Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


परमात्म्याकडे नेणारे सहा समाधी मार्ग

घेरंड मुनींनी आपल्याला समाधी म्हणजे काय ते सांगितले आहे. गुरुकृपा आणि गुरुभक्ती समाधी लाभासाठी कशी आवश्यक आहे ते सुद्धा आपण जाणून घेतले आहे. आता ही समाधी स्थिती प्राप्त कशी करायची त्याचे सहा यौगिक प्रकार ते सांगणार आहेत.

हे सहा समाधी विधी जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या आता पर्यंतच्या शिकवणीची अल्पशी उजळणी आणि काही गोष्टींचा मेळ घालणे आवश्यक आहे जेणेकरून ते आता सामाधीविषयी जे काही सांगणार आहेत त्याची संगती लागेल.

कुंडलिनी योगमार्गावर तीन महत्वाचे टप्पे किंवा अवस्था आपल्याला दिसून येतात. या तीन टप्प्यांची सुसंगती नीट कळल्याशिवाय हा एवढा सगळा खटाटोप कशासाठी करायचा ते नित कळणार नाही. त्यामुळे आधी हे तीन टप्पे जाणून घेऊ.

कोणताही साधक जेंव्हा योगमार्गावर पाउल ठेवतो तेंव्हा प्रथम त्याला योगासने, प्राणायाम, नेति-धौती आदी शुद्धी क्रिया करण्यास सांगितले जाते. या क्रियांचा उद्देश असतो मानव पिंडाची शुद्धी करून ते योगमार्गावरील वाटचालीसाठी तयार करणे.

आता गंमत बघा. एकीकडे साधक शिकत असतो की हे शरीर नश्वर आहे आणि कितीही काळजी घेतली तरी एक ना एक दिवस ते नष्ट होणार आहे. दुसरीकडे तो साधक आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध, शुद्धीक्रिया वगैरे वगैरे उपायांनी त्या नश्वर देहाची शुद्धी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. वरकरणी जरी हा विरोधाभास वाटत असला तरी त्यामागे योगशास्त्राची एक विशिष्ठ भूमिका आहे. मानवी शरीर जरी नश्वर असले तरी ईश्वराची अनुभूती या पिंडाच्या सहाय्यानेच घ्यायची असल्याने पिंडाला त्या अनुभूतीसाठी अनुकूल अशा प्रकारचे बनवणे आवश्यक ठरते. एखादा गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्याआगोदर शरीराला तयार करतो. एखादा धावपटू स्पर्धेत उतरण्यापूर्वी स्वतःला सज्ज करत असतो. एखादा कुस्तीपटू कुस्ती खेळण्या आगोदर तालमीत स्वतःला तयार करत असतो. त्याच धर्तीवर मनाला परमेश्वरात विलीन करण्याआगोदर योग्याला मनाला तयार करावे लागते. मन आणि शरीर एकमेकाशी घट्ट जोडले असल्याने प्रथम शरीराला तयार करणे ओघाने आलेच. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष ओलांडून आत्म्याचे प्रत्यक्षीकरण करण्यासाठी "पिंडशुद्धी" आणि "पिंडज्ञान" योग्याला अत्यंत उपयोगी पडते.

"पिंडशुद्धी" आणि "पिंडज्ञान" हा पहिला टप्पा साध्य झाल्यावर योगी आत्मसाक्षात्कार या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला लागतो. घेरंड मुनींनी ध्यान साधनेची फलश्रुती म्हणजे आत्मसाक्षात्कार हे आगोदर सांगितले आहेच. स्थुलाध्यान, सुक्ष्मध्यान आणि तेजोध्यान हे ध्यानाचे टप्पे पार करत जगदंबा कुंडलिनी जेंव्हा आज्ञाचक्र ओलांडते तेंव्हा योग्याला आत्मसाक्षात्कार घडून येतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय तर "मी" म्हणजे हा जड देह नसून सुद्ध, निखळ, कूटस्थ असा आत्मा आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती.

