Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


चुकीच्या योगसाधनेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी "हे" करून पहा

भगवान शंभू महादेवाने कथन केलेला योगमार्ग चार प्रमुख प्रकारांत विभागलेला आहे -- मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग. या चार योग प्रकारात अनेकानेक साधना आहेत. एखादी साधना निवडताना केवळ तुमची आवड हा एकच घटक नसतो. तुमची शरीरप्रकृती, तुमची मानसिक जडणघडण, तुम्ही ज्या वातावरणात रहात आहात ते वातावरण अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन कोणतीही आध्यात्मिक साधना आणि विशेषतः योगसाधना निवडावी लागते.

काही वेळा असं आढळून येतं की साधकाने मोठ्या उत्साहाने एखादी साधना पुस्तकातून किंवा इंटरनेट वरून घेतलेली असते आणि ती साधना केल्यावर त्याला काही फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. एकतर त्याची साधनेची निवड तरी चुकलेली असते किंवा निवडलेली साधना करण्याचा जो विधी आहे तो तरी कुठेतरी चुकलेला असतो. अशा वेळी साहजिकच तो साधक गोंधळून जातो. नेमकं पुढे काय करायचं ते त्याला उमगत नाही. अशावेळी खालील काही सोप्या गोष्टी करून पाहिल्यास चुकीच्या साधनेमुळे किंवा साधना चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे होणारा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते.

एक गोष्ट लक्षात घ्या की परमेश्वराने प्रत्येकाला रोग, व्याधी, प्रतिकूल परिस्थिति इत्यादीं मधून उठण्याची उपजत शक्ती दिलेली आहे. ही शक्ती प्रत्येकामध्ये कमी-अधिक प्रमाणात असतेच. चुकीच्या साधनेमुळे शरीरावर आणि मनावर असे दुहेरी दुष्परिणाम होऊ शकतात. एखादा आजार झाला तर त्यावर उपाय म्हणून आजकाल आपण पहिले औषधाची बाटली उघडतो. आपण आपल्या शरीराला स्वतःच्या स्वतः बरं होण्याची संधीच देत नाही कारण आपल्यापाशी तेवढा वेळ नसतो. हाच प्रकार साधना चुकल्यावर लोकं करतात. एक साधना चुकली आणि काही नुकसान झालं तर लगेच त्याला तोडगा म्हणून किंवा "सबस्टीट्यूट" म्हणून दुसरी साधना करायला घेतात.

अशा वेळी करायची पहिली गोष्ट म्हणजे सर्व साधना पूर्णतः थांबवून शरीर आणि मनाला स्वतः पूर्वपदावर येण्याची संधी देणे. घाई-गडबडीने कोणतीही दुसरी साधना सुरू करायची नाही. साधना पूर्णतः बंद ठेवण्याचा हा कालावधी तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होत होता आणि त्याची तीव्रता कितपत होती त्यावर अवलंबून राहील. साधारणतः एक महिना ते तीन महीने एवढा कालावधी त्यासाठी पुरेसा असतो.

एखादी नवीन साधना अथवा उपासना सुरू केल्यावर काम-क्रोधादी विकारांमध्ये वाढ होणे, चिडचिड होणे, अहंकार वाढणे, मूड स्विङ्ग होणे वगैरे गोष्टी घडू शकतात. असे प्रकार विशेषतः मंत्रमय आणि स्तोत्रमय साधानांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. तुमच्या शरीराला नवीन साधनेची सवय नसते आणि त्यामुळे ते सुरवातीला अशाप्रकारे वागत असते. परंतु असा प्रकार जर बराच काळ सुरू राहिला तर मात्र साधनेत काहीतरी चुकत आहे असे म्हणायला हरकत नाही. अशा वेळी घाईघाईने स्वतःच स्वतःच्या स्थितीचे निदान करणे टाळावे. एखाद्या जाणकार श्रद्धेय व्यक्तीचा त्याबाबत सल्ला घेण्याचा प्रयत्न करावा.

वरील साधना विश्रांतीचा कालावधी संपल्यावर हलकेच योगनिद्रा अथवा शवासनातील धारणा करायला सुरवात करावी. जेंव्हा एखादी साधना चुकते तेंव्हा शरीरातील प्राणशक्ती, नाड्या, चक्रे, कुंडलिनी, चित्त यांमध्ये काहीतरी असमतोल निर्माण होत असतो. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीरातील प्राणशक्ती आणि विविध चक्रे हळूहळू पूर्वपदावर यायला लागतात. या काळात आपल्या निद्रेकडे विशेष लक्ष द्यावे. पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. झोपेची "क्वालिटी" कशी आहे ते ही पहावे. व्यवस्थित झोपेसाठी दिनक्रमात आवश्यक ते बदल करावेत.

