Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


समाधी प्राप्तीसाठी गुरुकृपेची आणि गुरुभक्तीची आवश्यकता

घेरंड मुनींनी आतापर्यंत आपल्याला ध्यानयोग सांगितला आहे. आता ते ध्यानातून समाधीकडे जाणार आहेत. मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे निर्देश केलेला आहे.

घेरंड मुनी म्हणतात --

समाधिश्च परो योगो बहुभाग्येन लभ्यते ।
गुरोः कृपाप्रसादेन प्राप्यते गुरुभक्तितः ॥

अर्थात समाधी म्हणजे योगाची सर्वोच्च अवस्था आहे आणि ही अवस्था भाग्यशाली योग्यांनाच लाभते. गुरुकृपा रुपी प्रसादाने आणि गुरुभक्तीद्वारे ती प्राप्त होते.

येथे घेरंड मुनींनी पुन्हा भाग्य किंवा प्रारब्ध या गहन विषयाकडे निर्देश केला आहे. मागे शांभवी मुद्रा आणि सूक्ष्म ध्याना विषयी सांगताना सुद्धा घेरंड मुनींनी भाग्य आवश्यक असल्याचे सांगितले होते. आपण त्याविषयी आगोदर विस्ताराने जाणून घेतले आहे त्यामुळे पुन्हा त्या विषयाच्या खोलात जाण्याची गरज नाही.

येथे घेरंड मुनींनी सांगितलेले अन्य दोन घटक -- गुरुकृपा आणि गुरुभक्ती -- विचारात घेऊया.

भारतीय अध्यात्ममार्गात गुरुकृपा हा शब्द एवढ्या सरधोपटपणाने वापरला जातो की जर या शब्दाचा सामान्य अर्थ घेतला तर घेरंड मुनींना काय म्हणायचे आहे ते नीट कळणार नाही. कुंडलिनी योगमार्गावरील घेरंड मुनींना अभिप्रेत असलेली गुरुकृपा फार वेगळी आहे.

येथे अभिप्रेत असलेली गुरुकृपा म्हणजे काय ते कळण्यासाठी खाली दिलेला एक छोटासा उपक्रम करा जेणेकरून गुरुकृपेची योगमार्गाला अभिप्रेत असलेली छटा तुमच्या ध्यानी येईल. गुरुकृपेचा उथळ अर्थ गृहीत धरला तर विषयाची गल्लत होईल.

तुमच्या आवडीच्या कोणत्याही एका संत-सत्पुरुषाची निवड करा. मग त्या संत-सत्पुरुषा विषयी उपलब्ध असलेल्या साहित्याचे नीट वाचन करा. त्याचे जीवन चरित्र वाचा. त्याच्यावर रचले गेलेले लीलाग्रंथ वाचा. जाणकार लोकांनी त्याच्यावर लिहिलेले ग्रंथ वाचा. त्याची शिकवण उलगडून दाखवणारे ग्रंथ वाचा. हे सगळे वाचन करण्यामागचा उद्देश हा आहे की तुमच्या आवडीच्या त्या संत-सत्पुरुषाला नीट समजून घ्या. चांगले चार-सहा महिने घालवलेत तरी चालेल पण त्या संत-सत्पुरुषा विषयी अशी सांगोपांग माहिती अवश्य मिळवा.

एकदा का वरील वाचनाचा उपक्रम पार पडला की मग खालील गोष्टींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अगदी तंतोतंत अचूक असण्याची गरज नाही. ढोबळमानाने ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलात तरी पुरेसे आहे --

१. त्या सत्पुरुषाच्या एकूण भक्तांची संख्या किती असावी तो आकडा अंदाजाने लिहून ठेवा. उदाहरणा दाखल असे समजू की कोण्या एका सत्पुरुषाचे एक लाख भक्त होते.

२. त्या भक्तांपैकी किती जणांना त्या सत्पुरुषाच्या चमत्कारांची किंवा योगसामर्थ्याची प्रत्यक्ष अनुभूती आली आहे. हा आकडा सुद्धा लिहून ठेवा. उदाहरणासाठी असे समजू की एक लाख भक्तांपैकी ५० हजार भक्तांना तशी काही अनुभूती आलेली आहे.

३. त्या भक्तांपैकी किती जणांचे सांसारिक प्रश्न किंवा भौतिक अडीअडचणी त्या सत्पुरुषाने आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर सोडविल्या आहेत. हा आकडा सुद्धा लिहून ठेवा. उदाहरण म्हणून असे गृहीत धरू की २० हजार भक्तांच्या सांसारिक अडचणी त्या सत्पुरुषाने सोडविल्या आहेत.

४. त्या एकूण भक्तांपैकी किती जणांनी उच्च कोटीची आध्यात्मिक अथवा यौगिक प्रगती झाली. हा आकडा सुद्धा टिपून ठेवा. उदाहरण म्हणून असे समजू की ५० भक्तांनी अशी उच्च आध्यात्मिक प्रगती करण्यात यश मिळवले.

