Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


घेरंड मुनींनी विषद केलेले ध्यानाचे तीन प्रकार

मागील लेखात आपण घेरंड मुनींच्या कुंडलिनी ध्यानयोगाची थोडक्यात ओळख करून घेतली. एकूण ध्यान प्रक्रियेची घेरंड मुनींनी ध्यान आणि समाधी अशा दोन भागात विभागणी केलेली आहे हे ही आपण जाणून घेतले. ध्यान आणि समाधी यांचे उद्दिष्ठ काय आहे त्याविषयीचे घेरंड मुनींचे मतही आपण जाणून घेतले. आता पुढे जाऊन घेरंड मुनींची ध्यान पद्धती जाणून घेऊया. ती अभ्यासत असतांना अजपा योगाच्या अनुषंगाने काही सूक्ष्म गोष्टींचा उहापोह करण्याचा यत्नही करूयात.

घेरंड मुनींनी ध्यानाचे तीन प्रकार विषद केले आहेत. त्यांविषयी सांगताना ते म्हणतात -

घेरण्ड उवाच -
स्थूलं ज्योतिस्तथा सूक्ष्मं ध्यानस्य त्रिविधं विदुः
स्थूलं मूर्तिमयं प्रोक्तं ज्योतिस्तेजोमयं तथा
सूक्ष्मं बिन्दुमयं ब्रह्म कुण्डलीपरदेवता

ध्यानाचे तीन प्रकार येथे सांगितले आहेत. स्थूलध्यान, ज्योतिर्ध्यान आणि सूक्ष्मध्यान. ज्या ध्यानात सगुण, साकार मूर्तीचा समावेश असतो ते म्हणजे स्थूलध्यान. ज्या ध्यानात तेजाचा अर्थात प्रकाशाचा समावेश असतो ते म्हणजे ज्योतिर्ध्यान. ज्या ध्यानात बिन्दुस्वरूप ब्रह्मकुंडलिनीचे ध्यान केले जाते ते झाले सूक्ष्म ध्यान.

घेरंड मुनींनी वरील तीनही ध्यानप्रकारांचे जे वर्णन आणि विधी सांगितला आहे त्याकडे वळण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.

ध्यानाभ्यास हा एक प्रवास आहे. वाऱ्यापेक्षा अधिक चंचल असलेल्या मनाला वेसन घालणे हे काही सोपे काम नाही. जे योगाभ्यासक नित्यानियामाने ध्यानाचा सराव करतात त्याना मनाची ही चंचलता चांगलीच ठावून असेल. मनाला वेसन घालायला गेले की ते तुम्हाला कधी हातोहात फसवेल ते भल्याभल्या साधकांन सुद्धा काळात नाही. नवख्या साधकांची तर गोष्टच सोडा. जर मनाला वेसन घालायची असेल तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्यानेच घालावी लागते. जर उत्साहाच्या भरात किंवा फाजील आत्मविश्वासाच्या भरात हे टप्पे सोडून आधीच पुढे मारायचा प्रयत्न केला तर हाती फारसे काही लागत नाही. अजपा योगाच्या अनुषंगाने बोलायचे झाले तर अजपा ध्यान विधीची गुंफण ही एकापेक्षा अधिक क्रियांत का केलेली आहे ते आता तुम्हाला कळू शकेल.

या प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे स्थूलध्यान. दैनंदिन आयुष्यात मानवी मनाला नामरूपात्मक गोष्टींची सवय असते. निर्गुण निराकार परमेश्वराचे ध्यान त्याला पटकन जमत नाही. या उलट सगुण, साकार वस्तूंचे ध्यान त्याला आवाक्यातले वाटते. म्हणूनच घेरंड मुनींनी ध्यानाचा पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे स्थूलध्यान. आपल्या इष्ट देवतेची मूर्ती असो अथवा आपल्या सद्गुरूंची मूर्ती अथवा गुरुपादुका असोत त्याना स्थूलध्यानाचा विषय बनवून मनाला त्याचे आलंबन करायला भाग पाडणे हा स्थूलध्यानाचा अभ्यास आहे.

आमच्या वेबसाईटवर दिलेला अजपा योगाचा प्राथमिक अभ्यास जर तुम्ही विचारात घेतलात तर त्यात मूर्ती किंवा विग्रह किंवा पादुका असे काहीही नाही. त्यामुळे घेरंड मुनींनी सांगितलेल्या स्थूलध्यानाचा संबंध अजपा योगाशी कसा काय आहे असे कदाचित तुम्हाला वाटेल. अजपा योगात प्रथम स्थूल शरीराकडून घडणारे श्वासोच्छ्वास ध्यानाचा विषय बनवले जातात. त्यामुळे नैसर्गिक श्वासांवरील ध्यान हे एका अर्थाने स्थूलध्यानच आहे.

