Advanced Ajapa Dhyana Yoga : Tap the power of breath, mantra, mudra, and meditation for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र -- एक विलक्षण अनुभव

मागील लेखात आपण श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ कसा करावा ते जाणून घेतले. आजच्या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर या छोटेखानी लेखमालेचा शेवटचा भाग प्रस्तुत करत आहे.

आपल्या आराध्य दैवतेची उपासना कशा प्रकारे करावी हा भक्त आणि भगवंत यांचा आपापसातील विषय आहे. सगळेजण एकाच उपासना पद्धतीचा अवलंब करतील असे नाही. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळी माझ्या साधकदशेत होतो. महादेवाकडून शक्तिपात आणि दीक्षा मिळाल्या नंतरच्या साधनेचा सुरवातीचा काळ होता. अनेक नवीन गोष्टी घडत होत्या आणि त्यातूनच अनेक नवीन गोष्टी शिकत होतो. त्या वेळी इंटरनेटवर काही वाचून किंवा पाहून त्याप्रमाणे शिवोपासना केली अशी स्थिती नव्हती. पूजापाठाच्या दुकानांत उपलब्ध असलेली शिवोपासने संबंधीची पुस्तके हाच शिवोपासनेची माहिती मिळवण्याचा मुख्य मार्ग होता.

मी जेंव्हा त्या पुस्तकांतील माहिती वाचत असे तेंव्हा मला खूप गंमत वाटत असे. शिवलिंग अमुक प्रकारे ठेवा, तमुक प्रकारे पूजनासाठी बसा, अभिषेक असा-असा करा, भस्म असे लावा, रुद्राक्ष असे धारण करा, अमका मंत्र म्हणत फुले अर्पण करा, तमका मंत्र म्हणत नैवेद्य दाखवा अशी पारंपारिक माहिती त्या पुस्तकांत भरलेली असायची. मला यांतील काहीही येत नव्हते आणि या असल्या गोष्टी शिकाव्यात अशी इच्छा सुद्धा होत नव्हती. मी आपला माझ्या मनात येईल त्याप्रमाणे ओबडधोबड पद्धतीने शिवोपासना करत असे. महादेव बाबा आणि गौरा माईनी सुद्धा माझ्याकडून पारंपरिक कर्मकांडात्मक उपासनेची अपेक्षा कधी केली नाही. महादेव बाबा तर नेहमी सांगायचे की -- तू योगी आहेस. माझी उपासना मी तुला दिलेल्या साधनेनीच करत जा. बाकीच्या गोष्टींत उगाच वेळ घालवू नकोस. महादेव बाबांचे म्हणणे मी अर्थातच तंतोतंत पाळत असे. जेंव्हा कधी त्यांचे गुणगान करावे अशी इच्छा मनात येई तेंव्हा काही निवडक स्तोत्रांचा उपयोग मी करत असे. माझ्या आवडीच्या त्या निवडक स्तोत्रांपैकी एक म्हणजे श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र. हे स्तोत्र माझ्या आवडीचे असण्यामागे एक अजूनही कारण आहे -- या स्तोत्राच्या उपासने दरम्यान आलेला एक विलक्षण अनुभव.

श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र जेंव्हा पठण करायला सुरवात केली तेंव्हा सुरवातीला विविध पाठभेद / स्वरूपे करून पाहिली आणि त्यातील एकाची निवड केली. महादेव बाबांनी फक्त मूलपाठ आरंभी प्रणव लावून आणि अजून काही बीजमंत्रांचे संपुट लावून करायला सांगितला. आदी प्रणव लावायची सुचना मी तुम्हालाही सांगितली आहे पण हे बीजमंत्रांचे संपुटीकरण काय होते ते काही येथे प्रकट करता येणार नाही. त्या प्रमाणे पठणाचा अभ्यास सुरू केला. या स्तोत्राची आवड वाढत गेली आणि मग श्रीशिवसहस्रनाम नित्य उपासनेचे एक अविभाज्य अंग बनून गेले. एक दिवस महादेव बाबांनी सांगितले की आता हे पोथी वाचन पुष्कळ झाले आता ध्यानात पठण कर. ध्यानात पठण करण्यासाठी हे स्तोत्र तोंडपाठ असणे आवश्यक होते. त्यामुळे स्तोत्र पाठ करायला सुरवात केली. हे स्तोत्र मोठे आहे. मूलपाठाचेच शंभर-सव्वाशे श्लोक आहेत. उत्साहाच्या भरात सुरवातीचे पंधरा-वीस श्लोक पटकन पाठ झाले परंतु नंतर या पाठांतराचा कंटाळा येऊ लागला. शेवटी महादेव बाबांना सांगितले की हे स्तोत्र काही माझ्याच्याने पाठ होणार नाही त्यामुळे ध्यानस्थ होऊन त्याचा पाठ करणे काही शक्य होणार नाही. महादेव बाबा यावर काही बोलले नाहीत.

