Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


स्थूल ध्यानाचा पहिला प्रकार

मागील लेखात आपण घेरंड मुनींच्या कुंडलिनी ध्यानयोगाचे तीन प्रकार अर्थात स्थूलध्यान, ज्योतिर्ध्यान आणि सूक्ष्मध्यान जाणून घेतले. अजपा ध्यानात ते तीनही कसे समाविष्ट होतात ते ही आपण थोडक्यात जाणून घेतले. आता घेरंड मुनी आपल्याला स्थूल ध्यानाचे दोन विशिष्ठ विधी सांगत आहेत. खरंतर स्थूलध्यानाचे अनेकानेक प्रकार आहेत परंतु येथे घेरंड मुनी आपल्याला त्यांच्या मतानुसार महत्वाचे असे दोन विधी वानगी दाखल विषद करत आहेत. त्यांतील पहिला प्रकार आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

स्थूल ध्यानाचा पहिला प्रकार विषद करतांना घेरंड मुनी म्हणतात -

स्वकीयहृदये ध्यायेत्सुधासागरमुत्तमम् ।
तन्मध्ये रत्नद्वीपं तु सुरत्नवालुकामयम् ॥
चतुर्दिक्षु नीपतरुं बहुपुष्पसमन्वितम् ।
नीपोपवनसङ्कुलैर्वेष्टितं परिखा इव ॥
मालतीमल्लिकाजातीकेसरैश्चम्पकैस्तथा ।
पारिजातैः स्थलपद्मैर्गन्धामोदितदिङ्मुखैः ॥
तन्मध्ये संस्मरेद्योगी कल्पवृक्षं मनोहरम् ।
चतुःशाखाचतुर्वेदं नित्यपुष्पफलान्वितम् ॥
भ्रमराः कोकिलास्तत्र गुञ्जन्ति निगदन्ति च ।
ध्यायेत्तत्र स्थिरो भूत्वा महामाणिक्यमण्डपम् ॥
तन्मध्ये तु स्मरेद्योगी पर्यङ्कं सुमनोहरम् ।
तत्रेष्टदेवतां ध्यायेद्यद्ध्यानं गुरुभाषितम् ॥
यस्य देवस्य यद्रूपं यथा भूषणवाहनम् ।
तद्रूपं ध्यायते नित्यं स्थूलध्यानमिदं विदुः ॥

वरील सात श्लोकांत घेरंड मुनींनी स्थूल ध्यानाचा एक सुलभ प्रकार सांगितला आहे. सोप्या भाषेत वरील श्लोकांचा भावानुवाद आपण जाणून घेऊया.

योग्याने डोळे बंद करून आपल्या हृदय स्थानी एका सुधासागराचे किंवा अमृतसागराचे चिंतन करावे. त्याने अशी कल्पना करावी की त्या सुधासागराच्या मध्यभागी एक रत्नखचित द्वीप आहे. त्या द्विपातील वाळू सुधा रत्नांनी भरलेली आहे. चहूकडे कदंब वृक्ष दाटले असून ते फुलांनी बहरले आहेत. या द्वीपावर सर्वत्र मालती, चमेली, केशर, चंपा, पारिजात, कमळ इत्यादी वृक्षांची झाडी भरली आहे. या फुलाच्या सुगंधाने आसमंत भरून गेला आहे.

पुढे योग्याने असे चिंतन करावे की या वनाच्या मध्यभागी एक कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाला चार शाखा असून त्या चार वेद स्वरूप आहेत. या चारही शाखा असंख्य फुले आणि फळांनी डवरलेल्या आहेत आणि त्यांवर भ्रमर गुंजन करत आहेत. त्या शाखांवर बसलेले कोकीळ पक्षी आपल्या गाण्याने चराचर जणू मंत्रमुग्ध करून टाकत आहेत.

या कल्पवृक्षा खाली एक रत्नजडित मंडप असून त्या मंडपात आसन मांडलेले आहे. त्या आसनावर योग्याचे इष्ट दैवत विराजमान झालेले आहे. गुरुप्रदत्त विधीने योग्याने त्या इष्ट देवतेचे आसन-वाहन-आयुधे इत्यादींचे चिंतन करावे.

