अजपा योग आणि शांभवी मुद्रा ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

Untitled 1

सहज खेचरीत स्फुरलेले श्रीसुषुम्ना स्तवन

आज श्रावण मासारंभ होत आहे. काही वर्षांपूर्वी श्रावणातच एका निवांत वेळी "सहज खेचरीत" निमग्न असतांना स्फुरलेले आणि शब्दबद्ध केलेले "श्रीसुषुम्ना स्तवन" आज प्रस्तुत करत आहे. प्राचीन योगग्रंथांत सुषुम्नेला ज्या विविध नावांनी ओळखले जाते त्यांतील सात नावांची गुंफण या स्तवनात आहे. साधारणतः देवी-देवतांची स्तोत्रे आणि स्तवने ही पद्य स्वरूपात असतात. मला स्फुरलेले हे स्तवन मात्र गद्य स्वरूपात आहे. ही स्तुती वाचकांची योगाभ्यासातील गोडी वाढायला काही अंशी उपयोगी ठरेल एवढीच माफक आशा आहे. या स्तवनाच्या स्फुरणाला जगदंबा कुंडलिनी बरोबरच माझ्या "श्रीगुरुमंडलाचा" कृपाशीर्वाद आणि वात्सल्य प्रेम कारणीभूत आहे यात तिळमात्र शंका नाही.

ही सुषुम्ना स्तुती ही काही साहित्यिक रसास्वादाचा विषय नव्हे. त्या दृष्टीने त्याकडे अजिबात पाहू नये. हा संपूर्णतः योगगम्य रसास्वादाचा विषय आहे. ज्यांना अजपाचा आणि ध्यानोपासनेचा लळा लागलेला आहे त्यांनाच त्याची गोडी कळणार आहे. भगवान शंकराचा कुंडलिनी योग समृद्ध करण्यास अनेक सिद्ध योग्यांनी आणि त्यांच्या विविधांगी परंपरांनी आपापल्या परीने हातभार लावलेला आहे. आजच्या पावन दिवशी अशा सर्व सिद्ध योग्यांच्या चरणी नतमस्तक होत हे "श्रीसुषुम्ना स्तवन" येथे देत आहे.

वरील सुषुम्ना स्तवनाचे सविस्तर निरुपण करणे किंवा या स्तवनात निर्देश केलेल्या योगमय उपासनेचा विधी प्रकट करणे हा या लेखाचा उद्देश नाही. योगमार्गी अनुभवी साधकांना त्यांतील मर्म अवश्य कळेल. असे असले तरी या स्तवनाच्या फलश्रुतीविषयी काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे.

सुषुम्ना नाडी, सुषुम्नेकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निर्देश करणारी तिची सात नावे, आणि स्तवन हा अतिशय पवित्र विषय आहे. त्यामुळे हे स्तवन फलश्रुतीत दिल्याप्रमाणे दुर्जनांना कळणार नाही आणि फळणार तर त्याहून नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की आज सर्वत्र परपीडा, परनिंदा, असूया, आपापल्या मताविषयी पराकोटीचा दुराग्रह इत्यादी दुर्गुण सर्रास दिसून येत आहेत. कोणत्याही उपासनेबद्दल जोवर श्रद्धा असत नाही तोवर त्या उपासनेचे फळही मिळत नाही हे ओघाने आलेच. सर्व सुज्ञ आणि सुसंस्कृत वाचक अशा दुर्गुणांपासून स्वतःला दूर ठेवतील असा मला विश्वास आहे.

ह्या स्तुतीचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी विधिवत अजपा जप किंवा अजपा ध्यान करणे अगत्याचे आहे. आधी सांगितल्या प्रमाणे या स्तवनाचे केवळ पुस्तकी वाचन काही उपयोगी नाही. अजपा जप हा योग्य विधी सहितच घडला पाहिजे. अजपा ध्यान हे क्रियात्मक दृष्टीने सोपे असले तरी एक साधना म्हणून करत असतांना त्याचेही एक विशिष्ठ विधिविधान आहे. मंत्र. मुद्रा, प्राणायाम. आणि ध्यान यांचा तो एकत्रित सूक्ष्म अभ्यास आहे. केवळ पठण न करता स्तवनात दिल्याप्रमाणे सुषुम्नेच्या नामांचे आणि गुणांचे चिंतन-मनन करणे अधिक लाभप्रद आहे कारण शेवटी ही कुंडलिनीची ध्यानोपासना आहे. हे स्तवन ध्यानाभ्यासाला पोषक आहे आणि तसाच त्याचा उपयोग करायचा आहे.

सर्वसाधारण साधकांना सुषुम्ना नाडीविषयी अल्प माहिती असते. सुषुम्ना म्हणजे इडा आणि पिंगला यांच्या जोडीची मेरुदंडातून जाणारी एक नाडी. कुंडलिनी जागृत झाली की ती या सुषुम्नेतून जाते. सुषुम्ना नाडी सातही चक्रांना जोडते वगैरे मोजकीच माहिती बहुतांशी साधकांना असते. परंतु सुषुम्ना अजून बरंच काही आहे. सुषुम्नेचे यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी अथक साधना हा एकमेव मार्ग आहे. सुषुम्नेच्या कृपेने सुषुम्ना जाणायची असा काहीसा प्रकार आहे. फार काही सांगत नाही. तुम्ही स्वतःच्या साधनेच्या जोरावर ती अनुभूती प्राप्त करावी हे उत्तम.

आपण अनेकवेळा योगमार्गाला "योगशास्त्र" असं म्हणतो. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करण्याची स्वतःची अशी एक शिस्तबद्ध प्रणाली असते. त्या पद्धतीनेच तो अभ्यास घडायला हवा. रसायन शास्त्राचे उदाहरण घ्या. वाटेल तशी रसायने एकमेकात वाटेल त्या प्रमाणात मिसळली तर उपाय होण्याऐवजी अपायच होण्याची शक्यता जास्त असते. त्याच धर्तीवर वाटेल तशा साधना करून किंवा मन मानेल तसं आचरण करून योगमार्गावर थोडाफार लाभ कदाचित मिळू शकेल पण दीर्घकालीन फायद्यांपासून साधक वंचितच रहातो. कुंडलिनी योगाचे शास्त्र प्राचीन ऋषी-मुनींनी, योग्यांनी, आणि सिद्धांनी आखून दिलेले आहे. सुषुम्नेचे यथार्थ ज्ञान आणि जगदंबा कुंडलिनीची विशेष प्रीती प्राप्त करण्यासाठी श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण ही चतुःसूत्री योगाभ्यासी साधकांनी अवश्य अंगी बाणवली पाहिजे.

असो.

षटचक्रांची कमळे भेदून अनेक योगरहस्ये साधकापुढे लीलया प्रकट करणारी सुषुम्ना सर्व योगाभ्यासी वाचकांना "महापथा" वर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 09 August 2021