अजपा योग क्रिया आणि ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

अजपा योगाचा रोडमॅप

नुकतीच श्रीगुरुपौर्णिमा होऊन गेली आहे. त्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच मार्गदर्शनपर गोष्टी वाचल्या, ऐकल्या, पाहिल्या असतील. कदाचित काही विशेष साधना सुद्धा केल्या असतील. त्यामुळे आज कोणतेही निरूपण किंवा क्लिष्ट श्लोक वगैरे घेत नाही.

श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या काही अजपा योगसाधकां बरोबर हितगुज करण्याच्या ओघात एक आकृती त्यांच्यासाठी काढली होती. तीच आज येथे देत आहे. या छोटेखानी आकृतीला मी "अजपा योगाचा रोडमॅप" असं म्हणतो. अजपा योगाचे सुरवात ते शेवट असे जवळजवळ सर्व महत्वाचे टप्पे त्यात दर्शवलेले आहेत.

योगमार्गावरील कोणतीही साधना प्रणाली हा एक सखोल अभ्यासाचा आणि प्रत्यक्ष आचरणाचा विषय असतो. केवळ वाचलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं अनुभववजा ज्ञान येथे उपयोगी पडत नाही. योगमार्गावरून वाटचाल करत असतांना महत्वाचे टप्पे आणि अवस्था स्मरणात असतील तर वाट चुकत नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या आजच्या झटपट युगात साधकाचे पाय जमिनीवर टेकलेले असणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने हा रोडमॅप नेहमी लक्षात ठेवा. आपण कोणत्या स्तरावर आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे त्याची नियमित चाचपणी आणि आत्मपरीक्षण करा.

बहुतेक साधकांसाठी आध्यात्मिक साधना मार्ग आणि त्यावरील प्रगती ही एक संथ आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. जन्मोजन्मीचे संस्कार आणि प्रारब्ध भोग यांतून वाट काढत त्याला वाटचाल करायची असते. प्रवासातील गंतव्य स्थानाएवढाच प्रवास आणि प्रवासाचा कालखंड देखील महत्वाचा असतो. हा प्रवास आनंदी आणि ज्ञानप्रदायक कसा होईल हे पहाण्यात साधकाचा खरा कस लागत असतो. प्रवास मधेच सोडून न देता किंवा मार्ग मधेच न बदलता नेटाने मार्गक्रमण करणे ज्याला जमते त्यालाच अध्यात्माचा गड सर करणे शक्य होते.

आज या आकृतीचे विशेष काही विवरण वगैरे करत बसत नाही. माझ्या लेखांमधून अनेकवेळा या गोष्टी आपण कमी-अधिक प्रमाणात जाणून घेतल्या आहेत. कधीतरी वेळ मिळेल तेंव्हा परत एकदा या सगळ्यांची एकत्रितपणे उजळणी करीन. आजच्या साठी फक्त हा रोडमॅप --

योगसाधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना वाटचालीसाठी प्रेरित करण्यासाठी "जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनी" असलेला भगवान शंकर सर्व अजपा योग साधकांना आपला कृपाप्रसाद प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 29 July 2024