Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


घेरंड मुनींच्या योग पद्धती मधील समाधी महात्म्य

घेरंड मुनींनी आपल्याला सहा समाधी विधी सांगितले आहेत. शांभवी मुद्रा, भ्रामरी कुंभक, खेचरी मुद्रा, योनी मुद्रा, भक्ती योग आणि मनोमुर्च्छां या क्रियांद्वारे अनुक्रमे ध्यान समाधी, नाद समाधी, रसानंद समाधी, लय समाधी, भक्तियोग समाधी आणि मनोमुर्च्छां समाधी प्राप्त होते हे आतापर्यंत आपण जाणून घेतले आहे. समाधी अवस्थेलाच राजयोग असा प्रतिशब्द घेरंड मुनींनी वापरला आहे. योगक्रीयांद्वारे मनाची एकाग्रता हनुहळू धारणा-ध्यान-समाधी अशी उत्क्रांत होत राजयोगावस्थेत परिणत होते.

साधारणतः वरील सहा समाधी विधीं पैकी गुरु आज्ञेनुसार कोणतातरी एक विधी योगसाधक अंगीकारत असतो. हे विधी जरी भिन्न-भिन्न असले तरी अंतिमतः ते योग्याला एकाच अवस्थेप्रत घेऊन जातात. ज्या प्रमाणे अनेक नद्या आपापल्या मार्गाने वाहात वाहात शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतात त्या प्रमाणे वरील सहा समाधी मार्गही शेवटी एकाच योगारूढ अवस्थेप्रत घेऊन जातात. ती योगारूढ अवस्था कशी असते ते आता घेरंड मुनी सांगत आहेत.

घेरंड मुनी चंद्रकपालीला सांगतात --

इति ते कथितं चण्ड समाधिर्मुक्तिलक्षणम् ।
राजयोगः समाधिः स्यादेकात्मन्येव साधनम् ।
उन्मनी सहजावस्था सर्वे चैकात्मवाचकाः ॥

हे चंद्रकपाली! मी तुला मुक्ती प्रदान करणाऱ्या अशा समाधी विषयी सांगितले. राजयोग अथवा समाधीचा उद्देश आत्म्याशी एकरूप होणे हा आहे. राजयोग, समाधी, उन्मनी आणि सहजावस्था हे सर्व एकच स्थिती दर्शवणारे शब्द आहेत.

घेरंड मुनींनी जो ध्यान योग सांगितला आहे त्याचे उद्दिष्ट आहे आत्मसाक्षात्कार. मी म्हणजे हा जड देह नसून मी म्हणजे कूटस्थ आत्मा आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती मिळवणे हे या मार्गाचे उद्दिष्ठ आहे. या अनुभूतीला किंवा या अवस्थेला चार प्रतिशब्द घेरंड मुनींनी सांगितले आहेत -- समाधी, राजयोग, उन्मनी आणि सहजावस्था.

समाधी म्हणजे बुद्धीची समवृत्ती. जोवर मनात विचार येत आहेत तोवर ही समवृत्ती साधणारी नाही. मनातील विचार आत्म्यावर जणू एक पडदा टाकतात ज्यामुळे आत्म्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे प्रथम विचारांचा समतोल साधून, मनाचा नाश करून आत्म्याचा प्रकाश अनुभवावा लागतो.

पारंपारिक योगशास्त्रात भगवान शंकराने चार प्रकारचा योग सांगितला आहे -- मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग. हे चार मार्ग एका मागून एक किंवा एकत्रितपणे अंगीकारून योगी आपल्या आत्मसाक्षात्काराच्या उद्दिष्टाकडे अग्रेसर होत असतो. या चार योगांतील राजयोगाचा ध्यानात्मक साधनेशी जवळचा संबंध आहे. राजयोग साधला म्हणजेच समाधी साधली आणि समाधी साधली म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला. येथे एक लक्षात घ्यायला हवे की समाधीच्या सुद्धा अनेक श्रेण्या अथवा पायऱ्या आहेत. शेवटची पायरी साधली की राजयोग साधला. काही ठिकाणी राजयोगाच्या उच्चतम स्थितीला भगवान महादेवाने राजाधिराजयोग असे म्हटले आहे.

