Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


लयसिद्धी प्रदान करणारी परम गोपनीय योनिमुद्रा समाधी

कुंभकाचा उपयोग करून मनाला जणू मूर्च्छित करता येते हे आपण मागील लेखात पाहिले. घेरंड मुनींनी सांगितलेल्या समाधी विधींपैकी अजुक एक विधी म्हणजे परम गोपनीय मानली गेलेली योनिमुद्रा.

योनिमुद्रेने जी समाधी प्राप्त होते त्याला म्हणतात लयसिद्धी. योनिमुद्रेकडे जाण्यापूर्वी लय आणि लययोग म्हणजे काय ते थोडक्यात माहित असणे आवश्यक आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर लय म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत विलीन होणे अथवा विरघळणे. योगशास्त्राच्या दृष्टीने सांगायचे झाले तर मनातील विचारांना अन्य कशात तरी विलीन करून मन रिकामे अर्थात निर्विचार करण्याची प्रक्रिया म्हणजे लय. हा मनोलय दोन स्तरावर असतो -- पंचमहाभूतांच्या आणि नादाच्या. जड शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वाई आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले असते. या तत्वांच्या सूक्ष्म तन्मात्रा मनामध्ये वास करत असतात. काही यौगिक प्रक्रियांद्वारे या सूक्ष्म तत्वांचा एकमेकात लय घडवून मनोलय साधला जातो. पृथ्वीचा लय जळात, जलाचा लय अग्नीत, अग्नीचा लय वायूत, वायूचा लय आकाशात आणि अंततः आकाशाचा लय मनात असा लय साधत शेवटी मनाला अ-मन बनविले जाते.

दुसरा लय असतो नादाचा. काही यौगिक क्रियांद्वारे अनाहत नाद श्रवण करण्याचा अभ्यास केला जातो. सुरवातीला अनाहत नाद अर्थहीन आणि असंबद्ध असतात. नित्य अभ्यासाने हळूहळू ते सूक्ष्म होत जातात. असे दहा प्रकारचे नाद सांगितले आहेत. स्थूल नादांचा लय सूक्ष्म नादात करत करत अंततः ओंकाराचा नाद अनुभवाला येतो. तत्वांचा लय आणि नादाचा लय हे वरकरणी भिन्न वाटत असले तरी त्यांचा परस्परांशी सूक्ष्म संबंध आहे. फार खोलात न जाता येथे एवढे सांगणे पुरेसे आहे की तत्वलय आणि नादलय हे मनोलयाला कारक आहेत आणि म्हणूनच त्यांचा उपयोग योनिमुद्रेत केला जातो.

योनिमुद्रेने समाधी अवस्था प्राप्त कशी करायची ते सांगतांना घेरंड मुनी म्हणतात --

योनिमुद्रां समासाद्य स्वयं शक्तिमयो भवेत् ।
सुश‍ृङ्गाररसेनैव विहरेत्परमात्मनि ॥
आनन्दमयः सम्भूत्वा ऐक्यं ब्रह्मणि सम्भवेत् ।
अहं ब्रह्मेति चाऽद्वैतं समाधिस्तेन जायते ॥

याचा अर्थ असा की साधकाने योनिमुद्रा धारक करून स्वतः शक्तिमय बनावे. त्यानंतर शृंगार रसात आकंठ डुंबत परमात्म्याबरोबर विहार करावा. परमात्म्या बरोबर असा संगम घडला की साधक आनंद स्वरूप होतो. त्याला "मी ब्रह्म आहे" अशी अद्वैत अनुभूती येते.

घेरंड मुनींनी केवळ दोनच श्लोकात योनिमुद्रा समाधी विषयी माहिती दिली आहे परंतु या दोन श्लोकांचा अर्थ नीट उमगण्यासाठी अनेक वर्षांची अथक साधना करावी लागते. श्रीगुरूमंडलानी आखून दिलेल्या मर्यादेमुळे यातील योगगर्भ गुढार्थ प्रकट करता येणार नाही परंतु काही सूक्ष्म गोष्टींकडे संकेत करण्याचा प्रयत्न करतो.

घेरंड मुनी म्हणतात की साधकाने योनिमुद्रा करावी आणि स्वतः शक्तिमय बनावे. हा उपदेश वाटतो तेवढा सोपा नाही. स्वतः शक्तिमय व्हावे म्हणजे नक्की काय ते समजून घ्यायला हवे. कुंडलिनी योगशास्त्रानुसार प्रत्येक मानव पिंडात पुरुष तत्व आणि स्त्री तत्व विद्यमान आहे. योगमतानुसार त्यांना अनुक्रमे शिव आणि शक्ती असे म्हणतात. शिवतत्वाचे क्षेत्र आहे सहस्रार चक्र आणि शक्तीतत्वाचे क्षेत्र आहे मूलाधार चक्र. शक्तिमय बनावे म्हणजे मुलाधारातील शक्तीला अर्थात कुंडलिनीला जागृत करावे. या शक्तीला सहस्रारातील शिवाबरोबर एकरूप करावे. शिव-शक्ती एकरूप करण्यासाठी विशिष्ठ यौगिक प्रक्रिया आणि मंत्र आहेत जे फक्त जाणकार गुरूच तुम्हाला प्रदान करू शकतो. पुस्तकात वाचून ते फारसे कळणारे नाहीत.

