प्रिय वाचकांनो,
या वेबसाईट वरील माझे लेख वाचल्यानंतर बऱ्याचदा वाचक असे विचारत असतात की -- "आम्हाला सुद्धा श्रीगुरुमंडलाची उपासना करायची आहे. उपासना काय करावी आणि कशी करावी?"
प्रथम श्रीगुरुमंडल म्हणजे नक्की कोणाची उपासना ते समजून घ्या. तुम्ही जर सिद्ध योग्यांची गुरुपरांपरा पाहिलीत तर तुम्हाला कळेल की त्यात शिव, दत्तात्रेय, नवनाथ, चौऱ्याशी सिद्ध अशा अनेकानेक सिद्धांचा समावेश होतो. श्रीगुरुमंडल म्हणजे खरंतर या सर्व सिद्ध गुरूंचा समुदाय. असे असले तरी मला दीक्षा आणि साधना मिळाली ती शंभू महादेवाकडून. त्यानेच दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांची उपासना सुद्धा करवून घेतली. त्यामुळे माझे श्रीगुरुमंडल म्हणजे प्रामुख्याने भगवान शिव, अवधूत दत्तात्रेय आणि शंभूजती गोरक्षनाथ. श्रीगुरुमंडलाची उपासना म्हणजे या तिघांची एकत्रीत उपासना-सेवा-आराधना-साधना-भक्ति.
ज्या वाचकांना प्रामाणिकपणे श्रीगुरुमंडलाची भक्ति करायची आहे त्यांच्यासाठी येथे एक अत्यंत सोपी परंतु प्रभावी अशी उपासना देत आहे. लक्षात घ्या की ही उपासना प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे जे योग-अध्यात्म मार्गावर नवीन आहेत. ज्यांनी थोडेफार आध्यात्मिक वाचन केलेले आहे, क्वचित प्रसंगी एखादे स्तोत्र पठन वगैरे केलेले आहे परंतु यापूर्वी फारशी कोणतीही उपासना किंवा साधना केलेली नाही त्यांना डोळ्यासमोर ठेऊन ही उपासना / साधना देत आहे.
कोणत्याही सोमवार किंवा गुरुवार पासून ही उपासना सुरू करावी. तुमच्याकडे एक लोकरीचे आसन आणि एक रुद्राक्षाची जप माळ एवढ्या दोन गोष्टी असल्या तरी पुरेशा आहेत.
तुम्ही साधनेसाठी जो वेळ ठरवला आहे त्या वेळेत पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन लोकरीच्या आसनावर आसनस्थ व्हावे. आसनावर बसण्यापूर्वी हात, पाय आणि चेहरा पाण्याने धुवावा, चुळा भराव्यात आणि मगच साधनेला बसावे.
प्रथम डोळे बंद करून मनाला शांत आणि अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करावा. मनातल्या मनात भगवान गणपतीचे अल्पसे स्मरण करावे आणि साधनेत सफलता मिळण्यासाठी प्रार्थना करावी.
त्यानंतर रुद्राक्षाच्या जपमाळेवर खालील तीन मंत्रांचा क्रमाक्रमाने प्रत्येकी १०८ वेळा जप करावा. जप वाचिक किंवा उपांशू किंवा मानसिक पद्धतीने करता येतो. तुम्हाला ज्या प्रकारे करणे सोपे आणि आनंददायक वाटेल त्या प्रकाराने जप करावा. जप करतांना जपमाळ उजव्या हातात छातीच्या उंचीवर पुढ्यात धरावी आणि मध्यमा, अनामिका आणि अंगठा या बोटांच्या सहायाने जपमाळेचे मणी फिरवावेत.
पहिला मंत्र -- शिव गोरक्ष योगी
दूसरा मंत्र -- श्रीगुरुदेवदत्त
तिसरा मंत्र -- नमः शिवाय
एक लक्षात घ्या की मंत्रशास्त्राचे स्वतःचे असे खंडिभर सिद्धांत, नीती-नियम आणि विधी-विधान आहेत. तुम्ही नवीन साधक आहात असे गृहीत धरून येथे कोणतेही क्लिष्ट नियम किंवा विधी-विधान दिलेले नाही. मंत्र सुद्धा अगदी सौम्य आणि सात्विक असेच सांगितले आहेत जेणेकरून कोणताही दुष्परिणाम अथवा दुष्प्रभाव होणार नाही.
पहिले भगवान शंकराचे अवतरण मानले गेलेले गोरक्षनाथ. त्यानंतर नवनाथांना गुरुस्थानी असलेले आणि त्रिदेवांचे अंश असलेले दत्तात्रेय आणि त्यानंतर परमपदी विराजमान असलेला अलख आणि निरंजन असा आदिगुरू सांब सदाशिव अशी ही चढत्या क्रमाची मालिका आहे. जप करत असतांना मात्र त्यांच्या विषयी अभेद भाव मनात असू द्यावा. एक शिवतत्वच तीन स्वरूपात प्रकट झाले आहे या भावनेने जप करावा. तीनही मंत्रांचा जप पूर्ण झाल्यावर जपमाळ खाली ठेवावी आणि कमीतकमी पाच मिनिटे अजपा जप करावा. अजपा जपाचा सुलभ विधी येथे दिलेला आहे.
अजपा जप पूर्ण झाल्यावर सर्व जप साधना आणि अजपा साधना मनोमन श्रीगुरुमंडलाला अर्पण करावी. साधना समर्पित केल्यावर दोन-पाच मिनिटे आसनावरच मौन धारण करून बसावे आणि त्यानंतर साधना संपवावी. आसन आणि जपमाळ नीट उचलून ठेवावी.
वरील साधना करत असतांना खालील गोष्टींचे पालन करावे :
- वरील तीन मंत्र एका "सिंगल युनिट" सारखे करायचे आहेत. फक्त भगवान शंकराचा मंत्रच केला किंवा फक्त दत्तात्रेयांचा मंत्रच केला असे करू नये.
- मंत्रांचा दिलेला क्रम बदलू नये. प्रथम गोरक्षनाथ, त्यानंतर दत्तात्रेय आणि त्यानंतर भगवान शंकर असाच क्रम ठेवावा.
- सुरवातीचे सहा महीने / वर्ष जप एकदम मोठ्या संख्येने करू नये. जपाची ऊर्जा तुमच्या शरीर-मनाला झेपणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे सुरवातीला प्रत्येक मंत्राचा एकच माळ जप करावा.
- घरी शिवलिंगार्चन शक्य असल्यास उत्तमच अन्यथा मासिक शिवरात्रीच्या किंवा प्रदोषाच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात दर्शन घ्यावे.
- स्वतःचा आहार जास्तीत जास्त शुद्ध आणि सात्विक राखण्याचा प्रयत्न करावा.
तीन मंत्र, अजपा ध्यान आणि मौन अशा एकूण पाच घटकांनी बनलेली ही उपासना नित्य-नियमाने केल्यास तुमची या मार्गाची गोडी वाढेल आणि श्रीगुरुमंडलाची कृपा प्राप्त होईल अशी खात्री वाटते. ज्यांना श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या माध्यमातून शिवोपासना कशी करावी या विषयी सखोलपणे साधना शिकायची आहे त्यांना ऑनलाइन कोर्सचा पर्याय उपलब्ध आहे.
सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी