आमच्या वेब साईटच्या वाचकांकडून नेहमी विचारणा होत असते की
योगशास्त्रातल्या अनेकानेक साधनांपैकी नेमकी कोणती साधना करावी. येथे एक सोपी
आणि प्रभावी साधना देत आहोत - अजपा. अजपा साधना अत्यंत प्राचीन काळापासून भारतात चालत आली आहे.
अजपा साधनेचा उल्लेख उपनिषदे, तंत्रे, पुराणे आणि अन्य अनेक
योगग्रंथांत आढळतो. त्यांपैकी काही असे आहेत - योग चूडामणि
उपनिषद, योग शिखा उपनिषद, हंसोपनिषद, विज्ञान भैरव तंत्र, कुलार्णव तंत्र,
योगबीज, घेरंड संहिता, गोरक्षपद्धती, शिव पुराण, स्कन्द पुराण. इतकेच
नाही तर भगवत गीतेमध्ये सुद्धा अजपा साधनेशी अगदी मिळतीजुळती
साधना सांगितलेली दिसते.
अनादी काळापासून ऋषी, मुनी, संन्यासी, योगी अजपा साधनेद्वारे आत्मोन्नती करत
आले आहेत. भगवान शंकारानी पार्वतीला अजपा साधना शिकवल्याचे आगम
ग्रंथांवरून स्पष्ट होते. अत्री मुनींचे पुत्र दत्तात्रेय
यांनी नाथ पंथात ही साधना प्रचारीत केली. गोरक्षनाथांसारख्या
श्रेष्ठ सिद्धयोग्याने आपल्या योगबीज नामक ग्रंथात अजपा साधनेचा उल्लेख 'न भुतो
न भविष्यती' असाच केलेला आढळतो. नाथ संप्रदायाची ती एक महत्वाची साधना
आहे. स्वामी समर्थ रामदासांनीही आपल्या दासबोधात एक
स्वतंत्र समास अजपा साधेनेकरता वाहिला आहे. या सर्व उदाहरणांवरून अजपा साधनेचे
महत्व लक्षात येते.
अजपा साधना ही एक परिपूर्ण साधना आहे. अजपाच्या साधकाला अन्य
कोणत्याही साधनेची गरज लागत नाही. अजपा साधना ही जरी ध्यानाची पद्धती असली तरी
खरंतर त्या मधे मंत्र-हठ-लय-राज या चार मार्गांचा समन्वय सुखकारकरीत्या
झालेला आढळतो. अजपा ध्यानही आहे आणि प्राणायामही. अजपा सारखी
नैसर्गीक, दुष्परिणामरहित साधना क्वचितच आढळते. जोर-जबरदस्तीने कुंभक,
बन्ध वा मुद्रा करण्याने तोटा होवू शकतो. असा प्रकार अजपामधे होत नाही कारण ती
पुर्णतः नैसर्गिक साधना आहे. अजपाचे फायदे साधक काहीच काळात अनुभवू
शकतो. आमच्या वेब साईटचे वाचकही ते प्रत्यक्ष अनुभवाने पडताळून पाहू
शकतील. अजपाद्वारे कुंडलिनी जागरण हे सुखकारकपणे,
आल्हाददायकपणे होते. हठयोगासारख्या योगपद्धतींना अनेक नियम काटेकोरपणे पाळावे
लागतात जे आजच्या काळात साधकाला जाचक वाटू शकतात. अजपाचे मात्र तसे नाही. इतर
अनेक साधनांच्या तुलनेने अजपासाठी पाळावे लागणारे नियम अगदी कमी आहेत आणि ते
आजच्या काळातही सहज आचरणात आणता येण्यासारखे आहेत. अनेक साधकांना मनाला काबूत
ठेवून ध्यानासाठी लागणारी एकाग्रता साधणे अतिशय कठीण जाते. अजपा साधनेत
प्राणाद्वारे मनावर अंकुश ठेवला जात असल्याने चंचल मनाचा साधकही यात सफलता
मिळवू शकतो. अजपा साधना अबालवृद्ध, स्त्रीपुरूष कोणीही करू शकतो.
अजपाला वय, लिंग, जात, धर्म अशा अटी अजिबात नाहीत.
अजपा साधनेचे गुणगान योग, वेदांत आणि तंत्र या सर्वच मार्गांनी एकमुखाने केले आहे.
