Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


अनंतकोटीब्रह्मांडनायक

भारतवर्षात आजवर अनेक सत्पुरुष होऊन गेले. अध्यात्म जगतातील अनेक जण या सत्पुरुषांची भक्ती, उपासना करतांना आपल्याला दिसतात. यांतील काही सत्पुरुषांचे मठ, आश्रम, समाधी स्थळे वगैरे ठिकाणे सुद्धा अतिशय लोकप्रिय आणि सर्वज्ञात आहेत. या सत्पुरुषांच्या भक्तमंडळींच्या उपासनेत एक गोष्ट तुम्हाला हमखास आढळून येईल ती म्हणजे त्यांनी केलेला त्या-त्या सत्पुरुषाच्या नावाचा जयकार. कित्येकदा या जयकाराचे वाक्य सुद्धा त्या-त्या सत्पुरुषांच्या मठ-मंदिरांच्या भिंतींवर अंकित केलेले तुम्हाला आढळून येईल.

मी ज्यावेळेस योग-अध्यात्म मार्गावर नुकतेच पाऊल ठेवले होते तेंव्हा मला या जयकाराच्या वाक्यांचे एक वैशिष्ठ्य नेहमी खुणावत असे. ते वैशिष्ठ्य म्हणजे सत्पुरुष जरी भिन्न-भिन्न असले तरी बहुतेक सर्व सत्पुरुषांच्या जयकाराची वाक्ये या एकाच शब्दाने सुरू होत होती -- अनंतकोटीब्रह्मांडनायक.

त्या काळात हा शब्द - अनंतकोटीब्रह्मांडनायक - मला फार कॅची वाटत असे. मला जेंव्हा हे वैशिष्ठ्य जाणवले तेंव्हा माझ्या डोक्यात विचारांचा भुंगा सुरू झाला. हा शब्द कोणी शोधला असेल? हा शब्द कोणत्या प्राचीन ग्रंथाततून आला असेल? हा शब्द एखाद्या विशिष्ठ देवाचे किंवा परंपरेचे भक्तच वापरत असतील की कोणत्याही देवाला हा वापरला जात असेल? भगवान शंकरासाठी हे विशेषण कधी वापरले जाते का? असे अनेक प्रश्न जे आज कदाचित वरकरणी अगदी सामान्य किंवा अनावश्यक वाटतील ते माझ्या मनात त्यावेळी उभे राहिले होते.

ही फार जुनी गोष्ट सांगतोय. त्यावेळी आजच्या सारखी इंटरनेटची सुविधा सहज उपलब्ध नव्हती. त्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी थोडीफार पुस्तके आणि स्तोत्राच्या पोथ्या हाच मुख्य स्त्रोत माझ्याकडे उपलब्ध होता. नोकरी आणि दैनंदिन कामाच्या व्यापात हे प्रश्न मनात तसेच गाडले गेले. पाहू कधी वेळ मिळेल तेंव्हा असं स्वतःला समजावत दैनंदिन जीवन सुरू होते.

एके दिवशी दुपारी माझ्या संग्रहातील शिवोपासनेच्या पुस्तकांचा आणि पोथ्यांचा गठ्ठा घेऊन तो चाळत बसलो होतो. काळाच्या ओघात वरील प्रश्न जवळजवळ विस्मरणात गेले होते. ध्यानीमनी नसतांना एका स्तोत्राच्या पोथीत मृत्युंजय अष्टोत्तरशतनामावली नावाचे स्तोत्र सापडले. भगवान शंकराचेच स्वरूप असलेल्या मृत्युंजयाची एकशे आठ नावे असे त्या स्तोत्रचे स्वरूप होते. केवळ योगायोगाने माझी नजर त्यातील एका नावावर पडली -- ॐ अनंतकोटीब्रह्मांडनायकाय नम:. याच स्तोत्राच्या काही पाठभेदांत "अनंत" ऐवजी "अनेककोटीब्रह्मांडनायकाय" असा पाठभेद सापडला. शब्द किंचितसा वेगळा पण अर्थ तोच.

पुढे अजूनही शोध घेतला तर स्कंद पुराणातील ऋषभ योगी आणि भद्रायू आख्यानात शिव अवतार असलेल्या ऋषभ योग्याने भद्रायूला जी शिव नामावली आणि स्तोत्र दिले त्यातही अनंतकोटीब्रह्मांडनायक असा स्पष्ट उल्लेख होता. सहस्राक्षरी मालामंत्रात सुद्धा भगवान शंकराचे एक नाव म्हणून अनंतकोटीब्रह्मांडनायक असा स्पष्ट उल्लेख सापडला. महादेवाचा रुद्रावतार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मारुतीच्या पंचमुखी हनुमान कवचात हनुमानाला सुद्धा अनंतकोटीब्रह्मांडनायक असे म्हटलेले आढळले. त्यामुळे कदाचित अन्य अनेक देवी-देवतांच्या बाबतीत हाच शब्द वापरला गेला असेल याची कल्पना आली. अखिल ब्रह्मांडांची परमसत्ता किंवा परमेश्वर याकडे निर्देश करणारा हा शब्द आहे याची जाणीव झाली. प्रत्येक देवी / देवतेचे / सत्पुरुषांचे भक्त आपापल्या आराध्य दैवतेला सर्वश्रेष्ठ मानत असतात आणि त्यात वावगे असे काहीच नाही. तो भक्ताच्या हृदयाचा जणू सहज स्वभावच असतो. माझ्यापुरती तरी मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. शंभू महादेवाचा हा जयकार त्यावेळी माझ्या मुखातून पहिल्यांदा उत्स्फूर्तपणे बाहेर पडला होता --

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजराजेश्वर योगीराज परब्रह्म भक्तप्रतिपालक
आदिगुरु भगवान सांब सदाशिव की जय

योग-अध्यात्मात सत्य-त्रेता-द्वापर-कली अशी चार युगांची कालगणना मानली जाते. चार युगांची चौकडी एक हजार वेळा झाली की एक कल्प पूर्ण होतो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस-रात्र आणि ब्रह्मदेवाचे आयुष्य असते अशी शंभर वर्षे. असे सहस्र ब्रह्मदेव झाले की विष्णूची एक घटिका होते आणि असे हजार विष्णु झाले की रुद्राचा एक पळ होतो. असे हजार रुद्र झाले की आदीमायेचा अर्धा पळ होतो. आदिमाया ज्याच्यात विसावते तो भगवान महाकाल, मृत्युंजय अर्थात निर्गुण निराकार शंभू महादेव या सगळ्या अथांग काळाच्याही पलीकडे विराजमान असतो. ही थक्क करणारी कालगणना पाहिली की अनंतकोटी ब्रह्मांडे म्हणजे काय अफाट पसारा असेल याची अंधुकशी कल्पना येऊ शकेल. या अनंत काळाचा आणि ब्रह्मांडांचा स्वामी किंवा मालक असलेल्या भगवान शिवशंकराला अनंतकोटीब्रह्मांडनायक हे विशेषण अगदी सार्थक आणि चपलख बसणारे आहे.

असो.

काळाच्याही पलीकडे असणारा भगवान सदाशिव भक्तांच्या हृदयात मात्र सदासर्वकाळ विराजमान असतो. गुरुपौर्णिमा येऊ घातली आहे. तो आदीगुरु सर्वेश्वर साधकांना योग्य मार्ग दाखवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 19 July 2024