Untitled 1
भगवान दत्तात्रेयांची कृपा देणारे श्रीदत्त षटक स्तोत्र
फार वर्षांपूर्वीची गोष्ट. मी श्रीनृसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी येथे काही
काळ राहिलो होतो. कृष्णा पंचगंगा संगमी वसलेल्या या ठिकाणाचे महत्व दत्तभक्तांना
निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. रोज कृष्णेच्या
पाण्याचा पावन स्पर्श अनुभवावा, श्रीदत्त पादुकांचे दर्शन घ्यावे, काही काळ पायऱ्यांवर नामस्मरण करत बसावे आणि मग परत
फिरावे असा माझा क्रम असे. एक दिवस नामस्मरण करता करता असा विचार मनात आला की एकाच
नावाने भगवंताला आळवण्यापेक्षा वेगवेगळ्या नामांनी त्याला साद घालावी. मग काय जी
आठवतील, जी स्फुरतील त्या नामांचा पुकारा सुरु केला. काही काळ हे असे नामस्मरण करून
उठण्याच्या तयारीला लागतो. उठता उठता मनात विचार आला की आत्ता ज्या नावांनी
दत्तस्मरण केलेले आहे त्या नावांची गुंफण करून एक छोटेखानी स्तोत्र करून
श्रीदत्तगुरुंना का बरं अर्पण करू नये? तेथेच परत बैठक मारली आणि सहा श्लोकांच्या
"श्रीदत्त षटक स्तोत्राची" रचना झाली.
मी जेंव्हा या स्तोत्राची रचना केली त्यावेळी फलश्रुतीचा श्लोक रचलेला नव्हता.
स्तोत्राचे नामावल्यात्मक मुख्य सहा श्लोक रचल्यावर पुन्हा दत्तमंदिरात गेलो आणि
मनोभावे केलेली रचना भगवंताच्या चरणी अर्पण केली. दत्तात्रेयांना सांगितले की हे
योगीश्वरा! आजवर तुझ्या अनेक उच्च कोटीच्या भक्तांनी तुझे गुणगान करणारी उत्तमोत्तम
स्तोत्रे रचली आहेत. त्यांच्यापुढे माझी रचना म्हणजे "सूर्यापुढे काजवा" असली तरी
ती तू स्वीकार कर. एखादे लहान बालक आपल्या बोबड्या बोलांनी आई-बापाला वाटेल त्या
नावांनी हाका मारते. तसेच माझे हे "बोबडे बोल" तुझ्या चरणी मी अर्पण करत आहे. तूच
या स्तोत्राची फलश्रुती मला सांग. एवढी पार्थना करून तेथेच स्तोत्राची २१ आवर्तने
केली. श्रीदत्त कृपा अशी अगाध की माझी आवर्तने संपता-संपता या स्तोत्राची फलश्रुती
सुद्धा स्वयमेव स्फुरत गेली. तो फलश्रुतीचा स्फुरलेला श्लोक जोडून शेवटचे आवर्तन
केले आणि आनंदाश्रू आवरत माघारी फिरलो.
आज श्रीदत्त जयंतीच्या परम पवित्र मुहूर्तावर तेच "श्रीदत्त षटक स्तोत्र" येथे
सर्व वाचकांसाठी देत आहे. आजवर माझ्या परिचयातील ज्या-ज्या लोकांनी या स्तोत्राचे
विधिवत पाठ अथवा अनुष्ठान केले आहे त्या सगळ्यांना श्रीदत्त कृपेने त्याचा अतिशय चांगला अनुभव आलेला आहे.
अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे. मुमुक्षु आणि
मर्मज्ञ वाचकांना हे स्तोत्र निश्चितच आवडेल अशी माझी खात्री आहे. योगमार्गाची आवड
असणाऱ्या आणि आपापल्या सद्गुरूंचे चरण घट्ट धरून असणाऱ्या साधकांना हे स्तोत्र अमृत
वाटेल तर निंदक, खळ आणि दुर्जनांना ते विषवत भासेल.
जर या स्तोत्राची आवड वाटली तर आजच्या श्रीदत्त जयंतीच्या मुहूर्तावर या स्तोत्राचे २१, ५१ किंवा १०८ पाठ
करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा असे सुचवावेसे वाटते. प्रत्येक पाठ करतांना तो
"अथ" पासून "इति" पर्यंत संपूर्ण करावा. एकही शब्द गाळू नये, बदलू नये किंवा अधिकचा
जोडू नये. नियोजित पाठ पूर्ण झाल्यावर केलेले पाठ श्रीदत्तात्रेयांना भक्तिपूर्वक
अर्पण करावेत. आवड असल्यास काही काळ अजपा जप करावा आणि मग आसन उचलावे. स्तोत्राचे
पाठ करतांना किंवा स्तोत्र वाचतांना एक गोष्ट लक्षात घ्या की या स्तोत्राच्या नावात
"षटक" (सहा) आहे, "शतक" नाही. नजरचुकीने किंवा घाईत चूक होण्याची शक्यता आहे म्हणून
मुद्दाम सांगितलं.
असो. बाकी सारी श्रीदत्त प्रभूंची इच्छा.
योग-वेद-आगम-निगम अशा सर्व अध्यात्म विद्यांचे आचार्य असलेल्या भगवान
श्रीदत्तात्रेयांकडून सर्व वाचकांना अध्यात्ममार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.