Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


योगमार्गाचे महत्व आणि आवश्यक पात्रता -- गोरक्ष शतक

लेखमालेच्या मागील भागात आपण गोरक्ष शतका विषयी थोडक्यात ओळख करून घेतली. आता आपण थोडेसे अंतरंगात शिरणार आहोत.

गोरक्ष शतकाची सुरवात अशी आहे --

ॐ परमगुरवे गोरक्षनाथाय नमः ।
ॐ गोरक्षशतकं वक्ष्ये भवपाशविमुक्तये ।
आत्मबोधकरं पुंसां विवेकद्वारकुञ्चिकाम् ॥
एतद्विमुक्तिसोपानमेतत्कालस्य वञ्चनम् ।
यद्व्यावृत्तं मनो मोहादासक्तं परमात्मनि ॥
द्विजसेवितशाखस्य श्रुतिकल्पतरोः फलम् ।
शमनं भवतापस्य योगं भजति सज्जनः ॥

गोरक्ष शतकाचा जो संस्कृत पाठ उपलब्ध आहे त्यामध्ये सुरवातीला "ॐ परमगुरवे गोरक्षनाथाय नमः" असा एक नमनात्मक मंत्र आलेला आहे. गोरक्ष शतक ही गोरक्षनाथांची रचना आहे हे लक्षात घेता हा सुरवातीचा नमनात्मक मंत्र त्यांनी स्वतः सांगितलेला नाही हे उघड आहे. नंतरच्या काळातील सिद्ध-सत्पुरुषांनी गोरक्षनाथांबद्दल असलेला आत्यंतिक आदर प्रदर्शित करण्यासाठी तो घातला असावा. असे असले तरी या नमनात्मक मंत्रावरून त्याकाळच्या योग्यांच्या मनात गोरक्षनाथ या अवतारी सिदधाविषयी किती आदरभाव होता ते त्यातील परमगुरवे या विशेषणावरून सहज लक्षात येते. गोरक्षनाथ कोणी सामान्य गुरु नाहीत. ते आहेत शंभू महादेवाचे अवतार. त्यामुळेच त्यांना परमगुरू अर्थात सर्वोच्च गुरु असे संबोधले आहे. ज्या गोरक्षनाथांनी ग्रंथांत पुढे मांडलेले कुंडलिनी योगशास्त्र प्रकट केले आहे त्यांच्या विषयी आदर असल्या खेरीज या शास्त्राचा अभ्यास पूर्णतः फळणारा नाही हा सूक्ष्म अर्थही येथे लक्षात घ्यायला हवा.

या नमनात्मक मंत्रानंतर गोरक्ष शतकाची सुरुवात होते. गोरक्षनाथांनी आपल्या रचनेची सुरवात सुद्धा ओंकाराने केली आहे. मंत्राची किंवा स्तोत्राची सुरुवात ओंकाराने होणे हे काही नवीन नाही परंतु येथे गोरक्षनाथांनी आपल्या योगशास्त्रीय रचनेची सुरवात ओंकाराने केलेली आहे. पुढे येऊ घातलेल्या श्लोकांचे पावित्र्य आणि त्यांतील ज्ञानाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी बहुदा असे केले असावे. एखादा मंत्र ज्याप्रमाणे मंत्रदेवतेचा साक्षात्कार घडवतो त्याप्रमाणे ही रचना आत्माच्या साक्षात्कार घडवणारी आहे असेच जणू त्यांना सूचित करायचे आहे.

पहिल्या श्लोकात गोरक्षनाथ ग्रंथाचे प्रयोजन संगत आहेत. ते म्हणतात की मी हा ग्रंथ कशासाठी सांगतो आहे तर या ग्रंथाचा अभ्यासक भवपाशमुविमुक्त व्हावा म्हणून. मानवी जीवन नश्वर आहे. जीवन-मृत्यूच्या साखळीत गोवलेले आहे. सुख-दु:ख, जन्म-मृत्यू, पाप-पुण्य इत्यादी द्वंद्वानी ओतप्रोत भरलेले आहे. या सर्व गोष्टींपासून मुक्तता व्हावी म्हणून आपण कुंडलिनी योगशास्त्र कथन करत आहोत असे गोरक्षनाथ सांगतात.

येथे वापरलेला पाश हा शब्द शैव दर्शनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शैव दर्शनात पशू, पाश आणि पती ही त्रयी प्रसिद्ध आहे. या लेखाच्या दृष्टीने शैव दर्शनाच्या फार खोलात जाण्याची आपल्याला गरज नाही. अगदी लहानात लहान किडा-मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत जे जीव आहेत त्यांना शैव दर्शनात पशू असे म्हणतात. वरील द्वंद्वात त्यांना जी प्रकृती अथवा माया अडकवून ठेवते तिला पाश असे म्हणतात. या सर्व पशूंना पाशापासून मुक्त करण्यास सक्षम असतो तो त्यांचा स्वामी किंवा मालक. हा स्वामी म्हणजेच पशूंचा पती किंवा पशुपति. भगवान शंकराचे पशुपति किंवा पशुपतिनाथ हे नाव सुप्रसिद्धच आहे.

