Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


Untitled 1

अनाहत नाद प्रकट होण्यास सहाय्यक श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्र  

अनेक वर्षांपूर्वी मी "श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्रमंत्र" नामक एका स्तोत्राची रचना केली होती. या स्तोत्राचे वैशिष्ठ असे की याची रचना मी एका शिवमंदिराच्या गाभाऱ्यात बसून केलेली आहे. "त्या" दिवशी गाभाऱ्यात उभं राहून नमस्कार करण्यासाठी डोळे मिटून हात जोडले. तेवढ्यात जोराने कानाजवळ डमरू वाजल्याचा आवाज आला. आवाज एवढ्या जवळून आला होता की मी दचकून डोळे उघडले. बघतो तर गाभारा रिकामाच होत. पहाटे-पहाटेची वेळ असल्याने माझ्या शिवाय कोणीही नव्हते. भास झाला असेल अशी स्वतःची समजून घालून परत हात जोडले. पुन्हा तोच प्रकार. दोन-तीनदा असं झालं आणि शंभू महादेवाची इच्छा म्हणा किंवा झाल्या प्रकाराचा परिणाम म्हणा "श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्रमंत्र" अलगद उलगडत गेले. सुदैवाने प्रवासात असल्याने जवळ पेन होते. गाभाऱ्यातच बसून फुलपुडीच्या कागदावर स्तोत्र खरडत गेलो. परतल्यावर नीटपणे कागदावर पुन्हा उतरवले.

घटस्थापनेपासून नवरात्रीच्या मंगल पर्वाला सुरुवात होत आहे. श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्राच्या उपासनेद्वारे नादश्रवणाच्या अभ्यासाला बळकटी कशी द्यायची हा एक स्वतंत्र योगगम्य विषय आहे. या लेखात त्याविषयाच्या खोलात जाण्याचा मानस नाही परंतु आदीशक्तीचा जागर सुरु होत असतांना श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्र सर्वच योगाभ्यासींना आवडेल आणि उपयोगी पडेल अशी आशा वाटल्याने या लेखात ते प्रस्तुत करत आहे.

या स्तोत्राविषयी काही सांगण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. या स्तोत्राची रचना जरी मी संस्कृत्तात केलेली असली तरी मी संस्कृत भाषेतला तज्ञ वगैरे बिलकुल नाही. संस्कृत भाषेचे आणि व्याकरणाचे माझे ज्ञान मर्यादित आहे. किंबहुना असे असून सुद्धा या स्तोत्राची रचना संस्कृतात करण्याची प्रेरणा होणे ही सर्वस्वी जगदंबा कुंडलिनीची आणि माझ्या "श्रीगुरुमंडलाची" कृपा आहे. तुम्ही वाचक मंडळी मुमुक्षु आहात. जाणकार आहात. मर्मज्ञ आहात. हंस पक्षी ज्याप्रमाणे दुध आणि पाणी वेगळे करणे जाणतो त्याप्रमाणे तुम्ही या स्तोत्रातील ज्ञानगर्भ भाग तेवढा ग्रहण कराल अशी माझी खात्री आहे.

जागृत झाल्यावर कुंडलिनी शक्तीची अभिव्यक्ती अनेकानेक प्रकारांनी होत असते. त्यांमध्ये प्राण, नाद आणि तेज यांच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती विशेष महत्वाची असते. योगमार्गावरील सर्व साधकांनी अनाहत नादाविषयी ऐकले किंवा वाचलेले असते. अनाहत नादाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी षण्मुखी मुद्रा किंवा योनिमुद्रा धारण करून नादश्रवणाचा अभ्यास केला जातो. अभ्यास जसा जसा प्रगल्भ होत जातो तसा तसा अनाहत नाद उमटू लागतो. तबला, तंबोरा इत्यादी वाद्यांच्या सहाय्याने प्रकट होणारा नाद सर्वांच्या परिचयाचा आहे. कोणत्याही वाद्याचा आवाज प्रकट होण्यास साधारणतः दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टींचा एकमेकावर आघात करावा लागतो. उदाहरणार्थ, तबल्यातून आवाज उमटण्यासाठी हातांनी तो वाजवावा लागतो. तंबोऱ्यातून आवाज उमटण्यासाठी बोटांनी त्याच्या तारा छेडाव्या लागतात. या प्रक्रियेच्या बरोब्बर उलट प्रकार अनाहत नादाच्या बाबतीत घडत असतो. अनाहत नाद म्हणजे कोणत्याही आघाताशिवाय निर्माण झालेला ध्वनी किंवा नाद. हा नाद शुषुम्ना नाडीत प्रधानत्वाने अनाहत चक्राच्या ठिकाणी प्रकट होत असतो. प्राचीन योगग्रंथांत दहा प्रकारच्या अनाहत नादांचे आणि तत्संबंधी अनुभूतींचे वर्णन ठिकठीकाणी आलेले आहे. भिन्न-भिन्न ग्रंथांत त्यांबद्दल थोडीफार मतभिन्नता आढळते पण ढोबळपणे दशविध नाद ग्राह्य मानले गेले आहेत. कुंडलिनी आणि अनाहत नाद हे तत्वतः एकच आहेत. अनाहत नाद हा शक्तीचाच स्पंद आहे. शक्तीचाच नादरूपी हुंकार आहे.

