Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


श्रीदत्त जयंती २०२२ निमित्त चंद्राच्या सोळा कला

गेल्या काही आठवड्यांपासून घेरंड संहितेवरील लेखमाला सुरु केली आहे. त्यामुळे आजही त्याचाच पुढचा भाग प्रकाशित करण्याचा विचार होता. पहाटे पहाटे श्रीदत्तात्रेयांची प्रेरणा झाली की आजच्या दिवशी कुंडलिनी योगमार्वावर अग्रेसर असलेल्या अनुभवी साधकांसाठी अजपा शिव साधने विषयी काहीतरी लिहावे. श्रीदत्त गुरूंची प्रेरणा म्हणजे साक्षात आज्ञाच.

खरंतर काय लिहावे हे समजत नव्हते कारण एवढ्या गोष्टी आहेत या मार्गावर. काय सांगावे आणि काय नको हा प्रश्न आहे. शेवटी भगवान शंकराला आणि सद्गुरू दत्तात्रेयांनाच शरण गेलो. मी तुमचा एक यःकश्चित अजाण बाळक आहे तुम्हा विषयी काय लिहू शकणार त्यापेक्षा तुम्हीच माझ्याकडून काहीतरी लिहवून घ्या अशी विनवणी केली. त्याचीच फलश्रुती म्हणजे ह्या चंद्राच्या सोळा कलारूपी ज्ञानबिंदू.

कृपया एका लक्षात घ्या की खाली दिलेले बिंदू नवख्या साधकांसाठी नाहीत. ज्यांनी ध्यानमार्गाचा आणि कुंडलिनी योगाचा बराच काळ अभ्यास केलेला आहे, स्वतःच्या साधनेच्या जोरावर काही अनुभूती प्राप्त केलेल्या आहेत त्यांना या गोष्टी कदाचित कळतील. मी "कदाचित" अशासाठी म्हणतोय कारण ही कुंडलिनी योगाची गूढ आणि गोपनीय भाषा आहे. अनुभवी योगसाधकांनाही अवघड वाटण्याची शक्यता आहे. सदाशिव कृपेने आणि दत्त कृपेने जे अंतरंगी प्रकट झाले ते तसच्या तसं दिलेले आहे. त्यांची आज्ञा झाली तर भविष्यात कधी तरी या सोळा कलांचे विस्ताराने निरुपण करीन.

|| श्रीदत्त पौर्णिमेंच्या सोळा योगमय कला ||

अमावस्या -- श्रीदत्त कृपेचे पाठबळ नसेल आणि भगवान शंकराची अनुमती नसेल तर जगदंबा कुंडलिनी जागृत होऊन सुद्धा खालच्या चक्रांवरच घुटमळत रहाते कारण अशा योग्याच्या साधनेवर तमोगुणाची काजळी धरलेली असते.

प्रतिपदा -- योग्याच्या वज्रदंडाला नाजूक षटचक्रांची वेल गुंफलेली असते. योग्याने अजपाच्या हलक्या फुंकरीने चक्रांचा अचूक वेध करावा आणि जगदंबेला आदराने वाट मोकळी करून द्यावी.

द्वितीया -- मुलाधाराच्या सिद्धीसाठी नासिकाग्राची सिद्धी मिळवावी लागते आणि ज्ञानचक्राच्या सिद्धीसाठी भ्रूमध्याची. अजपा ध्यानविधीने नासिकाग्र सिद्धी आणि भ्रूमध्य सिद्धी आपसूकच साधते.

तृतीया -- ऊर्ध्वभागातील चंद्रामृताची अधोभागातील सूर्याग्नीत प्रतिक्षण आहुती पडत असते. चंद्र धारण करणाऱ्या शशिशेखराचा मंत्र योगमय विधीने जपणारा योगी अमृताचा होणारा ह्रास लीलया थांबवू शकतो.

चतुर्थी -- श्रीदत्त पादुकांचे स्मरण, ज्योतिर्लिंगाचे ध्यान आणि शिवमंत्राचा जप ज्याच्या मनी घट्ट रुजला आहे त्याला खरे योगरहस्य कळले असे समजावे.

पंचमी -- योग्याने शिवमंत्राचा जप नेहमी परावाणीने केला पाहिजे म्हणजे तो रोमारोमात भिनतो. मंत्रा विषयी पूर्ण श्रद्धा असेल आणि मंत्र चेतन अवस्थेत प्राप्त झाला असेल तरच तो परावाणी पर्यंत पोहचू शकतो.

