अजपा योग क्रिया आणि ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

मी नोकरी सोडतो

साधना हळूहळू दृढावत होती. मन अध्यात्माकडे अधिकच आकर्षिले जात होते. या सगळ्याचा परिणाम असा झाला की माझे अन्य गोष्टींवरील लक्ष उडाले. कशात लक्ष लागेना. सतत साधनारत रहावे, ईश्वरचिंतन करावे असे वाटत असे. बरं माझ्या मनातले कोणाला सांगावे तर 'एवढया लहान वयात देव देव कशाला करतोस. त्यापेक्षा कामात लक्ष दे.' असा सल्ला मिळण्याची भीती. लहानपणापासून मी अबोल. त्यातच योगसाधनेमुळे मी अधिकच अंतर्मुख झालो. मी लोकांमधे फारसा मिसळत नसे. आपण बरे की आपले काम बरे असा माझा दृष्टिकोन होता. त्यामुळे माझे सहकारी, वरिष्ठ मला एकलकोंडा समजत असत. काही माझ्या मागे तसे बोलूनही दाखवत. मला ते कळत होते, पण ही स्थिती बदलावी असे वाटत नव्हते. मी चारचौघांसारखा माणसात मिसळलो तर त्यांच्या भौतिक इच्छाआकांक्षांचा मला संसर्ग होईल असे वाटे. ते बर्‍याच अंशी खरेही होते. असे करता करता एक दिवस असा उजाडला की मी ठरवले - नोकरीला रामराम ठोकायचा!

मनाची तयारी सुरू केली. थोडी आर्थिक बचतही सुरू केली. त्याच सुमारास संगणक क्षेत्रात बरीच वाढ होत होती. नोकरी सोडून प्रथम आध्यात्मिक उन्नती साधायची आणि त्यानंतर वाटल्यास दुसरी नोकरी शोधायची असा विचार केला. बरोबरीने विचारमंथन चालूच होते. आपण हा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन तर घेत नाही ना? आजच्या जीवनशैलीला अनुसरून हा निर्णय आहे का? जर आपल्या मनासारखे यश मिळाले नाही तर काय करायचे? अशा अनेक प्रश्नांवर सखोल विचार केला. माझी अंत:प्रेरणा मला प्रोत्साहन देत होती. अखेरीस एक दिवस मी राजिनामा दिला.

नोकरी सोडताना मला थोडा अनपेक्षित असा त्रास सोसावा लागला. माझ्या काही वरिष्ठांनी केवळ मी नोकरी सोडतोय याचा राग म्हणून विनाकारण त्रास देण्यास सुरवात केली. इतके दिवस प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हे बक्षीस मिळताना पाहून मला वाईट वाटले. या अन्यायाविरुद्ध देवाकडे तक्रार करायची असे मी ठरवले. पण गंमत पहा. ध्यानाला बसल्यावर मी ही तक्रार करूच शकलो नाही. प्रत्येक वेळी माझे मन कोरे होऊन जाई.  जणु काही देव मला सुचवत होता की शत्रूबद्दलही वाईट विचार करणे साधकासाठी योग्य नाही. तत्क्षणी मी देवाच्या तसबीरीसमोर उभा रहिलो. डोळे मिटून हात जोडले. मनोमन प्रार्थना केली - 'देवा। तू मला वाचवलेस! त्यांना माफ कर. त्यांना सद्बुद्धी दे, जेणेकरून ते राग-द्वेष यांच्या आहारी न जाता विचार करू शकतील.' या प्रार्थनेबरोबर खूप हलके वाटले. कोण चांगला? कोण वाईट? कोण शत्रू? कोण मित्र? हे सारे तर आपल्याच भावभावनांचे खेळ आहेत. मनातील कटुता कुठच्या कुठे पळाली. डोळे उघडले तेव्हा निरंजनाच्या प्रकाशात तसबीर मंद स्मित करत होती. योगमार्गावर एक महत्वाचा धडा मी शिकलो होतो.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.