Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


चौऱ्यांशी लक्ष जीव योनी आणि तेवढीच योगासने

आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा सहा अंगांनी गोरक्ष शतकातील योग बनला आहे असं आपण लेखमालेच्या मागील भागात जाणून घेतले. आता शंभूजती श्रीगोरक्ष महाराज त्यांच्या षडंग योगातील प्रथम अंगा विषयी अर्थात आसना विषयी काही सांगत आहेत.

गोरक्षनाथ आसना विषयी सांगतात --

आसनानि तु तावन्ति यावत्यो जीवजातयः ।
एतेषामखिलान्भेदान्विजानाति महेश्वरः ॥
चतुराशीतिलक्षाणां एकमेकमुदाहृतम् ।
ततः शिवेन पीठानां षोडेशानं शतं कृतम् ॥
आसनेभ्यः समस्तेभ्यो द्वयमेव विशिष्यते ।
एकं सिद्धासनं प्रोक्तं द्वितीयं कमलासनम् ॥

वरील श्लोकांचा भावार्थ हा की -- जीवजंतुंच्या जेवढ्या प्रजाती पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत तेवढी आसने सुद्धा अस्तित्वात आहेत. ही सर्व सूक्ष्म भेद असलेली आसने केवळ भगवान शंकरच जाणतो. चौऱ्यांशी लक्ष जीव योनी पैकी एक-एक लाख जीव योनींचे प्रतिनिधित्व करणारी चौऱ्यांशी आसनेच शंभू महादेवाने प्रकटपणे सांगितली आहेत. त्यांपैकी दोन आसने विशेष आहेत. ती म्हणजे सिद्धासन आणि कमलासन (पद्मासन).

भारतीय अध्यात्मात वारंवार येणारी एक संकल्पना म्हणजे चौऱ्यांशी लक्ष जीव योनी. अध्यात्म मार्गाची फारशी ओळख नसलेल्या व्यक्तीला या चौऱ्यांशी लक्ष जीव योनीं बद्दल काही प्रश्न पडू शकतात. पहिलं म्हणजे ही चौऱ्यांशी लक्ष ही संख्या नेमकी कशी आली? दूसरा म्हणजे या चौऱ्यांशी लक्ष जीव योनी म्हणजे नक्की कोणत्या आहेत?

या पैकी पहिलं प्रश्न या लेखाशी थेट संबंधित नसल्याने मी त्यांचे विश्लेषण येथे करत नाही. इतके सांगितले तरी पुष्कळ आहे की चौऱ्यांशी लक्ष ही संख्या काही हवेतून काढलेली नाही. या विशिष्ठ संख्येमागे प्राचीन ऋषी-मुनींचा काही तर्क आहे. काही सिद्धांत आहे. त्या विषयी पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहिन. दूसरा जो प्रश्न आहे तो या लेखाच्या विषयाशी अधिक निगडीत आहे कारण गोरक्षनाथांनी चौऱ्यांशी लक्ष जीव योनींकडे निर्देश केलेला आहे आणि त्यांतील विविधता केवळ भगवान शंकरालाच ठाऊक असल्याचे सांगितले आहे.

चौऱ्यांशी लक्ष जीव योनींचे वर्गीकरण शास्त्र ग्रंथांत खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे --

जलज नव लक्षाणी स्थावर लक्ष विम्शति कृमयो रूद्र संख्यक:।
पक्षिणाम दश लक्षणं त्रिन्शल लक्षानी पशव: चतुर लक्षाणी मानव:।।

वरील श्लोकानुसार जलज म्हणजे पाण्यात राहाणाऱ्या जीव योनी नऊ लाख एवढ्या आहेत. झाडे-झुडपे वगैरे स्थिर राहाणाऱ्या जीव योनींची संख्या वीस लक्ष एवढी आहे. कृमि-कीटक स्वरूपातील जीव योनींची संख्या आहे अकरा लाख. पक्षी वर्गात मोडणाऱ्या जीव योनी आहेत दहा लाख. पशू वर्गात मोडणाऱ्या जीव योनी आहेत तीस लाख. शेवटी मनुष्य देह धारण केलेल्या मानव, देवी-देवता, दानव वगैरे योनींची संख्या आहे चार लाख. वरील वर्गीकरणाची बेरीज केली तर ती ९ + २० + ११ + १० + ३० + ४ = ८४ लाख एवढी भरते.

