Advanced Ajapa Dhyana Yoga : Tap the power of breath, mantra, mudra, and meditation for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र -- एक अद्भुत उपासना

लवकरच महाशिवरात्र येत आहे. तुमच्या पैकी जे अनुभवी साधक आहेत त्यांनी महाशिवरात्रीला कोणती साधना / उपासना करायची ते कदाचित ठरवले सुद्धा असेल. जे अध्यात्म मार्गावर नवखे आहेत त्यांना कदाचित या पावन पर्वावर कोणती उपासना करावी असा प्रश्न पडला असेल. अशा साधकांसाठी आज श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राद्वारे भगवान शिवशंकराची आराधना कशी करावी त्यांची थोडक्यात माहिती देणार आहे.

कोणत्याही आध्यात्मिक साधनेला काही ना काही विधी-विधान असते. कित्येक साधनांचे विधी-विधान एवढे क्लिष्ट आणि जटिल असते की सर्वसामान्य साधकांना ते आवाक्या बाहेरचे वाटते. जर ओढून-ताणून असे क्लिष्ट विधी-विधान पाळायचे ठरवले तर त्यांतील नीती-नियम, प्रथा, रूढी, "हे करा आणि हे करू नका" ची लांबलचक यादी यांकडे लक्ष पुरवण्यातच सगळे लक्ष आणि ऊर्जा वाया जाते. आपल्या आराध्य दैवतेची मुक्तपणे भक्ति करणे बाजूला रहाते आणि लंब्याचौडया विधी-विधानाद्वारे यांत्रिकपणे साधना केली जाते. त्यामुळे नवीन साधकांसाठी सोपी, सुलभ आणि अत्यल्प विधी-विधान असलेली साधना आवश्यक ठरते. अशीच एक साधना म्हणजे श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचे पठन.

नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र म्हणजे शंभू महादेवाच्या हजार नावांची गुंफण केलेले स्तोत्र आहे. खरंतर या स्तोत्रात महादेवाच्या एक हजार आठ नावांची श्लोकांच्या स्वरूपात रचना केलेली आहे. या एक हजार आठ नावांपैकी काही नावे एकापेक्षा अधिक वेळा स्तोत्रात आलेली आहेत. महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या शैव साहित्य ग्रंथांत वेगवेगळी श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रे आहेत. शिव महापुराण, लिंग पुराण, श्रीमद देवी भागवत, स्कंद पुराण, वायु पुराण, सौरपुराण, पद्मपुराण, शिवरहस्य, महाभारत, आगम ग्रंथ अशा विविध ग्रंथांमध्ये श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र आलेले आहे.

वरील शिवसहस्रनामां मध्ये अनेक ठिकाणी साम्य आहे आणि अनेक ठिकाणी भेदही आहे. त्यांची फलश्रुति सुद्धा भिन्न-भिन्न प्रकारची आहे. त्या-त्या श्रीशिवसहस्रनामांच्या उगमाच्या कथा सुद्धा सुद्धा भिन्न आहेत. उदाहरणार्थ, शिव महापुराणातील श्रीशिवसहस्रनाम हे श्रीविष्णूने शिव उपासना करतांना पठन केलेले आहे. भगवान सदाशिवाला प्रसन्न करून विष्णूने सुदर्शन चक्राची प्राप्ती करून घेतली त्या प्रसंगीचे हे श्रीशिवसहस्रनाम आहे. महाभारतातील श्रीशिवसहस्रनाम हे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेले आहे. श्रीकृष्णाला ते उपमन्यु ऋषींनी शिवोपासनेच्या दीक्षे दरम्यान प्रदान केलेले आहे. असे असले तरी या सर्व रचनांचे स्वरूप साधारणतः सारखेच आहे.

वरील सर्व गोष्टी वाचून तुमच्या मनात कदाचित असा प्रश्न निर्माण झाला असेल की मग एवढ्या वेगवेगळ्या श्रीशिवसहस्रनामां मधून नेमके कोणते पठणासाठी वापरायचे? या प्रश्नाचे सोप्पे उत्तर असे की जे शिवसहस्रनाम स्तोत्र तुम्हाला सहज उपलब्ध होईल ते पाठणासाठी घ्यावे. फार चोखंदळपणा करत बसलात तर मग मूळ उपासना राहील बाजूला आणि बारीक-सारिक गोष्टींमध्येच लक्ष गुंतून जाईल. संपूर्ण भारतात धार्मिक पुस्तकांसाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या गीता प्रेस गोरखपुर यांच्यातर्फे दोन श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. एक आहे श्रीमद देवी भागवता मधील आणि दुसरे आहे महाभारतातील. या दोन पैकी महाभारतातील श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र अधिक प्रचलनात आहे. त्यामुळे या लेखाच्या उर्वरित भागात आपण त्याचाच विचार करणार आहोत.