षष्ठी -- श्रीदत्त चरणी लीनता लाभल्यावर सुषुम्ना, वज्रा आणि चित्रा या तीन अति सूक्ष्म नाड्या शिवमंत्राचे गुंजन करू लागतात. शिवमंत्राचे असे गुंजन अव्याहत होऊ लागले की शिव-शक्ती सामरस्य सहजच अनुभवाला येते.

सप्तमी -- मंत्राची अक्षरे आणि मंत्रातील चैतन्य वेगवेगळे करता येणे हे मंत्रसिद्धीचे लक्षण आहे. असा योगी कोणत्याही अक्षर समूहाला मंत्रात परावर्तीत करू शकतो.

अष्टमी -- हकारात शिव आहे आणि सकारात शक्ती. श्रीदत्त कृपेने हंसरुपी शिव-अजपा आणि सोहंरुपी शक्ती-अजपा योग्याला कुटस्थाकडे घेऊन जातात.

नवमी -- अहोरात्र होणारा अजपा जप म्हणजे साक्षात शिव-शक्तीचे पिंडातील सूक्ष्म स्वरूप. ज्याने अजपा गायत्रीची कास धरली त्याच्यावर शिव-शक्ती प्रसन्न होतात. ज्याच्यावर शिव-शक्ती प्रसन्न आहेत त्याच्यावर सर्व देवी-देवता कृपेचा वर्षाव करतात.

दशमी -- पिंडातील कैलासावर सर्व देवी-देवता अखंड वास करतात परंतु त्यांचे दर्शन दुर्लभ आहे. योग्याने यम-नियमांचे पालन करत त्यांच्या प्रीत्यर्थ आंतरिक अजपा हवन अवश्य केले पाहिजे.

एकादशी -- सहस्रारात शिवमंत्र वारंवार भ्रमरगुंजन करू लागला, गात्रांना सुखद कंप सुटू लागला, अंगावर वारंवार रोमांच येऊ लागले, आनंदाश्रू अनावर झाले की खुशाल समजावं की मंत्रसिद्धी फार लांब नाही.

द्वादशी -- अजपा ध्यान करता करता शिवमंत्र आणि प्राण एक होऊ द्यावा. मंत्राचा लय प्राणात आणि प्राणचा लय मंत्रात वारंवार करावा. नित्य अभ्यासाने अहोरात्र स्वयमेव जप होऊ लागतो.

त्रयोदशी -- जोवर अजपा ध्यानाद्वारे सहज कुंभक साधत नाही तोवर विधिवत सहज कुंभकाचा स्थूल अभ्यास करावा. ह-कार आणि स-कार यांचे दीर्घकाळ मिलन झाले की केवल कुंभक स्वयमेव घटीत होतो.

चतुर्दशी -- ज्याला योगनिष्पत्ती साधायची आहे त्याने श्रीदत्ताला सद्गुरूचे आणि सदाशिवाला परमपदी अढळ स्थान द्यावे. मग योगारूढ व्हायला वेळ लागत नाही.

पौर्णिमा -- शिव आणि दत्त एकच आहेत. जो निर्गुण निराकार परमशिव स्वच्छेने तीन गुणांत विभागला गेला तोच लीला दाखवण्यासाठी दत्तरुपात पुन्हा एकवटला. ज्याला शिव म्हणजे दत्त आणि दत्त म्हणजे शिव अशी प्रत्यक्ष अनुभूती आली त्याने नरजन्म सार्थकी लावला यात शंका नाही. वरकरणी सामान्य भासत असला तरी तोच खरा योगी आणि तोच खरा योगारूढ.

|| फलश्रुती ||

वरील सोळा बिंदू लिहून झाल्यावर भानावर यायला जरा वेळ लागला. भानावर आल्यावर श्रीदत्त चरणी प्रार्थना केली की --

तुम्हाला सद्गुरू स्थानी आणि आदिगुरु भगवान शंकराला परमपदी मानून जे नित्यनेमाने दशांग अजपा ध्यान साधना अंगीकारतील त्यांना शिव-दत्त ऐक्याची अनुभूती देऊन योगमार्गावर अग्रेसर करावे. त्यांना भौतिक आयुष्यातही सुख-समृद्धी-भरभराट लाभावी. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याप्रमाणे त्यांचे जीवन आल्हाददायक करावे.

जोडलेले हात खाली घेत असतांना तसबिरीवरील एक फुल अलगद हातात पडले. जणू "तथास्तु" चा आश्वासक हुंकारच.


असो.

श्रीदत्त आणि श्रीसदाशिव यांची अभेद-भक्ती वाचकांचे योगजीवन समृद्ध करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 December 2022