Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


Untitled 1

कार्तिक स्वामी जन्माचे लज्जागौरी कनेक्शन

आज त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. ती कथा सुप्रसिद्धच आहे. त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही. आजच्या दिवशी भगवान शंकराची उपासना तर करतातच परंतु त्याचबरोबर कार्तिकस्वामीची उपासना सुद्धा करतात.

आपल्या कडच्या पौराणिक साहित्याचे एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांत एकाच देवी-देवतेच्या जन्मकथा अथवा अवतार कथा वेगवेगळ्या प्रकारे कथन केलेल्या आढळतात. भगवान कार्तिकस्वामी सुद्धा त्याला अपवाद नाही. तारकासुराचा वध हा शिवपुत्राच्या हातूनच होणार असल्याने शिव-पार्वती विवाह हा ओघाने आलाच. शिव-पार्वती मिलनातून हा शिवपुत्र जन्माला येणे अपेक्षित होते. परंतु घडले काही निराळेच.

शिवपुत्र कार्तिकस्वामीचा जन्म कसा झाला त्याबद्दल वेगवेगळ्या कथा आपल्याला आढळून येतात. शिव पुराणात आपल्याला खालील कथारूप आढळते.

शिव-पार्वती विवाहानंतर भगवान शंकर आणि पार्वती एकांतवासात होते. अनेक वर्षे लोटली परंतु शंकराच्या वैराग्यशील स्वभावामुळे त्यांचे मिलन काही घडून आले नाही. तेंव्हा देवतांनी अग्नी देवाला शंकराकडे पाठवले. अग्नि याचक म्हणून शंकराकडे आला आणि त्याने शंकराकडे त्याचे वीर्य दान म्हणून मागितले. या शिववीर्यातून पुढे कार्तिकस्वामीचा जन्म झाला. 

दुसऱ्या एका कथारुपानुसार शिव-पार्वती विवाहानंतर शंकर आणि पार्वती एकांतात विहार करत होते. त्यांच्या प्रणयक्रीडा सुरु असतांना अग्निदेव नेमके तेथे आले. शिवमिलनाला आतुरलेली पार्वती त्यावेळी प्रणयमग्न अवस्थेत होती. अचानक अग्निदेवाना तेथे आलेले पाहून पार्वती खुप लज्जित झाली आणि तिने लाजून आपला मुखचंद्र कमलपुष्पाने झाकून घेतला. पार्वतीचे हे मोहक रूप लज्जागौरी म्हणून प्रसिद्ध पावले. प्राचीन भारतात या लज्जागौरी स्वरूपाची उपासना बरीच प्रचलित होती असं इतिहास तज्ञ म्हणतात. तिला प्रणय आणि प्रसव यांची देवी मानून तिची उपासना केली जात असे. इकडे भगवान शंकराचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य अग्नीने ग्रहण केले. त्यातून पुढे कार्तिक स्वामीचा जन्म झाला.

अजून एका कथारुपानुसार कार्तिकस्वामीचा जन्म कामदहना नंतर भगवान शंकराच्या क्रोधाग्नी पासून झाला आणि त्याचा प्रतिपाळ सहा अप्सरांनी केला.

कथा रूप कोणतेही असले तरी कार्तिक स्वामीचे अवतरण तारकासुराचा वध करण्यासाठी झालेले आहे हा उद्देश सर्वठिकाणी सारखा आढळतो.

भगवान गणपती हा प्राधान्याने गौरीपुत्र मानला जातो तर भगवान कार्तिक स्वामी हा प्राधान्याने शिवपुत्र मानला जातो. एकदा या दोघा भावंडांच्या भांडणातून असा प्रसंग उद्भवला की कार्तिक स्वामीने असा शाप दिला की जी स्त्री माझं दर्शन करेल ती सात जन्म विधवा होईल आणि जो पुरुष माझं दर्शन करेल तो सात जन्म नरकात जाईल. शिव आणि पार्वती दोघांनी विनंती केल्यावर कार्तिक स्वामीने सांगितलं की कार्तिक पौर्णिमेला माझं दर्शन स्त्री-पुरुषांसाठी सर्वांसाठी लाभदायक ठरेल. अर्थात या "शाप प्रसंगात" सुद्धा काही भेद आहेत.

असो.

आजची त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा सर्व योगाभ्यासी वाचकांना भगवान शंकर आणि भगवान कार्तिकस्वामी या पितापुत्राचा आशीर्वाद प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 12 November 2019