अजपा योग क्रिया आणि ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

गोरक्षनाथांच्या योगमुद्रा -- काही मूलतत्वे आणि साधनोपयोगी गोष्टी

लेखमालेच्या मागील भागात आपण शंभू जती श्रीगोरक्षनाथ महाराजांच्या कुंडलिनी योगातील पाच मुद्रांची नावे जाणून घेतली. त्यांनी वर्णन केलेल्या पाच मुद्रा म्हणजे -- महामुद्रा, नभोमुद्रा, मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध. आधी म्हटल्याप्रमाणे या मुद्रांच्या क्रियात्मक विवरणात न जाता या मुद्रांच्या अनुषंगाने काही महत्वाच्या बाबी या (आणि कदाचित पुढच्या) लेखात नमूद करणार आहे.

मी योगमार्गावर अगदी नवीन होतो तेंव्हाची ही गोष्ट आहे. प्राचीन योगग्रंथ वाचत असतांना त्यात नेहमी असे लिहिलेले असायचे की कुंडलिनी शक्ती मूलाधारातून जागृत होऊन एकेक चक्र ओलांडत शेवटी सहस्रार चक्रात पोहोचते. सहस्रार चक्रात पोहोचल्यावर शिव आणि शक्ति यांचे मिलन घडून येते आणि योगी समाधीसुखाचा अनुभव घेतो वगैरे वगैरे. शिव आणि शक्ती यांचे मिलन ही संकल्पना खूप काव्यमय वाटते. कागदावर "शिव-शक्ती मिलन घडते" हे वाचणे अगदी सोप्पे आहे पण शिव-शक्ती मिलन घडते म्हणजे शरीरात आणि मनात नेमके काय घडते ते काही नीटसे उमगत नव्हते. आजवर प्रकाशित साहित्यात कोठेही यावर स्पष्ट प्रकाश टाकलेला नव्हता. सगळे जण फक्त एवढेच म्हणत होते की सहस्रारात शिव-शक्ती मिलन घडते पण म्हणजे नेमके काय घडते ते कोणीही स्पष्टपणे सांगितलेले नव्हते.

एक दिवस मी धीर करून लहान तोंडी मोठा घास घ्यायचे ठरवले आणि श्रीगुरुमंडला पुढे माझा प्रश्न टाकला -- सहस्रारात शिव-शक्ती यांचे मिलन होते म्हणजे नेमके काय घडते?

माझ्या या प्रश्नावर श्रीगुरुमंडल नुसते हसले आणि म्हणाले -- दिलेली साधना करत रहा म्हणजे कळेल एक दिवस. बराच कालावधी लोटला. एकीकडे माझी साधना दृढ होत होती, आध्यात्मिक अनुभवांची शिदोरी वाढत होती. मधून मधून संधी मिळेल तेंव्हा मी पुन्हा-पुन्हा माझा प्रश्न श्रीगुरुमंडला पुढे टाकत होतो आणि दर वेळेस तेच उत्तर मला मिळत होते.

असे करता करता एक दिवस मी पुन्हा तोच प्रश्न केला. यावेळेस मात्र श्रीगुरुमंडलाने जुनेच उत्तर न देता मस्तकी हात ठेवला. बस्स. किती वेळ त्या अवस्थेत होतो कळले नाही पण भानावर आल्यावर शिव-शक्ती मिलन होते म्हणजे नेमके काय ते अगदी लखलखीतपणे उमगले होते. श्रीगुरुमंडलाने एक चकार शब्दही न बोलता प्रत्यक्ष अनुभूतीच्या माध्यमातून उत्तर दिले होते. श्रीगुरुमंडलाने दिलेले उत्तर शब्दात प्रकट करणे हे त्यांनी घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन ठरेल परंतु त्या शिकवणीतील एक महत्वाचा बिंदु येथे देत आहे. नवीन साधकांना कळायला किंचित अवघड आणि अनुभवायला तर त्याहून अवघड आहे परंतु कुंडलिनी योग यथार्थ स्वरूपात कळण्यासाठी ते आवश्यक आहे.

शिव आणि शक्ती या दोन भिन्न वस्तु नसून एकाच वस्तूच्या दोन भिन्न अवस्था आहेत.

मुद्दाम मी हे अगदी साध्या, सोप्या, सामान्य भाषेत सांगतोय. त्यामुळे शब्दांकडे काटेकोरपणे बघण्यापेक्षा त्यांच्या आशयाकडे लक्ष द्या. मला माहितेय कदाचित तुम्ही "त्यात काय मोठंस" असं म्हणून पुढे जाल पण क्षणभर थांबा. नीट विचार करा -- जर शिव आणि शक्ती भिन्न नाहीत तर मग मिलन होते म्हणजे काय? कोणतेही मिलन घडण्यासाठी दोन भिन्न गोष्टींची आवश्यकता असते. एकीकडे म्हणायचे मिलन होते आणि दुसरीकडे म्हणायचे शिव-शक्ती भिन्न नाहीत. मग याचा अर्थ काय? नीट विचार करा. शंभू जती गोरक्षनाथ आणि संत ज्ञानेश्वर या दोघांनीही आपल्या कुंडलिनी योगाचे फळ "अद्वय आनंद" असे सांगितले आहे. या "अद्वय" चा अर्थ कळायला वरील शिकवणीचा अर्थ कळणे आवश्यक आहे.

