Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


कुंडलिनी जागृतीला पोषक पाच मुद्रा

आतापर्यंत गोरक्षनाथांनी आपल्याला आसने, नाड्या आणि प्राणशक्ति यांच्याविषयी काही सांगितले आहे. आता त्यापुढे जाऊन ते कुंडलिनी बद्दल काही सांगणार आहेत.

कुंडलिनी आणि तिची जागृती हा अध्यात्ममार्गावरील सर्वांच्याच कुतुहलाचा विषय. काहींना गूढगंभीर वाटणारा तर काहींना भीतीदायक वाटणारा तर अन्य काहींना बुचकळ्यात टाकणारा असा हा विषय. मी अजपा योग शिकवत असल्याने माझा अशा साधकांशी नेहमी संबंध येतो ज्यांना या विषयाबद्दल आकर्षण तर असतं पण एक अनामिक भीती किंवा चित्रविचित्र कल्पना त्यांच्या मनात भरलेल्या असतात. होतं काय तर जेंव्हा एखाद्या साधनामार्गावर प्रत्यक्ष अनुभव असलेले साधक कमी-कमी होत जातात तसं-तसं तो साधनामार्ग विनाकारण क्लिष्ट, गूढ आणि आवाक्याबाहेरचा वाटू लागतो. जेंव्हा त्यांची या विषयाशी सखोल ओळख होते तेंव्हा अर्थातच त्यांना त्याची गोडी वाटू लागते. एकदा का गोडी लागली की मग साधनाही नित्य-नियमाने घडू लागते. साधना नित्य-नियमाने घडू लागली की मग या मार्गावरील अनुभवही येऊ लागतात. कुंडलिनी म्हणजे घाबरण्यासारखे काही नसून ईश्वराने आपल्याला दिलेल्या ऊर्जा प्रणालीवर ताबा मिळवून आपले आयुष्य घडविण्याची गुरुकिल्ली आहे हे त्यांना कळू लागते.

कन्दोर्ध्वे कुण्डलीशक्तिरष्टधा कुण्डलीकृता ।
ब्रह्मद्वारमुखं नित्यं मुखेनावृत्य तिष्ठति ॥
प्रबुद्धा वह्नियोगेन मनसा मारुता हता ।
प्रजीवगुणमादाय व्रजत्यूर्ध्वं सुषुम्णया ॥
महामुद्रां नमोमुद्रामुड्डियानं जलन्धरम् ।
मूलबन्धं च यो वेत्ति स योगी सिद्धिभाजनम् ॥

या आधी गोरक्षनाथांनी आपल्याला कंद म्हणजे काय आणि तो शरीरात कुठे असतो ते विस्ताराने सांगितले आहे. आता ते सांगतात की या कंदाच्या वर कुंडलिनी शक्ति आठ कुंडले करून किंवा वेढे देऊन आणि ब्रह्मद्वाराचे मुख झाकून बसलेली असते.

पुढे जाण्यापूर्वी येथे गोरक्ष शतकातील काही वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींची दखल घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे अशी मान्यता आहे की कुंडलिनी शक्ति ही मूलाधार चक्रात वास करत असते. येथे मात्र गोरक्षनाथ म्हणतात की कुंडलिनी कंदाच्या वरच्या भागात असते. कंद कुठे असतो तर नाभीस्थानाच्या आसपास. म्हणजेच गोरक्ष शतकानुसार कुंडलिनी की मूलाधारात नसून माणिपूर चक्राच्या क्षेत्रात असते. ज्यांना कुंडलिनी योग नीट समजलेला नाही त्यांना याचे कारण कळणार नाही. विषयांतर टाळण्यासाठी मी ही ते येथे सांगत बसत नाही. एवढेच सांगतो की दोन्ही स्थाने तत्वार्थाने योग्यच आहेत. त्यामुळे मूलाधारच बरोबर, कंद चूक किंवा कंदच बरोबर, मूलाधार चूक अशा गोंधळात पडू नये.