मंत्रयोगातील काही मंत्र हे शुद्धीकारक आहेत. असे मंत्र मनाला शुद्ध करतात. शरीर-मनात एक प्रकारची शांती प्रस्थापित करण्याचे काम करतात. येथे कोणत्याही विशिष्ठ मंत्राचा उल्लेख मी मुद्दामच करत नाहीये कारण सर्वांसाठी एकच मंत्र चालेल असे नाही. त्यामुळे या शुद्धीकारक मंत्राची निवड एकतर एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाने करावी अथवा स्वतः नीट साधक-बाधक विचार करून मगच मंत्र निवडावा. तुमच्या आवडीचा एखादा साधा-सोपा नाममंत्र सुद्धा तुम्ही निवडू शकता. निवडलेल्या या मंत्राचा जप एकाच वेळी फार मोठ्या संखेने न करता सकाळ-संध्याकाळ किंवा सकाळ-दुपार-संध्याकाळ असा थोडा-थोडा विभागून करावा. लक्षात घ्या की हा काही तुमचा मुख्य मंत्र नाही. हा शुद्धिकरणाचा मंत्र आहे. एकदम त्याचे मोठे अनुष्ठान वगैरे करण्याचा फंदात पडू नये.

काही दिवसांनी योगनिद्रा आणि शुद्धीकरण मंत्राला अलगद ध्यानाची जोड द्यावी. ध्यानाची आवड असलेल्या बऱ्याच मंडळींना चक्रध्यान, शांभवी मुद्रा, खेचरी मुद्रा वगैरे गोष्टींची फार आवड असते. अशा विशिष्ठ चक्राशी अथवा कुंडलिनीशी संबंधीत ध्यान करणे या "रिकव्हरीच्या" कालखंडात टाळावे. आसनावर फक्त डोळे मिटून बसून राहावे आणि श्वासोच्छवास अनुभवावा. सर्वात उत्तम म्हणजे योगनिद्रेचाच विधी बसलेल्या स्थितीत करावा.

जर तुमच्या साधनेत कुंभकयुक्त प्राणायामाचा अंतर्भाव असेल तर पूर्वपदावर येत असतांना सुरवातीला कुंभक वगैरेच्या फंदात न पडता केवळ पूरक आणि रेचक यांकडेच लक्ष द्यावे. श्वासाचा "पॅटर्न" कुठे डिस्टर्ब तर झालेला नाही ना ते नीट काळजीपूर्वक अभ्यासावे.

अजून एक लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे तुमचा आहार. मनातील तमोगुण वाढलेला असतांना, मन विखुरलेले असतांना तमोगुणी आहारामुळे त्याला खतपाणी मिळणार नाही हे पहाणे आवश्यक आहे. कटाक्षाने सात्विक आणि सुपाच्य आहार घ्यावा. आहारा बरोबरच पोट साफ राहील याची काळजी घ्यावी. हठयोगातील नेती, बस्ती, धोती वगैरे शुद्धीक्रियांचे छोटेखानी आवर्तन करून घ्यावे. तुमचे काही ठराविक "डिटोक्स रुटीन" असेल तर ते उरकून घ्यावे.

आजच्या या लेखाचा विषय थेट अजपा योगाशी संबंधीत नसला तरी जाता जाता येथे अजपा गायत्रीचे महत्व अधोरेखित करावेसे वाटते. अजपा योगात अशी कोणतीही चूक होण्याची शक्यता नसते कारण कोणताही ओढूनताणून केलेला प्राणायाम किंवा हठयोगातील क्लिष्ट क्रिया त्यात वापरल्या जात नाहीत. नैसर्गिक श्वासोच्छवासांचाच वापर करून कोणत्याही अवडंबराशिवाय करता येण्यासारखी ती एक सुलभ आणि सुगम अशी ध्यान प्रणाली आहे.

असो.

"ह" कारात विराजमान झालेला शिव आणि "स" कारात विराजमान झालेली शक्ती सर्व अजपा योग साधकांवर आपल्या "सोहम" कृपेचा वर्षाव करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 13 January 2025