५. आता शोध घ्या की त्याच्या किती भक्तांना आत्मसाक्षात्काराचा प्रत्यक्ष लाभ झाला. क्षणभर असं समजू की दोन शिष्यांना आत्मसाक्षात्कार घडून येऊन त्यांचे जीवन धान्य झाले.

६. आता शेवटी असा शोध घ्या की त्या सत्पुरुषाने आपल्यासारखेच तुल्यबळ असे किती शिष्य निर्माण केले. ज्याप्रमाणे मच्छिंद्राने गोरक्ष तयार केला त्याप्रमाणे. ही संख्या कदाचित शून्यहि असू शकेल किंवा क्वचित एखादा शिष्य गुरुसम तयार झालेला असेल.

वरील क्रमांक ५ आणि क्रमांक ६ मधील शिष्यांवर त्या सत्पुरुषाने जी कृपादृष्टी केली ती म्हणजे घेरंड मुनींना येथे अभिप्रेत असलेली "गुरुकृपा". लक्षात घ्या की येथे घेरंड मुनी समाधी, आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष याविषयी बोलत आहेत. सांसारिक अडीअडचणींतून सोडवणारी "गुरुकृपा" त्यांना बिलकुल अभिप्रेत नाही. त्यांना अभिप्रेत असलेली गुरुकृपा ही शिष्याला आत्मसाक्षात्कार देणारी आणि मोक्ष मार्गावर अग्रेसर करणारी आहे.

क्रमांक १ ते क्रमांक ६ मधील उत्तरांचे आकडे तुम्हाला नेहमी उतरत्या क्रमाने आढळतील. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या सत्पुरुषाने त्याच्या कार्यकाळात खंडीभर आत्मसाक्षात्कारी योगी निर्माण केलेत असं कधी फारसं आढळणार नाही. आत्मसाक्षात्कार ही फार दुर्लभ गोष्ट आहे. ती अशी खिरापतीसारखी वाटता येत नाही. वरील उदाहरणात त्या सत्पुरुषाने त्याच्या लाखभर भक्तांपैकी सर्वांवरच आत्मसाक्षात्कार प्रदायीनी गुरुकृपा का बर केली नाही? त्या सत्पुरुषाच्या योगसामर्थ्याला काही मर्यादा होत्या का त्या भक्तांच्या प्रयत्नांत कमतरता होती? अर्थातच यात त्या सत्पुरुषाला दोष देता येणार नाही. साधकाचे अपुरे प्रयत्न, साधकाचे प्रारब्ध अथवा भाग्य आणि साधकाची कमकुवत गुरुभक्ती त्याला कारणीभूत आहे.

आता गुरुभक्ती म्हणजे तरी काय आहे? त्या सत्पुरुषाला हार-तुरे घालणे? त्या सत्पुरुषाचे गुणगान करणे? त्या सत्पुरुषाचे लीलाग्रंथांचे पारायण करणे? त्या सत्पुरुषाच्या मठ-मंदिरांना भेटी देणे? या सर्व गोष्टी भक्तीला पोषक असतील कदाचित परंतु या गोष्टी म्हणजे घेरंड मुनींना अभिप्रेत असलेली "गुरुभक्ती" नाही.

घेरंड मुनींना अभिप्रेत असलेली गुरुभक्ती म्हणजे सद्गुरूने दिलेली साधना प्रणाली आणि जीवन प्रणाली प्रत्यक्ष आचरणात आणणे. आपण एखादी गोष्ट तेंव्हाच आपलीशी करतो जेंव्हा आपली त्या गोष्टीवर प्रीती जडते. श्रद्धा बसते. लळा लागतो. अन्यथा आपण ती गोष्ट वरकरणी धारण करतो किंवा धारण करतही नाही. सद्गुरूंनी दिलेली साधना आणि जीवनशैली आपलीशी करायला त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा असावी लागते. ती नसेल तर मग गुरुभक्तीत पूर्णता येऊ शकत नाही.

कोणत्याही सद्गुरूला आपल्या शिष्यांच्या पात्रते विषयी पूर्ण कल्पना असते. कोण भक्तीचा आव आणत आहे आणि कोण खरीखुरी भक्ती करत आहे याची त्याला माहिती असते. कोणाचा कर्म संचय कशा प्रकारचा आहे याची त्याना जाणीव असते. कोण मन लावून साधनारत आहे आणि कोण साधनेची हेळसांड करत आहे हे ते ओळखून असतात. वरकरणी ते तसं दाखवत नाहीत इतकंच. गुरुकृपा आणि गुरुभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. टाळी कधी एका हाताने वाजत नाही. जेंव्हा शिष्याच्या गुरुभक्तीत पूर्णता येते तेंव्हा गुरुकृपेत सुद्धा पूर्णता येते. ज्याच्या अंगात खरी गुरुभक्ती भिनली आहे, जो सद्गुरुंच्या स्मरणात लीन झालेला आहे त्यालाच सद्गुरू अमुल्य अशी "गुरुकृपा" बहाल करतात.