श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्रात या दशविध अनाहत नादांच वर्णन मी योगगम्य भाषेत केलेले आहे. हे वर्णन मंत्रमय आहे. म्हणूनच मी त्याला "स्तोत्रमंत्र" असं म्हटलं आहे. कुंडलिनी शक्तीच नाद स्वरूपात कशी प्रकट होते ते वर्णन करणारे आणि कुंडलिनीची स्तुती करणारे बारा मंत्र आणि स्तोत्राची फलश्रुती सांगणारा एक श्लोक असं या स्तोत्राचे स्वरूप आहे. फारसे पाल्हाळ न लावला आता श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्र पाहुया.  

श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्रातील वरील बारा मंत्रांचे विस्ताराने विवरण करणे हा या लेखाचा उद्देश नाही. अनुभवी आणि जाणकार योगसाधकांना त्यातील योगगम्य अर्थाकडे केलेला निर्देश नक्कीच कळेल. सर्वसामान्य योगसाधाकाच्या दृष्टीने विचार करता खरंतर या मंत्रांचा विस्ताराने अर्थ कळण्याची त्याला गरजही नाही. हे बारा मंत्रांचे स्फुरण जगदंबा कुंडलिनीच्या आणि माझ्या "श्रीगुरुमंडलाच्या" आशीर्वादाने झालेले आहे. त्यांचे भक्तिपूर्वक केलेले उच्चारण आपले कार्य अचूक पणे करणार यात कोणताही संशय नाही.

या स्तोत्राच्या फलश्रुती विषयी दोन शब्द स्पष्ट करणे आवश्यक आहे. स्तोत्रातील शेवटच्या श्लोकात दिल्या प्रमाणे हे मंत्रमय स्तोत्राची फलश्रुती आहे अनाहत नादाचे प्रत्यक्षीकरण. प्रत्यक्षीकरण म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्ष प्रकट होणे अर्थात त्या गोष्टीची थेट अनुभूती मिळणे. योगसाधकाला अनाहत नादाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यास सहाय्यभूत असे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राचा फायदा मिळण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली म्हणजे तुमची या स्तोत्रावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा हा खुप तरल भाव आहे. त्यात जरा जरी कमतरता राहिली तरी मग फळात कमतरता रहाते किंवा फळ बिलकुल मिळत नाही. हे याच स्तोत्राच्या बाबतीत लागू आहे असे नाही. बहुतेक सर्वच मंत्र आणि स्तोत्रांच्या बाबतीत हा नियम लागू पडतो. तेंव्हा जगदंबा कुंडलिनीवर आणि या स्तोत्राच्या प्रत्येक शब्दावर अगाध श्रद्धा असल्या खेरीज त्याचा लाभ मिळणार नाही हे उघड आहे. थोडक्यात हे स्तोत्र "अभक्त" व्यक्तीसाठी नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही योगशास्त्रानुसार नादश्रवणाचा अभ्यास करायाला हवा. सर्वसाधारणपणे नादश्रवणाचा अभ्यास करतांना षण्मुखी मुद्रा किंवा योनी मुद्रा किंवा तत्सम "कान झाकण्याच्या" विधीने नादश्रवण केले जाते. वरील स्तोत्र या अभ्यासाला पर्याय नसून ते नादश्रवणाच्या अभ्यासाला पूरक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. नुसती या स्तोत्राची आवर्तने करून उपयोग नाही. त्या जोडीला नादानुसंधानाचा अभ्यास सुद्धा घडायला हवा. थोडक्यात सांगायचे तर या स्तोत्राचा पाठ "योगाभ्यासेन सह" करायचा आहे.

