Advanced Ajapa Dhyana Yoga : Tap the power of breath, mantra, mudra, and meditation for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


नाडीशोधन प्राणायामाची प्रारंभीक तयारी

लेखमालेच्या मागील भागात आपण गोरक्ष शतकातील मुद्राभ्यास सविस्तरपणे जाणून घेतला. आता पुढे श्रीगोरक्ष महाराज प्राणायमाबद्दल काय संगत आहेत ते जाणून घेण्याची वेळ आली आहे.

मुख्य प्राणायाम विधी सांगण्यापूर्वी गोरक्षनाथ प्राणायामाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी सांगतात --

यतः कालभयात् ब्रह्मा प्राणायामपरायणः ।
योगिनो मुनयश्चैव ततः प्राणं निबन्धयेत् ॥

स्वतः ब्रह्मदेव सुद्धा काळाला घाबरून प्राणायामाचा अभ्यास करत असतो. योगी, मुनी, तपस्वी सुद्धा निरंतर प्राणायामाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे योगसाधकाने सुद्धा प्राण निग्रहाचा सराव करावा.

प्राचीन भारतीय कालगणने नुसार देवी-देवता सुद्धा अमरपट्टा घेऊन आलेल्या नाहीत. मागे एका लेखात आपण विस्ताराने त्याबद्दल जाणून घेतले आहे. सहस्र चतुर्ययुगांनी बनलेला एक कल्प संपला की या सृष्टीचा लय अटळ आहे आणि त्यामुळे या सर्व देवी-देवतांचा सुद्धा लय अटळ आहे. महाप्रलय, महातांडव, तांडवनृत्य अशा संकल्पनांमधून ह्या लयाचे वर्णन केले गेले आहे. जसा जसा काळ सरतो तशी तशी जीवाची प्राणउर्जा क्षीण होत जाते आणि एक दिवस ती पूर्णपणे संपून मृत्यू ओढवतो. येथे गोरक्षनाथ म्हणतात की स्वतः ब्रह्मदेव सुद्धा काळाला भिऊन असतो आणि या कालभयावर तोडगा म्हणून तो आयुष्य वर्धन व्हावे या हेतूने प्राणायामाचा अभ्यास करतो. सिद्ध योगी, मुनी, तपस्वी वगैरे मंडळी सुद्धा काळाच्या भयापासून दूर पळण्यासाठी निरंतर प्राणायाम करत असतात. सामान्य माणसाने नेहमी श्रेष्ठ पुरूषांचे अनुकरण करावे या निर्देशाला अनुसरून योगसाधकाने सुद्धा प्राण संवर्धनार्थ प्राणायाम करावा असे गोरक्षनाथ सांगतात.

चले वाते चलं सर्वं निश्चले निश्चलं भवेत् ।
योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निबन्धयेत् ॥

जोवर शरीरातील वात चलायमान अथवा चंचल असतो तोवर सर्वकाही चंचल भासते पण जेंव्हा शरीरातील वात निश्चल होतो तेंव्हा सर्वकाही स्थिर होते. योग्याच्या चित्ताला स्थिरता प्राप्त होते. या कारणाने योगसाधकाने वायुचा निग्रह करावा.

आधीच्या श्लोकात गोरक्षनाथांनी जीवशक्तीला संबोधण्यासाठी प्राण असा शब्दप्रयोग केला आहे आणि आता ते वायु असा शब्दप्रयोग करत आहेत. असं का बरं? प्राणाला वायु म्हणण्याचे कारण काय? थोडक्यात सांगतो. शरीरातील प्राण ऊर्जेचे कार्य असते ते शरीराचे आणि मनाचे चलनवलन करणे. शरीरातील सर्व कार्य जसे हृदयाची धडधड, अन्नपचं, रक्ताभिसरण वगैरे करण्यासाठी प्राणऊर्जेची गरज असते. कोणतेही शारीरिक अथवा मानसिक कार्य म्हणजे ऊर्जेची चलयमान अथवा चंचल अवस्था असते. वात किंवा वायु सुद्धा असेच कार्य करतो. हलणाऱ्या हवेलाच आपण वारा असे म्हणतो. चंचलता आणि सूक्ष्मता हे गुणधर्म दोघांमध्येही आहेत. त्यामुळे प्राण आणि वायु हे शब्द योगग्रंथांत अनेकदा समानार्थी वापरले जातात.

प्राण आणि वायु यांचा संबंध सांगितल्यावर ते आता प्राण आणि हंस यांचा संबंध सांगतात --

षट्त्रिंशदङ्गुलं हंसः प्रयाणं कुरुते बहिः ।
वामदक्षिणमार्गेण ततः प्राणोऽभिधीयते ॥

गोरक्ष महाराज म्हणतात की हंस रूपी श्वासोच्छवास छतीस अंगुळे बाहेर जातो. डाव्या आणि उजव्या मार्गाने अर्थात इडा-पिंगला मार्गाने हा आत-बाहेर करत असतो. त्यालाच प्राण असे म्हणतात.

