Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


Untitled 1

अजपाने शिकवलं की...

आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वजण आपापल्या श्रद्धेनुसार साजरा करत आहेत. योग-अध्यात्माच्या क्ष्रेत्रात गुरुचे असलेले महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्याविषयी मी आज फारसं काही सांगणार नाही.

तसं बघायला गेलं तर गुरु नाही कोण?! काळाच्या कराल मुखात सरलेला प्रत्येक क्षण, सुख-दु:खांच्या जात्यावर घेतलेला प्रत्येक अनुभव, पावलोपावली भेटणारे मुखवटे आणि त्यांमागील चेहरे, वाचलेला प्रत्येक शब्द,  ऐकलेली प्रत्येक धून, पाहिलेलं प्रत्येक दृश्य, आणि केलेली प्रत्येक साधना आपल्याला काही ना काही शिकवून जात असते. त्यांतील काय स्वीकारायचे आणि काय नाही ते आपला विवेक ठरवत असतो. त्यामुळे विवेकशक्ती जेवढी चांगली तेवढेच ज्ञानार्जन उत्तम प्रकारे होत असते.

योगमार्गावर औपचारिकपणे गुरुचा घेतलेला शोध हा एक भाग झाला परंतु साधकाने जर उत्तम शिष्य होण्याकडे अधिक लक्ष दिले तर गुरु आज ना उद्या, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटतोच. साधक जर उत्तम तयारीचा असेल तर समस्त सिद्ध आणि दैवी शक्ती सुद्धा त्याला मार्ग दाखवण्यासाठी सदैव तत्पर असतात. योगी प्रथम पिंडाकडे लक्ष देतो. एक दिवस पिंडाच्या माध्यमातून ब्रह्मांडाचा शोध आणि बोध आपोआप घडू लागतो. अगदी तसंच साधक जेंव्हा स्वतःच्या "शिष्यत्वा" कडे प्रथम लक्ष देतो तेंव्हा समस्त ब्रह्मांडातील गुरुतत्व त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिग्दर्शन अवश्य करते. मग त्याला गुरुपणाच्या रूढ साचेबद्ध चौकटीत अडकून पडावे लागत नाही.

योगाभ्यासी साधकाने जर आपल्या योगसाधनेकडे नीट लक्ष दिले तर वरकरणी क्षुल्लक वाटणारी एखादी शारीरिक क्रिया सुद्धा त्याला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जात असते. ज्ञानग्रहणासाठी आसुसलेले मन आणि शिकण्याची वृत्ती मात्र त्याने जोपासायला हवी. फार पाल्हाळ लावत बसत नाही. तुम्ही सर्वजण आपापल्या गुरूंचे आशीर्वाद घेण्यास आतुर असाल. माझ्याच एका जुन्या लेखातील अजपा ध्याना विषयीच्या चार ओळी उद्धृत करून ही पोस्ट संपवतो. 

असो.

आदीगुरु भगवान शंकर आणि त्याची प्रिय शिष्या जगन्माता पार्वती सर्व योगाभ्यासी वाचकांना योगमार्गावर प्रेरित करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 23 July 2021