वरील परिच्छेदात आपण घेरंड मुनींनी वर्णन केलेल्या स्थुलध्यानाचा पहिला प्रकार जाणून घेतला. वरील प्रकारात बराच कल्पनाविलास आहे. सर्वसामान्य माणूस जेंव्हा डोळे मिटून बसतो तेंव्हा त्याच्या डोळ्यासमोर काल्पनिक चलचित्रे सुरूर होतात. मनाची ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्याचा नैसर्गिक प्रवृत्तीला योगमय बनवण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलेला आहे. वरील श्लोकांच्या आणि भावानुवादाच्या फार खोलात जाण्याऐवजी मी त्यांतील काही सूक्ष्म गोष्टींकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. या ध्यानप्रकारातील कल्पनाविलासाच्या खोलात जाण्यापेक्षा त्यांतून अधोरेखित होणाऱ्या काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

पहिली गोष्ट म्हणजे घेरंड मुनींनी ध्यान कोठे करायला सांगितले आहे बरं? ते त्यांनी शरीराच्या आत करायला सांगितले आहे. बाहेर डोळ्यांसमोरील अवकाशात नाही. त्याना साधकांना अंतर्मुख करायचे आहे. त्यामुळे बहिर्लक्ष्य न साधता त्यांनी अंतर्लक्ष्य साधण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरी गोष्ट अशी की त्यांनी ध्यान करायला हृदयस्थान अर्थात अनाहत चक्राची जागा निवडली आहे. असं का बरं? त्यांनी या पहिल्या प्रकारात मूलाधार किंवा अन्य एखादे चक्र का नाही निवडलं? एका लक्षात घ्यायला हवं की स्थूल ध्यान ही ध्यानाभ्यासाची प्रथम पायरी आहे. सात चक्रांची रचना जर तुम्ही लक्षात घेतलीत तर तुम्हाला असं आढळेल की अनाहत चक्र हा या चक्रमालिकेचा मध्यबिंदू आहे. एका टोकाला मूलाधार आणि दुसऱ्या टोकाला सहस्रार. बरोब्बर मध्यभागी अनाहत. थोडक्यात सांगायचे तर बहुतेक साधकांसाठी अनाहत चक्र हा एक समतोल बिंदू आहे.

अनाहत चक्राची निवड करण्यामागे अजून एक कारण आहे. अनाहत चक्र म्हणजे मन आणि भाव-भावना यांचे केंद्रस्थान. योगशास्त्रात मनाचे वास्तव्य या ठिकाणी मानले गेले आहे आणि भक्ती हा मनाचाच एक विषय आहे. वरील कल्पनाविलास हा एकाअर्थी मनाचा "खेळ" असल्याने तो अनाहताच्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल अशी भूमिका त्यामागे आहे.

ध्यानाचे स्थान सांगितल्यावर घेरंड मुनी पुढील काही श्लोकात ध्यान नक्की कशाचे करायचे आहे ते सांगतात. त्यांत मग झाडे, फुले, फळे, पक्षी, भ्रमर वगैरे गोष्टींचा समावेश त्यांनी केलेला आहे. मुळात त्यांनी हा कल्पनाविलास का सांगितला आहे? त्याची खरोखर गरज आहे का? की हा आपला उगाचचा "ध्यानातला टाईमपास" म्हणायचा?

नाही. हा सगळा सोपस्कार म्हणजे वायफळ प्रयत्न नाही. त्याला एक योगशास्त्रीय अर्थ आणि भूमिका आहे. समजा मी तुम्हाला सांगितले की डोळे मिटा आणि एक रसरशीत हापूस आंबा तुम्ही खात आहात अशी कल्पना करा. तुम्ही जेंव्हा असे करता तेंव्हा प्रत्यक्ष हापूस आंबा नसतांना सुद्धा त्याचा स्पर्श, आकार, चव, गंध वगैरे मनातल्या मनात अनुभवू शकता. हे कसे घडू शकते बरं? त्याला कारणीभूत आहे पंचमहाभूतांच्या सूक्ष्म तन्मात्रा. मनाच्या सहाय्याने तुम्ही या तन्मात्रांचा वापर करून जणू मनाची ज्ञानेंद्रिये चेतवत असता आणि त्याद्वारे हापूस आंबा खात असल्याची मानसिक अनुभूती प्राप्त करत असता. या अनुभूती नुसार तुमच्या मनात चांगला अथवा वाईट भाव निर्माण होतो. वरील हापूस आंब्याच्या उदाहरणात तुमच्या मनात चांगला भाव निर्माण होईल. जर मी तुम्हाला एखाद्या तुंबलेल्या गटाराचे चित्र रंगवायला सांगितले तर तुमच्या मनात दुर्गंधीयुक्त वाईट भाव तयार होईल.

