Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


निर्वाण षटक अर्थात शिवस्वरूप आत्मतत्वाची अनुभूती

घेरंड संहितेवरील लेखमालेत आतापर्यंत आपण ध्यानाचे तीन स्तर -- स्थूल, सूक्ष्म आणि ज्योतिस्वरूप -- जाणून घेतले आहेत. ध्यानाचा हा सगळा खटाटोप हा आत्मसाक्षात्कारासाठी आहे हे ही आपण जाणून घेतले आहे. ध्यानाचा टप्पा गाठल्यानंतर आता घेरंड मुनी समाधी आणि मोक्ष या अंतिम टप्प्या विषयी काही सांगणार आहेत. ते काय म्हणतात ते जाणून घेण्यापूर्वी आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष यांविषयी काही गोष्टींची उजळणी करणे क्रमप्राप्त आहे.

भगवान शंकर पार्वतीला सांगतो --

देहो देवालयो देवी जीवो देव: सदाशिव:
त्यजेद्ज्ञान निर्माल्यं सोहं भावेन पुजयेत

हा मानव पिंड हे जणू एक देवालय आहे. त्यात वास करणारा जीव हा प्रत्यक्ष सदाशिवच आहे. मायेच्या प्रभावामुळे जीव आपले शिवत्व विसरला आहे. त्याला पुनः आपल्या स्वरूपाची प्राप्ती होण्याचा मार्गही भगवान शंकराने येथे सांगितला आहे. अज्ञानरुपी निर्माल्याचा त्याग करून जर या जीवाची सोहं भावाने पूजा केली अर्थात सोहं भाव मनी घट्ट रुजवला तर जीव आणि शिव यातील ऐक्याची अनुभूती येते.

ही अनुभूती कशी असेल बरं? आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्याची मनस्थिती कशी असेल बरं? मी म्हणजे हा देह नसून कूटस्थ आत्मा आहे ही प्रत्यक्ष अनुभूती झालेल्या योग्याची मनोभूमी कशी असेल बरं? हा विषय एवढा गहन आहे की अन्य कोणी काय म्हणतो यापेक्षा आदी शंकराचार्यांसारख्या दिग्गजाचे याविषयी काय सांगणे आहे ते जाणून घेणे अधिक उचित आहे.

जीव-शिव ऐक्याच्या अनुभूतीनंतर प्राप्त होणारे हे निर्वाण पद कसे आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आदी शंकराचार्यांच्या निर्वाण षटक किंवा आत्म षटक स्तोत्राचा उपयोग करू. हे स्तोत्र निवडण्याचे एक कारण म्हणजे येथे फार किचकट, पांडित्यपूर्ण भाष्य किंवा निरुपण करण्यापेक्षा पटकन विषयाला आवश्यक आणि पोषक तेवढी उजळणी करणे एवढाच आपला उद्देश आहे. दुसरं कारण असं की हे स्तोत्र माझ्या स्वतःच्या अत्यंत आवडीच्या शिवस्तोत्रांपैकी एक आहे. केवळ सहा श्लोकांत आचार्य शंकर "नेति-नेति" मार्गाचा अवलंब करून आत्म्याच्या शिवस्वरुपाकडे आणि निर्वाण पदाकडे निर्देश करतात.

चला तर. निर्वाण षटकाकडे एक धावता दृष्टीक्षेप टाकूयात. या स्तोत्राचा सुलभ अर्थ विषद करतांना मी तो अजपा ध्यानाच्या आणि शिव साधनेच्या दृष्टीकोनातून दिलेला आहे. जेणेकरून घेरंड संहितेच्या कुंडलिनी योगाशी त्याचा मेळ घालणे तुम्हाला सोपे जाईल.

मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्रणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥१॥

जेंव्हा शांभवी मुद्रेच्या निरंतर अभ्यासाने योगी आत्म्याचे प्रत्यक्षीकरण करतो अर्थात आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतो. तेंव्हा त्याला असा अनुभव येतो की -- मी म्हणजे मन, बुद्धी, अहंकार किंवा चित्त नाही. मी म्हणजे कान, जीभ, नाक, नेत्र इत्यादी ज्ञानेंद्रिये नाही. मी म्हणजे आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू इत्यादी पंचमहाभूते नाही. या सर्वांच्या पलीकडला असा जो सत-चित-आनंद रुपी शिव आहे तो मी आहे.