जोवर मनुष्य देहाचे निरनिराळे देहव्यापार सुरु आहेत तोवर मन सुद्धा जागृत असते. माणूस जागा असो वा गाढ निद्रा घेत असो अथवा स्वप्न पहात असो हे मन जागे असतेच. किंबहुना माणसाच्या अस्तित्वासाठी मनाची नितांत आवश्यकता असते. समाधी अवस्थेत या मनाचा नाश केला जातो अर्थात मनाला उन्मन केले जाते अर्थात उन्मनी अवस्था साधली जाते. मनाचा नाश करणे म्हणजे मनातील विचारांचा नाश करणे. मनावर झालेले जन्मोजन्मींचे संस्कार पुसून टाकणे. पतंजली मुनींच्या भाषेत चित्तवृत्तींचा निरोध करणे.

नवीन साधकांना सहजावस्था हा जरा गोंधळात टाकणारा शब्द वाटू शकतो. ज्या मनाला ताब्यात आणण्यासाठी एवढा द्रविडी प्राणायाम करावा लागतो, एवढे कष्ट उपसावे लागतात ती अवस्था "सहज" कशी काय असू शकेल. आत्म्याचा प्रकाश बाहेर पडण्यासाठी तयारच असतो परंतु इंद्रिय आणि मनोव्यापार त्या प्रकाशावर जणू आवरण टाकतात. दिव्यावर काजळी धरावी तशी आत्म्याची अवस्था झालेली असते. समाधीद्वारे जेंव्हा मनाचा नाश केला जातो, काजळीचा नाश केला जातो तेंव्हा आत्म्याचा हा प्रकाश अगदी सहजपणे दृष्टीगोचर होतो. विचार रहित अवस्था प्राप्त झालेले मन जणू स्वभावतःच शून्य होऊन जाते. म्हणून ही सहजावस्थाच असते.

अशी अवस्था प्राप्त झाली की योग्याला काय अनुभव येतो ?

जले विष्णुः स्थले विष्णुर्विष्णुः पर्वतमस्तके ।
ज्वालामालाकुले विष्णुः सर्वं विष्णुमयं जगत् ॥

आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला योगी जळी, स्थळी, पर्वत-पाषाणी, अग्नी ज्वालांमध्ये विष्णू आहे असे जाणतो. त्याच्यासाठी सर्वाजग विष्णुमय होऊन जाते.

तुमच्यापैकी ज्यांनी कधी नवनाथ पोथी वाचली आहे त्याना वरील श्लोक वाचल्यावर भगवान दत्तात्रेयांची मच्छिंद्रनाथां बरोबर पहिल्यांना भेट झाली तो प्रसंग आठवेल. मच्छिंद्रनाथांना मच्छिच्या पोटात असतांनाच भगवान शंकराचा उपदेश प्राप्त झाला होता. भगवान शंकरानेच त्यांना सांगितले होते की पुढे दत्तात्रेयांच्या हस्ते दीक्षा देवविन. मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करत असतांना भगवान दत्तात्रेयांनी त्यांना हटकले आणि विचारले की सांग समोरचा पर्वत तुला दिसत आहे का. मच्छिंद्रनाथ म्हणाले -- कोणता पर्वत. मला तर चराचरात ईश्वर भरलेला आहे असे दिसत आहे.

येथे घेरंड मुनींनी तशाच प्रकारची अवस्था वर्णन केली आहे. जड जगत हे पंचमहाभूतांनी बनलेले असते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशी पंचतत्वे चराचर जगत व्यापून राहिलेली असतात. सामान्य माणसाला जगतातील नाम-रूपात्मक गोष्टीच आकलनात आणता येतात. योग्याला मात्र या नाम-रूपात्मक सृष्टीमागील ईश्वरी तत्वाचा अनुभव येत असतो.

येथे घेरंड मुनींनी विष्णुमय जगत असे म्हटले आहे. कोणतीही वस्तू उत्पत्ती-स्थिती-मे अशा तीन अवस्थांमधून जात असते. ब्रह्मा-विष्णू-महेश हे या तीन अवस्थांचे कारक आहेत. आपल्या आजूबाजूला जे काही जड जगत अस्तित्वात आहे ती या जगाची स्थिती अवस्था आहे. अर्थातच ती विष्णू अवस्था आहे. म्हणूनच घेरंड मुनींनी येथे जग हे "विष्णुमय" आहे असे म्हटले आहे.