आत्मसाक्षात्कार झालेला योगी आता मोक्ष अथवा कैवल्य प्राप्तीसाठी झटू लागतो. मोक्ष म्हणजे आत्माचे परामात्य्माबरोबर होणारे मिलन असे घेरंड मुनी सांगतात. हे मिलन कसे घडते तर मनाला शरीरापासून अलग करून त्याला परमेश्वरामध्ये विलीन गेल्याने योगी मोक्ष मार्गावर आरूढ होतो.

येथे लक्षात घ्या की घेरंड मतानुसार आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष ह्या दोन भिन्न अवस्था मानल्या गेल्या आहेत. ध्यानाभ्यासाने आत्मसाक्षात्काराचा लाभ होतो तर समाधी साधनेने मोक्ष लाभ घडून येतो असे घेरंड मुनी सांगतात.

पिंडशुद्धी / पिंडज्ञान हा प्रथम टप्पा, आत्मसाक्षात्कार हा द्वितीय टप्पा आणि मुक्ती / मोक्ष / कैवल्य हा तृतीय टप्पा अशी ही योगामार्गावारची वाटचाल आहे. या संपूर्ण वाटचालीसाठी गुरुकृपा अत्यंत आवश्यक असते. योग्याला गुरुकृपा मिळते ती दृढ गुरुभक्ती केल्याने. योगमार्गावर प्रगती किती व्हावी, गुरु कसा मिळावा, साधनेत सफलता कितपत मिळावी ह्या सगळ्या गोष्टी योग्याच्या स्वप्रयत्नांवर तर अवलंबून असतातच पण त्या जोडीला त्याच्या प्रारब्धात / भाग्यात / कर्मसंचयात काय दडले आहे यावरही त्यांची प्राप्ती अवलंबून असते.

मला आशा आहे की वरील विवेचनावरून घेरंड मुनींनी आत्तापर्यंत सांगितलेल्या भाग्य / प्रारब्ध, गुरुभक्ती, गुरुकृपा, ध्यानसिद्धी, समाधी, आत्मसाक्षात्कार, मोक्ष / मुक्ती या सर्व गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध तुम्हाला आता नीट लक्षात आला असेल.

ध्यानसाधनेत सफलता प्राप्त केलेला योगी आत्मसाक्षात्कार रुपी सिद्धी मिळवतो आणि मुक्ती लाभाकाराता समाधी साधनेला सुरवात करतो. समाधी म्हणजे काय तर मनाला शरीरापासून पृथक करून परमात्म्यामध्ये विलीन करणे. परमात्मा ही काही एक जड वस्तू नाही की जिचे ध्यान करता येईल. समस्त शास्त्रांत परमात्म्याचे वर्णन वेगवेगळ्या विशेषणांनी केलेलं आहे. निर्गुण, निराकार, कूटस्थ, अचल, अविनाशी, अव्यक्त, नाद-बिंदू-कला ज्याच्यापासून उगम पावतात तो परमात्मा.

परमात्म्याची ही बिरुदावली वाचायला जरी सोपी वाटली तरी प्रत्यक्ष ध्यानात मनाला विलीन करण्यासाठी तितकीशी सोपी नाही. त्यासाठी परमात्मा म्हणजे काय त्याची अत्यंत स्पष्ट व्याख्या तुमच्यापाशी तयार असावी लागते. सद्गुरू आपल्या शिष्याला इष्ट दैवत आणि इष्ट देवतेची उपासना करायला अवश्य शिकवतात ते याकरता.

हा जो कोणी इष्ट देवी-देवता असतो त्याला परमात्मस्वरूप मानून योगी समाधी साधनेला सुरवात करत असतो. हळूहळू इष्ट स्वरूपाची सगुण-साकार विशेषणे गळून पडतात आणि निर्गुण-निराकार विशेषणांचा प्रत्यय योग्याला येऊ लागतो.

परमात्म्याचे आपले प्रतिक कोण आणि त्याची सगुण ते निर्गुण उपासना कशी करायची हा खरंतर सद्गुरू आणि शिष्य यांच्यामधील विषय आहे. तरीही एक अंदाज येण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करू आणि मग पुढे जाऊ.

