Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


प्रगत स्तरावरील मुद्राभ्यास - महामुद्रा, मूलबंध, उड्डियान, जालंधर, खेचरी

आगोदर दिवाळी आणि त्यानंतर कार्तिक पौर्णिमा यांमुळे गोरक्ष शतकावरील लेखमाला काहीशी रेंगाळली आहे. आगामी श्रीदत्त जयंती येण्यापूर्वी आजच्या या लेखातून निदान योगमुद्रा प्रकरण तरी पूर्ण करूयात.

लेखमालेतील या आधीच्या लेखांत सांगितल्या प्रमाणे शंभू जती गोरक्षनाथांनी पाच योगमुद्रा कुंडलिनी जागरणासाठी महत्वाच्या मानल्या आहेत -- महामुद्रा, मूलबंध, उड्डीयान बंध, जालंधर बंध आणि खेचरी मुद्रा. आधुनिक काळात लिहिल्या गेलेल्या पुस्तकांत या योगक्रियांचे मुद्रा आणि बंध असे वेगवेगळे वर्गीकरण केले जात असले तरी प्राचीन योगग्रंथांत त्यांना एकत्रीतपणे मुद्रा असेच म्हणतात. शंभू महादेवाने अनेकानेक योगमुद्रा कथन केल्या आहेत. त्यांतील सर्वच मुद्रा काही सर्व योगग्रंथांत समाविष्ट केलेल्या नाहीत. भगवान दत्तात्रेयांच्या दत्तात्रेय योगशास्त्रं मध्ये त्यांनी आठ योगमुद्रा महत्वाच्या मानल्या आहेत. योगी स्वात्मारामाने आपल्या हठयोग प्रदीपिकेत दहा मुद्रा वर्णन केल्या आहेत. घेरंड मुनींनी आपल्या घेरंड संहितेत पंचवीस मुद्रा कथन केल्या आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की गोरक्ष शतकात गोरक्षनाथांनी सांगितलेल्या वरील पाच मुद्रा या आठ, दहा आणि पंचवीस च्या सर्व मुद्रा संग्रहांमध्ये समाविष्ट आहेत. याचा अर्थ असा की गोरक्ष शतकातील पाच मुद्रा या योगसाधकांसाठी मूलभूत स्वरूपाच्या आहेत. त्या अत्यंत महत्वाच्या असल्याने वेगवेगळ्या योगपरंपरांच्या "मुद्रा संग्रहांत" त्यांना स्थान मिळालेले आहे.

वरील पाच मुद्रांपैकी खेचरी मुद्रा वगळता अन्य चार मुद्रा या काही गोपनीय वगैरे नाहीत. त्यांचे आरोग्यविषयक फायदे पुष्कळ आहेत आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ते प्रमाणीतही झालेले आहेत. त्यामुळे जवळजवळ सर्व योग शिकवणाऱ्या संस्था या चार मुद्रा कमी-अधिक प्रमाणात हमखास शिकवतात. बहुतांश चांगल्या योगासनांच्या पुस्तकांत सुद्धा त्यांची कृती आणि माहिती मिळू शकते. तुम्ही आपापल्या योगशिक्षकाकडून किंवा योगमार्गदर्शकाकडून त्या अगदी सहज शिकू शकता. त्यामुळे या मुद्रा करण्याची कृती किंवा विधी मी येथे फारसा चर्चेस घेत नाही. या मुद्रां विषयी अन्य काही बारकावे आणि आध्यात्मिक फायदे मिळवण्यासाठी विचारात घ्यायच्या काही गोष्टी येथे विचारात क्रमशः घेऊया. खालील गोष्टी प्रगत स्तरावरील योग साधकांसाठीच आहेत. नवशिक्या साधकांसाठी त्या नाहीत. प्रगत स्तरावरील साधकांनी देखील आपापली श्रद्धा असलेल्या एखाद्या तज्ञ आणि जाणकार योगमार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच अशा प्रकारचा उच्च कोटीचा मुद्राभ्यास करावा. गोरक्ष शतकाचे निरूपण करत असतांना विषयाची खोली आणि आध्यात्मिक उपयोगिता लक्षात यावी म्हणून केवळ माहिती म्हणून येथे या गोष्टींकडे अल्पसा निर्देश करण्यात आला आहे.