येथे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे कुंडलिनीच्या वेढ्यांची संख्या. अन्य अनेक योगग्रंथांमध्ये कुंडलिनी मूलाधारात साडेतीन वेटोळे घालून बसलेली असते असे सांगितले आहे. येथे गोरक्षनाथ मात्र कुंडलिनी आठ वेटोळे घालून बसलेली असते असे सांगत आहेत. येथे एक लक्षात घ्यायला हवे की कुंडलिनीची तुलना जरी सापाशी, नागिणीशी किंवा भुजंगाशी केली जात असली तरी ती तुलना शब्दशः घेता कामा नये. त्यामुळे कुंडलिनीचे वेटोळे साडेतीन की आठ की अजून किती हे कळण्यासाठी त्या वेटोळ्यांचा सांकेतिक अर्थ लक्षात ध्यायला हवा. येथे गोरक्षनाथांनी कोठेही आठ वेटोळे म्हणजे काय ते सांगितलेले नाही किंवा त्यासंबंधी कोणता संकेतही केलेला नाही. मला माझ्या श्रीगुरुमंडलाने सांगितलेले दोन सांकेतिक अर्थ असे आहेत -- पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, सत्व, रजस आणि तमस.

अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे कुंडलिनी कशा स्थितीत पहुडलेली आहे ती स्थिती. कुंडलिनीने ब्रह्मद्वाराचे मुख आच्छादुन बसली आहे. सामान्यतः कुंडलिनी सुषुम्ना नाडीचे मुख झाकून बसलेली असते असे सांगितले जाते. येथे मात्र गोरक्षनाथांनी सुषुम्ना असा शब्द न वापरता ब्रह्मद्वार असा शब्द वापरला आहे. येथे ब्रह्मद्वार आणि ब्रह्मरंध्र या दोन शब्दांची गल्लत करून चालणार नाही. कोणत्याही नाडीची दोन टोके असतात. सुषुम्ना नाडीचे एक टोक आहे कंदात आणि दुसरे टोक आहे सहस्रारात. सुषुम्ना नाडीच्या सहस्रारातील टोकाकडचा आणि पुढचा जो भाग असतो त्याला म्हणतात ब्रह्मरंध्र आणि खालचे जे टोक असते त्याला गोरक्षनाथांनी येथे ब्रह्मद्वार असे म्हटले आहे. सहस्रारात शिवस्वरूप ब्रह्म आहे आणि सुषुम्ना हा त्याकडे जाणारा मार्ग त्यामुळे ब्रह्मद्वार हा शब्द येथे चपलख आहे.

कुंडलिनी शक्तीने सुषुम्ना द्वार आच्छादुन टाकले आहे कारण ती प्रकृती स्वरूपा आहे, माया स्वरूपा आहे आणि त्यामुळे जीवाला एवढ्या सहजासहजी शिवत्व प्राप्त होऊ देत नाही. ती जीवाला भौतिक जगतातच गुंतवून ठेवते. पुढच्या श्लोकात गोरक्षनाथ कुंडलिनी ऊर्ध्वगामी करण्याचा उपाय सांगत आहेत.

कुंडलिनी ऊर्ध्वगामी करण्यासाठी तीन गोष्टींची गरज येथे प्रतिपादित करण्यात आली आहे -- वन्ही, मन आणि वायु. वन्ही म्हणजे अग्नि. येथे अग्नि दोन अर्थाने आवश्यक आहे. या पूर्वी मूलाधार चक्रातील तेजस्वी कालाग्नी गोरक्षनाथांनी सांगितलेला आहे. त्या अग्नीला योगाग्नीची जोड दिल्यावर कुंडलिनी ऊर्ध्वगामी बनते. शिवणकाम करत असतांना आपण धागा थेट वस्त्रात शिवत नाही. धागा सुईत ओवला जातो आणि मग ती सुई वस्त्रात आवश्यकते नुसार फिरवली जाते. सुई पाठोपाठ तो धागा सुद्धा फिरतो आणि शिलाई पडत जाते. अग्निद्वारे जागृत झालेली कुंडलिनी कुठे जाईल? ते ठरते तुमच्या मनावर आणि प्राणवायुवर. मनाला जर सुषुम्ना मार्गात नेले तर मनापाठोपाठ प्राण तेथे जातो आणि त्या पाठोपाठ कुंडलिनी सुद्धा त्यांच्या पाठीपाठी जाते. अशा प्रकारे ध्यानाने आणि प्राणायामाने कुंडलिनीला सुषुम्नेत ऊर्ध्वगामी केले जाते. ज्यांना अजपा योगाची आवड निर्माण झाली आहे त्यांना आता अजपा जपाद्वारे कुंडलिनी जागृती कशी होते त्याचे रहस्य नीट कळू शकेल.