सद्गुरू सर्वप्रथम शिष्याला गुरुमंत्र प्रदान करतात. गुरुमंत्राने चित्त शुद्ध होते आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची प्रक्रियासुद्धा वेगवान होते. गुरुमंत्राने कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला चालना मिळते. देवात्म शक्ती अर्थात जगदंबा कुंडलिनी नाद आणि प्रकाश रूपाने व्यक्त होऊ लागते. दुर्दैवाने गुरुमंत्राविषयी लोकांच्या मनात एवढ्या चमत्कारीक गोष्टीनी घर केलेले असत की त्या ओझ्याखाली गुरुमंत्राचे खरे उद्दिष्ट बाजूला पडते. "पी हळद अन हो गोरी" जे ज्याप्रमाणे घडणारे नसते त्याप्रमाणे गुरुमंत्र हा एका क्षणात जन्मोजन्मींचे संचित संस्कार नष्ट करत नाही. त्यालाही आपला प्रभाव दाखवण्यासाठी साधकाच्या मनोभूमी अनुसार कमी-अधिक कालावधी हा लागतोच. साधक गुरुमंत्राकडून एवढ्या चुकीच्या अपेक्षा बाळगतात की मग गुरुमंत्र म्हणावा तसा प्रभाव दाखवू शकत नाही.

त्यानंतर परमात्म्याचे प्रतिक मानलेल्या देवी-देवतेची स्तोत्र, सहस्रनाम, बीजमंत्र, मूलमंत्र, काम्यमंत्र, "क्रमदिक्षा" विधीने अन्य मंत्रांची उपासना सद्गुरू शिष्याकडून आवश्यकते नुसार करवून घेत असतात. हे सर्व घडण्यासाठी अर्थातच शिष्याने भक्तीपूर्वक आपल्या सद्गुरूची सेवा करणे आणि विनयपूर्वक त्यांच्याकडून ज्ञान मिळवणे गरजेचे असते.

मनात "परमात्मा" पूर्णपणे ठसला की मग समाधी साधनेत मनाला परमात्म्यामध्ये विलीन करण्याचा अभ्यास योगी आरंभ करतो. मन आणि परमात्मा यांचे विलीनीकरण करण्याचे सहा मार्ग घेरंड मुनींनी सांगितले आहेत. ते म्हणतात --

शाम्भव्या चैव भ्रामर्या खेचर्या योनिमुद्रया ।
ध्यानं नादं रसानन्दं लयसिद्धिश्चतुर्विधा ॥
पञ्चधा भक्तियोगेन मनोमूर्च्छा च षड्विधा ।
षड्विधोऽयं राजयोगः प्रत्येकमवधारयेत् ॥

वरील श्लोकांचा अर्थ असा की -- ध्यान समाधी, नाद समाधी, रसानंद समाधी, लय समाधी हे चार राजयोग साधण्याचे मार्ग आहेत. ते अनुक्रमे शांभवी, भ्रामरी, खेचरी आणि योनिमुद्रा यांच्या सहाय्याने प्राप्त होतात. पाचवा मार्ग भक्तियोग समाधी असून सहावा मार्ग मनोमुर्च्च्छा समाधी आहे.

वरील श्लोकावरून योगशास्त्रातील "मुद्रा महात्म्य" तुम्हाला कळू शकेल. शांभवी मुदेद्वारे योगी ध्यानसमाधी प्राप्त करतो. षण्मुखी आणि भ्रामरी मुद्रेद्वारे योगी नादसमाधी साधतो. खेचरी मुद्रेद्वारे योगी रसानंद समाधी हस्तगत करतो. योनिमुद्रेद्वारे योगी लयसिद्धी समाधी धारण करतो. भक्तियोग समाधी प्रामुख्याने सात्विक भावनाप्रधानता असलेली साधना आहे तर मनोमुर्च्च्छा समाधीत कुंभकयुक्त प्राणायामाच्या सहाय्याने समाधी साधली जाते.

घेरंड मुनी आता वरील प्रत्येक समाधी प्रकाराचे थोडक्यात विवेचन करतील. पुढील लेखांत आपण ते जाणून घेऊ.

असो.

परमेश्वर परमात्मा आदिगुरु शंभू महादेव सर्व कुंडलिनी योगसाधकांना समाधी मार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 05 June 2023