पहिली मुद्रा आहे महामुद्रा. महामुद्रे मध्ये डाव्या पायाची टाच शिवण स्थानी दाबून धरली जाते. उजवा पाय पुढे पसरून दोन्ही हातांनी उजव्या पायाची बोटे धरली जातात. सर्वसाधारणतः या मुद्रेचे अभ्यासक डाव्या पायाची टाच शिवण स्थानी घट्ट दाबून धरतात आणि पसरलेल्या उजव्या पायाची बोटे हातांनी धरण्याचा प्रयत्न करतात. येथे एक होणारी चूक किंवा कमतरता म्हणजे बहुतेक साधक एकाच बाजूने ही मुद्रा करतात. जर या मुद्रेपासून जास्तीत जास्त लाभ मिळवायचा असेल तर ही मुद्रा एकदा डाव्या पायाची टाच दाबून तर एकदा उजव्या पायाची टाच दाबून आणि डावा पाय पुढे पसरून करायला हवी. दोन्ही बाजूने समसमान आवर्तने करावीत. उदाहरणार्थ, दोन आवर्तने डाव्या पायाची टाच दाबून आणि उजवा पाय पुढे पसरून आणि दोन आवर्तने उजव्या पायाची टाच दाबून आणि डावा पाय पुढे पसरून. अभ्यासकांकडून होणारी दुसरी चूक म्हणजे चुकीच्या जागी टाच दाबणे. शिवण स्थान म्हणजे काय ते नीट समजून घ्यावे. पुरुषांमध्ये शरीराच्या बाहेरच्या बाजूने वृषणांचा शेवट ते मलद्वार या जागी शिवणस्थान असते तर स्त्रियांमध्ये बाह्य योनिमार्गाचा शेवट ते मलद्वार या जागी शिवणस्थान असते. तुमची टाच या शिवणीवर मध्यभागी दाबली गेली पाहिजे. येथेच आतल्या बाजूला थोडे वर मूलाधार चक्र विराजमान असते. टाच जर पुढे किंवा मागे दाबली गेली तर अपेक्षित लाभ मिळणार नाही. ही मुद्रा करत असतांना फायदे वृद्धिंगत करायचे असतील तर मुद्रा स्थितीत असताना अजपा जप, कुंभकयुक्त प्राणायाम, सबीज प्राणायाम आणि त्रिबंध यांचा एकत्रीत अभ्यास सुद्धा तुम्ही करू शकता. अर्थात सुरवातीला काळजीपूर्वक हळूहळू सुरवात करावी आणि कालांतराने एक-एक गोष्ट वाढवत जावी. मुद्रा करत असतांना डोळे बंद ठेवावेत आणि मन जिथे-जिथे दाब स्थिति आहे तिथे-तिथे सावकाश फिरवावे. या मुद्रेत पाठीचा कणा आणि परिणामी सुषुम्ना नाडी ताठ आणि ताण स्थितीत असते. बंद डोळ्यांनी सुषुम्ना नाडीत तुम्ही ध्यान सुद्धा करू शकता. महामुद्रेमुळे वायु सुषुम्ना नाडीत प्रवेश करू लागतो. मेरुदंड स्थित षटचक्रं उन्मिलित होऊन त्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कार्ये सुरळीत सुरू होतात.