एक-दोन महिन्यांपूर्वी मी श्रीसुषुम्ना स्तवन दिले होते. तुम्हा वाचकांकडून त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तुमच्यासारख्या मुमुक्षु आणि जाणकार वाचकांनी जी पसंतीची आणि कौतुकाची थाप दिली त्याबद्दल मनापासून आभार. त्याचबरोबर अनेक वाचकांनी स्तोत्राच्या पाठा संबंधीच्या विधी-विधानाची विस्ताराने माहिती द्यावी अशीही विनंती केली होती. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अशी स्तोत्रांचा वापर हा योगाभ्यासासहित करायचा असल्याने सर्वच बारीकसारीक गोष्टी सांगता येत नाहीत. कुंडलिनीशी थेट संबंध असल्याने त्या अशा प्रकारे प्रकट करणे योग्यही होणार नाही. श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्राच्या बाबत्तही असेच आहे. त्यामुळे येथे सर्वसामान्य योगसाधकासाठी या स्तोत्राचा वापर करण्याचा एक सुलभ विधी देत आहे.

  • प्रथम आपल्या योगसाधनेच्या ठिकाणी एकांतात शांतपणे बसावे.
  • तुमच्या आवडीनुसार काही मिनिटे नाडीशोधन प्राणायाम किंवा अजपा जप करावा.
  • त्यानंतर श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्राचे सात, दहा, किंवा बारा पाठ शांतचित्ताने करावेत. यावेळी कसलेही विशिष्ठ ध्यान वगैरे करण्याची गरज नाही. डोळे बंद ठेऊ शकता किंवा उघडे ठेऊ शकता. पठण मानसिक किंवा उपांशु पद्धतीने करू शकता. फार मोठ्याने या स्तोत्राचा पाठ करू नये.
  • प्रत्येक पाठ करत असतांना तो "अथ" ओळी पासून सुरवात करून "इति" ओळी पर्यंत करावा. हे मुद्दाम सांगतोय कारण बऱ्याच वेळा लोकं फक्त पहिल्या आणि शेवटच्या पाठाला अनुक्रमे अथ आणि इति ओळ म्हणतात. काही वेळा अथ आणि इति ओळी पठणातून वगळल्या जातात. या स्तोत्राच्या बाबतीत तसे अजिबात करू नये. स्तोत्रातील एकही अक्षर गाळायचे नाही किंवा बदलायचे नाही. अतिरिक्त "ओंकार" किंवा अन्य काहीही जोडायचे नाही.
  • मी स्वतः ज्यांना नादश्रवण शिकवले आहे त्यांनी यात एक छोटी गोष्ट अजून करायची आहे. "अथ" ओळ म्हणत असतांना शिकवलेल्या मुद्रांपैकी क्रमांक ५ ची मुद्रा पटकन प्रदर्शित करायची आहे आणि "इति" ओळ म्हणत असतांना पटकन क्रमांक १ ची मुद्रा प्रदर्शित करायची आहे. या प्रक्रियेने तुमच्या साधनेला अतिरिक्त बळकटी मिळेल. येथे या प्रक्रियेच्या फार खोलात जाण्याची माझी इच्छा नाही.
  • त्यानंतर तुम्ही ज्या विधीने नादश्रवण करत असाल (षण्मुखी मुद्रा, योनी मुद्रा वगैरे वगैरे) त्याच विधीने नादानुसंधानाचा अभ्यास यथाशक्ती करायचा आहे. हा अभ्यास जेवढा जास्त काळ घडेल तेवढा उत्तम. येथे एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की तुमची नादश्रवणाची पद्धत अचूक असायला हवी. कान कसे झाकायचे, कोणते आवाज ऐकायचे, स्थूल आवाजांवरून सूक्ष्म आवाजांवर कसे जायचे, लक्ष नक्की कोठे केंद्रित करायचे असे अनेक बारकावे या प्रक्रियेत आहेत ते तुम्ही नीट समजून घेतले पाहिजेत.
  • नादानुसंधानाचा अभ्यास संपला की परत वर दिल्या प्रमाणे श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्राचे सात, दहा, किंवा बारा पाठ करायचे आहेत. आदी आणि अंती पाठ संख्या सारखी म्हणजेच ७-७, १०-१० किंवा १२-१२ अशी असू द्यावी. एकदा जी संख्या ठरवाल ती वारंवार बदलू नये.
  • शेवटी अन्य काही साधना असेल तर ती उरकून आसन उचलायचे आहे.

ज्यांना फक्त एक स्तोत्र किंवा स्तुती म्हणून हे स्तोत्र म्हणायचे असेल त्यांनी योगसाधना संपल्यावर याचा एक पाठ करायला हरकत नाही. हा पाठ मानसिक किंवा उपांशु पद्धतीनेच करावा.

मला आशा आहे की या स्तोत्राची आवड वाटून तुम्ही तुमच्या नादश्रवण साधनेत त्याचा अंतर्भाव कराल.

असो.

नादाचे मूळ स्फुरण जिच्या लीलेने उमटते ती जगदंबा पराशक्ती श्रीकुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांना नाद-बिंदू-कला यांचे गूढज्ञान प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 October 2021