Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


त्रिपदा गायत्री ते अजपा गायत्री

आज महाशिवरात्रीचा परम पवित्र दिवस आहे. महाशिवरात्रीला रात्रकालीन उपासना अत्याधिक महत्वाची मानली गेली असली तरी आज सकाळपासूनच शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. तुम्ही सुद्धा आपापल्या श्रद्धेनुसार हे पर्व साजरे करणार आहात याची मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा.

मागे एका लेखात मी शंभू महादेवाने माझ्याकडून श्रीदत्त योगमार्गी उपासना कशी करवून घेतली ते सांगितले आहे. आज आठवणींच्या पसाऱ्यामधून माझ्या लहानपणीची एक आठवण सांगणार आहे. ही घटना घडली त्या वेळेस मी ना योगमार्गावर होतो, ना माझी अध्यात्माशी काही ओळख होती, ना कोणते प्रगल्भ धार्मिक अथवा आध्यात्मिक साहित्य वाचण्याचे ते दिवस होते. मी साधारणतः शाळेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतानाची ही घटना आहे.

नुकतेच माझे मौंजीबंधन पार पडले होते. त्यानंतर देवाच्या दर्शनाला जाण्याचा काहीतरी विधी होता. एवढ्या वर्षांनंतर आता मला नेमका तो काय विधी किंवा प्रथा होती ते काही लक्षात नाही परंतु मला शंभू महादेवाच्या दर्शनाला नेण्यात आले होते. ज्या देवळात मला नेण्यात आले होते ते तसं आमच्या परिसरातील खूप जुनं आणि प्रसिद्ध मंदिर. देवळाच्या परिसरात अन्य देवी-देवतांची छोटेखानी मंदिरे असली तरी मुख्य देव म्हणजे शंभू महादेव.

या शिवमंदिरात येण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. मंदिराच्या आसपास शहरातील मोठे मार्केट आणि बाजार असल्याने आजवर अनेक वेळा आई-वडिलांबरोबर मी या देवळात आलेलो होतो. कित्येक वेळा त्या भागात आई-वडिलांबरोबर काही घरगुती खरेदीला गेल्यावर घाईत असतांना देवळाच्या बाहेरूनच पायातील चप्पल बाजूला काढून ठेऊन नमस्कार करायचा, मंदिरात डोकाऊन काय चाललेय ते पटकन बघायचे आणि मग पुन्हा चप्पल पायात सरकावत पुढे गेलेल्या आई-वडिलांना पळत-पळत गाठायचे असेही घडत असे. आज उपनयन संस्काराचा भाग म्हणून तिथे जात असल्याने बरोबर आई-वाडिलां व्यतिरिक्त अन्य लोकं सुद्धा होती एवढंच.

या मंदिरातील शिवलिंग खूप मोठे आहे. गाभाऱ्यात थेट प्रवेश करून शिवलिंगाला स्पर्श करता येतो. हार-फुलं वगैरे वहाता येतात. मी आत गेलो आणि शिवलिंगाचे विधिवत दर्शन घेतले. बरोबर वडीलधारी मंडळी असल्याने ते जे सांगतील तेवढे करायचे एवढंच माझं काम होतं. सर्व विधी झाल्यावर मी शंभू महादेवाला नमस्कार केला. त्या वेळेस मला काय वाटलं कोणास ठाऊक पण डोळे बंद करून त्या शिवलिंगाला नमस्कार करत असतांना मी मनातल्या मनात मौंजीबंधनात शिकलेला गायत्री मंत्र म्हणू लागलो. वास्तविक पहाता समोर होता भगवान शंकर पण मी त्याला नमस्कार करतांना म्हणत होतो त्रिपदा गायत्री मंत्र. ना मला कोणी हे असं कर म्हणून सांगितले होते ना कोठे मी असं काही वाचले होते. भगवान शंकर आणि गायत्री मंत्र यांचा परस्पर काही संबंध आहे का हे सुद्धा मला त्या वयात ठाऊक नव्हते. निव्वळ अंतर्मनाची एक उत्स्फूर्त क्रिया असंच या गोष्टीचे वर्णन करावे लागेल.

अल्प काळ माझ्या मनाचा हा उपक्रम सुरू असेल बहुदा आणि मग बरोबरच्या मंडळींनी "चल" म्हटल्याबरोबर मी तिथून निघालो. हे सर्व करत असतांना विशेष असे काहीच घडले नाही. घरी गेल्यावर अन्य गोष्टींत गुंतून गेलो. त्या दिवशी आणि पुढे काही दिवस रोज रात्री मला एक स्वप्न पडत असे -- मी शिवलिंगावर गायत्री मंत्र लिहीत आहे. कधी भस्माने तर कधी चंदनाने तर कधी गंधाने. लिहीत असतांना मंत्र कधी मोठ्याने म्हणत असे तर कधी पुटपुटत असे तर कधी मौनपणे लिहीत असे. शिवलिंग सुद्धा वेगवेगळी असायची. कधी एकदम तेजस्वी आणि लखलखीत तर कधी अस्पष्ट आणि धूसर. कधी आकाराने लहान कधी आकाराने मध्यम तर कधी आकाराने खूप मोठी. कधी धातूची तर कधी पाषाणाची तर कधी अपरिचित अशा गोष्टींनी बनलेली.

माझं त्या वेळच वय लक्षात घेता ह्या स्वप्नाचा अर्थ काय किंवा या स्वप्नाला काही आध्यात्मिक पार्श्वभूमी असेल का वगैरे असे प्रश्न मनात आले नाहीत. या स्वप्नात काही महत्वाचा संकेत वगैरे असेल असं काही कळलं नाही. त्यामुळे या स्वप्नाविषयी घरातल्या कोणाला काही सांगावे असेही कधी वाटले नाही. नंतरच्या काळात शाळा आणि त्या वयाला साजेशा दैनंदिन गोष्टी यात पुन्हा गुरफुटून गेलो. कालांतराने या स्वप्नाची आठवण सुद्धा पुसट होत गेली.

पुढे जेंव्हा ज्ञानेश्वरीशी गाठ पडल्या नंतरच्या काळात मला शंभू महादेवाने मायबाप बनून त्र्यंबकेश्वरला स्वपदीक्षा दिली तेंव्हा लहानपणचे हे विस्मरणात गेलेले स्वप्न पुन्हा मनामध्ये ठसठशीत पणे जागे झाले. मनोमन "कनेक्टिंग द डॉटस" होत गेले. लहानपणी मला कल्पनाही करता आली नसती की ज्या शंभू महादेवा पुढे आपण त्रिपदा गायत्री म्हणत आहोत तो शंभू महादेव एक दिवस आपली ओळख अजपा गायत्रीशी करवून देऊन आपल्याला मंत्र-उपदेश-साधना प्रदान करणार आहे.

असो.

शिवमहिमा अगाध आहे. अथांग आहे. ज्याचे वर्णन करण्यास वेद-पुराणे-शास्त्र कमी पडतात त्याचे वर्णन माझ्यासारखा यःकश्चित योगमार्गी कसं बरं करणार.

आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी जगदनियंता श्रीकंठ सर्व वाचकांना अजपा जप आणि शांभवी मुद्रेची कास धारण्याची प्रेरणा देवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 08 March 2024