Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


गुरुपौर्णिमा २०२४

आपल्या अशक्त आणि दुबळ्या मुलावर आई-वडील अधिक प्रेम करत असतात कारण त्यांना माहीत असतं की आपल्या शिवाय हा तग धरू शकणार नाही. माझ्या योगजीवनात भगवान महादेव बाबा आणि भगवती गौरा माईने मला अक्षरशः तशी माया दिलेली आहे.

नवखा साधक ते योगी हा खडतर प्रवास त्यांच्या आशीर्वादाशिवाय माझ्यासाठी अशक्यप्रायच होता. ज्याने मला मंत्र देऊन जपात् सिद्धिः जपात् सिद्धिः जपात् सिद्धिर्न संशयः चे बाळकडू पाजले आणि एक दिवस माझ्या जपाचे रूपांतर अखंड अजपा जपात कायमचे करून टाकले त्या शंभू महादेवाचे आभार तरी कोणत्या शब्दांत मानू!? त्यांचे आभार वगैरे मानलेले त्यांना आवडतही नाहीत त्यामुळे कोणत्याही औपचारिक रितीरिवाजात न जाता आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या चरणी अधिक लीन होतो आहे.

खरंतर माझ्यासाठी भगवान दत्तात्रेय हा शिवावतारच पण त्यांची ज्ञान देण्याची पद्धत थोडी वेगळी. माझा हा अवधूत प्रचंड शिस्तप्रिय आणि काटेकोर. दिलेली साधना झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे. काय वाटेल ते होऊ द्यात. महादेवाने दिलेल्या साधनेत माझ्याकडून अज्ञानवश ज्या त्रुटि किंवा दोष राहायचे ते निस्तरण्याची जबाबदारी आपणहून स्वीकारणारा हा कनवाळू. मायबापाचा ओरडा कधी खाऊ दिला नाही दत्तात्रेयांनी. आजच्या दिवशी त्यांच्या चरणी दृढ भक्ति अर्पण करणे एवढेच मी करू शकतो.

गोरक्षनाथ म्हणजे शंभू जती किंवा शिव योगी. जणू प्रति-शंभूच. वरकरणी काहीसे फटकळ आणि कडक वाटणारे पण आतून एकदम प्रेमळ. दिवसात चोवीस तास असतात. त्यातील एक चतुर्थ वेळ साधनेसाठी बाजूला काढायचा आणि मग उरलेल्या वेळात जगातल्या उठाठेवी करायच्या असा दंडक त्यांनी मला घालून दिला होता. त्यांनी करवून घेतली म्हणून माझ्याकडून साधना दृढतापूर्वक घडली. आजच्या गुरुपौर्णिमेला त्यांच्या चरणी माथा टेकतो आणि त्यांच्या नावाची विभूति मस्तकी धारण करतो.

तुम्ही जर माझ्या श्रीगुरुमंडलाला मानणारे असाल किंवा ऑनलाइन कोर्स केलेले असाल तर आज येथे दिलेल्या सुलभ उपासनेचा लाभ अवश्य घ्या. आज सर्वजण आपापल्या गुरूंच्या स्मरणात व्यग्र असणार आहेत त्यामुळे आज एवढेच. गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

॥ ॐ नम: शिवाय ॥


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 21 July 2024