गोरक्ष शतकातील योग हा जरी षडंग असला तरी त्यात यम आणि नियमांचे पालन अध्याऋत आहे. मी अन्य काही लेखांत हठयोग प्रदीपिके मधील दहा यम आणि दहा नियम यांबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्यांतील योग्यानी पाळावयाचे दहा नियम असे आहेत -- तप, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वर पूजन, सिद्धांत-वाक्य-श्रवण, लज्जा, मती, जप आणि हवन.

वरील दहा नियमापैकी ठळक अक्षरांत दिलेले पाच नियम हे मंत्र उपासनेशी थेट निगडीत आहेत. याचा अर्थ असा की हठयोग साधकाला प्रथम मंत्रयोग आचरणात आणणे आवश्यक आहे. मंत्रयोगाच्या भक्कम पायावर इष्ट देवतेची कृपा प्राप्त करायची आणि मग हठयोगांतर्गत मुद्राभ्यास करायचा असा अलिखित निर्देश यात दडलेला आहे. केवळ एक शारीरिक क्रिया म्हणून मुद्राभ्यास करणाऱ्या मंडळींना आध्यात्मिक स्तरावर त्याचा फारसा फायदा का होत नाही त्याचे कारणही यात दडलेले आहे.

वर उल्लेखिलेली मंत्र साधना ही तुमच्या गुरुपरंपरे नुसार मंत्र, स्तोत्र, हृदय, कवच, सहस्रनाम, पूजन, हवन वगैरे उपचारांनी केलेली ती शिव-शक्तीची सात्विक आराधना आहे. गुरुच्या निर्देशानुसार बीजमंत्र किंवा गुरुमंत्र किंवा क्रमदीक्षा विधीने केलेली ती उपासना आहे. सामान्यत: मानवी मन हे द्वैत भूमीवरच विराजमान झालेले असते. त्याला अंतर्मुख करण्यापूर्वी ही मंत्रोपासना चांगली उपयोगी पडते. तुम्ही जर प्रमुख देवी स्वरूपांची (उदा. दशमहाविद्या) सहस्रनामे किंवा स्तोत्रे अभ्यासलीत तर तुम्हाला असे आढळेल की देवीला कुंडलिनी स्वरूपा मानले गेले आहे. प्रेमळ आणि करूणामयी जगत्रय जननी देवी जशी एखाद्या मंदिरात विराजमान असते तशीच ती मानव पिंडात जगदंबा कुंडलिनीच्या रूपात विद्यमान असते. बाहेरील सगुण रूपातील देवी आणि तिची अंतर्गत ऊर्जा स्वरूपी कुंडलिनी शक्तीशी घातलेली सांगड आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. योगशास्त्रात पिंड-ब्रह्मांड ऐक्याची जी संकल्पना आहे -- पिंडी ते ब्रह्मांडी किंवा यथा पिंडे तथा ब्रह्मांडे -- त्यासाठी ही उपासना खूप उपयोगी ठरते.

आतापर्यंत सांगितलेल्या पाल्हाळा वरून तुम्हाला तीन महत्वाच्या बाबी लक्षात आल्या असतील. पहिली गोष्ट म्हणजे या मार्गावर पाऊल ठेवण्यापूर्वी तुमची मनोभूमी या मार्गासाठी तयार असणे गरजेचे आहे. सामान्य पूजा-पाठ-मंत्र-स्तोत्रादी सोपान ओलांडून तुम्ही जरा अधिक प्रगल्भ अशा आध्यात्मिक मनोभूमीवर पोहोचलेले असायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे गोरक्षनाथांचा कुंडलिनी योग हा योगजीवनाची मूलतत्वे अंगिकारलेल्या साधकांसाठी आहे. नवीन साधकांनी यम-नियमांच्या सहाय्याने स्वतःला तयार करून मग गोरक्षनाथांच्या षडंग कुंडलिनी योगाकडे वळायचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे गुरुनिर्देशनाखाली आध्यात्मिक प्रगतीला पोषक अशा कोणत्यातरी सात्विक मंत्राची विधिवत उपासना हा या मार्गावरचा एक आवश्यक आणि उपयुक्त भाग आहे.

या तीन गोष्टी जाणून घेतल्यानंतर आता गोरक्षनाथांच्या मुद्राभ्यासाकडे वळूया. आता ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे त्या गोरक्षनाथांनी सांगितलेल्या पाचही मुद्रांना लागू आहेत.

