Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


गुरुपौर्णिमा २०२३ -- शिव, दत्तात्रेय, गोरक्ष

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजराजेश्वर योगीराज परब्रह्म भक्तप्रतिपालक
आदिगुरु भगवान सांब सदाशिव की जय

मागील महिन्यात आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. योग आता केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. एकेकाळी अगदी मोजक्या योगी, बैरागी, साधू, संन्यासी यांच्या पुरता मर्यादित असलेला योग आता लाखो लोकांना अगदी सहज उपलब्ध झाला आहे. भारतात तर गल्लोगल्ली योगसंस्था, योगा स्टुडीओ आणि आश्रम निर्माण झाले आहेत. योगशास्त्रा विषयी मुबलक प्रमाणात साहित्य आणि माहिती आज विविध मार्गांनी उपलब्ध होत आहे.

तसं पहायला गेलं तर योगशास्त्राला मिळालेल्या या लोकप्रियतेमुळे आणि लोकमान्यतेमुळे अधिक प्रमाणात योगी, आत्मसाक्षात्कारी, सिद्ध निर्माण व्ह्यायला हवे होते. परंतु तसं बिलकुल झालेले दिसत नाही. उलटपक्षी आज योगाभ्यासक भरपूर असले तरी उच्च कोटीचे योगी, आत्मसाक्षात्कारी, संत-सत्पुरुष म्हणाव्या अशा व्यक्ती मात्र अत्यल्पच आहेत.

असं का बरं होत आहे? एकेकाळी गोपनीयतेच्या वलयाखाली झाकल्या गेलेल्या योगक्रिया आज सहजरीत्या उपलब्ध असूनसुद्धा योगमार्गाचे अंतिम उद्दिष्ट साधण्यास साधक का बरं कमी पडत आहेत?

कारणं अनेक आहेत. त्याचा उहापोह करणे हा काही आपला आजचा विषय नाही परंतु आजच्या दिवशी एका कारणाकडे निर्देश करणे आवश्यक वाटते -- साधक योगशास्त्राच्या "माहितीचे" रुपांतर योग "ज्ञानात" करण्यात कमी पडत आहेत. माहितीचे रुपांतर ज्ञानात करण्यामागे एक महत्वाचा दुवा असतो -- सद्गुरू. गुरुचे महत्व हे असे आहे. तुम्ही कोणा देहधारी व्यक्तीला गुरुस्थानी माना अथवा एखाद्या देह ठेवलेल्या सिद्ध संत-सत्पुरुषाला गुरु माना अथवा तुमच्या इष्ट दैवतेला सद्गुरूचे अढळ स्थान द्या, माहितीचे रुपांतर ज्ञानात करण्यात या गुरुतत्वाचा फार मोलाचा वाटा असतो.

गुरूची निवड जर चुकली तर योगमार्गावर घेतलेली सगळी मेहनत वायफळ ठरू शकते. सहज लिहिता लिहिता आठवली म्हणून एक गोष्ट सांगतो --

कोणे एके काळी, कोणे एके गावी एक वृद्ध साधू आला. हा साधू चमत्कार दाखवण्यात पटाईत होता. कोणाचेही भूत-भविष्य सांगणे, हवेतून वस्तू काढणे वगैरे वगैरे जादुई गोष्टी तो अगदी सहज करत असे. साहजिकच गावाच्या लोकांची त्याच्यावर श्रद्धा बसली. गावकरी त्याला सिद्ध-संत-सत्पुरुष मानू लागले. गावचा तरुण वर्गही त्याच्याकडे आकर्षित झाला. काही तरुणांनी त्या साधूचे शिष्यत्व स्वीकारून त्याच्याकडून दीक्षा वगैरे घेतली.

काही वर्षांनी वृद्धापकाळामुळे तो साधू मरण पावला. गावकऱ्यांना वाईट वाटले. त्या साधूचे शिष्य तर अतिशय दु:खी झाले. काही दिवसांनी त्या साधूच्या काही शिष्यांच्या अवती भवती भयंकर अक्राळ-विक्राळ अशा भूत-पिशाच्चांचा वावर जाणवू लागला. दात कराकरा खात ती त्या शिष्यांना भिववू लागली. एका शिष्याने धीर करून त्या भूत-पिशाच्चांना येण्याचे विचारले.

त्यावर ती भुते म्हणाली की -- तुमच्या गुरूने आमच्याकडून कामे करून घेतली आहेत. त्याच्या सर्व सिद्धी आणि चमत्कार आम्हीच दाखवीत होतो. त्याच्या बदल्यात तो आम्हाला आमच्या आवडीचा भोग प्रदान करत असे. आता तो मेला आहे पण त्याने कबूल केलेला भोग आम्हाला मिळालेला नाही. तुम्ही त्याचे शिष्य आहात. शिष्य या नात्याने आता ती जबाबदारी तुमची आहे. मुकाट्याने आमचा भोग आम्हाला द्या अन्यथा आम्ही काही तुमचा पिच्छा सोडणार नाही. आपल्या गुरुचे खरे स्वरूप समजल्यावर शिष्यांची अर्थातच पाचावर घारण बसली.