दुसरी मुद्रा आहे मूलबंध. मूलबंधात पायाची टाच शिवणस्थानी दाबून मलद्वाराचे आकुंचन केले जाते आणि अपान वायु वर ओढून घेतला जातो. योगग्रंथांत जारी फक्त मलद्वाराचे आकुंचन करा असे सांगितलेले असलेले तरी प्रत्यक्षात तीन ठिकाणचे आकर्षण केल्यास मूलबंध अत्यंत चांगल्या प्रकारे लागतो. पहिले म्हणजे अर्थातच मलद्वाराचे आकुंचन करणे. दुसरे म्हणजे मूत्रमार्गाचे सुद्धा आकुंचन करावे. तिसरे म्हणजे टाचेने दाबलेल्या शिवण स्थानाचे सुद्धा आकुंचन करावे. ह्या तीन जागी आकुंचन केले की मूलबंध अगदी घट्ट आणि छान लागतो. येथे अपान वर ओढायचा अभ्यास वाटतो तेवढा सोपा नाही. शरीरातील पंचप्राण -- प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान -- हे आधी ओळखता यावे लागतात. त्यानंतर अपान खालून वर ढकलावा लागतो. जर अपचन, मलबद्धता, वायु विकार असतील तर मूलबंध नीट जमत नाही. त्यामुळे आधी असे विकार दूर करावेत आणि मगच मूलबंध लावण्याचा सराव करावा. हा अभ्यास सुद्धा एकदा डाव्या पायाची टाच आणि एकदा उजव्या पायाची टाच असा आलटून-पालटून करावा. मूलबंध करत असतांना सोहं जप किंवा कुंभक करता येतो. मनाला मूलाधार चक्रातील स्वयंभू लिंगावर एकाग्र करून ठेवता येते. मूलाधार चक्राची देवता असलेल्या गणपतीच्या मुलमंत्राचा किंवा सामान्य नाममंत्राचा मानसिक जप करता येतो. मूलबंध छानपैकी साधायला लागला की शक्तीचा स्पंद मुलाधारापासून ते थेट सहस्रार चक्रापर्यन्त जाणवायला लागतो. अजपा योगाच्या दृष्टीने मूलाधार चक्र संतुलित असणे महत्वाचे आहे कारण येथेच परावाणीचा उद्भव होत असतो. मूलबंध ब्रह्मग्रंथीचे भेदन करण्यासाठी अत्यंत सहाय्यक आहे कारण मूलाधार चक्राचा संबंध भोगवाद, जडत्व, आळस, तमोगुण इत्यादींशी सुद्धा आहे.

तिसरी मुद्रा आहे उड्डियान बंध. हा नाभीस्थानी लावला जातो. डायफ्रेम ते ओटीपोट या क्षेत्रात यांचा दाब आणि प्रभाव जाणवतो. शरीराच्या ह्या भागात माणिपूर चक्र आणि जठराग्नि यांचे आधिपत्य असते. मूलाधार चक्रात वास करत असणारी कुंडलिनी मूलबंध लावून ऊर्ध्वगामी केली जाते. त्या शक्तीला सुषुम्ना नाडीतून अजून वर ढकलण्यासाठी उड्डियान बंधाची चांगली मदत होते. उड्डियान जरी एक स्वतंत्र मुद्रा गणली जात असली तरी मूलबंध लावल्यावरच तिची उपयोगिता वृद्धिंगत होते. योगग्रंथांत असे वर्णन आढळते की सिंह ज्याप्रमाणे हत्तीला मारण्यास सक्षम असतो त्याप्रमाणे उड्डियान बंध हा जरा-मृत्यूचा नाश करण्यास समर्थ असतो. उड्डियान हे माणिपूर चक्राचे क्षेत्र आहे आणि माणिपूर चक्राची देवता आहे भगवान विष्णु. श्रीहरी विष्णु हा जगताचे पालन-पोषण करणारी देवता आहे हे प्रसिद्धच आहे. त्यामुळे या मुद्रेमुळे शरीरस्थ विष्णु प्रसन्न होतो असा मतितार्थ आहे. सुषुम्ना मार्गात तीन महत्वाच्या ग्रंथी आहेत -- ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी आणि रुद्रग्रंथी. या ग्रंथीच्या स्थानांत जरी ग्रंथा-ग्रंथांत अल्पसा भेद असला तरी उड्डियान बंध एकूणच ग्रंथीभेदनाच्या कामी अत्यंत उपयोगी आहे. उड्डियान करत असतांना कुंभक स्वाभाविकपणे लागतो. ही मुद्रा करत असतांना तुम्ही माणिपूर चक्राचे ध्यान, माणिपूर चक्राच्या बीजमंत्राचा जप किंवा विष्णु मंत्राचा जप तुमच्या आवडीनुसार करू शकता.

