अजपा योग क्रिया आणि ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

योग दर्शन - योगमार्गाचे सुलभ विवरण

योग या शब्दाचा अर्थ मिलन घडणे वा जोडले जाणे असा आहे. अध्यात्मिक दृष्टीने पहाता आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड यांचे ऐक्य म्हणजे योग होय. पतंजली योगशास्त्रात योग या शब्दाची व्याख्या चित्तवृतींचा निरोध होणे अशी केलेली आहे. जेव्हा चित्तवृतींचा पुर्णपणे उपशम होतो तेव्हाच आत्मा आपल्या खर्‍या स्वरूपात स्थित होतो आणि जीव-शिव ऐक्याची अनुभुती साधकाला मिळते.

प्राचीन योगग्रंथ योगशात्राची विभागणी चार प्रकारात करतात. ते प्रकार म्हणजे मंत्रयोग, हयोग, लययोग आणि राजयोग. या चारही प्रकारांचे उद्दीष्ट मनोलय अथवा मनाला अ-मन बनवणे हेच आहे. सर्वच योगप्रकारांमधे आठ पायर्‍यांचा समावेश होतो. त्या आठ पायर्‍या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. नाथ संकेतींचा दंशू या पुस्तकात यम-नियमांबद्दल विस्ताराने माहिती दिलेली आहे. येथे थोडक्यात ओळख करून घेऊ. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ह्या गुणांचे पालन म्हणजे यम. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि इश्वरप्रणिधान या गुणांचे पालन म्हणजे नियम. स्थिर आणि सुखमय शरीरस्थिती म्हणजे आसन. जैवीक चैतन्यावर अर्थात प्राणावर ताबा मिळवणे म्हणजे प्राणायाम. पंचेंद्रियांना अंतर्मुख बनवणे म्हणजे प्रत्याहार. मनाला एखाद्या गोष्टीवर एकाग्र करणे म्हणजे धारणा. धारणा पक्व झाली की तीचे रुपांतर ध्यानात होते. ध्यान पक्व होवून मन अमन झाले की समाधी लागते. याचाच अर्थ साधनेच्या दृष्टीने समाधी अबस्थेची प्राप्ती हे योगसाधकाचे अंतिम लक्ष्य असते.

योगशास्त्रानुसार मानवी शरीर हे खालील पंचवीस तत्वांनी बनलेले आहे:

  • पुरुष आणि प्रकृती (शिव आणि शक्ति)
  • मन, बुद्धी आणि अहंकार
  • गन्ध, स्पर्श, आकार, चव, ध्वनी या पाच तन्मात्रा
  • नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये
  • हात, पाय, गुद, उपस्थ, वाक् ही पाच कर्मेंद्रिये
  • पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश ही पंचमहाभूते

या पंचवीस तत्वांनी बनलेल्या मानवी देहाला पिंड असे म्हटले जाते. ध्यानाच्या सहाय्याने मनोलय प्राप्त करून या पंचवीस तत्वांच्या पलीकडे असलेल्या निर्गुण परमशिवात लीन होणे हे योगसाधनेचे उद्दीष्ट आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे केवळ जड देह म्हणजे पिंड नव्हे. जड देहात जेव्हा प्राणशक्ती अथवा चैतन्य खेळत असते तेव्हाच खर्‍या अर्थाने मानवी पिंड कार्यरत असतो. किंबहुना ही शक्ती परमशिवाचीच असते आणि त्याच्यापासून अभिन्न असते. या ईश्वरी शक्तीला आदिशक्ती किंवा मूळ प्रकृती असे म्हटले जाते.

संपूर्ण योगशास्त्राचे सार भगवान शंकराने पार्वतीला दिलेल्या खालील उपदेशात सामावलेले आहे.

शिव उवाच -
देहो देवालयो देवी जीवो देव: सदाशिव: ।
त्यजेद्ज्ञान निर्माल्यं सोहं भावेन पुजयेत ॥   
जीवो शिव: शिवो जीव: सजीव: केवल शिव: ।
पाशबद्धो स्मृतो जीवा पाशमुक्तो सदाशिव: ॥

हे देवी! हा देह देवालय आहे. त्यात वास करणारा जीव साक्षात सदाशिवच आहे. अज्ञानरूपी निर्माल्याचा त्याग करून त्याची सोहं भावाने पूजा करावी. जीव शिव आहे आणि शिव जीव आहे. प्रत्येक सजीव हा शिवरूपच आहे. पाशांत बद्ध असलेला तो जीव आणि पाशमुक्त असलेला तो सदाशिव.

