Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


प्राणशक्ती जीवाला चेंडू प्रमाणे खेळवते

लेखमालेच्या मागील भागात आपण श्रीगोरक्षनाथांचे शरीरातील नाडीजाला संबंधीचे विचार जाणून घेतले. एकूण बहात्तर हजार नाड्या कंदस्थानातून उगम पाऊण शरीरातील विविध भागात जातात हे आपण माहीत करून घेतले. या नाड्यामधून प्राण ऊर्जा अव्याहतपणे वहात असते. त्या प्राण उर्जे विषयी आता गोरक्षनाथ महाराज काही सांगत आहेत.

जीव परमेश्वराने ठरवून दिलेली सुखदु:खं भोगण्यासाठी देह धारण करत असतो. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते त्याप्रमाणे धारण केलेला देह चालविण्यासाठी जीवाला ऊर्जेची गरज असते. योगशास्त्रात या ऊर्जेला प्राण असे म्हणतात. ही प्राण ऊर्जा शरीरातील निरनिराळ्या अवयवांपर्यंत पोहोचविण्यासाठी बहात्तर हजार नाड्यांचा वापर केला जातो.

प्राण ऊर्जा ही जरी एकच असली तरी कार्यानुसार आणि अभिव्यक्ति नुसार तिचे वेगवेगळे प्रकार योगशास्त्रात सांगितलेले आहेत. त्या पैकी दहा प्रकार अधिक महत्वाचे मानले गेले आहेत. तेच दहा प्रकार आता गोरक्षनाथ सांगत आहेत --

प्राणापानौ समानश्च ह्युदानो व्यान एव च ।
नागः कूर्मश्च कृकरो देवदत्तो धनञ्जयः ॥
नागाद्याः पञ्च विख्याताः प्राणाद्याः पञ्च वायवः ।
एते नाडिसहस्रेषु वर्तन्ते जीवरूपिणः ॥

प्राण शक्तीचे दहा महत्वाचे प्रकार या प्रमाणे -- प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. वरील दहा प्रकारांपैकी पहिले पाच जे आहेत ते "पंचप्राण" म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या सर्व प्राणांच्या माध्यमातून जीव प्राणरूप होऊन संपूर्ण नाडीजालातून भ्रमण करतो. यातील प्राण आणि अपान हे विशेष महत्वाचे आहेत कारण अन्य प्राण त्यांच्यावरच अवलंबून आहेत.

पुढे जाण्यापूर्वी एक अल्पसा विराम घ्या आणि जरा सखोल चिंतन करा -- गोरक्षनाथ म्हणतात की जीव प्राणरूपाने देहात भ्रमण करतो. याचा अर्थ असा आहे का की प्राण आणि जीव एकच आहेत? सुख आणि दु:ख भोगतो तो प्राण की जीव? देह ठेवल्यावर प्राण गेले असे आपण म्हणतो. हे "गेले" म्हणजे नक्की काय गेले आणि कुठे गेले? स्थूल शरीराशिवाय प्राण अस्तित्वात असू शकतात का? जीवाला प्राण एवढे "जीव की प्राण" का बरं असतात? नीट शांत चित्ताने या प्रश्नांचा विचार करा. सगळ्या गोष्टी काही ग्रंथांत प्रकटपणे दिल्या जात नाहीत. त्या गुरुमुखातून आणि स्वाध्यायातून जाणून घ्यायच्या असतात.

प्राण आणि अपान हे विशेष महत्वाचे आहेत असं मी आत्ताच सांगितलं. त्याचं कारण आता गोरक्षनाथ विषद करत आहेत --

प्राणापानवशो जीवो ह्यधश्चोर्ध्वं च धावति ।
वामदक्षिणमार्गेण चञ्चलत्वान्न दृश्यते ॥
आक्षिप्तो भुवि दण्डेन यथोच्चलति कन्दुकः ।
प्राणापानसमाक्षिप्तस्तथा जीवोऽनुकृष्यते ॥
रज्जुबद्धो यथा श्येनो गतोऽप्याकृष्यते ।
गुणबद्धस्तथा जीवः प्राणापानेन कृष्यते ॥
अपानः कर्षति प्राणः प्राणोऽपानं च कर्षति ।
ऊर्ध्वाधः संस्थितावेतौ यो जानाति स योगवित् ॥

गोरक्षनाथ म्हणतात की प्राण आणि अपान यांच्या वशीभूत होऊन जीव वर आणि खाली धावत असतो. प्राण हा शरीराच्या वरच्या भागात म्हणजे छाती, फूफ्फूसे ते नाभी इथपर्यंत सक्रिय असतो तर अपान हा नाभी पासून ते मलद्वारापर्यंत सक्रिय असतो. एक वर जाणारा आणि दूसरा खाली जाणारा असे हे परस्पर विरोधी वायूचे प्रवाह असतात. श्वास आणि प्रश्वास हे डाव्या आणि उजव्या नाकापुडीच्या मार्गाने अहोरात्र घडत असतात. या श्वासांबरोबर अर्थात प्राण आणि अपानाच्या गतीने जीव सुद्धा झोके घेत असतो.