आता कल्पना करा की एवढ्या सगळ्या चित्रविचित्र जीव योनींची प्रत्येक जीव योनीचे एक या प्रमाणे एकूण चौऱ्यांशी लक्ष आसने आहेत. ही एवढी आसने प्रत्यक्ष करणे तर सोडाच परंतु ती लक्षात ठेवणे सुद्धा सामान्य माणसाला शक्य होणार नाही. भगवान शंकर मात्र उत्पत्ति-स्थिति-लय यांच्या पलीकडील शाश्वत तत्व असल्याने तो या सर्व जीव योनी आणि पर्यायाने चौऱ्यांशी लक्ष आसने जाणतो.

वरील वर्गीकरणातील दूसरा गंमतीचा भाग बघा. देवी-देवता-राक्षस-दानव वगैरे सुद्धा मानव योनीत गणल्या गेल्या आहेत कारण त्यांना सुद्धा मनुष्य सदृश देह लाभला आहे. किमान वरील वर्गीकरणात तरी तसे मानले गेले आहे. भले त्या देहाच्या क्षमता, आयुष्य, उर्जेचा स्तर भिन्न-भिन्न असतील परंतु जीव योनी मात्र मानवच.

तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या विश्वाच्या एवढ्या पसाऱ्यामध्ये आपल्याला दुर्लभ मानली गेलेली मानव योनी प्राप्त झालेली आहे. त्याचा सदुपयोग करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्राप्त झालेल्या मानव जीव योनीचा सदुपयोग करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे शंभू महादेव-दत्तात्रेय-गोरक्ष यांनी प्रसार आणि प्रचार केलेला योग मार्ग.

गोरक्षनाथ महामुनी पुढे सांगतात की या सर्व आसनांमध्ये दोन योग्यासाठी विशेष महत्वाची आहेत -- सिद्धासन आणि कमलासन किंवा पद्मासन. आधुनिक काळात कोणत्याही चांगल्या योगासनांच्या पुस्तकामधून या आसनांची कृती सहज कळणारी आहे. जवळजवळ प्रत्येक योगासनांच्या अभ्यास वर्गात कमी-अधिक प्रमाणात त्यांचा सराव केला जातो. त्यामुळे या आसनांच्या सखोल कृतीत जाण्याची आपल्याला गरज नाही. या दोन आसनांचे गोरक्षनाथांना अभिप्रेत असलेले व्हर्जन कोणते आहे ते कळावे म्हणून एक धावती ओळख करून घेऊ.

योनिस्थानकमंघ्रिमूलघटितं कृत्वा दृढं विन्यसे-
न्मेढ्रे पादमथैकमेव नियतं कृत्वा समं विग्रहम् ।
स्थाणुः संयमितेन्द्रियोऽचलदृशा पश्यन्भ्रुवोरन्तरं ।
एतन्मोक्षकवाटभेदजनकं सिद्धासनं प्रोच्यते ॥

सिद्धासन करण्यासाठी डाव्या पायाच्या टाचेने शिवण स्थान घट्ट दाबून धरावे. उजव्या पायाच्ची टाच लिंग स्थानाच्या काहीशी वर दाबून धरावी. असे केल्याने शरीर ताठ होऊन समावस्थेत रहाते. त्यानंतर इंद्रियांचा निग्रह करून दोन भुवयांच्या मध्यभागी बघावे अर्थात शांभवी मुद्रा करावी. याला मोक्ष प्रदायक सिद्धासन असे म्हणतात.

