Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


सतीच्या देहाचे तुकडे आणि भगवान शिव प्रणीत दोन मार्ग

एकदा काही ऋषी-मुनींनी एका यज्ञाचे आयोजन केले होते. सर्व देवी-देवतांना आमंत्रण दिलेले होते. प्रजापति दक्ष सुद्धा यज्ञात उपस्थित रहाण्यासाठी आला होता. दक्ष आल्यावर त्याला मान देण्यासाठी सर्व देव उभे राहिले. भगवान शंकर मात्र आपल्या आसनं वरुण उठला नाही. या गोष्टीचा दक्षाला खूप राग आला. त्याने ही गोष्ट मनात धरून ठेवली.

पुढे एकदा दक्षाने स्वतः एका यज्ञाचे आयोजन केले. मागे झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने भगवान शंकराला वगळून बाकी सर्व देवांना यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. वास्तविक पहाता दक्ष कन्या सती भगवान शंकराची अर्धांगिनी त्यामुळे नात्याने शंकर दक्षाचा जावई होता. तरीही शिवाला अपमानित करण्यासाठी त्याने मुद्दाम आमंत्रण धाडले नाही.

इकडे सतीने विचार केला की पित्याच्या घरातील कार्यालय जाण्यासाठी आमंत्रणांची काय गरज. आपल्याच घरातील कार्य आहे तेंव्हा आपण अवश्य गेले पाहिजे. भगवान शंकर दक्षाच्या मनातील हेतु ओळखून होता. तो सतीला म्हणाला की तुझ्या वडिलांच्या मनात आपला अपमान करायचे आहे तेंव्हा आपण काही तेथे जाऊ नये हे उत्तम. तरीही सतीने बराच हट्ट धरला तेंव्हा नाईलाजाने शंकराने सतीला दक्षाकडे जाण्याची परवानगी दिली. स्वतः शंकर मात्र यज्ञाला न जाता अलिप्त राहिला.

अपेक्षेप्रमाणे सती यज्ञस्थळी गेल्यावर दक्षाने भर सभेत भगवान शंकराला अपमानास्पद दूषणे देण्यास सुरवात केली. पित्याकडून होत असलेला पतीचा अपमान सतीला सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात उडी घेतली. सती म्हणजे साक्षात आदिशक्तीचे स्वरूप. सतीने प्राणाहूती दिल्यावर ब्रह्मांडात हाहाकार उडाला. आपल्या प्रियेचा झालेला अपमान आणि तिने दिलेली प्राणाहूती भगवान शंकराला कळल्यावर तो प्रचंड संतापला. आपला मानसपुत्र वीरभद्राला पाठवून त्याने दक्षयज्ञाचा पुरता विध्वंस केला. एवढेच नाही तर वीरभद्राने शिवनिंदा करणारे दक्षाचे मस्तक तोडून टाकले. शोकाकुल अवस्थेत भगवान शंकराने यज्ञकुंडातून सतीचे कलेवर उचलले आणि बेभान होऊन तो भूमंडलावर भ्रमण करू लागला.

बराच काळ लोटला तरी शंकर शोकाकुल अवस्थेतून बाहेर येईना. यावर उपाय म्हणून विष्णूने सुदर्शन चक्राच्या सहाय्याने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. हे तुकडे भारत भूमीवर जिकडे-जिकडे पडले तिकडे-तिकडे शक्तिपीठांची निर्मिती झाली. अशी एकूण एक्कावन शक्तिपीठे तयार झाली. काही ग्रंथांत शक्तिपीठांची ही संख्या बावन्न, एकशे आठ वगैरे सुध्दा आढळते. या मतभिन्नतेमुळे तुम्ही तुमच्या गुरुपरंपरेला अनुसरून जी संख्या असेल ती ग्राह्य धरावी हे उत्तम. मला माझ्या श्रीगुरुमंडलाने शक्तिपीठांचा एक वेगळाच अर्थ सांगितला आहे त्या विषयी पुन्हा कधीतरी विस्ताराने सांगीन. महत्वाची गोष्ट ही की या शक्तिपीठांमध्ये शक्ति उपासना किंवा शाक्त मार्गी उपासना विपुल प्रमाणात होऊ लागली. या पौराणिक घटनेचा फार खोल आणि फार सूक्ष्म ठसा भारतीय उपासना पद्धतीवर आणि साधना मार्गावर जागोजागी झालेला आपल्याला दिसून येतो.