न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशाः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायू चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥२॥

कुंडलिनी क्रीयाभ्यासाच्या सहाय्याने शिव-शक्ती मिलन घडवल्यावर जेंव्हा शक्ती शिवात विलीन होते तेंव्हा योग्याला असा प्रत्यक्ष अनुभव येतो की -- मी म्हणजे प्राणशक्ती नाही. मी म्हणजे प्राण-अपान-समान-उदान-व्यान हे पंचवायू नाही. मी म्हणजे रस-रक्त-मांस-मेद-अस्थि-मज्जा-शुक्र हे सप्तधातु नाही. मी म्हणजे अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमय हे पंचकोष नाही. मी म्हणजे वाणी, हात, पाय, उपस्थ इत्यादी कर्मेंद्रिये नाही. या सर्वांच्या पलीकडला असा जो सत-चित-आनंद रुपी शिव आहे तो मी आहे.

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥३॥

शिव साधनेचा निरंतर अभ्यास घडल्यावर जेंव्हा समाधी साधू लागते आणि समत्व भावाचा उदय होतो तेंव्हा योग्याला असा अनुभव येतो की -- मी म्हणजे द्वेष, राग, लोभ, मोह, मद, मात्सर्य इत्यादी षडरिपू नाही. मी म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष इत्यादी पुरुषार्थ नाही. या सर्वांच्या पलीकडला असा जो सत-चित-आनंद रुपी शिव आहे तो मी आहे.

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥४॥

जेंव्हा शिव ध्यानाचा निरंतर अभ्यास घडतो तेंव्हा योग्याला असा अनुभव येतो की -- मी म्हणजे पुण्य, पाप, सुख, दु:ख नाही. मी म्हणजे मंत्र, तीर्थ, ज्ञान, यज्ञ इत्यादी गोष्टी नाही. मी म्हणजे भोग्य वस्तू, भोग घेतल्याचा अनुभव अथवा भोग घेणारा नाही. या सर्वांच्या पलीकडला असा जो सत-चित-आनंद रुपी शिव आहे तो मी आहे.

न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥५॥

यथाविधी मृत्युंजय शिवाचे ध्यान घडल्यावर योग्याला अशी अनुभूती येते की -- मी म्हणजे मृत्यूचे भय असलेला अथवा जातिभेदात गुरफटलेला नाही. मला कोणी पिता नाही, माता नाही, ना माझा कधी जन्म झालेला आहे. मला कोणी बांधव अथवा मित्र नाही. माझा ना कोणी गुरु आहे ना माझा कोणी शिष्य आहे. या सर्वांच्या पलीकडला असा जो सत-चित-आनंद रुपी शिव आहे तो मी आहे.

अहं निर्विकल्पॊ निराकाररूपॊ विभुत्वाञ्च सर्वत्र सर्वेद्रियाणाम ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥६॥

सहस्रारातील निर्गुण शिवतत्वाची कृपा प्राप्त झल्यावर योग्याला असा अनुभव येतो की -- मी निर्विकल्प आणि निराकार आहे. मी सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. सर्व इंद्रियांत मीच व्याप्त आहे. मला कसलीही आसक्ती नाही ना मला कसल्या मुक्तीची गरज आहे कारण या सर्वांच्या पलीकडला असा जो सत-चित-आनंद रुपी शिव आहे तो मी आहे.

आदी शंकराचार्यांचे हे निर्वाण षटक म्हणजे निव्वळ एखाद्या देवी-देवतेची स्तुती करणारे काव्य नाही. प्रत्येक योगसाधकाला अंतर्मुख व्ह्यायला भाग पाडणारी, प्रत्येक मुमुक्षुला विचार करायला भाग पाडणारी अशी ही संक्षिप्त परंतु ज्ञानगर्भ अशी रचना आहे.

हे एवढे चार शब्द लिहित असताना सुद्धा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. शंभू महादेवाच्या आठवणीने कंठ दाटून आला आहे. फार काही लिहू शकणार नाही.

असो.

समस्त ब्रह्मांडात ओतप्रोत भरून राहिलेला शंभू आणि त्याची प्रिया शांभवी सर्व योगमार्गी साधकांना जीव-शिव ऐक्याची अनुभूती प्रदान करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 May 2023