आता अजपा साधना म्हणजे काय आणि ती कशी करायची ते योगचूडामणि उपनिषदाच्या सहाय्याने समजावून घेऊ. योगचूडामणि उपनिषद सांगते:
हकारेण बहिर्याती सकारेण विशेत्पुनः ।
हंसहंसेत्यमुं मंत्रम जीवो जपदि सर्वदा ॥
षटशतानि दिवारात्रौ सहस्त्राण्येकविंशतिः ।
एतात्संख्यांवितं मंत्रम जीवो जपति सर्वदा ॥
अजपानाम गायत्री योगिनां मोक्षदा सदा ।
अस्याः संकल्पमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥
अनया सदृशी विद्या अनया सदृशो जपः ।
अनया सदृशं ज्ञानं न भूतं न भविष्यति ॥
हकार रूपाने श्वास बाहेर जातो आणि सकार रूपाने तो परत येतो. हा हंस-हंस असा मंत्र
जीव नेहमी जपत असतो. एका दिवसात एकवीस हजार सहाशे वेळा जीव हा मंत्र जपतो. ही अजपा
गायत्री योग्यांसाठी मोक्ष प्रदान करते. या जपाच्या केवळ संकल्पाने सर्व पापे नष्ट
होतात. यासारखी कोणतीही विद्या, यासारखा कोणताही जप, यासारखे कोणतेही ज्ञान
भूतकाळात कधी झाले नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही.
श्वास ह या मानसिक ध्वनीसह बाहेर पडतो आणि स या मानसिक ध्वनीसह आत
येतो. जर उश्वास आणि श्वासरूपी ही दोन अक्षरे जोडली तर हंस हा मंत्र बनतो. हीच
अक्षरे जर प्रथम श्वास आणि मग उश्वास अशी जोडली तर सोहं हा मंत्र बनतो. या दोनही
मंत्रांचा अर्थ एकच आहे. सोहं या शब्दाची फोड स: + अहम अशी
आहे आणि त्याचा अर्थ 'मी तो आहे' असा आहे. येथे मी म्हणजे जीव आणि तो म्हणजे शिव. याचाच
अर्थ सोहं मंत्र 'जीव तोचि शिव' हे शाश्वत सत्य सांगत आहे. आपण सर्वच प्रत्येक
श्वासाबरोबर हे सत्य गात असतो पण केवळ योगीच त्याचा खरा अर्थ जाणतो. सोहं मंत्राला
अजपा म्हटले आहे कारण त्याचा जप जाणीवपूर्वक करावा लागत नाही. जप या शब्दाचा अर्थ
एखाद्या मंत्राचे जाणीवपूर्वक वारंवार उच्चारण करणे असा आहे. सोहं मंत्र मात्र आपोआपच
उच्चारला जाईल याची
सोय परमेश्वराने करून ठेवली आहे. चोवीस तासांमधे माणूस २१,६०० वेळा श्वाशोच्छवास
करतो. याचाच अर्थ दररोज सोहं मंत्र श्वासांच्या माध्यमातून २१,६०० वेळा उच्चारला
जात असतो. अजपा मंत्राला गायत्रीही म्हटले आहे. गायत्री म्हणजे प्राणांचे रक्षण करणारी शक्ती.
श्वास चालू असेपर्यंतच आपण जीवंत
राहतो हे सर्वांनाच माहीती आहे. त्यामुळे सोहं मंत्राला गायत्री म्हणणे योग्यच आहे.
आता प्रत्यक्ष अजपा साधना करायची कशी ते पाहू. वाचकांनी या वेब
पेजच्या खाली दिलेला अजपा साधनेवरील व्हिडीओ सुद्धा जरूर पहावा.
-
आपल्या साधनेच्या जागी चौपदरी कांबळे वा जाड चादर पसरा. त्यावर चौपदरी सुती वस्त्र
पसरा. या आसनावर तुम्हाला साधनेला बसायचे आहे. शक्यतो दररोज एकाच जागी बसावे.
साधनेचे आसन अन्य कारणांसाठी वापरू नये.
-
आता ध्यान करण्याच्या आसनावर उत्तराभिमूख वा पुर्वाभिमूख बसा. बसण्यासाठी कोणत्याही
विशिष्ठ योगासनाचा आग्रह नाही. ज्या स्थितीत सुखपूर्वक बसता येईल असे कोणतेही
योगासन (सुखासन, पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन इत्यादी) निवडा. तेही शक्य नसेल तर
खुर्चीवर बसा. असे बसा की पाठीचा
कणा, छाती आणि डोक़े सरळ एका रेषेत राहील.
-
डोळे मिटून घ्या आणि मनोमन परमेश्वरापुढे नतमस्तक व्हा.
-
तीन वेळा ॐ काराचे उच्चारण करा. प्रत्येक उच्चारणाबरोबर मनातले विचार बाजूला
सारत आहात अशी भावना करा. ॐ काराच्या स्पन्दनांनी तुम्ही वेढले गेला आहात आणि
सुरक्षित आहात अशी प्रबळ भावना ठेवा.