वरील कृतीत मूलाधार चक्र, स्वाधीशठान चक्र यांच्याबरोबर आज्ञाचक्र यांचाही समावेश झालेला आहे. केवळ पायांची कृती मोक्ष प्रदान करू शकणार नाही हे उघड आहे. त्यामुळे इंद्रिय संयम, चक्र संतुलन आणि शांभवी मुद्रा यांचा केलेला समावेश येथे खूप महत्वाचा आहे. इंद्रियनिग्रहा सहित केलेली शांभवी मुद्राच योग्याला मोक्षकारक ठरू शकते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

आता गोरक्षनाथ कामलासन सांगतात --

वामोरूपरि दक्षिणं हि चरणं संस्थाप्य वामं तथा ।
दक्षोरूपरि पश्चिमेन विधिना धृत्वा कराभ्यां दृढम् ।
अङ्गुष्ठौ हृदये निधाय चिबुकं नासाग्रमालोकये-
देतद्व्याधिविकारहारि यमिनां पद्मासनं प्रोच्यते ॥

उजवे पाऊल डाव्या मांडीवर आणि दावे पाऊल उजव्या मांडीवर धारण करून दोन्ही हात पाठीमागून घालून उजव्या हाताने उजव्या पावलाचा आणि डाव्या हाताने डाव्या पावलाचा अंगठा धरावा. हनुवटी छातीवर घट्ट दाबून धरावी आणि नासिकाग्ग्रावर दृष्टी रोखून धरावी. याला योग्याच्या शरीरातील समस्त व्याधी-विकार नष्ट करणारे पद्मासन असे म्हणतात.

येथे सुद्धा पद्मासनाचा काहीसा कठीण प्रकार गोरक्षनाथांनी सांगितला आहे. पद्मासनाची उपयोगिता शरीर निरोगी ठेवण्यासाठी सांगितली आहे. ध्यानासाठी पद्मासनाचा वापर करत असतांना अर्थातच हातांनी पावलांचे अंगठे धरणे आणि हनुवटी छातीवर दाबून धरणे हा भाग बऱ्याचदा वगळला जातो. येथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की शांभवी मुद्रेच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यांमध्ये काही पद्धतींत भ्रूमध्यायकडे तर काहींत नासिकाग्राकडे लक्ष एकाग्र केले जाते. गोरक्षनाथांनी सिद्धासन सांगताना शांभवीची भ्रूमध्य पद्धती सांगितली आणि पद्मासन सांगताना शांभवीची नासिकाग्र पद्धती ते सांगत आहेत. शांभवी मुद्रा किती महत्वाची आहे ते यावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे.

वरील दोन्ही आसनांत काही समान दुवे आहेत जे ध्यानाभ्यासासाठी महत्वाचे आहेत. सिद्धासन आणि पद्मासन या दोनही आसनात मेरूदंड ताठ ठेवला जातो. दोन्ही आसनांत पायांची घडी घातली जाऊन बैठकीला छान विस्तृत आकार प्राप्त होतो. दोन्ही आसनांत केवळ शारीरिक बरोबरच इंद्रियनिग्रह सुद्धा आवश्यक आहे. दोन्ही आसनांमध्ये शांभवी मुद्रा धारण केली जाते किंवा शंभविला पोषक अशी स्थिति धारण केली जाते. तुम्ही ध्यानासाठी अगदी गोरक्षनाथांनी सांगितल्या प्रमाणे तंतोतंत आसने धारण केली नाहीत तरी जे कुठले आसन तुम्ही ध्यानासाठी निवडाल त्यात वरील वैशिष्ठ्ये आणि गुणधर्म असले म्हणजे झाले.

असो.

चौऱ्यांशी लक्ष जीव योनींची टाकसाळ चालवणारी जगदंबा पार्वती आणि जगदनियंता शंकर सर्व वाचकांना आपापल्या आसनात ध्यानमग्न करोत या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 25 March 2024