Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


क्षुरस्य धारा निशिता..

नुकतीच दिवाळी होऊन गेली आहे. तुम्ही सर्वांनी दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी केली असणार अशी खात्री आहे. दिवाळीची रात्र ही अमावस्या असली तरी हा आध्यात्मिक उपासनेत रस असलेल्यांचा अत्यंत आवडता कालखंड असतो कारण या काळात केलेली आध्यात्मिक साधना अनंतपट अधिक फलदायी ठरते अशी मान्यता आहे. विशेषतः मंत्र-तंत्र-सिद्धी इत्यादि गोष्टींत रस असलेले साधक या रात्रीची आतुरतेने वाट पहात असतात. दिवाळीच्या दिवसांत यमाची आठवण सुद्धा या ना त्या कारणाने काढली जाते.

या वर्षी मित्रपरिवारातील काही साधक मंडळींनी "काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे" अशी टूम काढली. मी थोडा विचार केला आणि म्हटलं तुमचं सगळं आवरून झालं की दोन-तीन तासांचा वेळ काढा आणि मग भेटू. तुम्हाला या ब्रह्मांडातील सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात दुर्लभ अशा सिद्धी विषयी काही सांगतो. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि कुतूहल दिसले. त्यांना तंबी दिली की "गर्दी नको, दर्दी हवेत" या उक्ती नुसार कोणाही हौशा-गौशा लोकांना बिलकुल बोलवायचे नाही. ज्यांच्या बुद्धीची झेप मीठ-मसाला लावलेल्या चमत्कारांच्या कथा-कहाण्याच्या पलीकडे नाही असे कोणीही नकोत.

मी आगोदरच तंबी दिल्यामुळे दोन-चार जणंच होते. त्यांच्या समोर एक जुने, छोटेखानी पुस्तक ठेवत मी म्हणालो की या बद्दल आपण पुढचे काही तास गप्पा मारणार आहोत. चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का सर्वात श्रेष्ठ आणि दुर्लभ अशी सिद्धी कोणती आहे? ती आहे -- स्वतःला साधणं अर्थात आत्मसिद्धी. अष्टमहासिद्धी ज्यांच्या पायावर लोळण घेत असंत त्या सिद्धयोग्यांनी सुद्धा बाकी सिद्धीचा त्याग करून आत्मसिद्धीच्या मागे लागा असा सल्ला त्यांच्या अनुयायांना दिलेला आहे. त्या पुस्तकाकडे बोट दाखवत मी पुढे म्हणालो -- हे आहे कठोपनिषद आणि त्यावर आदी शंकराचार्यांनी लिहिलेलं भाष्य. आत्मानुभूतीचा जो उपनिषद प्रणीत मार्ग आहे त्याबद्दल फार छान गोष्टी या उपनिषदातून शिकायला मिळतात.

एकदा वाजश्रवा नावाच्या ऋषींनी एका यज्ञाचे आयोजन केले होते. यज्ञात आपल्या मालकीच्या सर्व गोष्टी आपण दान म्हणून देऊ असा संकल्प त्यांनी केला होता. हे कळल्यावर त्यांचा लहानगा पुत्र नचिकेता त्यांच्याकडे गेला आणि त्याने विचारले की तुम्ही मला कोणाला दान करणार आहात? सुरवातीला वाजश्रवा ऋषींनी नचिकेताकडे दुर्लक्ष केले पण नचिकेताने वारंवार तोच प्रश्न विचारल्यावर रागावून ते म्हणाले -- जा, मी तुला यमाला दान देऊन टाकतो.

वडिलांचे हे उत्तर ऐकल्यावर नचिकेता यमाकडे गेला. त्यावेळी यम घरी नव्हता. तीन दिवस नचिकेता यमाच्या दारातच अन्न-पाण्याविना ठाण मांडून बसला. यम आल्यावर त्याने घडलेला वृत्तान्त कथन केला. यमाला लहानग्या नचिकेताचे कौतुक वाटले आणि त्याने नचिकेताला तीन वर मागण्यास सांगितले. अशा प्रकारे सुरू होतो कठोपनिषदाचा विषय असलेला यम आणि नचिकेता संवाद.

पहिला वर म्हणून नचिकेता आपल्या पित्याचा क्रोध शांत होऊ देत असे मागणे मागतो. दूसरा वर म्हणून नचिकेता स्वर्गसुखाला कारक अशा यज्ञकर्माचे ज्ञान यमाकडे मागतो. येथपर्यंत सगळं ठीक असतं. तिसरा वर म्हणून नचिकेता जे काही मागतो ते ऐकून यम थबकतो. नचिकेता यमाला म्हणतो -- काही म्हणतात की मृत्यूनंतरही आत्मा अमर असतो तर काही म्हणतात की आत्मा अमर नसतो. तू मला ही सर्व आत्मविद्या प्रदान कर.

यम नचिकेताला म्हणतो -- नचिकेता! हे ज्ञान देवांनासुद्धा दुर्लभ आहे. तू दीर्घायुष्य माग, सुख-समृद्धी माग, पुत्र-पौत्र-अश्व-पशूधन माग, हवे तेवढे मोठे साम्राज्य माग परंतु आत्मज्ञानाच्या बाबतीत मला आग्रह करू नकोस.

यमाच्या सांगण्यावर नचिकेता संतुष्ट होत नाही. हट्ट करून आणि निग्रहपूर्वक तो यमाकडे तोच वर मागतो. सरतेशेवटी नाईलाज होऊन यम नचिकेताला आत्मविद्येचे ज्ञान देण्यास प्रारंभ करतो. योग, ध्यान, ओंकार, नाड्या, सुषुम्ना, ग्रंथी असे कुंडलिनी योगाचे अविभाज्य घटक असलेल्या गोष्टींकडे यम सूक्ष्म संकेत करतो. यमाने दिलेला योग आणि ज्ञान यांचा उपदेश ग्रहण करून नचिकेता ब्रह्ममय अवस्था प्राप्त करून घेतो.

आमची ही सर्व अध्यात्म "मैफिल" संपेपर्यन्त मध्यरात्र उलटून गेली होती. दिवाळीच्या पणत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात सर्वांकडून काही वेळ अजपा ध्यान करून घेतले आणि मग एकमेकांचा निरोप घेतला. दरवर्षीपेक्षा "काहीतरी वेगळं" केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

खरंतर कठोपनिषदावर अजपा योगाच्या नजरेतून दृष्टिक्षेप टाकणारी एक वेगळी लेखमालाच करायला हवी एवढा तो विषय योगगर्भ आणि ज्ञानगर्भ आहे. कठोपनिषदातील एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे. तो तेवढा येथे देतो आणि आजच्या या पोस्टला विराम देतो.

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥

उठा. जागे व्हा. श्रेष्ठ अशा ज्ञानीजनांचा आश्रय घेऊन हे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. हा मार्ग सुरीच्या / तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखा दुर्गम आहे असे तत्वदर्शी लोक सांगतात.

असो.

लहानग्या नचिकेताकडे असलेली चिकाटी आणि अध्यात्म ज्ञानाची ओढ भगवान शंभू महादेव सर्व अजपा योग साधकांना प्रदान करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 04 November 2024