Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


नवरात्री २०२४

खरंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच ही छोटेखानी पोस्ट लिहिण्याचा मानस होता पण काही साधकांकडून नवरात्र विशेष साधना करवून घेत असल्याने त्यांच्या शंकानिरसनासाठी वेळ द्यावा लागला. ह्या पोस्टचा विषय थोडासा वेगळा आहे. कोणत्याही श्लोकांचे किंवा ग्रंथाचे निरूपण वगैरे त्यात नाही. मला जे सांगायचे आहे ते संगळ्यांनाच कळेल असं नाही. ज्यांनी दीर्घकाळ साधना केलेली आहे आणि ज्यांचा साधनेचा पाया भक्कम तयार झालेला आहे त्यांना ते समजेल अशी आशा आहे.

नवरात्र म्हटली की अनेक साधक काही ना काही विशेष साधना, उपासना हमखास करतात. अशा वेळी साधनेसाठी वापरली जाणारी सर्व "उपकरणे" जसं आसन, जपमाळ, रुद्राक्ष, शिवलिंग, दुर्गा यंत्र, श्रीयंत्र, भस्म-विभूति, स्तोत्रांच्या पोथ्या, सप्तशती, अन्य काही लीलाग्रंथ वगैरे वगैरे साफसुफ करून उत्साहाने मांडले जातात.

कल्पना करा की अशी साधनेची यथास्तीत मांडणी तुम्ही केलेली आहे परंतु साधना काही सुरू केलेली नाही. ही जी काही अवस्था आहे ती एक अद्भुत अशी अवस्था आहे. त्याचे कारण असे की ही अवस्था ही शब्दशः असंख्य शक्यतांनी आणि संभावनांनी खचाखच भरलेली अवस्था असते. तुम्हाला कदाचित माझे सांगणे गोंधळात टाकणारे किंवा असंबद्ध वाटण्याची शक्यता आहे. एक समांतर उदाहरण देतो म्हणजे कदाचित अधिक चांगल्या प्रकारे कळेल.

असं समजा की कोणी एक चित्रकार आहे आणि त्याला चित्र काढण्याची इच्छा झालेली आहे. त्याच्या टेबलावर पेन्सिल, खडू, रंगाच्या ट्यूबस, रंगाच्या बाटल्या, वेगवेगळे ब्रश असा सगळा जामानीमा केलेला आहे. समोरच एक कोरा कॅनवास मांडलेला आहे. ही जी काही अवस्था आहे की ज्यात तो त्याच्या सर्व साहित्यानीशी तयार आहे परंतु त्याचा कॅनवास मात्र अजून कोरा आहे, ती अवस्था सुद्धा अशाच असंख्य शक्यतांनी आणि संभावनांनी भरलेली आहे. कदाचित तो एखादा निसर्गातील देखावा काढेल. कदाचित तो पशू-पक्षी रंगवेल. कदाचित तो माणसांनी गच्च भरलेले एखादे ठिकाण दाखवेल. कदाचित तो दु:खाची झालर असलेली एखादी घटना काढायला घेईल. चित्र काढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य हाताशी असलेल्या त्या चित्रकारापुढे असंख्य पर्याय आहेत, शक्यता आहेत, संभावना आहेत. तो नेमके त्या कॅनवासवर काय चितारेल ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असेल आणि त्याची इच्छा अवलंबून असेल त्यांच्या मनातील त्याक्षणी अभिव्यक्त होऊ पाहाणाऱ्या संस्कारांवर. येथे "संस्कार" हा शब्द मी योगशास्त्रीय आध्यात्मिक अर्थाने वापरत आहे, सर्वसामान्य अर्थाने नाही.

ही जी काही state of pure potentiality असते ती प्रत्येक योगसाधकासाठी अत्यंत महत्वाची असते. या अवस्थेतूनच त्त्याच्या साधनेचे "प्रत्यक्षीकरण" होत असतं. कधीतरी मोकळा वेळ असताना एक गोष्ट करून बघा. आपल्या ध्यानाच्या आसनावर शांतपणे बसा. आपली जपमाळ, शिवलिंग / दुर्गा यंत्र / श्रीयंत्र, पोथी समोर ठेवा आणि एक एक करून या सगळ्या उपकरणांवर नीट विचार करा.

ती जपमाळ, यंत्रे, पोथ्या तुम्हाला नक्की कशासाठी वापरायच्या आहेत? त्यावर तुम्हाला नक्की कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे? वैदिक मंत्रांचा? तांत्रिक मंत्रांचा? की शाबर मंत्रांचा? त्या मंत्रांचा जप करून तुम्हाला नक्की काय साधायचे आहे? देवीकडून आपली फुटकळ कामे करून घ्यायची आहेत? परपीडा-परनिंदा यांसाठी मंत्रऊर्जा खर्ची घालायची आहे? ऑफिस मधील क्षुल्लक भांडणावरून सहकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी तंत्र-मंत्र-टोटके करण्यात ती ऊर्जा वापरायची आहे? ऑफिस मध्ये प्रमोशन, इनक्रीमेंट मिळवायचे आहे? की परमेश्वरी कृपाप्रसादासाठी तुम्हाला प्रयत्नशील व्हायचे आहे? गौणी भक्तीच्या स्तरावरून तुम्हाला पराभक्तीच्या लाटेवर स्वार व्हायचे आहे? पंचकोष शुद्ध करण्यासाठी मंत्राचा वापर करायचा आहे? कळत-नकळत घडलेल्या पापांचे क्षालन चावे म्हणून ती मंत्रऊर्जा वापरायची आहे? जनमोजन्मीचे संचित संस्कार नष्ट करायचे आहेत? धारणा, ध्यान, समाधी अशा पायऱ्या वेगाने चढायच्या आहेत? आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून तुम्हाला मंत्रसिद्धि हवी आहे?