पुढे काही दिवसांनी रात्री झोपेमध्ये एक विचित्र स्वप्न पडले. मी एका हिमाच्छादित पर्वतावर निसर्गसौन्दर्य न्याहाळत बसलो होतो. तेवढ्यात अत्यंत श्वेत वस्त्र परिधान केलेली एक स्त्री अचानक अवतीर्ण झाली. तिने पूर्ण शरीर आच्छादले जाईल अशी शुभ्र वस्त्र परिधान केली होती. मोजकेच पण अत्यंत लखलखीत सुवर्ण आणि मोत्याचे अलंकार तिने घातले होते. त्या स्त्रीच्या हातात एक पात्र होते आणि त्या पात्रात एक लेखणी सदृश्य गोष्ट ठेवलेली होती. आपण जेंव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला पहिल्यांदा पाहतो तेंव्हा त्याची काहीतरी गोष्ट आपल्या मनावर अधिक ठसली जाते. कुणाचा चेहरा, कुणाचा पोशाख, कुणाची उंची, कुणाची जाडी तर कुणाची अन्य काही शारीरिक लकब. या स्त्रीला पाहिल्यावर पहिली गोष्ट मनात भरत होती ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील सात्विकता. कोणाचेही हात आपोआप जोडले जावेत अशी सात्विकता. तिची ही सात्विकता तिच्या मुखावरच नाही तर सर्व देहातून जणू ओसंडून वहात होती.

मी काही बोलणार एवढ्यात तिने खुणेने मला काही न बोलण्याची सूचना केली आणि माझ्या हाताला अलगद धरून मला जवळच्याच एका शिलेवर बसवले. मी बसताच खुणेनेच मला तोंड उघडायला सांगितले. मी तोंड उघडताच ती तिच्या हातातील पात्रात जो काही पदार्थ होता त्यात ती लेखणी बुडवून माझ्या जिभेवर काहीतरी लिहू लागली. ती नक्की काय लिहीत होती त्याचा काही अंदाज येत नव्हता. ज्या द्रवात लेखणी बुडवून ती लिहीत होती तो मधासारखा काहीतरी गोडसर पदार्थ होता. तो नक्की मधच होता की अजून काही ते कळत नव्हतं. बराच वेळ ती स्त्री माझ्या जिभेवर काहीतरी लिहीत होती. मी स्तब्धपणे बसून होतो. शेवटी त्या स्त्रीचे लेखन पूर्ण झाले. तिने मातेच्या ममतेने माझ्या गालावरून हात फिरवत मला तोंड मिटण्याची खूण केली. तोंड मिटताच त्या "मधाची" चव जरा अधिक प्रखरपणे तोंडात जाणवली. माझे लक्ष क्षणभर त्या चवीकडे गेले असेल तेवढ्यात आकस्मिकपणे ती स्त्री अदृश्य झाली. मी तिला बोलावण्यासाठी, जोराने हाक मारण्यासाठी तोंड उघडले आणि त्या धक्क्याने मला जाग आली.

ब्रह्ममुहूर्ताला अजून वेळ होता. हे स्वप्न एवढे विचित्र होते की विचाराने पटकन झोप येईना. काय करावे असा विचार करत असतांना मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. मला श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र मुखोद्गत झाले होते. मी करत असलेला संपूर्ण पाठ अचूकपणे माझ्या मनात, माझ्या जिभेवर रेंगाळत होता. काही तासांपूर्वी पर्यन्त मला हे स्तोत्र पाठ नव्हते आणि आता या स्वप्नानंतर ते अचानक तोंडपाठ झाले होते. आत्ताच पडलेल्या त्या स्वप्नाचा आणि स्तोत्र आपोआप पाठ होण्याचा काहीतरी संबंध होता एवढे नक्की.

दुसऱ्या दिवशी मी महादेव बाबांना झाली घटना सांगितली. त्यावर ते हसून म्हणाले -- "हो. मीच शारदेला सांगितलं होतं तुझ्या जिव्हेवर लिहायला. आता झालं ना पाठ?" बापरे! म्हणजे ती स्त्री म्हणजे शारदा, सरस्वती होती. मला प्रचंड हळहळ वाटली. मला तिचे पाय धरण्याची तरी संधी मिळायला हवी होती. अर्थात पुढे मला ती मिळाली ती गोष्ट वेगळी. पुन्हा कधीतरी त्या विषयी सांगीन. आत्ता विषयांतर नको. गुरु आपल्या शिष्यासाठी, भगवंत आपल्या भक्तासाठी, बाप आपल्या मुलासाठी काय काय करतो ते बघा. मला स्तोत्र पाठ होत नाही म्हणून महादेव बाबांनी ते अशा प्रकारे माझ्यात जणू "ओतले". त्या दिवसा नंतर मी स्तोत्राचा वैखरी आणि उपांशू पाठ थांबवला. ध्यानस्थ बसून मनातल्या मनात त्या स्तोत्राचा पाठ करू लागलो. ते स्तोत्र आता स्तोत्र न रहाता जणू मंत्र बनलं होतं.