येथे अजपा योगाच्या मूळ "हंस" विज्ञानाकडे सूक्ष्म निर्देश केलेला आहे. मानव पिंडात श्वासोच्छवासाची क्रिया प्रामुख्याने प्राण आणि अपान या प्राणशक्तीच्या उप-प्रकारांच्या सहाय्याने घटित होत असते. अंगुळे म्हणजे बोटे किंवा प्राणांच्या मोजमापासाठी वापरलेले युनिट. हा हंस आत येताना किती अंगुळांवरून आत येतो आणि बाहेर जाताना किती अंगुळांपर्यंत बाहेर जातो याची जी परिमाणे योगग्रंथांत दिलेली आहेत त्यात थोडी भिन्नता आढळते. येथे श्वास बाहेर जाण्याचे प्रमाण हे छतीस अंगुळे दिलेले आहे. श्वासांची ही ये-जा दोन्ही नाकापुडयंतून वाहणाऱ्या इडा आणि पिंगला या नाड्यामार्फत होत असते.

प्राण, वायु आणि हंस यांतील अभिन्नता दर्शवल्यानंतर आता गोरक्षनाथ आपल्याला प्राणायामाच्या प्रत्यक्ष अभ्यासाकडे घेऊन जात आहेत --

बद्धपद्मासनो योगी नमस्कृत्य गुरुं शिवम् ।
नासाग्रदृष्टिरेकाकी प्राणायामं समभ्यसेत् ॥

योग्याने बद्धपद्मासनात बसावे आणि गुरुस्वरूप शिवाला नमस्कार करावा. त्यानंतर नासिकाग्रावर दृष्टी ठेऊन प्राणायामाचा अभ्यास करावा.

येथे "बद्धपद्मासन" या शब्दाचे दोन अर्थ होतात. हठयोगात बद्धपद्मासन नावाचे एक आसन आहे. त्यात नेहमीच्या पद्मासनात बसल्यावर हात मागे नेऊन उजव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने आणि डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने धरला जातो. येथे हा सारधोपट अर्थ घेऊन चालणार नाही कारण त्याने पुढील जो विधी आहे तो शक्य होणार नाही. त्यामुळे बद्धपद्मासन या शब्दाचा अर्थ "पद्मासनात बांधलेला" अर्थात पद्मासनात स्थिरस्थावर झालेला असा करावा लागेल. अशाप्रकारे आसनस्थ झाल्यावर प्रथम गुरुस्वरूप शिवशंकराला नमस्कार करावा. येथे "गुरुं शिवम्" शब्दाचा दूसरा अर्थ सुद्धा करता येतो. आपल्या गुरूला शिवस्वरूप मानून निजगुरुला नमस्कार करावा. आदीगुरु आणि निजगुरू यांच्या आशीर्वादाशिवाय प्राणायाम सिद्धीस जात नाही हा अभिप्राय येथे लक्षात घ्यावा. शिवाला नमस्कार केल्यावर नासिकाग्रावर दृष्टी ठेवावी. येथे नासिकाग्र हे दोन अर्थाने आहे. जर सरधोपट अर्थ घेतला तर नाकाचे टोक असा अर्थ होतो आणि त्यावर दृष्टी एकाग्र करावी असे म्हणावे लागते. जर अधिक सूक्ष्म अर्थ घेतला तर नासिकाग्र म्हणजे नासिकाग्रांतून आत-बाहेर करणाऱ्या श्वासांवर लक्ष एकाग्र करावे अर्थात अजपा जपाचा प्रारंभीक विधी करावा असा अर्थ होतो.

या लेखात आतापर्यंत जे निरूपण केले आहे त्यावरून तुम्हाला खालील गोष्टी लक्षात आल्या असतील --

शरीर आणि मनातील चंचलतेला जे घटक कारणीभूत आहेत त्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे प्राण. हंस रूपाने वहाणारा प्राणवायू जोवर चंचल, अस्थिर, असंतुलित आहे तोवर मन सुद्धा चंचल रहाणार आहे. त्यामुळे मनाची चंचलता कमी करण्याचा एक अभ्यास म्हणून प्राणायामाकडे पाहायला हवे. प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी एका आसनात बराच काळ बसण्याचा सराव असावा लागतो तरच प्राणायामाचा अभ्यास चांगला होतो. पद्मासन किंवा असे कोणतेही आसन ज्यात बैठक आणि मेरूदंड ताठ राहील त्याची निवड तुम्ही करू शकता. प्राणायाम करताना तुम्ही डोळे बंद ठेवणार असाल तर नजर बहिर्गामी होऊ नये म्हणून तिला नासिकाग्रावर एकाग्र करून ठेवावी. तुम्हाला जर डोळे बंद करायचे असतील तर बंद डोळ्यांनी अजपा जप करावा. गोरक्ष शतकातील या प्राणायामाचे आरोग्यावर सुपरिणाम होतातच परंतु या प्राणायामाचे मूळ उद्दिष्ट आध्यात्मिक स्तरावरील आहे. त्यामुळे भगवान शिवशंकराचा आणि निजगुरुचा आशीर्वाद त्यातील सफलतेसाठी आवश्यक आहे.

पद्मासनात स्थिरवल्या नंतर पुढे काय करायचे? प्राणायाम कसा करायचा? या अभ्यासातील प्रगतीचे टप्पे कोणते? प्रगतीची लक्षणे कोणती? ते सर्व निरूपण शंभूजती गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेने पुढील लेखात करेन.

असो.

प्राणशक्ती जिच्यात बीजरूपाने विद्यमान असते ती परांबा पराशक्ती कुंडलिनीस्वरूपा भगवती आणि योगविद्येचे ज्ञाते श्रीगोरक्षनाथ सर्व योगसाधकांना प्राणविद्येचा अभ्यास करण्याची प्रेरणा देवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 27 January 2025