Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


Untitled 1

खेचरी मुद्रे विषयी काही...

खेचरी मुद्रा मी भक्तांच्या आग्रहाखातर प्रकट केली आहे.
सर्व सिद्धि प्रदान करणारी ही मुद्रा मला प्राणांपेक्षा जास्त प्रिय आहे.
~ शिव-पार्वती संवाद

जवळ जवळ सगळ्या जुन्या कुंडलिनी योग विषयक ग्रंथांमध्ये ज्या दहा अति-महत्वाच्या मुद्रा सांगितल्या आहेत त्यांमध्ये सगळ्याच ग्रंथांनी एकमुखानी गौरवलेली मुद्रा म्हणजे खेचरी मुद्रा. दुर्दैवाने खेचरी मुद्रे विषयी साधकांच्या मनात एवढे गैरसमज असतात की मुळ तत्व बाजूला रहाते आणि तर्क-वितर्क आणि पुस्तकी चर्चाच जास्त असते. या लेखात मी खेचरी मुद्रे विषयी काही गोष्टी सांगणार आहे.

खेचरी मुद्रा म्हणजे काय?

सर्वप्रथम आपण खेचरी मुद्रा म्हणजे काय ते समजाऊन घेऊया. खेचरी हा शब्द "ख" आणि "चरी" अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. "ख" शब्दाने आकाश अर्थात मनाची निर्विचार अवस्था निर्देशित केली आहे. "चरी" म्हणजे फिरणारी किंवा प्रवेश करणारी. थोडक्यात खेचरी म्हणजे आकाशात फिरणे. हे आकाशात फिरणे दोन स्तरावर घडत असते - शारीरिक आणि मानसिक. त्यापैकि शारीरिक स्तरावर जी क्रिया साधक करतो त्याला खेचरी मुद्रा असे म्हणतात. या क्रियेच्या परिणाम स्वरूप मनाची जी निर्विचार अवस्था प्राप्त होते त्याला खेचरी अवस्था असे म्हणतात.

खेचरी मुद्रे मध्ये साधक आपली जीभ उलटी फिरवून, ताळूला भिडवून मागे नेतो. पडजीभ ओलांडून त्याची जीभ मेंदूकडे जाणार्‍या "कपाल कूहरात" प्रवेश करते. तेथे प्रवेश केल्यावर अनेक चवींचे स्त्राव साधक अनुभवतो. त्याचबरोबर त्याचे मन शांत होऊ लागते. शरीर शुद्धी झालेली असेल तर बिंदुविसर्ग नामक चक्रातून स्त्रवणारे "अमृत" साधक प्राशन करू शकतो. मन शांत होत होत शेवटी त्याला समाधी लागते. खेचरी मुद्रा साधण्यासाठी जीभ लांब असावी लागते. त्यासाठी हठयोगामध्ये काही क्रिया आहेत ज्या पुढे सांगितल्या आहेत.

खेचरी मुद्रे द्वारे मनाची जी निर्विचार अवस्था होते त्याला नुसतं खेचरी किंवा खेचरी अवस्था म्हणतात. येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की खेचरी अवस्था साधण्याचे जे उपाय आहेत त्यातील एक म्हणजे खेचरी मुद्रा. हठयोगात खेचरी मुद्रेची थोरवी गायली आहे कारण ही मुद्रा साधली तर ध्यानावस्था सहजसाध्य होते. परंतु अन्य मार्गानी सुद्धा खेचरी अवस्था प्राप्त होऊ शकते.

खेचरी मुद्रा कशी साध्य होते?

खेचरी मुद्रा म्हणजे काय ते जाणून घेतल्यावर आता खेचरी मुद्रा साधायची कशी ते पाहू. खेचरी मुद्रा तीन प्रकारांनी साधता येते:

  • हठयोग
  • मंत्र
  • शक्ति समर्पणाद्वारे उत्फुर्तपणे

हठयोगोक्त खेचरी मुद्रा सर्वात कठीण आणि धोकादायक आहे. ही क्रिया एखाद्या जाणकार हठयोग्याच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहूनच शिकणे श्रेयस्कर आहे. हठयोगोक्त खेचरी मुद्रेच्या साधनेमध्ये प्रथम जीभ लांब केली जाते. या साधनेला लंबिका योग असेही म्हणतात. आपली जीभ खालच्या जबड्याला मांसल तंतुंनी आणि स्नायुंनी जोडलेली असते. आधुनिक वैद्यक शास्त्रात त्याला frenulum linguæ किंवा frenulum म्हणतात. हठयोगात ही जोडणी हळूहळू कापली जाते. त्याकरता जुन्या काळी धारधार शस्त्र, केस वगैरे वापरत असत. रोज एक सुतभर काप देऊन त्याजागी लगेच हळद किंवा वनौषधी लावल्या जात. त्याच बरोबर जिभेला लोणी लावून चिमट्याने खेचण्याचा सराव केला जातो. कधी कधी जीभ एका कापडी पट्टीने बांधतात आणि मग खेचण्याचा सराव केला जातो. अनेक दिवस असे केल्याने जीभ चांगली लांब होते आणि कपालकुहरात प्रवेश करू शकते. या क्रियेत मोठा धोका आहे हे तुमच्या लक्षात आलच असेल. थोडी जारी चूक झाली तरी जिभेचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. परिणामी बोलण्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. सर्वसाधारण साधकांना अशा प्रकारे खेचरी मुद्रा साधणे शक्य नाही हे लक्षात घेऊन लाहीरी महाशयांसारखे योगी आपल्या शिष्यांना "तालव्य क्रिया" शिकवत असत.

