Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


यदू राजा आणि दत्तात्रेय अवधूत संवादातून शिकण्यासारख्या काही गोष्टी

तुम्ही जर दत्त भक्त असाल तर श्रीमद भागवतात आलेला यदू राजा आणि अवधूत दत्तात्रेय यांच्यामधील संवाद तुमच्या नक्कीच परिचयाचा असेल. यदू राजा एकदा एका ब्रह्मज्ञ अवधूताला पहातो. तो अवधूत एखाद्या बाळकाप्रमाणे काही कामधाम न करता आपल्यातच मग्न होऊन आनंदाने विचरण करत असतो. यदू राजाला तो एकलकोंडा अवधूत जडवत, उन्मत्त, पिशाच्चवत भासतो. आजूबाजूच्या भौतिक जगताची फिकीर नसलेल्या त्या अवधुताला यदू राजा त्याच्या ब्रह्ममय स्थितीचे रहस्य विचारतो. या विचारणेच्या उत्तरादाखल तो अवधूत आपल्या चोवीस गुरूंचा लेखाजोखा मांडतो. कबूतर, पृथ्वी, सूर्य, पिंगला वेश्या, वायु, हरिण, समुद्र, पतंग, हत्ती, आकाश, जल, मधमाशी, मासा, बालक, कुरर पक्षी, अग्नि, चंद्र, कुमारी कन्या, सर्प, बाण बनवणारा, कोळी, भृंगी, अजगर आणि भ्रमर असे त्याचे चोवीस गुरु आणि तो अवधूत म्हणजे अर्थातच दत्तात्रेय महामुनी.

दत्तात्रेयांच्या या चोवीस गुरूं विषयी अनेकदा सांगोपांग चर्चा केली जाते. त्या गुरूंचे गुण जाणून घेणे महत्वाचे आहेच परंतु या एकूणच घटनेतून आणि या कथेतून सुद्धा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बोध घेण्यासारख्या आहेत. अशाच काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

या कथेतील सगळ्यात पहिले जाणवणारी गोष्ट म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या अंगी असलेली गुणग्राहकता. तसं पाहायला गेलं तर दत्तात्रेय हे त्रिदेवांचे अवतार. अनुसयेसारखी सत्वशील स्त्री त्यांची माता आणि सप्तर्षिमध्ये ज्यांची गणना होते असे अत्री मुनी त्यांचे पिता. असं असूनसुद्धा त्यांना इतरांकडून काही गुण शिकावेत असं वाटतं. दोन-चार पुस्तके वाचून आपल्याला योग कळला आहे अशा भ्रमात रहाणारा मोठा वर्ग आज निर्माण झाला आहे. योगमार्ग म्हणजे अनंताची वाटचाल. योग म्हणजे ज्याची खोली अगम्य आहे असा अथांग सागर. योग म्हणजे कवेत मावू शकणार नाही असे विस्तीर्ण आकाश. प्रतिक्षण ज्ञान ग्रहणाची आस ज्याला आहे तोच येथे तरुन जातो. शिकण्याची वृत्ती संपली की साधनेतील प्रगतीसुद्धा खुंटते. वरील कथा प्रसंगात ज्या गुरूंचा उल्लेख आहे त्यांतील कोणीही दत्तात्रेयांजवळ येऊन त्यांना -- चल रे बाबा, तुला ज्ञान देतो -- असे शिकवलेले नाही. ज्ञान प्राप्तीसाठी आतुर असलेल्या दत्तात्रेयांनी आपणहून त्या-त्या गुरूंकडून ज्ञानाचे कण वेचलेले आहेत.

दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे हे चोवीस गुरु हे दत्तात्रेयांच्या आजूबाजूलाच त्यांना दिसलेले आहेत. वरील कथेतील गुरु हे काही प्रतिष्ठित आश्रम, योगसंस्था किंवा परंपरा स्थापलेले गुरुवर अथवा आचार्य नाहीत. या गुरूंकडून दत्तात्रेयांनी ना कोणती औपचारिक दीक्षा घेतली आहे ना त्यांच्याकडून कोणते पांडित्यपूर्ण ज्ञानाचे धडे घेतले आहेत. आध्यात्मिक ज्ञान मिळवायचे म्हणजे कोणातरी विशिष्ठ व्यक्तीकडे जाऊन किंवा विशिष्ठ संप्रदायात अथवा परंपरेत सामील होऊन ते मिळवायचे असते असा जो सर्वसाधारण संकेत आहे त्याला छेद देत दत्तात्रेयांनी आजूबाजूच्या प्रसंगांतून आणि वस्तूंतून काही आध्यात्मिक शिकवण टिपली आहे. अनेक गुरु करा किंवा देहधारी गुरु वगैरेच्या फंदातच पडू नका असा टोकाचा संदेश या कथेतून घ्यायचा नाहीये. आपली ज्ञानेंद्रिये उघडी ठेवली, मन मोकळे ठेवले, बुद्धी तीक्ष्ण असली, विवेक जागृत असला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनातून सुद्धा उमगायला लागतात असा संदेश यातून घ्यायचा आहे. योगशास्त्राच्या नजरेतून दैनंदिन जीवनाकडे बघणे हा सुद्धा साधनेचाच एक भाग आहे हे कायम लक्षात ठेवले की मग आपसूकच छोट्या-छोट्या सामान्य भासणाऱ्या गोष्टींत सुद्धा ज्ञानबिंदू दिसू लागतात.

तिसरी गोष्ट म्हणजे दत्तात्रेयांनी आवश्यक त्या सर्व स्त्रोतांकडून ज्ञान ग्रहण केलेले आहे. जड वस्तु, पशू, पक्षी, प्राणी, मनुष्य अशा सगळ्यांकडून त्यांनी ज्ञानग्रहण केलेले आहे. ज्ञानाचा स्त्रोत म्हणून पशू-पक्षी हीन आणि मानव श्रेष्ठ असा कोणताही भेदभाव त्यांनी केलेला नाही. ज्याच्या मधील जो गुण त्यांना भावला तो त्यांनी मोकळेपणाने स्वीकारला. अध्यात्मज्ञान फक्त प्रवचनांमधून, पुस्तकांमधून, प्राचीन साहित्यातून किंवा एखाद्या व्यक्तिविशेषा कडूनच मिळते असं नाही. ज्याला वैचारिक प्रगल्भता आलेली आहे, ज्याची प्रज्ञा विकसित झालेली आहे अशा साधकाला ते अनेकानेक गोष्टींमधून प्राप्त होते. डोळ्याला लावलेली झापडे काढून ज्ञानाचे सर्व स्त्रोत आदराने स्वीकारण्याची जेंव्हा साधकाची तयारी होते तेंव्हा मग त्याचे ज्ञानवर्धन वेगाने होऊ लागते.

चौथी गोष्ट म्हणजे राजा असलेल्या यदूने पिशाच्चवत फिरणाऱ्या एका अवधुताची केलेली पारख. साधारणतः साधक आपापल्या सोशल स्टेटसला शोभेल असा गुरु शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून अध्यात्म अंगिकारण्याचा त्याचा प्रयत्न असतो. एखादा मोठा उद्योगपति किंवा समाजातील उच्च प्रतिष्ठित व्यक्ति असेल तर तो साधारणतः त्याच्या सोशल स्टेटसशी मिळत्या जुळत्या संस्थेशी, आश्रमाशी किंवा गुरुशी स्वतःला संलग्न करून घेतो. ज्ञान प्रदान करणाऱ्या व्यक्तीची पारख त्याच्या ज्ञानावरून करण्याऐवजी त्याच्या अनुयायांची संख्या, प्रसिद्धी, आश्रमांचा पंचतारांकितपणा, संस्थेचा पसारा इत्यादी बाह्य गोष्टींवरून केली जाते. अशी पारक्ष कित्येकदा सपशेल चुकीची सुद्धा ठरू शकते. येथे शिष्याच्या भूमिकेत असलेला यदू हा एक राजा आहे परंतु त्याला दत्तात्रेयांची ब्रह्मज्ञ स्थिति जाणवली आहे. आपण राजा आहोत वगैरे अहंकार टाकून तो अजगरवृत्ती आणि पिशाचवृत्ती धारण केलेल्या एका अवधुताला शरण जात आहे. लोकांना नाना प्रकारचा अहंकार असतो - शिक्षण, श्रीमंती, प्रसिद्धी, पुस्तकी पांडित्य आणि अजून बऱ्याच गोष्टी. ह्या अहंकारामुळे खरं अध्यात्मज्ञान चाखलेला मार्गदर्शक दुरावतो. ज्याला हा सगळा अहंकाराचा गोतावळा बाजूला ठेवता येतो त्याला उत्तम मार्गदर्शनाचा लाभ घडत असतो.