या कथेचे तात्पर्य हे की -- गुरु आणि शिष्य यांचे नाते हे वाटते त्यापेक्षा अधिक सूक्ष्म आणि तरल स्तरावर घटीत होत असते. जर गुरूची निवड चुकली तर अध्यात्म सोडाच पण भलत्याच मार्गाला लागून अधःपतन होण्याचा धोका असतो. ही निवड नेहमी डोळसपणे करायला हवी. केवळ वाचीव, ऐकीव, सांगोपांगी माहितीवर आधारित ही निवड असता कामा नये.

संत कबीराचा एक प्रसिद्ध दोहा आहे --

गुरु कीजिए जानि के, पानी पीजै छानि ।
बिना विचारे गुरु करे, परे चौरासी खानि॥

संत कबीराच्या वरील दोह्याचे सुलभ हिंदी रुपांतर सुद्धा लोकप्रिय आहे -- पानी पीना छानकर और गुरु करना जानकर. आपण पिण्यासाठी पाणी ज्याप्रमाणे गाळून घेतो जेणेकरून पाण्यातील गाळ आणि कचरा निघून जाईल त्याप्रमाणे गुरूची निवड करतांना सुद्धा विवेकाची चाळणी अवश्य लावली पाहिजे. जर तसे केले नाही आणि गुरूची निवड चुकली तर कबीर म्हणतो की साधकाला चौऱ्यांशी लक्ष योनी भोगाव्या लागतील अर्थात मोक्ष कदापि मिळणार नाही.

समजा एखाद्या साधकाला कोणी देहधारी गुरु पसंत पडत नसेल आणि कोणा देह ठेवलेल्या संत-सत्पुरुषाची भक्ती सुद्धा करावीशी वाटत नसेल तर मग काय करायचं? या प्रश्नाचे उत्तर हे अर्थातच व्यक्तीसापेक्ष असणार आहे. तरीही श्रीगुरुचरित्रातील खालील ओवी येथे आठवते --

आदिपीठ 'शंकर' गुरु ।
तदनंतर 'विष्णु' गुरु ।
त्यानंतर 'चतुर्वक्‍त्र' गुरु ।
हें मूळपीठ अवधारीं ॥

याचा अर्थ असा की भगवान शंकर हे गुरुतत्वाचे आदिपीठ आहेत. भगवान शंकरा नंतर गुरुपीठाची धुरा श्रीविष्णूंकडे जाते आणि त्यानंतर ब्रह्मदेवाकडे. भगवान शंकर आदिगुरु असून त्यांच्या मुखातूनच शास्त्रे, आगम, मंत्रशास्त्र, योग कथन केली गेली आहेत. विशेषतः कुंडलिनी योग तर शिव-पार्वती संवादातूनच प्रकट झालेला आहे. कुंडलिनी योगाचा आणि शिव-शक्तीचा संबंध एवढा घनिष्ट आहे की मूलाधारातील शक्ती आणि सहस्रारातील शिव यांचे सामरस्य हा त्याचा गाभा आहे. ज्या भगवान शंकराने मानव पिंडात जगदंबा कुंडलिनी देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्या भगवान शंकराला सद्गुरू मानल्यास मार्ग सुकर होईल हे उघड आहे. एकदा का शंकराच्या चरणी स्वतःला अर्पण केले की मग तो सर्व काही पाहून घेतो.

विषयांतर वाटले तरी या बाबतीतील माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. बऱ्याच वर्षांपूर्वी मी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कुंडलिनी योगमार्गावर आलो. भगवान शंकराला सद्गुरू मानून वाटचाल सुरु केली. पुढे त्याच्याच कृपेने त्र्यंबकेश्वर येथे कुंडलिनी जागृत होऊन पुढचा मार्ग आणि प्रवास अगदी स्पष्टपणे उमगला. एक गंमत आणि योगायोग बघा. शिव महापुराणात भगवान शिवाच्या अंगातूनच श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांची निर्मिती झाली असा कथाप्रसंग आहे. म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश ही एकाच शिवतत्वाची त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सुद्धा नेमकी हीच स्थिती दर्शवते. हे शिवलिंग काहीसे खोलगट असून त्याच्या तळाशी ब्रह्मा-विष्णू-महेश असे तीन लिंगात्मक उंचवटे आहेत. सर्वसाधारण शिवलिंगात हे वैशिष्ठ दिसत नाही.

भगवान शंकराने दिलेली शिव साधना करता करता एकदिवस त्यानेच ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे स्वरूप असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या चरणी घातले आणि दत्तभक्ती सुद्धा करवून घेतली. माझ्यापुरते सांगायचे झाले तर त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मा-विष्णू-महेशच श्रीदत्त स्वरूपात अवतरले. मी नेहमी माझ्या अन्य लेखांत सांगतो की शिव आणि दत्त वेगळे नाहीत. एकच आहेत. त्या माझ्या प्रत्यक्ष अनुभूतीचे मूळ या गूढ संकेतात दडलेले होते.

