श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र -- पाठ कसा करावा
मागील लेखात आपण श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राची फलश्रुती विस्ताराने जाणून घेतली. जर तुम्हाला या स्तोत्राची उपासना करावीशी वाटत असेल तर मग पुढची पायरी म्हणजे या स्तोत्राचा पाठ कसा करावा त्याची नीट माहिती करून घेणे. या लेखात नवीन साधकांसाठी या स्तोत्राच्या पठणाचा एक विधी प्रस्तुत करत आहे.
श्रीशिवसहस्रनाम दोन प्रकारांत उपलब्ध आहे. पहिला प्रकार म्हणजे स्तोत्र आणि दूसरा प्रकार म्हणजे नामावली. खरं म्हणजे स्तोत्र हे सर्वात जास्त प्रभावी आणि फलदायी आहे परंतु तुम्हाला जर संस्कृत वाचायची बिलकुल सवय नसेल तर कदाचित स्तोत्र पठण तुम्हाला अवघड वाटू शकते. अशांसाठी दूसरा सोपा पर्याय म्हणजे नामावलीचे पठण करणे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की स्तोत्र आणि नामावलीत काय फरक आहे?
श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र हे श्लोकांनी बनलेले आहे. प्रत्येक श्लोकात शिवनामे गुंफलेली आहेत. नामावलीत श्लोकातील एक-एक नाम घेऊन त्याच्या आदी प्रणव आणि अंती नमः पद जोडलेले आहे. एक उदाहरण देतो म्हणजे नीट कळेल. श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रातील पहिला नामात्मक श्लोक खालील प्रमाणे आहे --
स्थिरः स्थाणुः प्रभुर्भीमः प्रवरो वरदो वरः ।
सर्वात्मा सर्वविख्यातः सर्वः सर्वकरो भवः ॥
हा झाला श्लोक. हाच श्लोक नामावली स्वरूपात खालील प्रकारे रूपांतरित केला जातो --
ॐ स्थिराय नमः ।
ॐ स्थाणवे नमः ।
ॐ प्रभवे नमः ।
ॐ भीमाय नमः ।
ॐ प्रवराय नमः ।
ॐ वरदाय नमः ।
ॐ वराय नमः ।
ॐ सर्वात्मने नमः ।
ॐ सर्वविख्याताय नमः ।
ॐ सर्वस्मै नमः ।
ॐ सर्वकराय नमः ।
ॐ भवाय नमः ।
ज्यांना संस्कृत श्लोक कठीण वाटतील त्यांना नामावलीच्या रूपाने सुमभ पर्याय उपलब्ध आहे. पूजा-पाठाची पुस्तके विकणाऱ्या दुकानांत स्तोत्र आणि नामावली अशी दोन्ही स्वरूपे एकत्रित अथवा वेगवेगळी उपलब्ध असतात. गीताप्रेस, गोरखपूर तर्फे प्रकाशित केलेल्या महाभारतातील श्रीशिवसहस्रनामाच्या पोथीत स्तोत्र आणि नामावली असे दोन्ही प्रकार एकत्रच दिलेले आहेत.
तुमच्या सोयीनुसार प्रथम हे ठरवा की तुम्हाला स्तोत्र पाठ करायचा आहे की नामावली पाठ करायचा आहे. नामावलीचा पाठ करण्यासाठी सरळ नामवलीतील एक-एक नाममंत्र म्हणायचा आणि पहिल्या नामामंत्रा पासून ते एक हजार आठाव्या नामामंत्रा पर्यन्त म्हणत जायचे. श्लोकांचा पाठ करणारे भक्त साधारणतः पोथीत छापलेला पहिल्या श्लोकापासून म्हणायला सुरवात करतात ते थेट शेवटच्या श्लोकापर्यंत. असे करायला जरी काही हरकत नसली तरी या प्रकारच्या पठणात अनेक असे श्लोक येतात जे अवांतर असतात. त्यांचा सहस्रनामाच्या मूल पाठाशी संबंध नसतो. पूर्व-पीठिका, उत्तर-पीठिका, फलश्रुती वगैरे गोष्टींचे हे श्लोक असतात. जर तुम्हाला तुमचा पाठ आटोपशीर आणि आवश्यक आहे तेवढाच ठेवायचा असेल तर प्रथम मूल पाठाचा पहिला श्लोक आणि अंतिम श्लोक शोधून काढा.
