Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


स्थूल ध्यानाचा दुसरा प्रकार

मागील लेखात आपण घेरंड मुनींनी विषद केलेला स्थूल ध्यानाचा पहिला प्रकार जाणून घेतला. हा पहिला प्रकार योगमार्गावर नवीन असलेल्या साधकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अनाहत चक्रात आपल्या इष्ट देवतेचे गुरूच्या निर्देशानुसार ध्यान करणे असे या प्रथम प्रकाराचे स्वरूप आहे. हे ध्यान पक्व झाले की स्थूल ध्यानाच्या काहीशा प्रगत अशा या दुसऱ्या प्रकाराकडे जाता येईल. स्थूल ध्यानाचा हा दुसरा अभ्यास नेमका काय आहे ते या लेखात आपण जाणून घेऊ.

स्थूल ध्यानाचा दुसरा प्रकार विषद करतांना घेरंड मुनी म्हणतात -

सहस्रारे महापद्मे कर्णिकायां विचिन्तयेत्।
विलग्नसहितं पद्मं द्वादशैर्दलसंयुतम्॥
शुक्लवर्णं महातेजो द्वादशैर्बीजभाषितम्।
हसक्षमलवरयुं हसखफ्रें यथाक्रमम्॥
तन्मध्ये कर्णिकायां तु अकथादिरेखात्रयम्।
हळक्षकोणसंयुक्तं प्रणवं तत्र वर्तते॥
नादबिन्दुमयं पीठं ध्यायेत्तत्र मनोहरम्।
तत्रोपरि हंसयुग्मं पादुका तत्र वर्तते॥
ध्यायेत्तत्र गुरुं देवं द्विभुजं च त्रिलोचनम्।
श्वेताम्बरधरं देवं शुक्लगन्धानुलेपनम्॥
शुक्लपुष्पमयं माल्यं रक्तशक्तिसमन्वितम्।
एवंविधगुरुध्यानात्स्थूलध्यानं प्रसिध्यति॥

घेरंड मुनी म्हणतात -- योग्याने सहस्रार चक्र नामक जे महापद्म आहे त्याच्या कर्णिकेत अर्थात मध्यभागी एका बारा पाकळ्यांनी बनलेल्या कमळाचे ध्यान करावे. हे द्वादशदल युक्त पद्म शुभ्र वर्णाचे असून ते अतिशय तेजस्वी आहे. या कमलाच्या बारा पाकळ्यांवर अनुक्रमे ह, स, क्ष, म, ल, व, र, युँ, ह, स, ख, फ्रें अशी बीजाक्षरे अंकित आहेत. या बारा दलांच्या कमलाच्या मध्यभागी अ, क, थ अशा तीन रेखांनी बनलेला त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या तीन कोनांत अनुक्रमे ह, ल, क्ष अशी बीजाक्षरे आहेत. या त्रिकोणाच्या मध्यभागी ओंकार अंकीत केलेला आहे.

योग्याने पुढे असे ध्यान करावे की याच त्रिकोणात नाद आणि बिंदू यांनी युक्त असे एक पीठासन आहे. या सुंदर आणि मनोहर अशा पीठासनावर दोन हंस पक्षी विराजमान आहेत. ते हंस पक्षी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुरुपादुकाच आहेत.

पुढे असे ध्यान करावे की याच ठिकाणी योग्याचे गुरुदेव विराजमान झाले आहेत. दोन रेखीव भुजा, दोन प्रेमळ नेत्र, शुभ्र वस्त्रे, शुभ्र चंदनाची उटी ल्यालेल्या गुरुदेवांनी पांढऱ्या फुलांच्या माळा धारण केलेल्या आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला त्यांची रक्तवर्णी शक्ती उभी आहे.

अशा प्रकारे ध्यान केल्याने स्थूल ध्यान सिद्ध होते.