भारतीय अध्यात्मशास्त्रात वेदांना सर्वोपरी मानण्यात आलेलं आहे. वेदांत सांगितलेले "सर्वं खल्विदं ब्रह्म" अर्थात सर्व चराचर सृष्टीत ब्रह्म ओतप्रेत भरलेले आहे हे कळणे सर्वसामान्य माणसासाठी अवघड आहे. नुसते "ब्रह्म-ब्रह्म-ब्रह्म" असे घोकून काही ब्रह्म अनुभवता येणार नाही. ब्रह्मतत्व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी काहीतरी मार्ग किंवा उपाय किंवा साधना माहीत असल्या खेरीज ते कळणार नाही. परम दयाळू शंभू महादेवाने असे दोन अत्यंत महत्वाचे मार्ग सांगितले आहेत -- योग आणि तंत्र. एके ठिकाणी भगवान शंकर स्वतः म्हणतात --

योगमार्गेषू तंत्रेषू दीक्षितांस्तश्च दूषका:
ते ही पाषणडिन: प्रोकता: तथा तै: सहवासिन:

याचा अर्थ असा की योग आणि तंत्र मार्गावरील दीक्षा ग्रहण केलेल्या साधकांना जो दूषणे देतो तो व्यक्ति आणि त्याला या कामी साथ देणारे सहकारी हे निःसंशय पाखंडी समजावेत.

योग आणि तंत्र हे दोन्ही मार्ग भगवान आदिनाथानेच जनकल्याणाच्या हेतूने प्रसारित प्रचारीत केलेले आहेत. त्यापैकी तंत्र मार्ग हा निरनिराळ्या देवी-देवतांची उपासना विदित करणारा आहे. हे सर्व उपासना विधी शिव-पार्वती संवादाच्या रूपाने तंत्र साहित्यात प्रचुर प्रमाणात उपलब्ध आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की आधुनिक काळात तंत्र म्हणजे जारण-मारण, वशीकरण, टोने, टोटके, तोडगे, उपाय वगैरे वगैरे परपीडा प्रधान गोष्टींचा संग्रह बनून राहिलेला आहे. त्यांतील सखोल आध्यात्मिक विचारधारा, शुद्धता आणि सात्विकता जवळजवळ लोप पावलेली आहे.

भगवान शंकराची योगविद्या ही मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग आणि राजाधिराज योग अशा पाच प्रमुख शाखांत पसरलेली आहे. बाह्य देवी-देवतांची उपासना करून झाली की मग अंतरंगातील "आत्मारामाची" उपासना सुरू होते ती योगमार्गाच्या सहाय्याने. त्यातूनच मग पुढे "जीव-शिव" ऐक्याची किंवा "सर्वं खल्विदं ब्रह्म" अनुभूती योगासाधक घेत असतो. दुर्दैवाने शंभू महादेवाने प्रसारित केलेला योगमार्ग सुद्धा कालियुगाच्या भेसळी पासून वंचित राहिलेला नाही. आज योगाच्या नावाखाली मन मानेत तशी तोडमोड आणि शेंडा-बुडखा नसलेल्या साधना सर्रास पहायला मिळत आहेत. विशेषतः पाश्चात्य जगत या भेसळीत आघाडीवर आहे.

योग आणि तंत्र हे दोन मार्ग साधनेच्या दृष्टीने जरी पूर्णतः भिन्न वाटत असले तरी त्यामध्ये एक महत्वाचा असा समान दुवा आहे -- शक्ति. सतीच्या कथेत शक्तिपीठांची निर्मिती आणि त्यांचा शक्ति उपासनेशी असलेला संबंध आपण जाणून घेतला. तंत्र शास्त्रात या शक्तीची बाह्य उपासना अधिक महत्वाची मानली गेली आहे तर योगशास्त्रात शक्तीची आंतरिक उपासना अधिक महत्वाची मानली गेली आहे. दशमहाविद्या असोत किंवा नवदुर्गा उपासना असो किंवा अन्य अनेकानेक देवी स्वरूपांची उपासना असोत त्या सर्व योगशास्त्रात कुंडलिनी उपासनेत येऊन एकवटतात. "यथा पिंडे तथा ब्रह्मांडे" किंवा "पिंडी ते ब्रह्मांडी" या तत्वानुसार सतीच्या कलेवराचे तुकडे योग्यासाठी बाहेर सांडलेले नसतात तर ते पिंडातच विद्यमान असतात. योग्यासाठी शक्ति पिंडातच आपल्या भ्रतारा बरोबर सुखाने नांदत असते आणि शिवही पिंडातच आपल्या सखीच्या सहवासाचा आनंद घेत समाधीसुख भोगत असतो.