पुढच्या श्लोकात ते वरील भाव वेदांताच्या परिभाषेत व्यक्त करतात --

भूचराः खेचराश्चामी यावन्तो जीवजन्तवः ।
वृक्षगुल्मलतावल्लीतृणाद्या वारिपर्वताः ।
सर्वं ब्रह्म विजानीयात्सर्वं पश्यति चात्मनि ॥

भूचर अर्थात जमिनीवर वास कारणाते, खेचर अर्थात आकाशात विहार करणारे, त्याचबरोबर जीव-जंतू, वृक्षवल्ली, तृण, जलाशय, पर्वत इत्यादी सर्व गोष्टी ब्रह्ममय आहेत असे जाणावे. आत्म्यामध्ये या सर्वाना पहावे.

मागील श्लोकात जड जगत विष्णुमय आहे असे सांगितल्यावर आता तेच जग ब्रह्ममय आहे असे घेरंड मुनी सांगत आहेत. शिवमय, विष्णुमय, ब्रह्ममय असे विविध शब्द शेवटी त्या परमतत्वाकडेचा निर्देश करतात. आपापल्या श्रद्धेनुसार आणि आवश्यकते नुसार आपण वेगवेगळे शब्द वापरत असते. येथे घेरंड मुनी आपल्याला "पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी" या तत्त्वाची जणू आठवण करून देत आहेत. जड जगत हे आत्म स्वरूप आहे असे ते सांगतात.

आत्म्याविषयी अधिक स्पष्टता आणण्यासाठी ते पुढे सांगतात --

आत्मा घटस्थचैतन्यमद्वैतं शाश्वतं परम् ।
घटाद्विभिन्नतो ज्ञात्वा वीतरागं विवासनम् ॥

आत्मा म्हणजे शरीरस्थ चैतन्य. आत्मा हा एकमेवद्वितीय, शाश्वत आणि सर्वोपरी आहे. आत्मा आणि घट-पिंड भिन्न आहेत हे जाणून योग्याने सर्व इच्छा-वासनांचा त्याग केला पाहिजे.

आत्मा म्हणजे नक्की काय हा एक मोठ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. येथे घेरंड मुनी म्हणतात शरीरस्थ चैतन्य म्हणजे आत्मा. नवीन साधकांनी येथे चैतन्य आणि प्राण यांची गल्लत होऊ देऊ नये. घेरंड मुनी म्हणतात हा आत्मचैतन्य असे आहे की ज्याला तोड नाही. जे नाश होणारे नाही अर्थात जे शाश्वत आहे. या आत्मचैतन्याला ते सर्वश्रेष्ठ मानतात.

आतापर्यंत वर्णन केलेली योगारूढ अवस्था प्राप्त होण्यासाठी योग्याने वैराग्य भावने समाधी साधना अंगिकारली पाहिजे असे ते अधोरेखित करतात --

एवं मिथः समाधिः स्यात्सर्वसङ्कल्पवर्जितः ।
स्वदेहे पुत्रदारादिबान्धवेषु धनादिषु ।
सर्वेषु निर्ममो भूत्वा समाधिं समवाप्नुयात् ॥

योग्याने सर्व संकल्प-विकल्पांचा त्याग करून स्वतःचा जड देह, मुलंबाळ, पत्नी, बंधू, नातेवाईक, संपत्ती इत्यादीं पासून अलिप्त राहून समाधी अवस्था प्राप्त केली पाहिजे.

योगमार्गावर वैराग्याचे महत्व येथे घेरंड मुनींनी अधोरेखित केले आहे. येथे लक्षात घ्यायची गोष्ट ही की क्रियात्मक योगसाधना ही नाण्याची एक बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू आहे वैराग्य. जर वैराग्य नसेल तर कितीही साधना केली तरी समाधी साधनेचा अंतिम टप्पा अर्थात आत्मसाक्षात्कार तो गाठणे कठीण आहे. वैराग्याची परिभाषा सुद्धा काळाप्रमाणे बदलते. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या गरजा आणि आधुनिक काळातील मानवाच्या गरजा यात कमालीची भिन्नता आहे. हे कालसापेक्ष बदल आणि त्यांचा वैराग्याशी असलेला संबंध साधकाने नीट समजून घ्यायला हवा. आधुनिक काळात अनेक साधकांना "पंचतारांकित" आध्यात्म हवेहवेसे वाटते कारण स्वतःची स्वैर जीवनशैली काकणभर सुद्धा न बदलता, किंबहुना जगत असलेल्या स्वैर जीवनशैलीचे उदात्तीकरण करत त्यांना अध्यात्म मार्ग गाठायचा असतो. अशा आचरणाने वरकरणी देखावा निर्माण करता येतो परंतु ध्यानमार्गावर खऱ्या अर्थाने प्रगती काही साधता येत नाही.

