गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र २०२५
महाशिवरात्री २०२५ च्या मुहूर्तावर श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रावरील लेखमाला पूर्ण झाल्यावर या स्तोत्रात जी शिवनामे आलेली आहेत त्यांच्या अर्थाबद्दल जिज्ञासा आणि कुतूहल स्तोत्र पाठकांच्या मनात निर्माण होण्यासाठी काहीतरी करावे असा विचार डोक्यात घोळू लागला. त्या वरूनच मग "दैनंदिन शिवनाम" ही संकल्पना सुचली. आजच्या गुढीपाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर या उपक्रमाचा शुभारंभ करत आहे.
श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रात एक हजार आठ शिवनामांचा संग्रह आहे. स्तोत्र वाचत असतांना बऱ्याचदा श्लोक एका पाठून एक वाचण्याकडे लोकांचा कल असतो. स्तोत्र म्हणण्याच्या ओघात त्यांतील नामांच्या अर्थाकडे काहीसे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक नामाचा स्वतःचा असा एक अर्थ आहे. त्या नामाने शंभू महादेवाचा आणि शिवतत्वाचा काही गुण प्रकाशित केलेला आहे किंवा त्याच्या काही वैशिष्ठ्य कडे संकेत केलेला आहे. नामा बरोबरच त्या नामाचा अर्थ कळला तर स्तोत्र पाठ अधिक सार्थकी लागेल, भक्तिवर्धन करणारा ठरेल हे निश्चित.
खरंतर श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रातील सर्वच्या सर्व नामांचे अर्थ एकाच वेळेस देणे मला सहज शक्य होते परंतु त्यांत श्लोकांप्रमाणे अनेक नामे पुढ्यात आल्याने वाचकाकडून नाम-अर्थ यांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका होता त्यामुळे तसे करणे मुद्दामच टाळले आहे. त्यापेक्षा एकेक नाम जर दररोज विचारात घेतले तर त्या-त्या नामावर आत्मचिंतन करणे साधकांना अधिक सोपे होईल. त्या दृष्टीने दररोज शिवनामाचा हा उपक्रम सुरू करत आहे. श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रातील नामांची नामावली करून रोज एकेक नाम त्याच्या संक्षिप्त भावार्था सहित पोस्ट करणार आहे. हे नाम फक्त वाचून थांबू नका. दिवसभर या नामाचा उपयोग चिंतन, मनन, आत्मपरीक्षण अशा साधानोपयोगी गोष्टींसाठी करा.
उदाहरण म्हणून श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रातील पहिले नाम घ्या --
ॐ स्थिराय नमः ॥
आता वाटायला हे नाम किती सोप्पे आहे परंतु त्यातील अर्थकडे लक्ष दिल्यास आत्मचिंतनासाठी अनेक प्रश्न उपलब्ध होतात जसे -- आध्यात्मिक दृष्टीने स्थिरता म्हणजे नक्की काय? शिवाला स्थिर का म्हटले आहे? आपण स्थिर आहोत का? दैनंदिन जीवनात आपली स्थिरता कधी ढासळते? कधी चांगली असते? शिवतत्वाची ही स्थिरता कोणत्या चक्रावर तुम्हाला अधिक जाणवते? चलायमान कुंडलिनी शिवात कशी स्थिरावते? ही आध्यात्मिक स्थिरता प्राप्त कशी करता येईल?
बघा. एका नामाने किती विविधांगी चिंतन करण्याची संधी तुम्हाला मिळते. गंमत अशी होते की ज्यांना अध्यात्मात फक्त वरवर रस आहे ते असे चिंतन कधी फारसे करत नाहीत. त्यांचा सगळा रस हा प्रामुख्याने अमुक संख्येने मंत्रजप करणे किंवा तमुक संख्येने स्तोत्र पाठ करणे इथपर्यंतच मर्यादित असतो. त्या पलीकडे जाऊन शिवतत्वाच्या अंतरंगात बुडी मारावी असे त्यांना कधी वाटत नाही. ध्यानमार्गावर वाटचाल करण्यासाठी मात्र असे चिंतन अत्यंत उपयोगी ठरते. अनेकदा असे सखोल चिंतन करत असतांना नकळत अशा काही गूढ गोष्टी हाती लागतात की ज्या हजारो मंत्रांच्या जपाने सुद्धा गवसणार नाहीत. तुम्हा वाचकांपैकी आत्मचिंतनाची सवय असलेल्या साधकांना या नाम-अर्थाचा यथायोग्य उपयोग होईल अशी आशा आहे.
गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री २०२५ पासून दररोज या वेब पेज वरती एक शिवनाम आणि त्याचा संक्षिप्त भावार्थ देणार आहे. नाम आणि अर्थ हा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत देणार आहे जेणेकरून सर्वांनाच उपयोगी पडेल. पूर्व प्रकाशित नामे सुद्धा उपलब्ध असतील जेणेकरून एखादा दिवस वेब पेजला भेट देता आली नाही तरी निसटलेले नाम वाचता येईल.
असो.
समस्त नामरूपात्मक जगताचे आदीकारण असलेला भगवान सदाशिव आणि जगदंबा पराशक्ती गिरिजा माई सर्व शिव उपासकांना योग मार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.