थोडक्यात सांगायचे तर पुरुषार्थ, प्रारब्ध / भाग्य, गुरुभक्ती आणि गुरुकृपा या समाधी मार्गाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत असा घेरंड मुनींचा आशय आहे.

पुढे ते असंही म्हणतात की --

विद्याप्रतीतिः स्वगुरुप्रतीतिरात्मप्रतीतिर्मनसः प्रबोधः ।
दिने दिने यस्य भवेत्स योगी सुशोभनाभ्यासमुपैति सद्यः ॥

वरील श्लोकाचा अर्थ असा की -- गुरूने दिलेल्या विद्येबद्दल दृढ खात्री, स्वतःच्या गुरूविषयी दृढ श्रद्धा आणि स्वतःविषयी प्रकांड आत्मविश्वास असलेल्या योग्याच्या मनात दिवसेंदिवस ज्ञानाचा उदय होऊ लागतो आणि एक दिवस तो समाधी अवस्था प्राप्त करतो.

येथे घेरंड मुनींनी विद्या, गुरु आणि आत्मतत्व यांविषयी प्रतीती असा शब्द वापरला आहे. प्रतीती म्हणजे स्वानुभवाच्या आधारे निर्माण झालेला दृढ निश्चय किंवा दृढ विश्वास. साधारण साधकाची कमकुवत आणि वारंवार डळमळीत होणारी श्रद्धा आणि येथे सांगितलेली प्रतीती यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

आपल्या सद्गुरूने शिकविलेली आणि आजवर अनेकदा अनुभवलेली योगसाधनाच आपल्याला एक ना एक दिवस समाधी अवस्थेचा सुद्धा लाभ करून देईल असा दृढ भाव म्हणजे "विद्या प्रतीती". आपले सद्गुरू सर्वोपरी मानून त्यांच्या अनेकदा प्रत्ययास आलेल्या शिकवणीनुसार आचरण करणे म्हणजे "स्वगुरू प्रतीती". नवखा साधक ते अनुभवी योगी असा प्रवास अनुभवलेले आपण आता समाधी लाभ घेण्याचा जो घाट घालत आहोत त्यात यश मिळवणारच हा दुर्दम्य आत्मविश्वास म्हणजे "आत्म प्रतीती".

असा समाधिसुख भोगण्यास आतुर झालेला योगी मग काय करतो बघा --

घटाद्भिन्नं मनः कृत्वा ऐक्यं कुर्यात्परात्मनि ।
समाधिं तं विजानीयान्मुक्तसंज्ञो दशादिभिः ॥
अहं ब्रह्म न चान्योऽस्मि ब्रह्मैवाहं न शोकभाक् ।
सच्चिदानन्दरूपोऽहं नित्यमुक्तः स्वभाववान् ॥

अशा योग्याने समाधीत प्रवेश कसा करावा तर त्याने आपले मन शरीरापासून अलग करून परमात्म्याशी जोडून टाकावे. असे केल्याने सर्वसाधारण मानवी मनाच्या ज्या ज्ञात अवस्था आहेत त्यांपेक्षा भिन्न अशी समाधी अथवा मोक्ष नामक अवस्था योग्याला प्राप्त होते. समाधी लाभ घडून आल्यावर त्याला असा अनुभव येतो की -- मी ब्रह्म आहे, मी अन्य काही वस्तू नसून ब्रह्मतत्व आहे, मी शोक जाणत नाही कारण मी सत-चित-आनंद स्वरूप आहे. मी स्वभावतःच नित्य मुक्त आहे.

मागील लेखात आपण निर्वाण षटकातील आत्मानुभूती विस्ताराने जाणून घेतली आहे त्यामुळे पुन्हा खोलात जाण्याची गरज नाही. निर्वाण षटकातील "शिवोहं" आणि घेरंड मुनींनी येथे सांगितलेली "सोहं" ही एकाच ब्रह्मतत्वाची अनुभूती आहे.

वरील श्लोकांत घेरंड मुनींनी मनाला शरीरापासून अलग करून मनाला परमात्म्याशी एकरूप करण्याचा उल्लेख केलेला आहे. हे कसे साधायचे? कोणत्या यौगिक प्रक्रियांनी हे एकीकरण करणे शक्य आहे? घेरंड मुनी आता आपल्याला ते सांगणार आहेत. पुढच्या लेखांत आपण ते जाणून घेऊ.

असो.

योग्यांचा आराध्य असलेला शंभू महादेव प्रामाणिक गुरुभक्तांना अमोघ गुरुकृपारुपी प्रसाद प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 29 May 2023