वरील विवेचन वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की स्थूल ध्यानाचा हा दुसरा प्रकार काहीसा कठीण आणि क्लिष्ट आहे. किंबहुना घेरंड मुनींनी हा प्रकार दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्याचे कारणही तेच आहे. पहिल्या प्रकाराचा बराच काळ सराव घडला की त्यानंतरच हा दुसरा अभ्यास सुरु करावा असा अलिखित निर्देश त्यामागे आहे. वरील ध्यान विधी नीट कळण्यासाठी तो आपापल्या सदगुरूंकडून समजावून घेणे अगत्याचे आहे. त्याचे कारण असे की त्यांत सूक्ष्म बीजमंत्रांचा समावेश आहे. हे बीजमंत्र नक्की कसे म्हणायचे, ते एक-एक म्हणायचे की अन्य कोणत्या मंत्रात मिसळून म्हणायचे, जो त्रिकोण वर्णन केलेला आहे तो वर टोक असलेला की खाली टोक असलेला, पादुकांना हंस का म्हटले आहे वगैरे वगैरे अनेक सूक्ष्म गोष्टी त्यांत आहेत. हे सर्व ज्ञान गुरुमुखातून स्वीकारावे हे उत्तम. त्यामुळे येथे मी केवळ सुलभ भावानुवाद दिलेला आहे.

वरील ध्यानप्रकारातील काही वैशिष्ठ्ये आणि सूक्ष्म संकेत अतिशय महत्वाचे आहेत. येथे थोडक्यात त्यांकडे निर्देश करतो म्हणजे विषयाची खोली लक्षात येईल.

स्थूल ध्यानाच्या पहिल्या प्रकारात घेरंड मुनींनी अनाहत चक्राचा वापर सांगितला होता. या दुसऱ्या प्रकारात मात्र ते सहस्रार चक्राचा उपयोग करतात. मागील लेखात आपण पाहिले की अनाहत चक्र हा चक्र प्रणालीचा मध्यबिंदू आहे आणि त्यामुळे तो वैराग्याचा सुद्धा "मध्यबिंदू" आहे. हा मध्यबिंदू नवीन साधकांना साधता येणे प्रयत्नसाध्य आहे. या उलट सहस्रार हा चक्र प्रणालीचा सर्वोच्च टोकाचा बिंदू आहे. पर्यायाने तो प्रखर वैराग्याचा सुद्धा द्योतक आहे. जेंव्हा साधकाच्या जीवनात वैराग्य आणि कर्मयोग खऱ्या अर्थाने रुजेल तेंव्हाच त्याला हा स्थूल ध्यानाचा दुसरा प्रकार सिद्ध होईल.

घेरंड मुनी सहस्रार चक्राला महापद्म म्हणतात. एवढेच नाही तर या महापद्माचा एक छोटा भाग ते बारा पाकळ्यांच्या एका उप-कमलाच्या स्वरूपात वर्णन करतात. सहस्रार चक्राचे असे "विभाजन" सर्वच योगग्रंथांत आपल्याला आढळत नाही.

संस्कृत वर्णमाला आणि चक्रसंस्था यांचा घनिष्ठ संबंध आहे. या बारा पाकळ्यांच्या कमलावर जी अक्षरे सांगितली आहेत ती अक्षरे म्हणजे खरंतर बीजमंत्र आणि मातृका आहेत. त्यांचा ध्यानासाठी उपयोग कसा करायचा हा प्रगत साधकांसाठी असलेला विषय आहे. वेगवेगळ्या परंपरांत हे मंत्र वेगवेगळ्या प्रकाराने वापरलेले तुम्हाला आढळतील. त्यामुळे त्यांचा वापर तुमच्या गुरुकडून अथवा एखाद्या जाणकाराकडून नीट समजावून घ्यावा.

घेरंड मुनींनी येथे नाद-बिंदू-कला अशा तीन आगमोक्त संकल्पनांचा त्रोटक उल्लेख केला आहे. या संकल्पना प्रामुख्याने प्राचीन शिव आणि शाक्त आगम ग्रंथांमध्ये प्रचुर प्रमाणात आपल्याला आढळतात. कुंडलिनी योग हा भगवान शिव प्रणीत मार्ग असल्याने या मार्गावरही त्या संकल्पनांचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो.