पुढे गोरक्षनाथ सांगतात की आपली ही रचना कशी आहे तर आत्मबोधकारक. आत्मस्वरूपा विषयी कोणी लिहिलेले वाचणे ही एक गोष्ट झाली, कोणी काही बोललेले ऐकणे ही अजून एक गोष्ट झाली परंतु आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष बोध घेणे ही पूर्णतः भिन्न गोष्ट आहे. गोरक्षनाथांचा योग हा आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष बोध अर्थात आत्मज्ञान करून देणारा आहे.

एवढेच नाही तर गोरक्षनाथांचा हा ग्रंथ विवेकाच्या द्वाराची जणू कुंजिकाच आहे. माणूस आत्मज्ञानापासून वंचित रहाण्याची जी काही कारणे आहेत त्यांतील एक महत्वाचे म्हणजे विवेकाचा अभाव. विवेक म्हणजे सत आणि असत यांमधील फरक स्पष्टपणे ओळखण्याची पात्रता. विवेक शक्ति क्षीण असेल तर हा बोध होत नाही. आपल्या आजूबाजूला जर नजर टाकली तर असे आठळते की आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अथवा तीव्र साधकांमध्ये ही विवेकाशक्ती प्रचुर प्रमाणात विकसित झालेली असते. याउलट मंद स्वरूपाच्या साधकांमध्ये ही विवेक शक्ति अत्यंत क्षीण असते. अध्यात्ममार्गावर सक्षमपणे वाटचाल करण्यासाठी विवेकशक्तीचा विकास करणे आवश्यक असते. हा विकास घडतो कुंडलिनी योगाच्या प्रत्यक्ष साधनेने. गोरक्ष शतक हा कुंडलिनी योग्गशास्त्राची मूलतत्वे विषद करणारा ग्रंथ असल्याने गोरक्षनाथांनी त्याला विवेकशक्तीच्या द्वाराची कुंजिका असे म्हटले आहे. कुंजिका म्हणजे चावी. एखादी बहुमूल्य गोष्ट कडीकुलपात बंदिस्त ठेवली जाते. कोणत्याही कुलपाला कोणतीही चावी लावता येत नाही. कुलूप उघडण्यासाठी त्या कुलूपाचीच चावी आवश्यक असते. अगदी त्याचप्रमाणे विवेकद्वार उघडण्यासाठी या ग्रंथांत विषद केलेल्या शांभव योगाची चावीच कामी येते असे गोरक्षनाथ ठासून सांगतात.

दुसऱ्या श्लोकात ते पुढे सांगतात की या ग्रंथात प्रकट केलेले ज्ञान मुक्ती प्रदायक आहे. जन्म-मृत्यूच्या साखळीतून साधकाची सुटका करणारे आहे. जन्म-मृत्यूच्या पाशातून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सदा भोग-विलासात आसक्त असलेल्या इंद्रियांना आणि मनाला या मोह-मायेपासून अलग करून परमातम्याशी जोडणे किंवा ईश्वरात आसक्त करणे. थोडक्यात मनाची आसक्ती आहेच परंतु ती आता भौतिक जगतात नसून आंतरीक जगतात परावर्तित झालेली आहे. हे आसक्ती परिवर्तन करण्याचे साधन म्हणजे या ग्रंथांत वर्णन केलेला योगमार्ग.

योगशास्त्र भौतिक सुखांपासून इंद्रियांना आणि मनाला परावृत्त करत असल्याने योगशास्त्राची कास धरावी अशी इच्छा सर्वांच्याच मनामध्ये निर्माण होत नाही. ही इच्छा कोणाच्या मनात निर्माण होते तर सज्जन आणि साधू वृत्तीच्या माणसांमध्ये. वेद-उपनिषदे-आगम-निगम यांनी ज्या अध्यात्म ज्ञानाचे प्रचुर माहात्म्य वर्णन केलेले आहे त्या ज्ञानाला गोरक्षनाथ म्हणतात श्रुतिकल्पतरू. कल्पवृक्ष ज्याप्रमाणे मागेल ते देणारा आहे त्याप्रमाणे श्रुतितील ज्ञान सर्व इच्छांची पूर्तता करणारे आहे. या श्रुतिकल्पतरूची फळे म्हणजेच योग. या कल्पतरूच्या शाखांवर द्विज अर्थात ज्ञानीजन विराजमान झालेले आहेत. या योगफळाच्या सेवनाने भवताप किंवा आधिदैहिक, आधिदैविक तथा आधिभौतिक ताप नष्ट होतात म्हणून तो योग सेवन करण्याचा सल्ला गोरक्षनाथ येथे देत आहेत. थोडक्यात भोग-विलासात मग्न न रहाता मानवी जीवनाचे सार्थक करावे, ईश्वरी अनुग्रह प्राप्त करावा, आत्मज्ञान चाखावे अशी प्रबळ इच्छा ज्यांच्या मनात निर्माण झालेली आहे असे मुमुक्षूच योगामार्गाची कास धरतात.

असो.

सदा समाधीत मग्न असणारा सांब सदाशिव सर्व योगाभ्यासी साधकांना बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना वेसण घालून अंतर्मनाच्या खोल डोहात बुडी मारण्याची प्रेरणा देवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 12 February 2024