चौथी मुद्रा आहे जालंधर बंध. ही मुद्रा दोन प्रकारे लावता येते. पहिल्या प्रकारात डोके खाली झुकवून हनुवटी गळ्याच्या खड्ड्यात घट्ट रोवली जाते. दुसऱ्या प्रकारात हनुवटी खाली न रोवता फक्त कंठसंकोच केला जातो. या दोन प्रकारातील पहिला प्रकार अधिक लोकप्रिय आहे कारण त्याने दाबस्थिति सहज प्राप्त होते. दूसरा प्रकार हा बंध लावून काही ध्यानात्मक क्रिया करायची असेल तर अधिक उपयोगी आहे. गोरक्ष शतकात गोरक्षनाथांनी जो विधी त्रोटक स्वरूपात वर्णन केला आहे तो दुसऱ्या प्रकाराशी मिळताजुळता आहे. जालंधर बंधाचे कार्य आणि उपयोगिता समजून घेण्यासाठी तुम्हाला योगशास्त्रातील "अमृत" ही संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. खरंतर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक वेगळा लेखच लिहायला हवा परंतु विस्तार भयास्तव येथे अगदी थोडक्यात ती संकल्पना सांगतो. योगमतानुसार सहस्रार चक्रात सोळा कलांनी युक्त असा चंद्र विद्यमान आहे आणि माणिपूर चक्रात बारा कलांनी युक्त असा सूर्य विद्यमान आहे. सहस्रारातील हा चंद्र एका योगीगम्य अमृताचा वर्षाव निरंतर करत असतो. हे अमृत जोवर आहे तोवर देह जीवंत रहातो. सामान्यतः हे चंद्रामृत सहस्रार चक्रातून पाझरल्यावर माणिपूर चक्रातील सूर्यामध्ये पडते. परिणामी या अमृताचा नाश होतो. देहाला जरा-मृत्यू प्राप्त होतो. योगमतानुसार हा अमृताचा ह्रास कमी करणे शक्य आहे. त्यासाठी अनेक योगक्रिया प्राचीन योगग्रंथांत दिलेल्या आहेत. त्यांतील एक म्हणजे जालंधर बंध. आता तुम्हाला जालंधर बंधाची उपयोगिता आणि महत्व कळू शकेल. जालंधर बंध विशुद्धी चक्राशी संबंधित आहे. त्यामुळे या बंधाने विशुद्धी चक्राचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

गोरक्ष शतकातील पाचवी मुद्रा आहे नभोमुद्रा किंवा खेचरी मुद्रा. गोरक्षनाथांनी नभोमुद्रा आणि खेचरी मुद्रा हे शब्द समानार्थी वापरले आहेत. या दोन्ही शब्दांनी निर्देशित केलेली मुद्रा एकच आहे. घेरंड संहितेत मात्र घेरंड मुनींनी नभोमुद्रा आणि खेचरीमुद्रा या दोन भिन्न मुद्रा म्हणून गणल्या आहेत. खरंतर साधकाचा नभोमुद्रेचा अभ्यास हळूहळू विकसित होत जेंव्हा पूर्णवस्थेला जातो तेंव्हा ती खेचरीची स्थितीच असते. त्यामुळे नभोमुद्रा ही एका अर्थी "बेबी खेचरी" असते. खेचरी मुद्रे विषयी योगग्रंथांत अनेकानेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. खेचरी मुद्रेचे महात्म्य अवर्णनीय असेच आहे. मी माझे खेचरी मुद्रे विषयीचे अनुभव आणि एकूणच खेचरी विषयीची माहिती अन्य लेखांत दिली आहे त्यामुळे येथे पुन्हा त्यांविषयी काही सांगत नाही. खेचरी विद्येचे तीन भाग आहेत -- खेचरी मुद्रा, खेचरी मंत्र आणि खेचरी अवस्था. या तीन पैकी फक्त खेचरी मुद्रेचा उल्लेखच गोरक्ष नाथांनी येथे केलेला आहे. अन्य दोन भाग अत्यंत गोपनीय स्वरूपाचे आहेत. खेचरी मुद्रेचा जो हठयोग प्रणालीतील अभ्यास आहे त्यामध्ये जिभेची लांबी वाढविली जाते. याला "लंबिका योग" असे म्हणतात. त्यासाठी जिभेचे विशिष्ठ प्रकारे छेदन, चालन आणि दोहन आवश्यक मानले आहे. ही क्रिया सर्वसामान्य साधकाच्या दृष्टीने अतिशय क्लिष्ट आणि धोकादायक ठरू शकते. सर्वसाधारण योगसाधकाने लंबिका योगाच्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर आहे. वरील अभ्यासाने लांब झालेली जीभ विपरीत दिशेने कपाल कुहरात घुसविली जाते, दृष्टी भ्रूमध्यावर एकाग्र केली जाते आणि सहस्रारातील अमृताचे पान केले जाते. सुरवातीला आंबट, तुरट, खारट अशी चव लागते पण नंतर ती अमृतमय होत जाते. ही अवस्था सर्वसाधारणच नव्हे तर प्रगत साधकासाठी सुद्धा दुर्लभ आहे. योगग्रंथ असे सांगतात की जन्मजन्मीचे सुकृत असेल तरच खेचरी मुद्रा साधली जाते. खेचरी विद्येचा जो मंत्र आहे त्याला म्हणतात "मेलन मंत्र". हा मेलन मंत्र भिन्न-भिन्न ग्रंथांत वेगवेगळया स्वरूपात दिलेला आहे. खेचरी मुद्रा आणि खेचरी मेलन मंत्र यांच्या सहाय्याने खेचरी अवस्था प्राप्त केली जाते. या अवस्थेत अनेक अद्भुत अनुभव येत असतात. जड समाधी सुद्धा घटित होऊ लागते. या सर्व गोष्टी खरंतर एका वेगळ्या लेखमालेचा विषय ठरावा. विषयांतर टाळण्यासाठी सध्या येथेच थांबूया.