जीवाच्या या झोक्यांना गोरक्षनाथांनी एक छान उपमा दिली आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे जमिनीवर अथवा भिंतीवर काठीने आपटलेला चेंडू परत परत उसळ्या मारत असतो त्याप्रमाणे जीव हा प्राण आणि अपान यांच्या सपाट्यांत सापडलेला असतो. प्राण आणि अपान हे जणू त्या जीवाला एकमेकांकडे टोलवत त्याच्याशी खेळत असतात.

पुढे ते अजून एक उदाहरण देतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे दोरीने बांधलेला बहिरीससाणा / ससाणा दूर उडून गेला की त्याला दोरी ओढून परत बोलावले जाते त्याप्रमाणे जीवाला प्राण आणि अपान आपल्याकडे ओढून घेतात. जीवाला आपल्याकडे ओढण्यासाठी ते जी दोरी वापरतात ती असते त्रिगुणांची. जीव जोवर जीवंत आहे तोवर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या आधीन राहूनच कार्य करत असतो. ही गुणांची दोरी प्राण आणि अपानाला आयती सापडते आणि ते आपला खेळ सुरू ठेवतात.

वरील सर्व प्राण आणि अपानाच्या खेळाकडे अजपा योगाच्या नजरेतून पहाण्याचा प्रयत्न करा. अजपा योगात जो जप घटित होत असतो तो श्वासाच्या माध्यमातून होत असतो. श्वास आणि प्रश्वास हे प्राण आणि अपानाच्या गतीमुळेच घडत असतात. याचा अर्थ असा की जीवदशा ही अजपा जपाशी अत्यंत जवळची आहे. एकदा प्राण अपानाला आपल्याकडे ओढतो आणि मग अपान प्राणाला आपल्याकडे ओढतो. ही श्वास-प्रश्वास साखळी अहोरात्र सुरू असते. गोरक्षनाथ म्हणतात की हा प्राण-अपानाचा अर्थात अजपा गायत्रीचा खेळ जो जाणतो तो खरा योगशास्त्रातला मर्मज्ञ.

थोडे विषयांतर झाले तरी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आहे. हा लेख संपवता संपवता सहज कॅलेंडरकडे नजर गेली तर नोंद होती -- श्री लाहिरी महाशय जयंती. ज्यांना कोणाला क्रियायोगाची थोडीतरी माहिती आहे त्यांना श्यामा चरण लाहिरी हे नाव अपरिचित नाही. परमहंस योगानंदांचे गुरु स्वामी युक्तेश्वर गिरी यांचे ते गुरु. थोडक्यात सांगायचे तर महावतार बाबाजी, लाहिरी महाशय, स्वामी युक्तेश्वर गिरी आणि परमहंस योगानंद अशी ती गुरुपरंपरा. मी जेंव्हा योगामार्गावर अगदी नवखा होतो तेंव्हा परमहंस योगानंद आणि युक्तेश्वर गिरी यांचे साहित्य अभ्यासले होते आणि लाहीरी महाशयांचे क्रियायोगातील अमूल्य योगदान सुद्धा.

शंभू महादेवाने शक्तिपातपूर्वक अजपा गायत्रीची आणि कुंडलिनी योगाची दीक्षा देऊन मला माझे गंतव्य दाखवले त्यामुळे मला अन्य साधना मार्गांची कधी गरज पडली नाही परंतु लाहीरी महाशयांच्या क्रियायोग प्रणालीतील कुंडलिनी प्राणायाम, खेचरी मुद्रा, शांभवी मुद्रा, तालव्य क्रिया, नाभी क्रिया, महामुद्रा, योनिमुद्रा, ओंकार क्रिया, ठोकर क्रिया वगैरे वगैरे योगक्रिया ही सुद्धा आदिशक्ती कुंडलिनी आणि प्राण शक्तिचीच उपासना आहे. शंभू जती गोरक्षनाथ ज्या प्राणशक्ती विषयी आपल्याला सांगत आहेत तीच शक्ती वेगवेगळ्या परंपरांत वेगवेगळ्या क्रियांद्वारे जागवली जाते, आराधिली जाते एवढंच. ज्यांना लाहीरी महाशयांच्या क्रियायोगाची सखोल माहिती आहे त्यांना त्या प्रणालीतील आणि अजपा योगातील समान क्रिया, समान धागे, समान घटक आणि घनिष्ठ संबंध प्रकर्षाने जाणवल्याशिवाय रहाणार नाही.

असो.

आपल्या लाडक्या प्राणसख्याची अर्थात शंभू महादेवाची "पंचप्राण" असलेली भगवती जगदंबा कुंडलिनी सर्व अजपा योग साधकांवर अखंड कृपेचा वर्षाव करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 30 September 2024