Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


नवीन वर्षी या पाच साधना अवश्य करा

निमिष, काष्टा, कला, मुहूर्त, दिवस अशी सुरू होणारी प्राचीन भारतीय कालगणना चार युगे ओलंडत मग थेट हजार चतुर्यूगांचा समूह असलेल्या कल्पा पर्यन्त झेपावते. काळाच्या या अफाट आणि मानवी बुद्धीच्या पलिकडील पसाऱ्यात एक वर्ष म्हणजे फारसा कालावधी नाही. सामान्य मानवासाठी मात्र या एका वर्षात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात. भिंतीवरील कॅलेंडर बदलले की आपसूकच त्याचे मन नवीन वर्षातील आडाखे आणि आराखडे बांधू लागते.

जर तुम्हाला अजपा योगाचा आणि शंभू महादेवाचा लळा लागला असेल तर तुम्हाला मी जे नेहमी सांगतो तेच नवीन वर्षाच्या आरंभी पुन्हा एकदा सांगतो -- अजपा गायत्री, शिवपंचाक्षर, शिवसहस्रनाम, वाणी संयम आणि आहारशुद्धी या पाच गोष्टींचा अभ्यास आणि अंगीकार जो श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण पूर्वक करतो त्याला योगमार्गावरील सफलता दूर नाही.

आहारशुद्धीने सत्वगुण वाढीस लागून चत्वार वाणी ताब्यात येतात. वाणी संयम साधला की मन अंतर्मुख होऊन शिवसहस्रनामात तल्लीन होते. शिवसहस्रनामात रंगलेले मन एकाग्र होत शिवमंत्रात ध्यानस्त होते. ध्यानस्त मन प्राणाच्या साक्षीने अजपा गायत्रीत लीन होऊन जाते.

वरील पाचही गोष्टी वरकरणी वाटायला खूप सोप्या वाटतात परंतु त्यांतील प्रत्येक गोष्ट म्हणजे जणू एक स्वतंत्र साधना आहे. शंभू महादेवांची केलेली योगोपासना आहे. ज्याप्रमाणे एखादी भक्कम इमारत बांधण्यासाठी तिचा पाया मजबूत असावा लागतो त्याप्रमाणे उच्च आध्यात्मिक प्रगतीसाठी तिचा सोपान मजबूत असावा लागतो. वरील पाच गोष्टींचा अंगिकार हा मजबूत सोपान बांधण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतो.

आहारशुद्धी म्हणजे फक्त काय खावे आणि काय नको एवढेच नाही तर पंचमहाभूते, सप्तधातु आणि पंचकोष यांनी बनलेला हा पिंड योगसाधनेच्या दृष्टीने कसा तयार करावा याचे शास्त्र. वाणी संयम म्हणजे फक्त मितभाषीपणा नाही तर ओठ, दंत, जिव्हा, कंठ, प्राण, मन, बुद्धी, अहं या क्रमाने होणारा वैखरी ते परा असा प्रवास कसा करावा त्याचे शास्त्र. शिवसहस्रनाम म्हणजे फक्त हजार नामांचा समूह पठण करणे नव्हे तर त्या प्रत्येक नामाने अभिव्यक्त होणारा गुण आणि ऊर्जा यांचे चिंतन आणि त्यामागील निर्गुण-निराकाराचे मनन करण्याचे शास्त्र. शिवपंचाक्षर म्हणजे फक्त प्रणव सहित अथवा प्रणव रहित पाच अक्षरांचा समूह जपणे नव्हे तर त्या पाच वर्णांचा उपयोग करून पंचकोशांच्या पलिकडील शिवस्वरूपी लीन होण्याचे शास्त्र. अजपा गायत्री म्हणजे फक्त श्वासांवर लक्ष ठेवणे नाही तर श्वासांमागील प्राणशक्ती, प्राणशक्ती मागील कुंडलिनी शक्ती, कुंडलिनी शक्ती मागील आदिशक्ति आणि शिव-शक्तीच्या मिलनातून स्फुरणारा सोहं रूपी हुंकार अनुभवण्याचे शास्त्र.

वरील पाच गोष्टीबद्दल खरंतर विस्ताराने लिहिण्याची इच्छा होती परंतु आजच्यासाठी इतकंच. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या योगमय आणि स्नेहमय हार्दिक शुभेच्छा !!

असो.

ज्या सिद्ध योग्यांनी महाकाल भगवान सांब सदाशिवाच्या भक्तीच्या जोरावर काळावर जय मिळवला ते सर्व सिद्धसत्पुरुष अजपा योग साधकांवर आपल्या कृपेचा निरंतर वर्षाव करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 01 January 2025