पाचवी गोष्ट म्हणजे दत्तात्रेयांच्या अंगी असलेला सरळपणा, नम्रपणा आणि त्यांचा जनसंगपरित्याग. ज्ञानी माणसांत हमखास आढळणारे एक लक्षण म्हणजे त्यांचा नम्र स्वभाव. त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार बिलकुल नसतो. एखादा फळांनी लगडलेला आम्रवृक्ष जसा फलभाराने झुकलेला असतो तद्वत ज्ञानी व्यक्ति ज्ञानाधिक्याने नम्र झालेली असते. येथे दत्तात्रेय अवधूत अवस्थेत आकंठ डुंबणारे असे सिद्ध योगी आहेत परंतु त्यांचे वर्तन बालकाप्रमाणे आहे. वास्तविक त्यांना गुरुपणाची मखमली झालर पांघरून मोठा शिष्य समुदाय बरोबर घेऊन फिरणे सहज शक्य आहे परंतु तसे न करता ते एकांतप्रिय असे विचरण करत आहेत. अष्टांग योगसाधनेत जनसंगपरित्याग हा एक गुण सांगितला आहे त्यांचे पालन दत्तात्रेय करत आहेत. जनसंग टाळल्याने अजून एक फायदा होतो तो म्हणजे मौन पाळणे सहज शक्य होते. गर्दी टाळल्याने, मौन पाळल्याने, बडेजाव रहित साधी-सरळ जीवनशैली अंगिकारल्याने आत्मचिंतन करण्यास पुरेसा वेळ मिळतो. प्राप्त झालेली ब्राह्मी स्थिति आकंठ अनुभवता येते.

गेल्या काही वर्षांत योग-अध्यात्म क्षेत्र काहीसे भडक आणि बटबटीत झाले आहे. आत्मप्रौढी, दंभ, परपीडा, परनिंदा, दुराग्रह असे अध्यात्ममार्गावर निषिद्ध मानले गेलेले दुर्गुण सर्रास जोपासले जात आहेत. इंटरनेट, सोशल मीडिया, यूट्यूब यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसचा एक प्रचंड प्रभाव नवीन साधकांवर पडत आहे. काळानुसार असे बदल घडणे स्वाभाविक आहे परंतु असे बदल घडत असताना येथे पुन्हा तुमची विवेकशक्ती आणि प्रज्ञा उपयोगी पडणार आहे. अष्टांगयोगातील एक नियम आहे "मती" अर्थात सदसद्‌ विवेकबुद्धी. चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, स्वीकारार्ह काय आणि त्याज्य काय हे तुम्हाला तुमच्या बुद्धी-विवेकाच्या आधारानेच ठरवावे लागते. प्राचीन ग्रंथांत अशी मान्यता आहे की हंस पक्षाला जर दूध आणि पाणी एकत्र मिसळून दिले तर तो त्यातील फक्त दूधच तेवढे शोषून घेतो. दत्तात्रेयांसारखी ज्ञानपिपासा, गुणग्राहकता आणि तीक्ष्ण प्रज्ञा असेल तर या सगळ्यातून हंसपक्ष्या प्रमाणे चांगल्या-वाईटाची पारख करणे शक्य होते. अजपा योगासारख्या ध्यान साधनेने साधकातील हा "हंस" भाव विकसित होत असतो.

असो.

आज श्रीदत्त जयंतीचा पावन दिवस आहे. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्र ज्याप्रमाणे अमृताचा वर्षाव करत असतो त्याप्रमाणे गुरुतत्व व्यापून राहिलेले भगवान दत्तात्रेय सर्व अजपा योग साधकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 14 December 2024