तुमाच्यापैकी जे लोक संसारी आहेत त्यांनी हे मुद्दाम लक्षात घ्यावे की घेरंड मुनींनी जरी येथे मुलबाळ, पत्नी, बंधू, नातलग असे सर्वसाधारण गृहस्थी जीवन कनिष्ठ आहे असे म्हटले असले तरी त्याचा त्याग करा असे न सांगता त्यात निर्ममत्व असू द्या असे सांगितले आहे. भगवान शंकर हा अशा जीवनशैलीचा जणू आदर्श आहे. शंभू महादेवाकडे पहा. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून जिची ख्याती आहे अशी जगदंबा पार्वती त्याची पत्नी आहे. सुख-समृद्धीचा दाता मानला गेलेला भगवान गणपती आणि देवांचा सेनापती असलेला कार्तिक असे पुत्र त्याला आहेत. कुबेर, यक्षगण, भूतगण रुद्रगण, भैरवगण असा त्याचा मोठा परिवार आहे. सर्व देव ज्याची उपासना करतात असा तो देवांचा देव महादेव आहे. एवढे असूनही तो "गृही विरागी" आहे. घेरंड मुनींना अपेक्षित असलेली जीवनशैली बहुतेक साधकांच्या आवाक्याबाहेरील असली तरी समाधी लाभासाठी ती आवश्यक आहे. योगमार्गावरील यशाचे गमक अथक योगसाधने बरोबरच या वैराग्यशील, साध्या, सोप्या, सरळमार्गी जीवनशैलीत सुद्धा दडलेले आहे.

चंडकपालीला करत असलेल्या उपदेशाला पूर्णविराम देताना ते म्हणतात --

तत्त्वं लयामृतं गोप्यं शिवोक्तं विविधानि च ।
तेषां सङ्क्षेपमादाय कथितं मुक्तिलक्षणम् ॥
इति ते कथितं चण्ड समाधिर्दुर्लभः परः ।
यं ज्ञात्वा न पुनर्जन्म जायते भूमिमण्डले ॥

हे चंडकपाली, भगवान शिवाने सांगितलेले मनोलयाचे विविध मार्ग हे असे आहेत. हे मार्ग गोपनीय आहेत, मनोलय रुपी अमृत प्रकट करणारे आहेत. मुक्ती प्रदान करणारे हे सर्व मार्ग मी तुला सांगितले. अतिशय दुर्लभ अशा समाधी विषयी मी तुला सांगितले. जो या ज्ञानाच्या सहायाने समाधी अवस्था प्राप्त करतो त्याला भूमंडलावर पुनश्च जन्म घ्यावा लागत नाही.

भगवान शंकर म्हणजे योगमार्गाचा जनक आणि सर्वेसर्वा. आता जरा गंमत पहा. घेरंड मुनींनी कथन केलेला हा मार्ग आहे शैव मार्ग अथवा शिवमत. या शिवमता द्वारे योगी ज्या कुंडलिनीची उपासना करत असतो तो आहे शक्ती अथवा शाक्त मताचा भाग. घेरंड मुनींनी जी अंतिम स्थिती वर्णन केली आहे ती आहे वेदांत प्रणीत ब्रह्ममय अवस्था. यातील एक टप्पा आहे जड जगताची विष्णुमय अनुभूती. थोडक्यात घेरंड मुनींचा योग हा शैव, शाक्त, वैष्णव आणि वेदांत अशा विविध मतांचा समन्वय आहे. अमुकच एका मार्गाविषयी किंवा मताविषयी दुराग्रह त्यात नाही. शेवटी अंतिम स्थिती ही या सर्व ज्ञात आणि अज्ञात मार्गांच्या पलीकडली आहे.

असो.

ज्या कृपाळू महादेवाने योगमार्ग अलगद जगदंबेच्या कर्णकुहरात प्रकट केला तो श्रीकंठ सर्व मुमुक्षु योगसाधकांना वैराग्यशील योगजीवनाची कास धरण्याची प्रेरणा देवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 23 October 2023