सहस्रार चक्र हे सर्वोच्च कमल. येथे खरंतर परमात्म्याचा निवास मानला गेला आहे. अशा या सर्वोच्च ठिकाणी घेरंड मुनी ध्यान करायला सांगतात ते आपापल्या सद्गुरूंचे. सद्गुरू हे ज्ञानी असल्याने आणि त्यांच्या मुखातून हा योग तुम्हाला प्राप्त झालेला असल्याने तुमच्यासाठी ते शिवस्वरूपच आहेत असे घेरंड मुनींना सांगायचे आहे. आधुनिक काळात अशा प्रकारची गुरुनिष्ठा आणि श्रद्धा क्वचितच आढळत असली तरी सद्गुरूंना सहस्रार चक्रात मानाचे स्थान देण्यामागचे कारण हे असे आहे.

घेरंड मुनींनी गुरुपादुकांकडे केलेला निर्देश सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. त्यांनी गुरुपादुकंना हंसयुग्म का बरे म्हटले आहे? त्यांनी हंस पक्ष्यांचेच रूपक का वापरले आहे? त्यांत काही सूक्ष्म संकेत आहे का? हंस म्हणजे पक्षी की अन्य काही? या सगळ्या प्रश्नांवर नीट विचार करा. येथे विस्ताराने सांगत बसल्यास विषयांतर होईल आणि लेखही खूप लांबेल. त्यामुळे फार खोलात न जाता केवळ तुमचे लक्ष वेधतो आणि पुढे जातो.

घेरंड मुनींनी वर्णन केलेले सद्गुरूंचे ध्यान सुद्धा वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ते केवळ सद्गुरूंचे ध्यान सांगत नाहीत तर सद्गुरुंच्या शक्तीचे सुद्धा ध्यान करायला सांगतात. यातही आपल्याला आगमोक्त संकल्पनेची छटा पहायला मिळते. शिवमतानुसार संपूर्ण ब्रह्मांडात शिव-शक्ती युगुल व्याप्त आहे. त्रिदेव सुद्धा एकटे कार्य करत नाहीत तर ब्रह्मा-सरस्वती, विष्णू-लक्ष्मी, शिव-पार्वती अशा आपापल्या शक्तीसहित कार्यरत असतात.

येथे सद्गुरुना त्यांच्या शक्ती सहित मानाचे स्थान दिलेले आहे. शक्ती ही स्त्री-स्वरूपा मानली गेली असली तरी येथे शक्ती म्हणजे पत्नी अथवा भार्या असा ढोबळ अर्थ घेऊन चालणार नाही. सद्गुरू हे कुंडलिनी शक्ती पूर्णतः जागृत केलेले असल्याने त्यांची शक्ती म्हणजे शिव-शक्ती मिलनाचा आनंद चाखलेली कुंडलिनी होय. म्हणूनच घेरंड मुनींनी त्या शक्तीचा रंग रक्तवर्णी सांगितला आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्या प्रमाणे कुंडलिनी शक्ती ही "नागिणीचे पिले कुंकुमे नाहले" अशी कुंकुमवर्णीच अर्थात रक्तवर्णीच आहे.

तर घेरंड मुनींनी विषद केलेल्या स्थूल ध्यानाचा दुसरा प्रकार हा असा आहे. काहीसा अवघड आहे हे खरं परंतु सद्गुरुंच्या आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व काही घडून येते. योग्य मार्गदर्शनाबरोबरच साधकाचे प्रयत्न आणि चिकाटी योगमार्गावर परम आवश्यक आहेत. घाई न करता टप्प्याटप्प्याने पहिला प्रकार आणि नंतर दुसरा प्रकार असा हा अभ्यास आहे. श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण अंगी बाणले तर तो प्रयत्नसाध्य आहे.

स्थूल ध्यानाचे दोन प्रकार सांगितल्यावर घेरंड मुनी आता ज्योतीर्ध्यानाकडे वळतील. लेखमालेच्या पुढील भागात त्याविषयी विस्ताराने जाणून घेऊ.

असो.

आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व ध्यानप्रेमी वाचकांचे ध्यान तिळातिळाने प्रगल्भ होवो आणि गुळाप्रमाणे गोडवा प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 January 2023