वरकरणी भिन्न-भिन्न भासणाऱ्या या दोन साधना मार्गांत अनेक ठिकाणी एक विलक्षण Overlap आढळतो. या दोन मार्गांच्या परिभाषेतील अनेक शब्द आणि संज्ञा समान आहेत परंतु त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र पूर्णतः वेगवेगळा आहे. एक छोटेसे उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल. तंत्र शास्त्रात जारण-मारणादी अभिचार कर्म "षटकर्मे" म्हणून ओळखली जातात. आता तंत्रशास्त्रातील ही षटकर्मे कोणती तर मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन, विद्वेषण आणि उच्चाटन. योगशास्त्रात शरीर शुद्धी करण्यासाठी "षटकर्मे" आहेत. आता योगशास्त्रातील षटकर्मे पहा -- धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती. या दोन मार्गातील हा विरोधाभास नीट पहा. दोन्ही "षटकर्मे" पण एक तमोगुण प्रधान आणि म्हणूनच योग्याना निषिद्ध. दुसरी सत्वगुण प्रधान आणि शरीरशुद्धी घडवण्यास सहाय्यक आणि म्हणूनच योग्याना प्रिय आणि स्वीकारार्ह.

आता भगवान शंकराने आणि मच्छिंद्र-गोरक्ष आदि सिद्ध योग्यानी या दोन्ही शाखांत एकच संज्ञा का बरं वापरल्या असाव्यात? तसं पाहायला गेलं तर भिन्न-भिन्न संज्ञा वापरणे त्यांना सहज शक्य होते पण तरीही त्यांनी तसे न करता एकच संज्ञा वापरली. असे करण्यामागे मला तीन कारणे महत्वाची वाटतात. पहिले म्हणजे या दोन्ही मार्गांवर "पिंडी ते ब्रह्मांडी" हा सिद्धांत ग्राह्य मानलेला आहे. जर आंतरीक जगत आणि बाह्य जगत यांतील साम्य वारंवार अधोरेखित करायचे असेल तर त्यासाठी दोन्ही ठिकाणी समान परिभाषा किंवा समान संज्ञा वापरणे उचित आहे. दुसरे कारण असे की हे दोन्ही मार्ग एकमेकाला समांतर (Parallel) जातात. या मार्गांवरील साधना प्रणाली जरी भिन्न असल्या तरी त्या मार्गांवरील अनेक टप्पे सारखेच आहेत. त्यामुळे या दोन समांतर धावणाऱ्या मार्गांवर पारिभाषिक शब्द आणि संकल्पना सुद्धा मिळत्याजुळत्या आहेत. तिसरे एक सूक्ष्म कारण मला विशेष महत्वाचे वाटते ते म्हणजे Confirmation Bias.

आता Confirmation Bias म्हणजे काय? समजा मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे. जर मी तुम्हाला सांगत असलेली गोष्ट तुमच्या श्रद्धेशी किंवा तुमच्या विचारसरणीशी किंवा तुमच्या Belief System शी मिळती जुळती असेल तर तुम्ही माझ्या म्हणण्याचा लगेच स्वीकार कराल. या उलट माझे सांगणे जर तुमच्या श्रद्धेशी किंवा तुमच्या विचारसरणीशी किंवा तुमच्या Belief System शी मेळ खाणारे नसेल तर तुम्ही माझे म्हणणे सहजासहजी स्वीकारणार नाही. माझे सांगणे योग्य असले तरी मग तुम्ही त्या बद्दल साशंकता दर्शवाल किंवा त्याला नाकाराल कारण ते तुमच्या विचारसरणीशी जुळत नाहीये.

मच्छिंद्र-गोरक्षनाथांचा प्रभाव त्या काळच्या अध्यात्म जगतावर एवढा विलक्षण होता की अनेक अघोरी, कापालिक, तांत्रिक मार्गावरील साधक आपापले पूर्वापार रूढ असलेले मार्ग सोडून त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. या अन्य पंथाच्या वाटसरूंसाठी नवीन काही संज्ञा प्रचारात आणण्यापेक्षा त्यांच्या Confirmation Bias शी मिळत्या जुळत्या भाषेचा वापर त्यांना अधिक परिणामकारक वाटला असावा.

तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की आजच्या या लेखाचा मूळ गोरक्ष शतकाशी काय संबंध आहे?! आता गोरक्ष महाराज पुढे जे काही सांगणार आहेत ते नीट कळण्यासाठी वरील सर्व पार्श्वभूमी तुम्हाला उपयोगी पडेल असे मला वाटले म्हणून या लेखाचा प्रपंच मांडला. आता शंभूजती गोरक्षनाथ चक्रे, कुंडलिनी आणि प्राण यांबद्दल काही सांगणार आहेत. पुढील लेखात त्यांच्याच कृपेने मी ते यथाशक्ति विषद करणार आहे.

असो.

साडेतीन वेटोळे घालून निवांत बसलेली परांबा पराशक्ती कुंडलिनी सर्व वाचकांना योगमार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 May 2024