शिव आणि शक्तीचा शृंगार अनुभवण्याचा यौगिक विधी जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांचे मिलन घडवावे आणि त्या मिलनाचा अमृतानंद योग्याने उपभोगावा. शिव हे पुरुष तत्व आणि शक्ती हे स्त्री तत्व असल्याने घेरंड मुनींनी येथे स्त्री-पुरुष मिलनाच्या परिभाषेत ह्या अवस्थेचे वर्णन केलेले आहे. प्रत्यक्ष अनुभूतीच्या दृष्टीने मात्र हा अनुभव योग्याला द्वैताच्या पुढे घेऊन जाणारा आणि अद्वैत भूमीवर आरूढ करणारा असा आहे. "मी ब्रह्म आहे" अशी अद्वैतानुभूती प्रदान करणारा आहे.

आता ही योनिमुद्रा साधायची कशी? त्याविषयी घेरंड मुनी सांगतात --

सिद्धासनं समासाद्य कर्णाक्षिनासिकामुखम् ।
अङ्गुष्ठतर्जनीमध्यानामादिभिश्च धारयेत् ॥
काकीभिः प्राणं सङ्कृष्य अपाने योजयेत्ततः ।
षट्चक्राणि क्रमाद्ध्यात्वा हंसमनुना सुधीः ॥
चैतन्यमानयेद्देवीं निद्रिता या भुजङ्गिनी ।
जीवेन सहितां शक्तिं समुत्थाप्य पराम्बुजे ॥
शक्तिमयः स्वयं भूत्वा परं शिवेन सङ्गमम् ।
नानासुखं विहारं च चिन्तयेत्परमं सुखम् ॥
शिवशक्तिसमायोगादेकान्तं भुवि भावयेत् ।
आनन्दमानसो भूत्वा अहं ब्रह्मेति सम्भवेत् ॥
योनिमुद्रा परा गोप्या देवानामपि दुर्लभा ।
सकृत्तु लाभसंसिद्धिः समाधिस्थः स एव हि ॥

प्रथम सिद्धासनात बसून कान, नाक, डोळे, मुख अशी छिद्रे हाताच्या अंगठा आणि तर्जनीसह अन्य बोटांनी बंद करावीत. यालाच योगशास्त्रात षण्मुखी मुद्रा असेही म्हणतात. अनाहत नाद श्रवण करण्यासाठी षण्मुखी मुद्रा आवश्यक मानली जाते. त्यानंतर काकीमुद्रे द्वारे प्राण आणि अपान यांचे मिलन घडवावे. मग हंस मंत्राद्वारे षटचक्रांचे क्रमशः भेदन करत कुंडलिनीला जागृत करून जीवात्म्याला सहस्रार चक्रात घेऊन जावे. शिव आणि शक्ती यांचा संगम घडवून "मी ब्रह्म आहे" अशा आनंदात रममाण व्हावे. घेरंड मुनी म्हणतात -- ही योनिमुद्रा परम गोपनीय असून देवानांही दुर्लभ आहे. योनिमुद्रा सिद्ध झाली की योगी समाधी साधू शकतो.

योनिमुद्रेचे वरील वर्णन अत्यंत त्रोटक आणि अपूर्ण आहे. तरीही एक योनिमुद्रा साधण्यासाठी किती अन्य यौगिक प्रक्रियांचा वापर करावा लागतो ते पहा -- षण्मुखी मुद्रा, काकीमुद्रा, प्राण आणि अपान संयोग, हंस मंत्र, षटचक्र भेदन, कुंडलिनी अथवा शक्ती चालन, शिव आणि शक्ती सामरस्य आणि अंततः अहं ब्रह्म असा मनोभाव. योनिमुद्रा वरकरणी सोप्पी वाटली तरी किती क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे ते सहज लक्षात येईल.

योनिमुद्रा परम गोपनीय असून ती देवानांही दुर्लभ आहे असे घेरंड मुनी म्हणतात. याचा अर्थ उघड आहे की त्यांनी योनिमुद्रेचे जे काही वर्णन प्रकट पणे दिलेले आहे ते फक्त एक ढोबळमानाने कल्पना यावी एवढेच आहे. त्यांनी योनिपुद्रेचा संपूर्ण विधी बिलकुल प्रकट केलेला नाही. मागे एका लेखात या गोपनीयते विषयी मी अधिक विस्ताराने लिहिले आहे.

समाधी लाभ आणि लयसिद्धी हा योनिमुद्रेचा प्रधान फायदा आहे परंतु योनिमुद्रेचे अन्य फायदेही आहेत. त्यांतील काही खालील प्रमाणे --

ब्रह्महा भ्रूणहा चैव सुरापी गुरुतल्पगः ।
एतैः पापैर्न लिप्येत योनिमुद्रानिबन्धनात् ॥
यानि पापानि घोराणि उपपापानि यानि च ।
तानि सर्वाणि नश्यन्ति योनिमुद्रानिबन्धनात् ।
तस्मादभ्यसनं कुर्याद्यदि मुक्तिं समिच्छति ॥

घेरंड मतानुसार योनिमुद्रेच्या अभ्यासाने ब्रह्महत्या, भृणहत्या, मद्यपान, गुरुदारागमन इत्यादी महापातकांचा नाश होतो. पृथ्वीतलावरील समस्त पापे, महापापे आणि उपपापे योनिमुद्रेच्या अभ्यासाने नष्ट होतात. जन्मजन्मांतरीची कळत नकळत घडलेली पापे मुक्तीमार्गात अडथळा आणतात त्यामुळे ज्याला मुक्तीची अभिलाषा आहे त्याने योनिमुद्रा अवश्य धारण करावी.

असो.

ज्या सांब सदाशिवाचे नामस्मरण समस्त पापांना दग्ध करते तो शंभू महादेव सर्व योगसाधकांना रहस्यमयी आणि गोपनीय योनिमुद्रेच्या प्राप्तीकरता प्रेरित करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 August 2023