वरील उपदेशाचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे:

देहो देवालयो देवी जीवो देव: सदाशिव: ।

निर्गुण परमशिवाच्या मनात आले की आपण दोन व्हावे. त्यानेच मग प्रकृती आणि पुरुषाचे रुप घेतले. या दोघांकरवी त्यानेच सारी सृष्टी प्रसवली. जर सारी सृष्टी त्या सदाशिवापासून निर्माण झाली आहे तर प्रत्येक जीवामधे त्याचेच चैतन्य वास करत असले पाहिजे हे उघड आहे. या अर्थाने प्रत्येक जीव हा शिवच आहे. जीव देहरूपी देवालयामधे वास करतो. देहाला दिलेली देवालयाची उपमा अगदी समर्पक आहे. देवालय कसे असते? शुद्ध, सात्विक आणि पवित्र. साधकाने देहही असाच पवित्र राखायला हवा. अर्थात देहाचे फाजील लाड करणे टाळले पाहिजे. देवालयात चैनीच्या सोयी असतात का? त्याचप्रमाणे शरीराचे फाजील लाड न पुरवता ते नियमीत आहार-विहाराच्या माध्यमातून निर्मल ठेवले पाहिजे.

त्यजेद्ज्ञान निर्माल्यं सोहं भावेन पुजयेत ।

जर प्रत्येक जीव हा शिवरूपी आहे तर मग त्याला तशी अनुभूती का बरे येत नाही? कारण प्रकृतीच्या अंमलाखाली गेल्यामुळे जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरतो. त्या प्रमाणे अंधारात पडलेली दोरी सर्पाप्रमाणे भासते त्याप्रमाणे जीवाला 'मी म्हणजे माझा देह' असा भ्रम होतो. तो त्याचे शिवपण विसरून जातो. जर जीवाला त्याचे शिवपण प्राप्त करून घ्यायचे असेल तर हे भ्रमरूपी निर्माल्य कवळसून टाकायला हवे. जीवाला 'मी तो आहे' अर्थात 'सोहं' हा बोध होणे गरजेचे आहे. हा बोध ठसवणे हीच जीवाची शिवाप्रती खरी पूजा ठरते.

जीवो शिव: शिवो जीव: सजीव: केवल शिव: ।

जीव आणि शिव कधीच वेगळे नसतात. ते तसे असल्याचा केवळ भास जीवाला होत असतो. जीव तोच शिव आणि शिव तोच जीव. शिवरूपी चैतन्यस्पंद प्रत्येक सजीवामधे स्फुरत असतो. आरशावर धुळ बसली तर प्रतिबिंब नीट दिसत नाही. तो स्वच्छ पुसल्यावर ते दिसू लागते. जेव्हा आरसा मळलेला होता तेव्हा त्यात प्रतिबिंब उमटत नव्हते. पण म्हणून तो आरसा नव्हताच असे म्हणता येईल का? अर्थातच नाही. तसेच जीवाचे आहे. जरी जीव अज्ञानाने शिवत्व विसरला असला तरी तो मुलतः शिवच होता आणि आहे.

पाशबद्धो स्मृतो जीवा पाशमुक्तो सदाशिव: ।

जीव का बरे आपले शिवत्व विसरतो? जीव आपले शिवत्व विसरतो कारण प्रकृती त्याला त्याच्या कर्मांनुसार नानाविध पाशांनी जखडून ठेवते. हे पाश म्हणजे - काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मात्सर्य. जोवर हे पाश आहेत तोवर जीवाला शिवपण येणे शक्य नाही. या पाशांतून जो मुक्त आहे तो शिवच आहे. हे पाश कसे तुटतात? परमेश्वराला भक्तीपूर्वक 'सोहं' भावाने पुजल्याने. ही सोहं पूजा कर्मकांडात्मक नाही. या पुजेला जडरूपातील फुले, गन्ध, दीप, धूप, नैवेद्य अजिबात लागत नाहीत. सोहं ही भावात्मक पूजा आहे. केवळ प्रगाढ ध्यानाच्या माध्यामातूनच ती करता येऊ शकते

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या नाथ संकेतीचा दंशु या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.