गोरक्षनाथांनी सांगितलेल्या पाचही मुद्रांचे आरोग्यासाठी लाभ आहेत आणि कुंडलिनी जागृतीसाठीही त्या उपयुक्त आहेत. तुम्ही जेंव्हा या मुद्रांचा अभ्यास करत असतं त्या कालखंडात तरी तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या मुद्रांचा संबंध शरीरातील ऊर्जा केंद्रांशी आणि ऊर्जा वाहक नाड्याशी आहे. तुमचा आहार सात्विक असू देत. विशेषतः शरीरात वात आणि कफ निर्माण करणारे पदार्थ कटाक्षाने टाळा. वातूळ पदार्थ, तळलेले पदार्थ, फार थंड पदार्थ, रुक्ष पदार्थ, लोणची-पापड टाळा. केळी, पेरू सारखी फळे ज्यांचा गर गच्च लगदा स्वरूपात तयार होतो ती टाळा. गाईचे साजूक तूप अवश्य सेवन करा. नाड्यांना त्याने चांगले पोषण मिळते. या मुद्रा करत असतांना पोटावर बऱ्यापैकी दाब पडत असतो त्यामुळे यांचा अभ्यास करताना पोट रिकामे असणे अत्यावश्यक आहे.

या मुद्रांचा अभ्यास एक व्यायाम म्हणून करू नका तर एक आध्यात्मिक साधना म्हणून करा. समोर टीव्ही सुरू आहे, आजूबाजूला घरातील अन्य मंडळींचा वावर सुरू आहे अशा स्थितीत कधीही मुद्राभ्यास करू नका. कुंडलिनी योगाभ्यास हा एकांतातच करायला हवा. आगम शास्त्रात साधकाचे तीन प्रधान भाव सांगितले आहेत -- पशुभाव, वीरभाव आणि दिव्यभाव. गोरक्षनाथांनी सांगितलेल्या पाचही मुद्रा करण्यासाठी वीर भाव आणि दिव्य भाव अधिक फायदेशीर आहेत. तुमच्या गुरुकडून वीर भाव / दिव्य भाव कशाला म्हणतात, त्यांची लक्षणे कोणती आणि तो अंगी कसा बाणवायचा ते नीट शिकून घ्या. केवळ या शब्दांवरून काहीतरी अंदाज बांधू नका. कुंडलिनी योग हा पुरुषार्थ प्रधान साधनामार्ग आहे. तुमच्या स्वप्रयत्नांना येथे अत्यधिक महत्व आहे. तुमच्या अंगी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी की मी माझ्यातील सुप्त दैवी गुण प्रकट करीनच. एक ना एक दिवस जीव-शिव ऐक्य अनुभविनच.

गोरक्षनाथांनी सांगितलेल्या या पाचही मुद्रांचा अभ्यास करतांना तुमची सुषुम्ना नाडी चालू राहील याची काळजी घ्या. सुषुम्ना चालू असतांना ह्या मुद्रा केल्यास अधिक फलप्रद ठरतात असा माझा अनुभव आहे. तुम्हाला माहीत असेल की शिव स्वरोदय शास्त्रानुसार इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांचे स्वतःचे खास असे महत्व आणि कार्य आहे. मुद्राभ्यासाच्या वेळेस सुषुम्ना प्रधानता असू द्यात म्हणजे फायदा वृद्धिंगत होईल. सुषुम्ना चालू असतांना त्याला अजपा जपाची जोड दिल्यास कल्पनातीत लाभ होतो असा माझा अनुभव आहे. मुद्राभ्यास करत असतांना मन जर सुषुम्ना नाडीवर ठेवले असेल, अजपा जपावर ठेवले असेल तर ते अंतर्मुख चटकन होते. परिणामी कुंडलीनी जागृतीला अधिक पोषक बनते. सुषुम्ना चालू कशी करायची त्याचे अनेक विधी आहेत. तुमच्या गुरुकडून त्यातील एखादा नीट समजून घ्या आणि त्याचा अवलंब करा. उदाहरणार्थ, काही काळ दोन्ही बाजूनी "अश्वसंचलन" अवस्थेत राहिल्यास सुषुम्ना चालू करता येते. येथे विस्तार भयास्तव फार खोलात जात नाही.

या लेखात कुंडलिनी योगा विषयी तीन मूलतत्वे आणि मुद्राभ्यासा विषयी तीन साधनोपयोगी गोष्टी सांगितल्या. अशा छोट्या-छोट्या अनेक गोष्टी आणि बारकावे असतात जे सांगायची इच्छा असते परंतु विस्तार भयास्तव आवरते घ्यावे लागते. पुढील लेखात गोरक्षनाथांनी वर्णन केलेल्या पाच मुद्रांपैकी प्रत्येक मुद्रेविषयी काही सांगण्याचा मानस आहे.

असो.

संत ज्ञानेश्वरांनी ज्यांना "विषयविध्वंसकवीरू" असे गौरविले आहे ते शंभू जती श्रीगोरक्षनाथ सर्व कुंडलिनी योग साधकांना त्यांच्या मुद्रा विज्ञानात अग्रेसर करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 28 October 2024