अजपा योग क्रिया आणि ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

पुस्तक वाचण्यापूर्वी...

काही वर्षांपूर्वी माझे "Kundalini Yoga: Concepts & Practices" हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक वाचकांची पत्रे व Emails आल्या. त्यात बरेच प्रश्न, शंका, गोंधळ आणि गैरसमज होते. कुंडलिनी जागृतीचे अनुभव जाणून घेण्याची अनेकांची इच्छा होती. हे छोटेखानी पुस्तक त्याचीच परिणती आहे. नवखा साधक ते योगी या मार्गावर बरेच अनुभव आले. ते सर्वच येथे मांडणे शक्य नाही. तसा विचारही नाही. आपले योगमार्गावरील अनुभव गुरुव्यतिरीक्त अन्य कोणालाही सांगू नयेत असा रूढ संकेत आहे. त्याला फारसा छेद न देता या पुस्तकामधून नवीन साधकाला उपयोगी पडतील असे काही अनुभव प्रस्तुत करण्याचा मानस आहे.

बर्‍याचदा साधकांच्या मनात कुंडलिनी जागृतीविषयी अनेक गैरसमज असतात. आजकाल कित्येक ढोंगी माणसे स्वत:ला गुरू म्हणवून घेताना आढळ्तात. ज्यांची स्वत:ची कुंडलिनी जागृत झालेली नाही, ज्यांचा स्वत:चा अभ्यास नाही अशी माणसे कुंडलिनीविषयी अधिकारवाणीने बोलताना दिसतात. त्यांना गुरू बनण्याची व दुसर्‍याला योग शिकवण्याची घाई झालेली असते. शिष्यही बर्‍याचदा आपली मर्यादा सोडून वागताना आढळतात. संगणकाच्या कळीप्रमाणे बोट दाबताच आध्यात्मिक प्रगती साध्य होईल अशी त्यांची अपेक्षा असते. तसे न झाल्यास ते आपल्या गुरूला व अध्यात्म-मार्गाला नावे ठेवू लागतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. आज चांगल्या गुरूंएवढीच (किंबहूना जास्तच) चांगल्या शिष्यांचीही गरज आहे.

या पुस्तकाचे नाव कदाचित तुम्हाला गोंधळात टाकेल. पण त्याला एक गूढ अर्थ आहे. हिन्दु धर्मग्रंथांमध्ये शिव-शक्ती यांचे अतूट नाते आहे. कधी ते पुरुष-प्रकृती या रुपात आढळते तर कधी ब्रह्म-माया या रुपात. शक्ति ही नेहमी शंकराच्या डाव्या बाजूला विराजमान असते. शंकराचे वर्णन करतांना "वामे शक्ति धरं देवं" असेच केले जाते. शंकराची हीच शक्ती मानवी देहामध्ये कुंडलिनी रूपाने वास करत असते.  कुंडलिनी जागरण हा तंत्रशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. तंत्रशास्त्रातील शक्ती-उपासना ही खरेतर कुंडलिनीचीच उपासना आहे. श्रीकंठाचा आपल्या शक्तीवर पूर्ण ताबा असतो. केवळ तोच तिला आपल्या मर्जीनुसार वागवू शकतो. म्हणून हे शीर्षक. हे तत्व अर्थातच प्रत्यक्ष अनुभवातूनच कळणे शक्य आहे.

पुस्तकाचे प्रत्येक प्रकरण दोन भागात विभागले आहे. केवळ माझे व्यक्तिगत अनुभव सांगणे एवढेच या पुस्तकाचे उद्दिष्ट नाही. अनुभवांबरोबरच कुंडलिनी योगशास्त्राच्या नवीन साधकाला उपयोगी ठरतील असे काही मार्गदर्शन करणे हेही एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणून ही विभागणी. प्रत्येक प्रकरणातील पहिला भाग काही अनुभव विषद करतो तर दुसरा भाग त्या अनुभवांशी निगडीत काही माहिती देतो.

या पुस्तकाची सुरवात करण्यापूर्वी एक सांगावेसे वाटते की या अनुभवांकडे डोळसपणे पहा. त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाचे साधनामार्गावरचे अनुभव वेगळे असतात. त्यांकडे नियम म्हणून न पहाता एक मार्गदर्शन म्हणून पहा.

जगद्नियंता श्रीकंठ सर्व साधकांना योग्य मार्ग दाखवो हिच त्याच्या चरणी प्रार्थना.

सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.