Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


देवाकडे "लक्ष" आणि "लक्ष्य" देणे महत्वाचे

लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे. जेंव्हा एखाद्या देवाचा किंवा देवीचा उत्सव येतो तेंव्हा भक्तांच्या आनंदाला जणू भरती येते. आपल्या लाडक्या देवासाठी काय करू आणि काय नको अशी भक्तांची अवस्था होते. आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर आपण त्यांच्या आवडीच्या गोष्टी करतो. मग ते खाद्यपदार्थ असोत की एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असो. त्याच धर्तीवर आपला लाडका देव येणार म्हटल्यावर त्याच्या आवडीच्या गोष्टी करणे हे ओघाने आलेच.

गणपतीचे उदाहरण घ्यायचे झाल्यास मोदक, दुर्वा, आवडीची पुष्प आणि पत्र, आकर्षक सजावट, स्तोत्र, आरत्या वगैरे वगैरे अनेक गोष्टींनी गणरायाचे स्वागत केले जाते. आता गंमत बघा. जो भगवान गणेश ऋद्धी-सिद्धींचा पती आहे, ज्याचे शुभ आणि लाभ असे दोन पुत्र आहेत. ज्याला आमोद आणि प्रमोद नावाची नातवंडे आहेत. जो सर्वाना सुख-समृद्धी प्रदान करणारा आहे त्याला आपल्या या वस्तूंची गरज असते काय? अर्थातच नाही. परंतु भक्ताच्या मनातील समर्पणाचा भाव जाणून तो त्या सर्व वस्तू स्वीकारतो. प्रसन्न होतो. भक्ताला आशीर्वाद देतो.

सर्वसाधारण भक्ताच्या दृष्टीने अशा स्थूल उपचारांनी किंवा कर्मकांडात्मक उपचारांनी देवाची पूजा करणे योग्यच आहे. परंतु योगसाधकांनी विशेषतः ध्यानाभ्यासाची आवड असलेल्यांनी जरा अधिक प्रगल्भ विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे. कधी असा विचार केलाय का की -- असं काही आहे का जे देवाजवळ नाही पण आपल्याकडे आहे? असेलच तर ते असं काय आहे?

आहे. एक गोष्ट अशी आहे जी एक साधक म्हणून केवळ आपणच आपल्या देवाला देऊ शकतो -- आपले लक्ष.

गोंधळलात? थांबा. जरा अधिक खोलात जाऊन विषयाचा विचार करू.

आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असू आणि ती व्यक्ती जर आपल्याच विचारात व्यग्र असेल तर आपण म्हणतो -- काय रे! मी एकटाच बडबड करतोय. लक्ष कुठाय तुझं? आपण त्या व्यक्तीशी बोलत असतांना आपली अपेक्षा असते की त्या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष द्यावे. आता लक्ष देणे म्हणजे काय तर त्या व्यक्तीचे मन आपल्या बोलण्यावर केंद्रित असणे. जर समोरच्या व्यक्तीचे मन आपल्या बोलण्यावर केंद्रित झालेले असेल तर आपण म्हणतो की तो लक्ष देऊन ऐकत आहे. या उलट समोरच्या व्यक्तीचे मन आपल्या बोलण्यावर केंद्रित झालेले नसेल तर आपण म्हणू की त्याचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही.

याचा अर्थ असा की समोरच्या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष देणे ही एक अशी क्रिया आहे की जी त्या व्यक्तीच्या हाती आहे. आपण फारच फार त्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु आपल्याकडे लक्ष द्यायचे किंवा नाही हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते.

आता ध्यानाच्या दृष्टीने एक पाउल पुढे जाउया. हे जे काही "लक्ष" आहे त्याचा ध्यानामार्गावर एक मोठा भाऊ आहे. त्यांचे नाव आहे "लक्ष्य". योगशास्त्रात तीन प्रकारची लक्ष्ये सांगितली आहेत - बहिर्लक्ष्य, अंतर्लक्ष्य आणि मध्यलक्ष. येथे या तीन लक्ष्यांचा विस्ताराने उहापोह करण्याची गरज नाही. सोप्या भाषेत त्यांचा अर्थ तेवढा विचारात घेऊ.

बहिर्लक्ष्य म्हणजे नासिकेच्या अग्रभागापासून किंवा मस्तकाच्या वरील भागापासून काही अंतरावर मन केंद्रित करणे. एकाग्र करणे. अंतर्लक्ष्य म्हणजे आपल्या अंतरंगात किंवा चित्तात एखाद्या ध्यानाच्या प्रतीकावर मन एकाग्र करणे. मध्यलक्ष्य म्हणजे अंतः आणि बहिः यांच्या मधील आकाशावर मन एकाग्र करणे.

ध्यानाला बसल्यावर साधक आपल्या ध्यानाच्या प्रतीकावर प्रथम "लक्ष" देत असतो आणि मग त्या लक्षाचे रुपांतर "लक्ष्या" मध्ये करत असतो. पतंजलीच्या परिभाषेत सांगायचे तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी जी मालिका असते तीच गोष्ट येथेही घडत असते.

आता ध्यानसाधक म्हणून विचार करा की आपल्या इष्ट देवतेला आपण स्थूल उपचार अर्पण करतो पण आपले "लक्ष" त्याच्याकडे खरोखरच असते का? लक्ष असलेच तर ते "लक्ष्य" बनण्यासाठी काही प्रयत्न आपण करतो का? असा विचार केल्यावर तुम्हाला असे आढळेल की आपला लाडका देव अनेक प्रकारांनी आपले "लक्ष" वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु शेवटी लक्ष द्यायचे की नाही हे आपल्याच हातात आहे. आपण स्वतःला भौतिक जगतातच गुंतवून ठेवले तर त्याच्याकडे "लक्ष" आणि "लक्ष्य" दोन्ही दिले जाणार नाही.

आपले "लक्ष" आणि "लक्ष्य" ही अशी गोष्ट आहे की जी "त्याच्याजवळ नाही". फक्त "आपल्या जवळच" आहे. मग कल्पना करा की ही गोष्ट जर आपण त्याला अर्पण केली तर तो किती बरं आनंदित होईल! सर्वसाधारण साधकांच्या बुद्धीला ही गोष्ट कदाचित पटणारही नाही. परंतु योगमार्गावर थोडीशी जरी प्रगल्भता आली असेल तर ही गोष्ट नक्की पटेल. त्यांतील मर्म अचूकपणे कळेल.

असो.

तुम्हा सर्वाना येऊ घातलेल्या गणेशोत्सव पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. मूलाधारात अखंड निवास करणारा भगवान गणपती सर्व योगाभ्यासी वाचकांचे लक्ष आणि लक्ष्य योगमार्गावर स्थिर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 18 September 2023