शिवभक्ती, दत्तभक्ती करता करता एक दिवस शंभूजती गोरक्षनाथांची उपासना सुद्धा घडली आणि त्यांचा कृपाशीर्वाद सुद्धा लाभला. भगवान गोरक्षनाथ सुद्धा शंकराचाच अयोनिसंभव अवतार. ज्या गोरक्षनाथांनी संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा त्र्यंबकपंत याना अनुग्रह दिला होता त्या गोरक्षनाथांचा त्र्यंबकेश्वर क्षेत्राशी अत्यंत घनिष्ठ संबंध होता. गोरक्षनाथांनी त्र्यंबकेश्वरा जवळील गोरक्ष गुंफेत तप-साधना केली होती. अनुपम शिळेवर नवनाथ आणि चौरांशी सिद्धांना उपदेश केला होता. ही दोन्ही ठिकाणे भक्तांमध्ये प्रसिद्धच आहे.

या तिघांच्या अनुग्रहाने कुंडलिनी योगातील अनेक बारकावे, गोपनीय गोष्टी समजल्या ज्या आजवर कोणत्याच ग्रंथांत किंवा उपलब्ध साहित्यात निर्देशित नव्हत्या. माझ्यासारख्या यःकश्चित योगमार्गी साधकाला हाताचे बोट धरून मातेच्या मायेने आपलेसे करणाऱ्या श्रीगुरुमंडला विषयी अजून किती आणि काय सांगावे. शब्द अपुरे पडतील अन लेखणी थिटी पडेल. लिहिता लिहिता त्यांच्या आठवणीने रोमांच उभे राहिले आहेत आणि कंठ दाटून आला आहे. अधिक काही न लिहिता एवढेच सांगून पुढे जातो की भगवान शिव, अवधूत दत्तात्रेय, शंभूजती गोरक्ष यांची अभेद भावाने सेवा आणि भक्ती कुंडलिनी योग्याला बरंच काही देऊन जाते. कृतकृत्य करून जाते.

लिहिण्याच्या ओघात थोडे विषयांतर झाले. आज हे सगळं पाल्हाळ लावण्यामागे एवढाच उद्देश आहे की एकदा का तुम्ही स्वतःला शिवचरणी अर्पण केले की मग तो सगळं काही पाहून घेतो हे तुमच्या ध्यानी यावे. लोटाभर पाण्याने प्रसन्न होणारा तो "ओढरदानी" तुमच्यासाठी सर्वकाही करतो. तुम्ही त्याच्या चरणी श्रद्धा, सबुरी, शिस्त आणि समर्पण मात्र दाखवायला हवे. जन्मजन्मांतरीच्या या प्रवासात कित्येकदा असं होतं की आपल्या हातून नेमकी कोणाकोणाची उपासना घडणे आवश्यक आहे ते यःकश्चित मानवाला कळत नाही. मागील जन्मांतील कर्मे, प्रारब्ध, गतजन्मांतील साधना सर्वासामान्य साधकाच्या ज्ञानकक्षेत येऊ शकत नाहीत. भगवान शंकरासारखा कोणी जर आपला सद्गुरू आणि इष्ट असेल तर मग फारसा विचार करावा लागत नाही. तो परमपिता सर्वकाही जाणत असतो. तुमच्या चालू जन्मासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे त्याच्याशिवाय कोणाला ठाऊक असणार. शंभू महादेवाच्या चरणांशी स्वतःला ठेवले की मग कर्ता आणि करविता तोच बनून जातो.

शिवभक्ती आणि शिवसाधना कशी करावी हा सुद्धा तसा व्यक्तीसापेक्ष विषय आहे. प्रत्येकाचे आयुष्यातील ध्येय निरनिराळे असते. ते ध्येय गाठण्यासाठी अवलंबलेला मार्ग निरनिराळा असतो. प्रत्येकाची या वाटचालीची गती वेगवेगळी असतो. प्रत्येकाची या प्रवासा बद्दलची ओढ वेगवेगळी असते. अनंताच्या या वाटेवरती प्रत्येकाचा शोध भिन्न-भिन्न असतो. सोहं सरितेतील गुढगर्भ डोहात प्रत्येकाला झालेला बोधही भिन्न-भिन्न असतो. माझा शोध आणि बोध शंभू महादेवाच्या चरणांशी संपला. बाकी प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार आपला निर्णय घ्यावा आणि मार्गक्रमण करावे हे उत्तम राहील.

असो.

भगवान शिव-दत्त-गोरक्ष आपल्या गुरुकृपेच्या अमृत सिंचनाने योगसाधकांना कृतकृत्य करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजराजेश्वर योगीराज परब्रह्म भक्तप्रतिपालक
आदिगुरु भगवान सांब सदाशिव की जय


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 03 July 2023