Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


Untitled 1

यथार्थ ज्ञानासाठी ऋतंभरा प्रज्ञा आवश्यक

मानवी बुद्धी ही एक अद्भुत गोष्ट आहे. जर सोप्या भाषेत बुद्धीची व्याख्या करायची झाली तर असे म्हणता येईल की एकाद्या वस्तूचे ज्ञान प्राप्त करून देणारी शक्ती अथवा सामर्थ्य म्हणजे बुद्धी किंवा प्रज्ञा. सर्वसामान्य माणसाच्या दुर्ष्टीने बघायचे झाले तर त्याला जरी बुद्धी असली तरी त्या बुद्धीचा स्तर माणसामाणसांत भिन्न-भिन्न असतो. एक सोपे उदाहरण घेऊ. समजा एक तेजस्वी हिरा एकाद्या लहान बालकाला दाखवला. तर तो हिरा बघितल्यावर त्याची बुद्धी त्याला एवढंच सांगेल की हा "चकाकणारा दगड" आहे. जर तोच हिरा एकाद्या अन्य प्रौढ व्यक्तीने पाहिला तर त्याची बुद्धी त्याला सांगेल की हे कोणतेतरी "मौल्यवान रत्न" आहे. तोच हिरा जर एखाद्या हिऱ्यांची पारख असलेल्या जवाहिऱ्याने पाहिला तर त्त्याची बुद्धी त्याला सांगेल की हा "अमुक-अमुक प्रकारचा दुर्लभ हिरा" आहे.

वरील उदाहरणावरून हे सहज लक्षात येण्यासारखे आहे की वेगवेगळ्या माणसांची बुद्धी त्याना एकाच गोष्टीचे भिन्न-भिन्न प्रकारे आकलन करून देते. आता बुद्धीत हा भेद का बरे पडतो? सर्वसाधारण माणसाची बुद्धी त्याच्या मनावर जन्मोजन्मी झालेल्या संस्कारांच्या आधाराने कार्य करत असते. हे संस्कार भिन्न-भिन्न व्यक्तींत भिन्न-भिन्न असल्याने त्यांची बुद्धी सुद्धा भिन्न ध्वनीत होते. सामान्य माणसाच्या बुद्धीची तुलना करायची तर ती गढूळलेल्या तलावाशी करता येईल. ज्या प्रमाणे गढूळ पाण्यामुळे आणि पृष्ठभागावर उठणाऱ्या तरंगांमुळे तलावाचा तळ स्पष्ट दिसत नाही. त्याप्रमाणे मनावरील संस्कारांमुळे वस्तूचे यथार्थ ज्ञान माणसाला होत नाही.

आता कल्पना करा की अशी सामान्य बुद्धी जर परमेश्वराचे आकलन करण्याचा प्रयत्न करू लागली तर काय होईल बरे? व्यक्तीच्या मनात जसे संस्कार झाले आहेत त्यांनुसार परमेश्वर म्हणजे काय हे ती व्यक्ती ठरवेल. एकाच शास्त्रग्रंथाच्या शिकवणीचा अनेक प्रकारे अर्थ काढला जातो तो त्यामुळेच. प्रत्येक पंडित, विद्वान, बुद्धिमान व्यक्ती शास्त्रग्रंथांचे आकलन आणि निरुपण आपापाल्या संस्कारांप्रमाणे नकळत करत असते. अध्यात्मज्ञानाचे झालेलं हे आकलन तंतोतंथ यथार्थ असेलच असे अजिबात नाही. पूर्वसंस्कारांनी दुषित झालेली बुद्धी आकलनही तशाच प्रमाणे करणार हे उघड आहे.

जेंव्हा मनातील सर्व संस्कारांचा उपशम होतो तेंव्हाच बुद्धी त्या वस्तूचे ज्ञान यथार्थपणे करून घेऊ शकते. योगशास्त्रात अशा शुद्ध आणि निखळ बुद्धीला ऋतंभरा प्रज्ञा अशी संज्ञा वापरली जाते. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त करून घेणे ही काही सामान्य गोष्ट नाही. अनेक वर्षांची ध्यानसाधना त्यासाठी अत्यावश्यक आहे. तेंव्हा कुठे संस्कारांची आटणी होते आणि परमेश्वराचे यथार्थ ज्ञान संभव होते. याला शॉर्टकट नाही. कुंडलिनी जागृत झाली की तिला प्रथम असे सगळे संचित संस्कार धुवून काढावे लागतात. साधकाच्या सध्याच्या अवस्थेनुसार आणि प्रयत्नांच्या तीव्रतेनुसार या संस्कारआटणीचा कालावधी अवलंबून असतो.

जेंव्हा ऋतंभरा प्रज्ञेचा उदय होतो तेंव्हा मात्र ती अन्य संचित संस्काराना प्रतिबंध करते. त्यांना प्रगट होण्यापासून रोखते. परिणामी सिद्ध योगी परमेश्वरी मिलनाचा आनंद अखंड स्वरूपात घेऊ शकतो. समस्त योगमार्गाची ओढ ही या शाश्वत आनंदाच्या झऱ्यासाठी असते.

वरील सर्व विचेचन मी क्लिष्टता येऊ नये म्हणून मुद्दामच अत्यंत सोप्या भाषेत केले आहे. ऋतंभरा प्रज्ञा आणि ती प्राप्त करण्याची पद्धती यांवर बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. विस्तारभयास्तव येथेच थांबतो.

भगवान आदिनाथाच्या आणि दत्तगुरुंच्या कृपेने प्रयत्नशील साधकांच्या अंतरंगात ऋतंभरा प्रज्ञेचा उदय होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 01 April 2019