उदाहरणा दाखल मी गीता प्रेस, गोरखपुर यांच्या महाभारतातील श्रीशिवसहस्रनामाचा पाठ येथे प्रमाण मानला आहे. त्यांच्या पोथीतील पहिला श्लोक असा आहे --
वासुदेव उवाच -
ततः स प्रयतो भूत्वा मम तात युधिष्ठिर ।
प्राञ्जलिः प्राह विप्रर्षिर्नामसङ्ग्रहमादितः ॥१॥
...
...
अष्टोत्तरसहस्रं तु नाम्नां शर्वस्य मे शृणु ।
यच्छ्रुत्वा मनुजव्याघ्र सर्वान्कामानवाप्स्यसि ॥३०॥
वरील पहिल्या श्लोकांपासून ते थेट तीसाव्या श्लोकापर्यंत स्तोत्राचा पूर्व भाग आहे. यात श्रीकृष्णाची उपमन्यु ऋषीना विनंती आणि त्यांचे त्यावर कथन आलेले आहे. हा भाग शिवसहस्रनामाच्या मूल पाठात येत नाही आणि त्यामुळे पठण केला नाही तरी चालते. एकतीसाव्या श्लोकांपासून सहस्रनामाचा मूल पाठ सुरू होतो --
स्थिरः स्थाणुः प्रभुर्भीमः प्रवरो वरदो वरः ।
सर्वात्मा सर्वविख्यातः सर्वः सर्वकरो भवः ॥३१॥
वरील श्लोकाला प्रणव जोडलेला नाही. मला माझ्या श्रीगुरुमंडलाने प्रणव जोडण्यास सांगितले आहे त्यामुळे मी तुम्हाला या प्रथम श्लोकाच्या आरंभी प्रणव जोडावा असे सांगीन. तुम्ही तुमच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार प्रणव जोडायचा अथवा नाही ते ठरवावे. प्रणव जोडल्यावर वरील श्लोकाचे स्वरूप असे होईल --
ॐ स्थिरः स्थाणुः प्रभुर्भीमः प्रवरो वरदो वरः ।
सर्वात्मा सर्वविख्यातः सर्वः सर्वकरो भवः ॥३१॥
वरील श्लोका पासून सुरू करून ते थेट एकशे त्रेपन्नाव्या श्लोकापर्यंत स्तोत्राचा मूल पाठ आहे. त्यामुळे शेवटचा श्लोक असेल --
व्रताधिपः परं ब्रह्म भक्तानां परमा गतिः ।
विमुक्तो मुक्ततेजाश्च श्रीमान्श्रीवर्धनो जगत् ॥१५३॥
या पुढील श्लोक (क्रमांक एकशे चौपन्न ते एकशे ब्याऐंशी) हे उत्तर भाग आणि फलश्रुतीचे आहेत. त्यांचा पाठ नाही केला तरी चालतो. थोडक्यात सांगायचे तर श्लोक क्रमांक एकतीस ते श्लोक क्रमांक एकशे त्रेपन्न पर्यन्त या स्तोत्राचा मूल पाठ आहे. या एवढ्याच श्लोकांचा पाठ केला तरी चालतो. जर तुम्हाला वेळ असेल तर मग अथ पासून इति पर्यन्त सर्व पाठ तुम्ही करू शकता. बहुतेकांना असलेली वेळेची अडचण लक्षात घेऊन येथे मी वरील मूल पाठाचा प्रकार सांगितला आहे. तुम्हाला जर अजून काही वेगळा गुरूपदेश असेल तर अर्थातच तुम्ही त्या प्रमाणे पठण करावे.
वरील प्रमाणे श्रीशिवसहस्रनामाच्या स्तोत्राचा एक पाठ करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो त्या नुसार एका वेळी किती पाठ करायचे ते तुम्ही ठरवू शकता. काही जणांना सुरवातीला एक पाठ करण्यासाठी अर्था तास ते पाऊण तास सुद्धा लागू शकतो. नित्यनेमाने सराव केलात तर केवळ पंधरा-वीस मिनिटांत तुम्ही एक पाठ पूर्ण करू शकाल. एकदा का पाठ करण्याची सवय लागली की मग आनंदही येऊ लागतो. आवडीनुसार आणि सवडीनुसार दिवसातून एक वेळा, सकाळ-संध्याकाळ अथवा त्रिकाल पाठ तुम्ही करू शकता. एकदा का सराव झाला की मग श्रीशिवसहस्रनामाची एकशे आठ, एक हजार आठ अशा संख्येने लघु अनुष्ठाने सुद्धा करता येतात. अर्थात कोणतीही घाई गडबड नको. सावकाश, हळूहळू सराव करावा आणि एक दिवस पाठावर प्रभुत्व मिळवावे.
