Advanced Ajapa Dhyana Yoga : Tap the power of breath, mantra, mudra, and meditation for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


एक विचित्र घटना

एक संथ, शांत व काहीशी कंटाळवाणी दुपार. माझा पहिलावहिला पगार नुकताच हातात पडला होता. सगळ्यांना 'पहिल्या' गोष्टींच जसं अप्रूप वाटतं तसंच मलाही होतं. अर्धा दिवसाच्या सुटीनंतर ऑफिसमधुन निघालो. येताना काही मित्रांना भेटायला गेलो. माझ्यासारखाच बहुतेकांचा पहिला पगार झाला होता. साहजिकच गप्पांचा ओघ पहिल्या पगाराभोवती घुटमळत होता. कोणाला घरच्यांना व मित्रांना पार्टी द्यायची होती तर कोणाला खरेदी करायची होती. घरी परतताना आपण पहिल्या पगाराचे काय करावे हा विचार माझ्या मनात घुटमळत होता. विचारांच्या तंद्रीतच रेल्वे स्टेशनात घुसलो आणि एक विचित्र गोष्ट घडली...

फलाटाच्या दुसर्‍या टोकाला एक म्हातारा फेरीवाला जुनी-नवी पुस्तके मांडून बसला होता. पुस्तकांच्या त्या पसार्‍याकडे माझे पाय नकळत वळू लागले. एक सुप्त आकर्षण मला लोहचुंबकासारखे खेचत होते. एखाद्य़ा कठपुतळीच्या बाहूलीसारखा मी हलत होतो. मन जणू काही सुन्न, जडवत झाले होते. जणू माझे स्वतंत्र अस्तित्वच कोणीतरी हिरावून घेतले होते. कोणत्याशा एका मातकट पुस्तकाकडे मी यंत्रवत बोट दाखवले. त्या म्हातार्‍या विक्रेत्याने आनंदाने ते पिशवीत कोंबले आणि माझ्या हाती ठेवले. मी खिशातून हाताला येतील ते पैसे त्याच्या हातावर ठेवले आणि उरलेले पैसेही न घेता चालू लागलो.

वार्‍याच्या एक-दोन झुळका अंगावरून गेल्यावर चित्त थार्‍यावर आले. मनात प्रचंड खळबळ माजली होती. हे काय चाललंय? मी ते पुस्तक का घेतले? तेही मनात काही इच्छा नसताना? कोणाच्या दबावाखाली मी ते घेतले? शरीराला हलका घाम फुटला होता. तशाच अवस्थेत घरी पोहोचलो. लक्षात आले की आपण ते पुस्तक कोणते आहे तेही बघितलेले नाही. मनातली उत्सुकता दाबत मी ते पुस्तक बाहेर काढले. ती होती भावार्थ दीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी. माझ्या पहिल्या पगाराने नकळत स्वत:साठी घेतलेल्या या भेटीने माझ्या आयुष्याचे वळणच बदलून टाकले.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.