आता मनाला आणि प्राणाला सुषुम्नेत कसे न्यायचे? त्याच्या अनेक क्रिया योगशास्त्रात वर्णीत आहेत. गोरक्षनाथांनी येथे पाच योगमुद्रा सांगितल्या आहेत ज्या ते कुंडलिनी जागृतीसाठी आवश्यक मानतात. एक लक्षात घ्या की गोरक्ष शतक हा हठयोगाचा ग्रंथ आहे त्यामुळे येथे त्यांनी फक्त हठयोगातील मुद्राच सांगितल्या आहेत. ध्यानयोगातील कोणतीही क्रिया त्यांनी येथे निर्देशित केलेली नाही. गोरक्षनाथ ज्या पाच योगमुद्रा येथे सांगत आहेत त्या अशा आहेत -- महामुद्रा, नभोमुद्रा, उड्डीयान बंध, जालंधर बंध आणि मूलबंध.

अगदी सामान्य योगसंस्थांपासून ते नामांकित योगसंस्थांपर्यंत सगळीकडे वरील योगमुद्रा शिकवल्या जातात. त्यात गोपनीय किंवा दुर्लभ असे काही नाही. गंमत म्हणजे हजारो लोक या मुद्रांचा सरावही करत असतात. परंतु त्यातील फारच थोड्याना या मुद्रांचे जे फळ गोरक्षनाथांनी सांगितले आहे ते प्राप्त होते. बहुतेक जण एक शारीरिक क्रिया म्हणून यांचा अभ्यास तर करतात परंतु कुंडलिनी जागृतीचा अनुभव काही केल्या त्यांना येत नाही. असं का बरं? याचं उत्तर थोडक्यात द्यायच झालं तर मी असं म्हणेन की यौगिक क्रिया हा कुंडलिनी साधनेचा फक्त एक छोटा भाग आहेत. यौगिक क्रियांना जेंव्हा अन्य भाग जोडले जातात तेंव्हाच ती एक परिपूर्ण साधना बनते आणि आध्यात्मिक दृष्ट्या फलदायक ठरते. हे अन्य भाग मिळवायला गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचून उमगतातच असं नाही. मागे काही लेखांत अजपा योगाच्या "दशांग" साधनेचा उल्लेख मी केला आहे. त्यात जसं सगळी अंगे एकत्र बांधल्यावर एक परिपूर्ण साधना बनते तसाच प्रकार येथे आहे.

बरं नुसती संपूर्ण साधना प्रणाली ज्ञात होऊन सुद्धा उपयोगी नाही. विजेचा दिवा प्रकाशमान होण्यासाठी नुसता दिवा असून चालत नाही. त्या जोडीला आवश्यक ते वायरिंग आणि विद्युत ऊर्जा आवश्यक असते. त्याचप्रमाणे नुसती साधना माहीत होऊन पूर्ण फळ प्रदान करत नाही. साधनेत सुद्धा चैतन्य ओतावे लागते. गुरु तुम्हाला साधना शिकवताना केवळ काही क्रिया शिकवत नसतो तर त्या क्रिया शिकवतांना त्यांना चेतवून तुम्हाला प्रदान करत असतो. गुरुच्या शब्दाशब्दात चैतन्य साठवलेले असते. तुमच्याप्रती शुभसंकल्प करून तो तुम्हाला त्या चैतन्याने मढवलेली साधना शिकवत असतो. गुरुमुखातून साधना ग्रहण करण्याचे महत्व हे असे आहे.

या पुढील काही श्लोकांत गोरक्षनाथांनी या पाचही मुद्रांचे विवरण दिलेले आहे. ते विवरण मुख्यतः क्रियात्मक असल्याने मी त्यात फारसा शिरणार नाही. श्रीगुरुमंडलाने परवानगी दिली तर या मुद्रांविषयीचे माझे काही व्यक्तिगत अनुभव आणि कोणत्याही ग्रंथांत न आढळणारी काही निरीक्षणे सांगण्याचा विचार आहे. अन्यथा गोरक्ष शतकाच्या पुढील भागाकडे आपण जाऊ.

असो.

मुद्रा या शब्दाचा एक अन्य अर्थसुद्धा आहे -- जी मुद अर्थात आनंद देते ती. भगवान शंभू महादेवाला आनंद देणारी त्याची अर्धांगिनी जगदंबा आदिशक्ती पार्वती अजपा योग साधकांना कुंडलिनी योगमार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 18 October 2024