोडू नको. तसा ती सोडूही शकणार नाहीस."

या शिवप्रदत्त उपदेशाच्या, मंत्राच्या आणि साधनेच्या आधाराने माझी योगामार्गावरील पुढील वाटचाल सुरु झाली.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वराच्याच जवळ असलेल्या संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरात मला आदिनाथ ते ज्ञाननाथ या समग्र गुरु परंपरेचे ज्योर्तीमय दिव्य दर्शन घडले.

तदनंतरच्या काळातही भगवान शिव, अवधूत दत्तात्रेय, आणि मच्छिंद्र-गोरक्षनाथादी सिद्धांच्या योगमार्गाचा आणि योगमताचा अभ्यास आणि उपासना यथाशक्ती घडत गेली. या मार्गावर वाटचाल करत असतांना दिव्य दर्शने, दृष्टांत आणि मार्गदर्शनही वेळोवेळी मिळत गेले. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या सिद्ध गुरुपरंपरा कशा जागृत आणि चेतन आहेत ते तुम्हाला कळावे.

अजपा योग विषयक मार्गदर्शन

एवढ्या वर्षांच्या काळात आलेल्या अनुभूतींच्या आणि स्वानुभवाच्या आधारे कुंडलिनी योग शिकविण्याची प्रेरणा झाली. या वेबसाईटच्या माध्यमातून करत असलेले लेखन आणि मार्गदर्शन ही त्याचीच परिणती आहे. अर्थात त्यामागील आज्ञा आणि प्रेरणा सर्वस्वी माझ्या सिद्ध "श्रीगुरुमंडलाची" आहे. या वेबसाईटवर अजपा ध्यानाची प्राथमिक पद्धत मी विस्ताराने दिलेली आहे. माझ्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु मध्ये सुद्धा कुंडलिनी योग आणि अजपा ध्यानाविषयी विवरण केलेले आहे. अजपा साधनेची प्राथमिक पायरी जरी सोपी आणि सुलभ असली तरी ती मंत्र, प्राणायाम, मुद्रा आणि ध्यान यांची एका विशिष्ठ प्रकाराने केलेली जुळणी आहे. त्यात अनेक बारकावे आणि खाचाखोचा आहेत. त्या सर्व पुस्तकांतून किंवा लेखांतून प्रकट करणे अशक्य असले तरी अनेक गोष्टींचे निरुपण आणि उहापोह मी माझ्या लेखनाद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा सर्व वाचकांना तो आवडेल अशी आशा आहे.

असो.

श्रद्धा, सबुरी, शिस्त आणि समर्पण उरी असू द्यावे आणि मग बघा हा मार्ग तुम्हाला कसं भरभरून देईल ते. सर्व वाचकांना या मार्गावरील वाटचालीकरता मनःपूर्वक शुभेच्छा.

सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.


Introduction to Ajapa Dhyana in Marathi