-
नाकावाटे
दिर्घ श्वास घ्या जेणेकरून तुमची फुप्फुसे हवेने पूर्ण भरतील. श्वास सोडताना तो
तोंडावाटे बाहेर सोडा. घेतलेली हवा पूर्णपणे बाहेर जात आहे याकडे
लक्ष द्या. असे चार ते सहा वेळा करा.
-
आता तोंड बंद करून सारे लक्ष आपल्या नैसर्गिक श्वासांवर ठेवा. येणारा आणि जाणारा प्रत्येक श्वास अनुभवा.
एरवी आपोआप होणारे श्वसन जाणिवपूर्वक पाहा.
-
ज्यावेळेस श्वास आत येईल तेव्हा मनातल्या मनात 'सो' असा ध्वनी उमटत आहे अशी भावना
ठेवा. ज्यावेळेस श्वास बाहेर जाईल त्यावेळेस 'हं' असा ध्वनी मनातल्या मनात उच्चारा.
-
प्रत्येक श्वासाबरोबर हा सोहं मंत्र मनातल्या मनात जपत रहा. लक्षात ठेवा की या
क्रियेत श्वासाची नैसर्गिक गती बदलणे अपेक्षित नाही. श्वासाच्या गतीत मुद्दाम
हस्तक्षेप करू नका.
-
साधना संपल्यावर एकदम आसनावरून उठू नका. काही काळ आसनावरच डोळे मिटून बसा आणि साधनेमुळे
निर्माण झालेली शिथिलता, शांतता आणि आनंद अनुभवा.
-
परमेश्वराला परत वंदन करा आणि हलकेच डोळे उघडा.
आपली श्वासांवरची जाणीव अधिक प्रखर होण्यासाठी तुम्ही अशी कल्पना करू शकता की
श्वासाबरोबर असंख्य प्रकाशकण नाकावाटे शरीरात प्रवेश करत आहेत आणि उच्छ्वासावाटे ते
शरीराबाहेर जात आहेत. सुरवातीच्या काळात तुमची जाणीव प्रामुख्याने श्वासनावरच असु
द्यात. साधना चांगली मुरली की तुम्ही जाणीवेचे केंद्र अनाहतस्थानी वा भ्रुमध्यस्थानी
अथवा सुषुम्नेमध्ये ठेवू शकता. जाणीवेचे केंद्र आपापल्या इच्छेनुसार निवडा. एकदा ते निवडले की वारंवार
बदलू नका. निवडलेल्या केंद्राची जाणीव प्रखर होण्याकरता त्या ठिकाणी तुम्ही ज्योत,
ॐ कार वा इष्टदैवतेची प्रतिमा कल्पू शकता.
अजपा साधनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नाथ संकेतींचा दंशू हे पुस्तक अवश्य वाचा.
वाचकांना अनेकदा असा प्रश्न पडतो की साधना किती वेळ करावी. त्यांना माझे सांगणे
असते की साधनेसाठी प्रत्येकाने आपापल्या दैनंदीन आराखड्यानुसार वेळ द्यावा.
कोणी तो ५ मिनीटे देईल तर कोणी तासभर.
कोणी तो सकाळी देईल तर कोणी संध्याकाळी.
'अधिकस्य फलं अधिकम' ही उक्ती अजपा साधनेलाही लागू
पडते. सर्वसाधारणपणे असे सांगता येईल की साधकाने
कमीतकमी दिवसातून एकदा २०
मिनीटे तरी साधनेकरता द्यावी.
ज्यांना दोनदा साधना करणे शक्य आहे त्यांनी
अवश्य सकाळ-संध्याकाळ ती करावी. शक्य असल्यास सुटीच्या दिवशी साधनेला जास्त
वेळ द्यावा.
अजपा साधनेचा नियमीत सराव साधकाला खालील फायदे मिळवून देतो:
- मन तत्काळ शांत होते
- शरीर-मनाला विश्रांती मिळते
- ताणतणाव, चिंता, काळज्या यांपासून आलेला मानसिक शीण दूर होतो
- दोनही स्वर समान वाहू लागतात
- रोजच्या आयोष्यातील ताणतणावांना सामोरे जाण्यास उत्साह मिळतो
- राग, नैराश्य, आळस, भीती इत्यादी मानसिक त्रासांपासून सुटका होते
- शरीरातील प्राणमय कोष प्रस्फूटीत होतो
- चक्रे आणि सुषुम्ना नाडी उघडली जाते
- अध्यात्मिक शक्ती (कुंडलिनी) हळूवारपणे आणि आल्हाददायकपणे जागृत होते
- धारणा-ध्यान-समाधी ही त्रिपुटी साधता येते
वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या नाथ संकेतीचा दंशु
या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या.
अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.