अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

कुंडलिनी जागृती

पहाटे तीन वाजता उठलो. स्नान करून साधनेला बसलो. आज साधनेत एक आगळाच उत्साह ओसंडत होता. साधना आटोपून नाश्ता न करताच दर्शनासाठी बाहेर पडलो. हवा अगदी सुखद होती. चहावाले, फुलवाले व फेरिवाले मांडामांड करत होते. मंदिरात पोहोचल्यावर हायसे वाटले, कारण गर्दी फार कमी होती. चपला देवळाबाहेरच काढून रांगेत उभा राहिलो. रांग जसजशी पुढे सरकत होती तसतशी भक्ती उचंबळून येत होती. आज प्रथमच भक्तीने अंत:करण एवढे चिंब झालेले मी अनुभवत होतो. काल या जागेविषयी वाटलेली आपुलकी आणि आजची ही उचंबळणारी भक्ती... माझेच मला आश्चर्य वाटले.

करता करता रांग संपली. पुजारी पूजा करण्यात, फुले-धूप सारखे करण्यात मग्न होते. त्र्यंबकेश्वरचे शिवलिंग सामान्य शिवलिंगांपेक्षा वेगळे आहे. ते खोलगट असून त्यात तीन अंगठ्याएवढे उंचवटे (लिंगे) आहेत. ते ब्रम्हा, विष्णू, महेश ही त्रिमूर्ती आहेत असे मानले जाते. गर्दी कमी असल्याने डोळे भरून दर्शन घेता आले. या मंदिरात दर्शनासाठी काही विशिष्ट दिवसांखेरीज गाभार्‍यात जाऊ देत नाहीत. तेव्हा बाहेरूनच गाभार्‍याच्या उंबरठयावर डोके ठेवले. एक क्षण शंकराची सर्वांगसुंदर मूर्ती डोळ्यांसमोर तरळली. दुसर्‍याच क्षणी एक प्रचंड विजेचा लोळ माझ्या पाठीतून डोक्याकडे उठला. त्या अनपेक्षित धक्क्याने मी जवळजवळ कोलमडलोच. केवळ पायर्‍यांचा आधार असल्याने पडलो नाही इतकेच. मन केव्हाच सुन्न झाले होते. शरीरभर झिणझिण्या पसरल्या होत्या. डोळ्यांसमोर शेकडो सूर्य चमकल्यासारखा प्रकाश पसरला होता. काय होतय ते कळतच नव्हते. "चला! चला लवकर", कोणीतरी खेकसले. कसेतरी स्वत:ला सावरत मी बाजूला झालो. माझी अवस्था कोणाला कळणार नाही इतपत काळजी घेत मंदिराच्या दुसर्‍या दाराने बाहेर पडलो.

मंदिराच्या आवारातच एक कुंड आहे, बर्‍यापैकी मोकळी जागा आहे. थोडा आडोसा बघून मी जमिनीवरच फतकल मारली. काही काळाने चित्त थोडे थार्‍यावर आले. आजवर केवळ पुस्तकात वाचलेली आणि ऐकलेली 'कुंडलिनी जागृती' आपण अनुभवत आहोत हे एव्हाना कळून चुकले होते. होणार्‍या गोष्टी चांगल्या आहेत वा नाहीत हे मात्र कळत नव्हते. किंबहुना त्या विचाराला आता काही अर्थही उरला नव्हता. "लॉज गाठायला हवा..." मनात विचार आला. तसाच धडपडत उठलो, अंगात पुन्हापुन्हा खेळू पाहाणारी वीज कशीतरी दाबून धरली आणि परतीच्या वाटेला लागलो. सर्व गोष्टी त्या प्रकाशाने वेढलेल्या दिसत होत्या. जणू काही सारे जग त्या प्रकाशातूनच जन्माला आले होते. समजा, एखाद्या पाण्याच्या भांड्यात दोन चेंडू टाकले आहेत. ते चेंडू जरी स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून असले तरी एकाच पाण्याने ते एकमेकांशी जणू जोडलेले असतात. अगदी तशाच प्रकारची जाणीव तो प्रकाश पाहताना होत होती. तो प्रकाश जणू सार्‍या जगाला जोडणारा समान दुवा होता. सारे जग जणू त्या दैवी प्रकाशात तरंगत होते. कसा तरी लॉज गाठला. थरथरत्या हातांनी कुलूप उघडले. दार मागे ढकलून कडी सरकवली. अंगात अजिबात त्राण नव्हते. आतापर्य़ंत कसातरी दाबून धरलेला विजेचा प्रवाह मोकळा सोडत स्वत:ला बिछान्यावर झोकून दिले.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.