वरील सर्व कल्पनाविलासाने एक प्रकारचा आनंद आणि हर्ष निर्माण होतो. साधकाचे मन आल्हादित होते. मनाची अशी प्रसन्न अवस्था अर्थातच पुढे जे ध्यान सांगितले आहे त्याला पोषक बनते. जर मनात रटाळ किंवा कंटाळवाणा विचार असेल तर त्याचा ध्यानावर दुष्परिणाम होईल म्हणून प्रथम मनाला टवटवीत आणि प्रसन्न अवस्थेत घेऊन जाण्याचा हा उपक्रम घेरंड मुनींनी सांगितला आहे.

त्यानंतर ते अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की योग्याने गुरु निर्देशित विधीने आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करावे. या त्यांच्या सूचनेत तीन सूक्ष्म संकेत दडलेले आहेत. पहिला म्हणजे त्यांनी ध्यानाच्या या प्रथम विधीत गुरु आणि इष्ट अशा दोन भिन्न पातळ्या सांगितल्या आहेत. साधारणतः शिष्य जेंव्हा एखाद्या देहधारी गुरूकडे जातो तेंव्हा तो गुरु त्याला त्याच्या पात्रतेनुसार त्याच्या इष्ट देवतेची भक्ती कशी करायची ते सांगतो. गुरुभक्तीच्या जोडीला योगाभ्यासक इष्टभक्ती सुद्धा करत असतो.

दुसरा सूक्ष्म संकेत हा की योगसाधकाला आपले इष्ट दैवत कोण हे अचूक ठाऊक असायला हवे. तुम्हाला अनेक योगसाधक आणि उपासक दिसतील की जे वर्षोनवर्षे कोणा देवतेची भक्ती-उपासना करत आहेत परंतु त्यांची प्रगती फारशी झालेली नाही. अनेकदा याचे कारण चुकीच्या इष्ट देवतेची उपासना हे असते. हा सूक्ष्म विषय आहे. एका छोटेखानी लेखात त्या विषयी विस्ताराने सांगणे कठीण आहे कारण त्यात अनेक बारकावे आणि खाचाखोचा आहेत. One size fits all असा प्रकार या बाबतीत चालत नाही. तुम्ही तुमच्या सद्गुरुंच्या सल्ल्यानुसार आपापले इष्ट दैवत निश्चित करावे हे उत्तम.

तिसरा सूक्ष्म संकेत असा आहे की तुमच्या इष्ट देवतेची भक्ती-उपासना-ध्यान वाटेल त्या विधीने करून चालणार नाही. एकाच दैवतेच्या अनेकानेक उपासना पद्धती आणि ध्यानपद्धती आहेत. येथेही तुम्हाला तुमच्या गुरुच्या सल्ल्यानुसारच जाणे आवश्यक आहे. तुमच्या गुरुकडून इष्ट ध्यानाचा विधी विस्ताराने जाणून घेऊन त्यानुसार ध्यानसाधना घडली तरच लवकर लाभ मिळेत हे ओघाने आलेच. आजच्या इंटरनेट युगात ढीगभर माहिती उपलब्ध आहे आणि अनेक साधक त्या माहितीच्या आधारे मन मानेत त्या पद्धतीने सरमिसळ, तोडमोड करून स्वतःची साधना आखण्याचा प्रयत्न करत असतात. असे करण्यामागचा त्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी बरेच वेळा त्यात अचूकता आणि उपयोगिता यांचा अभाव असल्याचे दिसून येते परिणामी त्यांचा बहुमुल्य वेळ वाया जातो आणि फलप्राप्ती अत्यल्पच होते.

गुरु आणि इष्ट या दोन पातळ्यांवरून ध्यानसाधना केलेल्या योग्याला एकदिवस गुरु आणि इष्ट यांच्या एकतेची खात्री पटते. अनेकदा या गोष्टी साधकांनी पुस्तकांत वाचलेल्या असतात पण त्या वरकरणीच असतात. मनात खोलवर अजूनही पूर्णतः खात्री पटलेली नसते. अशी खात्री ज्यांची पटलेली आहे अशा योग्याला घेरंड मुनी ध्यानाचा एक दुसरा प्रकार सांगतात. तो दुसरा ध्यान प्रकार कोणता हे आपण या लेखमालेच्या पुढील भागात जाणून घेऊ.

असो.

नवीन वर्षी सर्व वाचक आपापल्या सद्गुरूंची आणि आपापल्या इष्ट देवतेची अचूक निवड करून ध्यानमार्गावर अग्रेसर होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 01 January 2023