गोरक्ष शतकावरील या लेखमालेत उच्च कोटीच्या मुद्राभ्यासा विषयी काही गोष्टी सांगण्याचा अल्पसा यत्न मी केला आहे. योगशास्त्रात मुद्राभ्यासाला महत्वाचे स्थान आहे. मूलतः भगवान शंकराने कथन केलेला हा मुद्रिका योग अवधूत दत्तात्रेय, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, संत ज्ञानेश्वर आणि अन्य अनेक सिद्धयोग्यानी अंगिकारलेला आहे आणि वेळोवेळी कथनही केलेला आहे. मुद्राभ्यासाचा एक मोठा फायदा म्हणजे तुमच्या योगसाधनेला घटावस्था फार शीघ्र गतीने येते. येथे एक लक्षात घ्यायला हवे की सर्वसामान्य पूजा-पाठ आणि योगमार्ग यांत जमीन-आस्मानाचे अंतर आहे. एवढेच कशाला आरोग्यासाठी योग आणि अध्यात्मासाठी योग यांत सुद्धा बरेच अंतर आहे. सामान्य जीवनात आपण बघतो की कोणाला क्रिकेट, फुटबॉल सारखे मैदानी खेळ आवडतात. कोणाला बुद्धिबळ, कॅरम सारखे बैठे खेळ आवडतात. तर कोणाला रेसिंग, गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग यांसारखे साहसी खेळ आवडतात. अमुक एक खेळ चांगला आणि बाकीचे खेळ वाईट असे आपण म्हणू शकत नाही. जो-तो आपापल्या आवडीनुसार कोणता खेळ खेळायचा ते ठरवत असतो. हाच प्रकार अध्यात्मात सुद्धा लागू पडतो. कोणाला भोळी-भाबडी भक्ति आवडते. कोणाला जप, नामस्मरण, स्तोत्रपाठ, लीलाग्रंथ आवडतात. कोणाला निखळ ज्ञानमार्ग श्रेयस्कर वाटतो. तर कोणाला अष्टांगयोग प्रिय वाटतो. ज्याने त्याने आपापली आवड आणि पात्रता ओळखून आपला मार्ग निवडावा हे उत्तम.

असो.

संत ज्ञानेश्वरांनी शंभू जती गोरक्षनाथांना "विषय विध्वंसक वीरू" असे गौरवलेले आहे. भगवान शंकराच्या योगमार्गाचा प्रसार आणि प्रचार करण्यात सिंहाचा वाटा असलेले सिद्ध श्रीगोरक्षनाथ महाराज सर्व अजपा योग साधकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 09 December 2024