काही परंपरांमध्ये जीभ ताळुला उलटी करून चिकटवण्याच्या अभ्यासाला खेचरी मुद्रा म्हटले जाते. ते बरोबर नाही. या स्थितीला घेरंड संहितेत नभो मुद्रा म्हटले आहे. नभो मुद्रा आणि खेचरी मुद्रा यांमध्ये बरेच अंतर आहे. फारच फार खेचरीची पूर्वतयारी म्हणून नभो मुद्रेचा सराव करता येईल. परंतु नभो मुद्रा ही काही खेचरी मुद्रेची जागा घेऊ शकणार नाही.

योग कुंडलिनी उपनिषदा सारख्या ग्रंथांमध्ये खेचरी साधण्यासाठी काही मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. ह्या मंत्रात पाठभेद आहेत त्यामुळे नेमका अचूक मंत्र कोणता ते कळणे कठीण आहे. माझ्या मते अशा प्रकारे मंत्राद्वारे खेचरी अवस्था साध्य होणे शक्य आहे परंतु केवळ मंत्राद्वारे जीभ लांब होऊन खेचरी मुद्रा साधणे शक्य वाटत नाही. त्यामुळे योग कुंडलिनी उपनिषदा मधील मंत्र हे खेचरी अवस्था प्राप्त करून देतात असे मानणे जास्त बरोबर ठरेल.

खेचरी मुद्रा साधण्याचा सर्वात निर्धोक उपाय म्हणजे जागृत कुंडलिनीला अनन्य भावाने शरण जाणे. कुंडलिनी जागृती नंतर ज्या उत्फुर्त क्रिया होतात त्या ज्ञानमयी शक्तीने घडविलेल्या असतात. शक्ति केवळ अशाच क्रिया घडवून आणते ज्या साधकाला खरोखरच आवश्यक आहेत. कल्पना करा की जर एखादा साधक हठयोगोक्त खेचरी मुद्रा महत्प्रयासाने साध्य करून घेण्यासाठी झटत आहे. परंतु जर त्याच्या या जन्मीच्या साधनेला खेचरीची गरजच नसेल तर? अर्थातच त्याने विनाकारण कष्ट केले असा अर्थ होईल. शक्तीला शरण गेल्यावर तुमच्या पात्रतेनुसार कुंडलिनी स्वतः खेचरी मुद्रा घडवून आणते. ती ही कोणतेही कापणे, खेचणे असले प्रकार न करता. माझा या उत्फुर्त क्रियांबाबतचा व्यक्तीगत अनुभव मी देवाच्या डाव्या हाती मध्ये दिलेला आहे. त्याची पुनरावृत्ती येथे करत नाही. गम्मत अशी की साधनेच्या व्यतिरिक्ताच्या काळात साधकाला स्वप्रयत्नाने खेचरी मुद्रा साधणारही नाही पण साधनेला बसल्यावर गरजेप्रमाणे जीभ झटकन वळून कधी कपालकूहरात शिरेल ते कळणारही नाही.

खेचरी मुद्रा अत्यावश्यक आहे का?

काही योग परंपरा खेचरी मुद्रेविषयी दुराग्रह बाळगताना दिसतात. खेचरी शिवाय समाधी अशक्य आहे असा त्यांचा दावा असतो. जन्मोजन्मीच्या पुण्य कर्माचा प्रभाव म्हणून खेचरी साधते असे योगग्रंथ सांगतात हे जरी खरे असले तरी फक्त खेचरी म्हणजे सर्वस्व नाही. याबाबतीत रामकृष्ण परमहंसानी सांगितलेली एक गोष्ट आठवते. एकदा एका सोनाराला अचानक खेचरी मुद्रा लागली आणि तो समाधीत गेला. बघता बघता सार्‍या गावात हो गोष्ट पसरली. लोकं त्याला बघायला गर्दी करू लागते, त्याच्या पाया पडू लागले. काही तासांनी त्याची खेचरी सुटली, समाधी उतरली आणि तो पूर्वपदावर आला. त्याने आजूबाजूला पाहिले, मान हलवली आणि परत आपल्या घरात जाऊन कामात आणि संसारीक गोष्टीत व्यस्त झाला. तात्पर्य हे की खेचरी मुद्रा लागुन सुद्धा जर वैराग्य अंगी बाणलेले नसेल तर काही उपयोग व्हायचा नाही. त्या सोनारासारखे संसारात परत अडकायला होईल.

खेचरी मुद्रेद्वारे जी समाधी लागते त्याला जड समाधी म्हणतात. ही समाधी "जड" असते कारण ती कृत्रिमपणे जिभेच्या सहायाने प्राप्त करून घेतलेली असते. खेचरी लागली म्हणजे परमेश्वर हाती आला असा अर्थ होत नाही. खेचरी मुद्रा ज्या साधकांना साधत आहे त्यांनी ती जरूर करावी. ज्यांना इच्छा आहे त्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली थोडाफार पूर्वाभ्यासही करायला हरकत नाही. नभो मुद्रेसारख्या सोप्या क्रिया करायलाही हरकत नाही. परंतु महत्वाची गोष्ट आहे ती खेचरी अवस्था साधण्याची. नियमित साधना, वैराग्य, जप, अजप यांच्या सहाय्याने खेचरी अवस्था नक्कीच प्राप्त होऊ शकेल.

जाता जाता अजून एक रहस्य सांगतो - खेचरी मुद्रेने जे हाती लागतं त्यापेक्षा काकणभर जास्तच देणारी एक अजून मुद्रा आहे. शांभवी मुद्रा !! त्या विषयी पुन्हा कधीतरी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 May 2015