असा विचार प्रत्येक "उपकरणा" विषयी करा आणि मग पहा तुमच्यासमोर कसे असंख्य पर्याय आणि शक्यता आहेत. अध्यात्म साधना अशी असावी की जी इहलोकी आणि परलोकी सुद्धा साथ देईल. केवळ या एका जन्माचा विचार करू नका. या जन्मी थोडेफार जप-तप, पूजा-पाठ केलेत म्हणजे तुम्ही जन्म-मृत्यूच्या तावडीतून लागलीच मुक्त व्हाल या भ्रमात राहू नका. प्रारब्ध आणि नियतीचा खेळ अनाकलनीय असतो. कोणती इच्छा, कोणता ऋणानुबंध, कोणते संस्कार कसे आणि कधी फलद्रूप होतील आणि अनंताच्या वाटेवर अडथळा उभा करतील याचा काही नेम नाही. त्यामुळे थोडे दूरदर्शी बना. असंख्य शक्यतांमधील कोणत्या शक्यता तुम्हाला खुणावत आहेत ते काटेकोरपणे अभ्यासा. आज ज्या शक्यता तुम्हाला आवडत आहेत त्या उद्या कदाचित नकोशा, त्रासदायक वाटतील. त्यामुळे नीट काळजीपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही निवडलेल्या शक्यता तुमच्या साधनेची दिशा ठरवत असतात. गाडीचे इंजिन जसे गाडीची गती आणि दिशा ठरवते तसे तुमची निवड तुमची आगामी प्रगती आणि दिशा ठरवणार आहे हे लक्षात असू द्या.

आता तुम्हाला एक पायरी अजून पुढे नेतो. मुलाधारात निद्रिस्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत करून तिला सहस्रारा मध्ये न्यायचे असते हा कुंडलिनी योगाचा अगदी सोपा करून सांगितलेला बाळबोध धडा आहे. कुंडलिनी जागृती ही सुद्धा अशीच असंख्य शक्यता घेऊन येते. कुंडलिनी जागृत करून तुम्हाला तिला पिंगलागामी करायची आहे? की इडागामी? की सुषुम्नागामी? तुम्हाला तुमच्यात एखादा कलागूण, लेखन, कवित्व वगैरेंचा विकास करायचा आहे का? की तुम्हाला ज्ञानगर्भ विषयांचा अभ्यासक, शास्त्रज्ञ, संशोधक वगैरे कुणी बनायचे आहे? कुंडलिनी जागृती झाल्यावर तुम्हाला सिद्धि प्राप्त व्हाव्यात अशी सुप्त इच्छा आहे का? सिद्धीचे प्रदर्शन करून त्याद्वारे जनसंग्रह, धन, प्रतिष्ठा मिळवावी असा तुमचा सुप्त मानस आहे का? कोणत्या सिद्धी तुम्हाला हव्याहव्याशा वाटतात? त्यांच्या गुण-दोषांची सविस्तर माहिती तुम्हाला आहे का? तुम्हाला कुंडलिनी जागृतीतून भोग हवा आहे? की मोक्ष? को दोन्ही? की अजून काही तिसरेच हवे आहे? शक्तीला शिवाकडे सोपवण्यात तुम्हाला स्वारस्य आहे की तुम्हाला शक्तीचा भौतिक स्तरावर वापर करायचा आहे? या जन्मी जागृत केलेली कुंडलिनी तुम्हाला पुढच्या प्रवासात सुद्धा साथ देईल असे तुम्हाला वाटते का? अशा असंख्य शक्यता या मार्गावर आहेत. दुर्दैवाने आजकाल लोकांनी कुंडलिनी योग एवढ्या खालच्या स्तरावर आणून ठेवला आहे की असा सखोल विचार करणारे साधक फारसे असतच नाहीत.

आता अजून एक शेवटची पायरी वर. तुम्ही श्रीयंत्र नक्की पाहिलेलं असणार. कदाचित तुमच्या घरी पूजनात सुद्धा तुम्ही ते ठेवलं असेल. नवरात्रीचे दिवस असल्याने मुद्दाम श्री यंत्राचे उदाहरण घेतोय. श्रीयंत्राचे सर्वोच्च स्थान असते त्याच्या मध्यभागी असलेला बिंदु. हा बिंदु सुद्धा अशाच असंख्य शक्यता आणि संभावना या ब्रह्मांडात प्रेरित करत असतो. निर्गुण निराकारात नादाचा एक स्पंद उमटतो. शिव आणि शक्ती यांचा अद्भुत खेळ सुरू होतो. या खेळाचे बीज म्हणजे हा बिंदु. या बिंदूच्या विस्फोटात "अनंतकोटीब्रह्मांडे" निर्माण करण्याची ताकद असते. वर वानगीदाखल जशा काही शक्यता सांगितल्या आहेत तशाच त्या श्रीयंत्रांच्या बाबतीत सुद्धा आहेत पण विषय मोठा असल्याने त्यात फार खोलात जात नाही. केवळ एक शक्यता मांडतो आणि थांबतो -- तुम्हाला त्या भगवतीची उपासना सृष्टि क्रमाने करायची आहे की संहार क्रमाने?

असो.

कोणी काली कुलातील देवी स्वरूपांची उपासना करतात तर कोणी श्री कुलातील देवी स्वरूपे भजतात. अन्य काही नवदुर्गा मानणारे असतात. या समस्त कुलांचे सार असलेली कुल-कुंडलिनी सर्व साधकांना योग्य दिशा दाखवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 04 October 2024