महाभारतातील अनुशासन पर्वातील हा प्रसंग आहे. युधिष्ठिर पितामह भीष्मानच्या भेटीला आलेला आहे. सोबत श्रीकृष्ण सुद्धा उपस्थित आहे. नुकतेच भीष्मानी युधिष्ठिराला श्रीविष्णुसहस्रनामाचा उपदेश केलेला आहे. श्रीविष्णुसहस्रनाम ऐकून आनंदित झालेला युधिष्ठिर आता आणखी काही ज्ञान ग्रहण करण्यास उत्सुक झालेला आहे. तो पितामहांना आदरपूर्वक म्हणतो -- पितामह! कृपा करून मला आता संपूर्ण जगताचे कारण असलेल्या, देव आणि आसुर यांचा गुरु असलेल्या आणि देवांचाही देव असलेल्या शंभू महादेवांची तुम्हाला माहीत असलेली निरनिराळी नावे सांगा. युधिष्ठिराच्या या विचारणेवर भीष्म त्याला सांगतात -- जो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे परंतु जो कोणाला दृष्टिगोचर होत नाही अशा त्या शंभू महादेवाचा नाममहिमा कथन करण्याचे सामर्थ्य माझ्यासारख्या सामान्य मानवा मध्ये नाही. शिवनामाचे माहात्म्य आणि गुणगान यथार्थपणे फक्त शंख, चक्र आणि गदाधारी असा श्रीहरी नारायणच करू शकतो.

श्रीकृष्णाकडे निर्देश करून भीष्म युधिष्ठिराला पुढे सांगतात -- या श्रीकृष्णाने हजार वर्षे दृढ तपस्या करून चराचर जगताचा गुरु असलेल्या भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आहे. तो महादेवाचा अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या कृपेने याला अपत्यप्राप्ती झाली असल्याने या श्रीहरी कृष्णाला महादेवाची थोरवी चांगली माहीत आहे. शिवनामचा महिमा वर्णन करण्यासाठी याच्याऐवढा सुयोग्य अन्य कोणी असेल असे मला वाटत नाही.

वरील कथेचा पुढील भाग सांगण्यापूर्वी श्रीकृष्णाने शिवोपासना केल्याचा जो उल्लेख आहे त्या विषयी थोडे सांगायला हवे. जेणेकरून त्या उल्लेखचा संदर्भ अधिक स्पष्ट होईल.

भगवान श्रीकृष्णाच्या आठ पत्नी विशेष रूपाने प्रसिद्ध आहेत ज्यांची नावे आहेत रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. या पैकी जाम्बवन्तीला बराच काळ लोटला तरी श्रीकृष्णाकडून अपत्यप्राप्ती होत नव्हती. यावर काही उपाय करावा म्हणून श्रीकृष्ण भगवान शिवशंकराचे परम भक्त असलेल्या उपमन्यु ऋषींकडे गेला. उपमन्यु ऋषींनी श्रीकृष्णाला शिवोपासनेची दीक्षा दिली. शिव महापुराणाच्या वायवीय संहितेत उपमन्यु ऋषी आणि श्रीकृष्ण यांचामधील शैव दीक्षे संबंधीचा जो भाग आहे तो या उपासनेवर अधिक प्रकाश टाकणारा आहे. शिव उपासना आणि दृढ तपस्या करून श्रीकृष्णाने भगवान शंकराला प्रसन्न केले. शंभू महादेवाच्या आशीर्वादाने श्रीकृष आणि जाम्बवन्तीला पुत्र झाला. सदाशिवाच्या आशीर्वादाने पुत्र झाला म्हणून श्रीकृष्णाने त्याचे नाव सांब असे ठेवले. शिवोपासनेचे ज्ञान प्रदान करत असतांना उपमन्यु ऋषींनी श्रीकृष्णाला श्रीशिवसहस्रनाम सुद्धा शिकवले होते. तेच श्रीशिवसहस्रनाम आता श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत आहे --

ततः स प्रयतो भूत्वा मम तात युधिष्ठिर ।
प्राञ्जलिः प्राह विप्रर्षिर्नामसङ्ग्रहमादितः ॥

श्रीशिवसहस्रनामाच्या छापील पोथीत सर्वसाधारणतः वरील श्लोकापासून स्तोत्राची सुरवात होते. या श्लोकापासून पुढे काही श्लोक उपमन्यु ऋषींचे शिवनाम महिमा वर्णन करणारे भाष्य आहे. त्या विषयी आपण पुढील लेखात जाणून घेऊ.

असो.

भगवान शंभू महादेव आणि त्याला प्रिय असणारा श्रीकृष्ण सर्व अजपा योग साधकांमध्ये शिवोपासनेची तीव्र ओढ निर्माण करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 12 February 2025