कुंडलिनी योगमार्गावर साधक प्रगतावस्थेत पोहोचला की त्याला दैवी अनुभव येऊ लागतात. त्या अनुभूतींमध्ये नाद आणि प्रकाश यांच्या अनुभवांचा समावेश असतो. उदाहरण द्यायचे झाले तर ध्ध्यानावस्थेत अनाहत नाद ऐकू येणे किंवा ओंकाराचा ध्वनी ऐकू येणे किंवा मंत्र-स्तोत्रादि ऐकू येणे हे सगळे अनुभव नादाचे अनुभव आहेत. तर ध्यानावस्थेत दैवी प्रकाश दिसणे, चक्रांचा रंग आपोआप प्रकट होणे, एखादे विहंगम दृश्य दिसणे, देवी-देवतांची दर्शेन होणे यांसारखे अनुभव प्रकाशाचे अनुभव आहेत. घेरंड मुनींनी ध्यानाचा दुसरा प्रकार सांगितला आहे तो म्हणजे ज्योतिर्ध्यान. घेरंड मुनींनी ह्या दुसऱ्या प्रकाराचे वर्णन त्यामानाने अत्यंत त्रोटक स्वरूपात दिलेले आहे. ज्योतिर्मय प्रकाश म्हणजे फक्त दिव्याची ज्योत किंवा तत्सम प्रकाश असा अर्थ करणे बरोबर ठरणार नाही. तेज म्हणजे प्रकाश. मानवाची दर्शनक्षमता ही प्रकाशावर अवलंबून असते. जे काही दृश्यमान होईल ते एका अर्थाने प्रकाशाचाच खेळ असतो. त्यामुळे घेरंड मुनींचे ज्योतिर्ध्यान किंवा तेजोध्यान अभ्यासाच्या दृष्टीने जरा व्यापक अर्थाने समजून घ्यायला हवे.

अजपा ध्यानाच्या अनुषंगाने बोलायचे झाले तर अजपा योगाच्या चतुर्थ क्रियेमध्ये ज्योतीर्ध्यानाची प्रक्रिया समाविष्ट आहे. ज्योतीर्ध्यानाचे सर्व लाभ तर त्यात मिळतातच पण त्यापुढे जाऊन प्राण आणि कुंडलिनी कुटस्थामध्ये स्थिर होण्यास चालनाही मिळत असते.

घेरंड मुनींनी सांगितलेला ध्यानाचा तिसरा प्रकार म्हणजे सूक्ष्मध्यान. नावावरूनच तुमच्या लक्षात आला असेल कि आधी वर्णन केलेल्या दोन प्रकारांच्या तुलनेने हा अधिक प्रगत आणि अवघड प्रकार आहे. घेरंड मुनी म्हणतात की ध्यानाच्या या प्रकारात जगदंबा कुंडलिनीचे ध्यान सूक्ष्म बिन्दुस्वरुपात करावे. ते कसे करावे हे आपण नंतर जाणून घेणार आहोत परंतु येथे ध्यानाच्या या तीन प्रकारांचे टप्पे लक्षात घ्या. प्रथम स्थूल आणि दृश्यमान प्रतिक हा ध्यानाचा विषय होता. त्यानंतर तो स्थूल प्रकाश ज्योतिर्मय स्वरूपात परावर्तीत झाला. आता तोच ज्योतिर्मय प्रकाश सूक्ष्म बिंदूच्या स्वरूपात परावर्तीत झाला आहे. वर केलेले विवेचन तुम्हाला जर नीट उमगले असेल तर एकाच "प्रकाशाची" ही जणू तीन स्थित्यंतरे आहेत असे तुम्हाला जाणवेल. वरकरणी ते एकमेकांशी संबंध नसलेले ध्यानाचे प्रकार भासतील परंतु प्रत्यक्षात ते एकाच प्रक्रियेच्या प्रगतीचे तीन टप्पे आहेत.

अजपा योगाच्या दृष्टीने सूक्ष्म ध्यानाकडे बघायचे झाले तर असे म्हणता येईल की चतुर्थ क्रियेत प्रगती होत होत ती सूक्ष्म अवस्थेप्रत पोहोचते. मूलाधारातील कुंडलिनी आज्ञाचक्राची वेस ओलांडायाला सज्ज झाली कि सूक्ष्म ध्यान सहज जमू लागते. मंत्र आणि ध्यान यांच्या एकीकरणाचा हा टप्पा असतो. नाद आणि प्रकाश यांच्या खेळातून हा सूक्ष्मतर प्रवास करायचा असतो. अर्थात हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे शब्द तोकडे पडतात.

घेरंड मुनींनी सांगितलेल्या या तीन ध्यान प्रकारांची विधी आपण यानंतर क्रमशः जाणून घेणार आहोत. एकदम विधी-विधान देण्याआगोदर वरील पार्श्वभूमी नीट समजून त्यांची ध्यान पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास विषय अधिक सुलभ होईल अशी आशा आहे.

असो.

स्थूल ते सूक्ष्मतर जगतावर जो अधिराज्य गाजवतो तो जगद्नीयंता सदाशिव मुमुक्षु योगसाधकांना योग्य मार्ग दाखवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 28 November 2022