मंत्र जपाचे जसे वाचिक, उपांशू आणि मानसिक असे प्रकार आहेत तसेच श्रीशिवसहस्रनामाच्या पाठणाचेही प्रकार आहेत. सुरवातीला वैखरी वाणीने वाचिक पठण तुम्ही करू शकता जेणेकडून उच्चार आणि नामांची स्पष्टता मनामध्ये बिंबेल. त्यानंतर उपांशू म्हणजे तोंडांतल्या तोंडात पुटपुटल्यासारखे पठण तुम्ही करू शकता. अजून पुढच्या अवस्थेत या स्तोत्राचे मानसिक पठण करत तुम्ही ध्यानस्थ होऊ शकता. अर्थात ही जरा प्रगत स्थिती आहे. अनेक वर्षांचा काळ त्यासाठी लागू शकतो. सर्वसामान्य साधकांसाठी वाचिक आणि उपांशू पद्धतीने पठण करणेच श्रेयस्कर आहे. त्यातूनच बरेचसे फायदे मिळवता येतात.
आतापर्यंत सांगितलेला पाठाचा विधी हा दैनंदिन पाठासाठीचा विधी आहे. काही नैमित्तिक कारणाने पाठ करायचा असल्यास वरील पाठ विधीला अधीक विस्तृत करता येते. उदाहरणार्थ, महाशिवरात्र, श्रावण, नवरात्र इत्यादी कालखंडात करण्याचा नैमित्तिक पाठ खालील प्रकारे करता येईल --
शक्य असल्यास प्रथम यथाशक्ती शिवपूजन करावे अथवा शिवमंदिरात दर्शन घेऊन यावे. त्यानंतर श्रीगुरुमंडलाच्या सुलभ उपासनेत दिलेल्या तीनही मंत्राच्या एक-एक माळ जप करावा. वेळेची कमतरता असल्यास पहिल्या आणि दुसऱ्या मंत्राचा किमान एकवीस वेळा जप करावा. शिव मंत्राचा मात्र एक माळ जप अवश्य करावा. शिव मंत्राचा जप केल्यावर श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचे एक, तीन, पाच अथवा जेवढ्या संखेये ठरवले असतील तेवढ्या संख्येने पाठ करावेत. त्या नंतर पुन्हा शिव मंत्राचा एक माळ जप करावा. त्या नंतर पाच मिनिटे तरी अजपा जप करावा. काही काळ मौन धारण करून बसावे आणि त्या नंतर आसनावरून उठावे.
जर तुमच्या घरी शिवलिंग असेल अथवा शिवमंदिरात जाणे तुम्हाला सहज शक्य असेल तर तुम्ही श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राच्या अथवा नामावलीच्या सहाय्याने शिवलिंगार्चन सुद्धा करू शकता. त्यासाठी एका तबकात भरपूर फुले अथवा फुलाच्या पाकळ्या अथवा बिल्वपत्रे घ्यावीत. जर तुम्ही श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ करत असाल तर प्रत्येक श्लोक म्हणून झाल्यावर शिवलिंगावर पुष्प / पाकळ्या / बिल्वपत्र अर्पण करावे. जर तुम्ही श्रीशिवसहस्रनाम नामावलीचा पाठ करत असाल तर प्रत्येक नाममंत्र म्हणून झाल्यावर शिवलिंगावर पुष्प / पाकळ्या / बिल्वपत्र अर्पण करावे. वरील विधी तुम्ही भस्म, चंदन वगैरे गोष्टींनी सुद्धा करू शकता. याच प्रकारे पळीने जल / जल / पंचामृत अर्पण करत अभिषेक सुद्धा करता येतो.
असो.
स्वर्गातील देवी-देवता सुद्धा ज्याच्या नामस्मरणाने धन्य होतात तो शंभू महादेव सर्व अजपा योग साधकांची शिवनामातील गोडी वृद्धिंगत करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.