Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्

श्रीगणेशाचे आगमन होत आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. श्रीगणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून तुमच्यापैकी अनेकजण विशेष साधना सुद्धा नक्की करणार आहेत. श्रीगजाननाचा कुंडलिनी योगाशी असलेला घनिष्ठ संबंध आणि अजपा जपाशी असलेले नाते आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत.

तुम्हा सर्वांना गणेश जन्माची गोष्ट ठाउकच आहे. माता पार्वतीने स्नानाला गेली असता रक्षणार्थ गणेशाची नियुक्ती केली आणि मग पुढचा सगळा गजमुखाचा कथाप्रसंग घडून आला. सामान्यतः भगवान गणपती हा एक सौम्य, सात्विक, गोंडस-गोजिरवाणा, गोडगोड अशा स्वरूपात पूजला जातो. सर्वसामान्य गृहस्थी साधकाच्या दृष्टीने ते योग्यच असले तरी जे कुंडलिनी योगसाधक आहेत त्यांनी याकडे थोडे अधिक सखोलपणे पाहिले पाहिजे.

माता पार्वतीने गणेशाची निर्मिती संरक्षणाचे प्रयोजन मनात धरून केलेली आहे. याचाच अर्थ गणपती ही मूलतः एक रक्षक देवता आहे. कुंडलिनी योगाच्या दृष्टीने बघायचे झाले तर माता पार्वतीचेच शरीरातील स्वरूप म्हणजे जगदंबा कुंडलिनी. जगदंबा कुंडलिनीचे मूल निवासस्थान म्हणजे मूलाधार चक्र. या कुंडलिनी शक्तीने आपल्या रक्षणार्थ गणेशाची योजना मूलाधार चक्रात केलेली आहे. गणपती अथर्वशीर्ष सांगते --

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्

अर्थात हे गणपती देवा! तू मूलाधार चक्रात नित्य निवास करतोस.

सर्वच देवी-देवता आपल्या भक्तांचे रक्षण करत असल्या तरी शैव आणि शाक्त मार्गात काही दैवताना विशेष रूपाने रक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. मारुती, भैरव, नृसिंह वगैरे दैवते त्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. कुंडलिनी योगाच्या दृष्टीने गणपती सुद्धा रक्षक देव आहे. गणपतीचे काहीसे उग्र, तीक्ष्ण, विराट आणि अचंबित करणारे स्वरूप ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे त्यांनाच हे कळू शकेल.

भगवान गणपती आपली रक्षकाची भूमिका दोन बाजूंनी बजावतो. एका बाजूला तो जगदंबा कुंडलिनीचे रक्षण करतो तर दुसऱ्या बाजूला तो साधकाचे सुद्धा रक्षण करतो. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेक की जगदंबा कुंडलिनीचे रक्षण गणपती कसे काय करणार? कुंडलिनी मूलाधारात निद्रिस्त किंवा सुप्तावस्थेत आहे याचा अर्थ असा की साधकाची शक्ति केवळ प्रवृत्ती मार्गानी किंवा भोग मार्गानी कार्यरत आहे. आदिशक्ति आपल्या मायेचा विळखा असा सहजासहजी सोडत नाही. ती साधकाला निवृत्ती मार्गावर किंवा मोक्ष मार्गावर सहज येऊ देत नाही. ती साधकाची कठोर परीक्षा घेते. त्याकामी तिला गणपतीची मदत होत असते. सुखोपभोग, भौतिक इच्छा, भोगविलास, आळस, नैश्कर्म्य, जडत्व इत्यादि मूलाधार चक्राचे गुणधर्म ती जागवते. साधकाला हातोहात चकवते आणि त्याला भौतिक जगतातच गुंतवून ठेवते.

भगवान गणपतीची उपासना ही कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी केली जाते. एखादे कार्य सुरू करतांना आपण म्हणतोच की अमुक-अमुक गोष्टीचा श्रीगणेशा केला. कुंडलिनी जागृतीची सुरवात सुद्धा मूलाधार चक्रातील गणेशाच्या साक्षीने आणि परवानगीने करावी लागते.

तुम्ही जर गणपती अथर्वशीर्ष पठण केले असेल तर तुम्हाला माहीत असेल की --

अव पश्चात्तात्। अव पुरस्त्तात्।
अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात्।
अव चोर्ध्वात्तात्। अवाधरात्तात्।
सर्वतो मां पाहि पाहि समंतात् ॥

हे एका अर्थाने दिगबंधनच आहे. दिगबंधन म्हणजे सोप्या भाषेत दिशा बांधणे. हे भगवान गणपती! पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण, वर, खाली आणि सर्वत्र तू माझे रक्षण कर. साधनेला बसण्यापूर्वी साधनेत विघ्न येऊ नयेत आणि सर्व बाजूंनी आपले रक्षण व्हावे म्हणून गणपतीला केलेली ही एक प्रार्थनाच आहे. मंत्रशास्त्रात दिगबंधनासाठी अनेक मंत्र आणि उपाय आहेत पण गणेश भक्तांसाठी हा एक सहज आणि सोप्पा मार्ग आहे.

साधनामार्गावर अनेकदा साधकाला विविध प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींना सामोरे जावे लागते. प्राणमय कोषातील किंवा आभामंडळातील ही अशुद्धी प्रामुख्याने मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्राच्या द्वारे पिंडाला प्रभावित करत असते. भगवान गणपतीची उपासना अशा निगेटिव्ह गोष्टींपासून सुद्धा साधकाचे रक्षण करते.

सरस्वती प्रमाणेच भगवान गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. त्याचे कारण --

त्वं चत्वारि वाक्पदानि ॥

गणपती चारही वाणींचा स्वामी आहे. जगदंबा कुंडलिनी परा, पश्चती, मध्यमा आणि वैखरी अशा चार स्वरूपात प्रकट होत असते. वैखरी वाणी स्वरयंत्रातून विशुद्धी चक्राच्या क्षेत्रात प्रकट होते परंतु सर्वात सूक्ष्म आणि सर्वात दुर्लभ अशी परावाणी मूलाधार चक्रात प्रकट होत असते. जर भगवान गणेश प्रसन्न झाला तर या चारही वाणी क्रमशः सहज प्रसन्न होतात. शुद्ध-निखळ अजपा जपाचा उगम परावाणीत होत असतो. त्यामुळे अजपा योगसाधकाला गणेशाची प्रसन्नता आवश्यकच असते.

कुंडलिनी आणि अजपा योग यांच्या दृष्टीने गणपतीची उपासना कोणती आणि कशी करावी हा एक स्वतंत्र विस्तृत विषय आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी जाणून घेऊ.

असो.

जगदंबा कुंडलिनीचे रक्षण करणारा शिवसुत आणि वरदमूर्ति भगवान श्रीगणेश सर्व योग साधकांना आशीर्वाद प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 September 2024