बराच काळ लोटला. ध्यानातील सहस्रनाम आता चांगलेच तल्लीनतेने होत होते. एके दिवशी हा ध्यानाभ्यास करत असतांना एवढे गाढ ध्यान लागले की मनातील पाठ सुद्धा जणू थांबला आणि परा वाणीतील पाठ सुरू झाला. ध्यानाच्या त्या प्रगाढ अवस्थेत मला असे स्पष्ट दिसले की माझ्या सहस्रार चक्राच्या हजार पाकळ्यांवर शिवसहस्रनामातील एकेक नाम जणू स्पंदाच्या रूपाने अंकित झाले होते. उरलेली आठ नामे अष्टमातृकांच्या रूपात सहस्रार कमलाच्या कर्णिके मध्ये विराजमान झाली होती. सहस्रदल पद्माच्या मध्यभागी महादेव बाबा आणि गौरा माई विराजमान झाले होते. तिन्ही वाणी खुंटून चौथीने पाठ सुरू होता. मातृका शिवनाम गात होत्या. त्यांचा झंकार चक्राचक्रात, नाडीनाडीत, गात्रागात्रात, रोमारोमात पोहोचत होता. किती वेळ या अवस्थेत होतो माहीत नाही. भानावर आलो तेंव्हा घामानी आणि आनंदाश्रूनी शरीर भिजले होते. शरीराला हलकासा कंप सुटला होता. अष्टसात्विक भाव ओथंबून वहात होते.

साधक जेंव्हा एखादे स्तोत्र साधना / उपासना म्हणून करतो तेंव्हा त्या स्तोत्राच्या किंवा मंत्राच्या फलश्रुतीकडे त्याचे लक्ष असते. स्तोत्राच्या पाठात दिलेली फलश्रुती ही केवळ एक संकेत असतो त्या स्तोत्राच्या उर्जेकडे आणि सामर्थ्याकडे. स्तोत्राचे फायदे जे दिलेत त्यापेक्षा खूप भिन्न आणि उच्च कोटीचे असू शकतात. श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र सुद्धा असेच एक स्तोत्र आहे. त्याचे फायदे हे काही भौतिक गोष्टींत मोजता येण्यासारखे नाहीत. स्तोत्राचा सर्वात मोठा फायदा ईश्वरभक्ती, ईश्वरप्राप्ती हा आहे. वास्तविक पहाता परमेश्वराचे एकच नाम त्याच्याकडे निर्देश करण्यासाठी पुरेसे असते. एखाद्या चित्रकाराला आपल्या चित्रात अनेकानेक रंगांची उधळण करावी अशी इच्छा होते. एखाद्या गायकाला निरनिराळे राग आणि आलाप वापरुन आपली कला सादर करावीशी वाटते. त्याचप्रमाणे भक्ताला आपल्या भगवंताचे गुणविशेष वेगवेगळ्या नामांतून व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नामांमधून तो एकाच ईश्वराकडे संकेत करत असतो. परमेश्वर सुद्धा आपल्या भक्ताची ही आवड ओळखून त्याला प्रेरित करतो, प्रोत्साहित करतो.

माघी पौर्णिमेच्या साधारण दोन दिवस आधी सोमप्रदोष होता. त्या दिवशी गौरा माईने सांगितले की या महाशिवरात्रीसाठी श्रीशिवसहस्रनामावर काहीतरी लिहावे. गौरा माईची इच्छा म्हणजे आज्ञा. त्यामुळे माघी पौर्णिमेला या छोटेखानी लेखमालेचा पहिला भाग प्रकाशित केला. माघी पौर्णिमेला सुरू केलेली ही पाच लेखांची मालिका आज महाशिवरात्रीच्या पावन समयी पूर्ण करून महादेव बाबा आणि गौरा माई यांच्या चरणी अर्पण करत आहे. तुम्हा वाचकांना सुद्धा ती आवडली असेल अशी आशा आहे.

असो.

महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर वाणी आणि वर्णमाला यांचा स्वामी असलेला सांब सदाशिव ब्रह्मरंध्रात प्राणशक्तीच्या साक्षीने "जागरण" करणाऱ्या योग साधकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भगवान शिव प्रणीत योग विद्येचे आणि अजपा गायत्रीचे उपासक आणि मार्गदर्शक आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 26 February 2025