श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र -- उपमन्यु ऋषींचे कथन

मागील लेखात आपण महाभारतातील श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राची पार्श्वभूमी जाणून घेतली. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला उपमन्यु ऋषींनी त्याला शिवनामाचा जो काही महिमा सांगितला तो सांगत आहे. श्रीशिवसहस्रनामाच्या छिपील पोथीत या श्लोकांचे भाषांतर सहसा असत नाही. त्यामुळे या लेखात मुद्दाम त्या श्लोकांपैकी काही निवडक महत्वाच्या श्लोकांचे धावते आणि सुलभ भाषांतर देत आहे. श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र उपासना करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना कदाचित भक्तीवर्धनासाठी याचा उपयोग होईल.

ब्रह्मप्रोक्तैरृषिप्रोक्तैर्वेदवेदाङ्गसम्भवैः ।
सर्वलोकेषु विख्यातं स्तुत्यं स्तोष्यामि नामभिः ॥

श्रीकृष्णा! मी महादेवाची स्तुति / प्रार्थना या नामांनी करतो जी ब्रहमदेव आणि ऋषी-मुनींनी सांगितली आहेत. जी वेदांत आणि वेदांगांत योजिली आहेत. जी सर्व लोकांत विख्यात आहेत.

महद्भिर्विहितैः सत्यैः सिद्धैः सर्वार्थसाधकैः ।
ऋषिणा तण्डिना भक्त्या कृतैर्वेदकृतात्मना ॥

महादेवांची ही नामे दिग्गजांनी सांगितली आहेत. ती सत्य आहेत. सिद्धि मिळवून देणारी आहेत. सर्वार्थ साधून देणारी आहेत. वेद ज्ञानात पारंगत असलेल्या तंडी नामक ऋषींनी ती भक्तिपूर्वक सांगितली आहेत.

यथोक्तैः साधुभिः ख्यातैर्मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ।
प्रवरं प्रथमं स्वर्ग्यं सर्वभूतहितं शुभम् ॥

जो सर्व साधू-ऋषि-मुनींद्वारे स्तवीत आहे, जो आदि आहे, जो स्वर्ग प्रदान करू शकतो त्या शंभू महादेवाची मी या नमांनी स्तुति करतो.

वरयैनं भवं देवं भक्तस्त्वं परमेश्वरम् ।
तेन ते श्रावयिष्यामि यत्तद्ब्रह्म सनातनम् ॥

हे श्रीकृष्णा! तू शिवशंकराचा भक्त आहेस. सर्व जगताचे मूल कारण असलेल्या आणि सर्व देवांचा देव असलेल्या महादेवांची तू या नामांनी भक्ति कर.

दश नामसहस्राणि यान्याह प्रपितामहः ।
तानि निर्मथ्य मनसा दध्नो घृतमिवोद्धृतम् ॥
गिरेः सारं यथा हेम पुष्पसारं यथा मधु ।
घृतात्सारं यथा मण्डस्तथैतत्सारमुद्धृतम् ॥

अनेकानेक शिवनामांमधून ही निवडक हजार नावे मी आता तुला सांगत आहे. ज्या प्रमाणे दहयामधून लोणी काढले जाते त्या प्रमाणे ही हजार नावे सारभूत आहेत. ज्या प्रमाणे खाणीतून सोने काढले जाते, फुलांमधून मध काढला जातो, लोण्या मधून तूप काढले जाते त्या प्रमाणे या नामांची काळजीपूर्वक निवड केलेली आहे.

सर्वपापापहमिदं चतुर्वेदसमन्वितम् ।
माङ्गल्यं पौष्टिकं चैव रक्षोघ्नं पावनं महत् ॥
प्रयत्नेनाधिगन्तव्यं धार्यं च प्रयतात्मना ॥

ही नामे पापनाशक आहेत. चारही वेदांचे ज्ञान यांत सामावलेले आहे. ती मंगल कारक, पौष्टिक, रक्षण करणारी आणि अति पवित्र आहेत. त्यांना प्रयत्नपूर्वक धारण कर / स्मरणात ठेव.

सर्वभूतात्मभूतस्य हरस्यामिततेजसः ।
अष्टोत्तरसहस्रं तु नाम्नां शर्वस्य मे श‍ृणु ।
यच्छ्रुत्वा मनुजव्याघ्र सर्वान्कामानवाप्स्यसि ॥

जो सर्व जीवांचा आत्मा आहे. जो हर आणि सर्व म्हणून प्रसिद्ध आहे. जो अति तेजस्वी आहे. अशा महादेवांची एक हजार आठ नामे तू आता श्रवण कर. ही नामे श्रवण केल्याने मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

अशा प्रकारे श्रीकृष्णाला सांगून उपमन्यु ऋषी श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ आरंभ करतात --

ॐ स्थिरः स्थाणुः प्रभुर्भीमः प्रवरो वरदो वरः ।
सर्वात्मा सर्वविख्यातः सर्वः सर्वकरो भवः ॥
...
...
व्रताधिपः परं ब्रह्म भक्तानां परमा गतिः ।
विमुक्तो मुक्ततेजाश्च श्रीमान्श्रीवर्धनो जगत् ॥

एक लक्षात घ्या की श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचा मुख्य भाग हा वरील दोन श्लोकांपैकी पहिल्या श्लोकाने सुरू होतो, त्या नंतर उर्वरित नामांचे श्लोक येतात आणि मग वरील दुसऱ्या श्लोकाने त्यांची सांगता होते. थोडक्यात सांगायचे तर "स्थिर" हे या स्तोत्रातील प्रथम शिवनाम असून "जगत" हे एक हजार आठवे शिवनाम आहे. या व्यतिरिक्त जे काही श्लोक आहेत ते पूर्व-भाग, ध्यान, मानस पूजा, उत्तर-भाग, फलश्रुति अशा अवांतर गोष्टींचे असतात.

श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राच्या उत्तर-भागात या स्तोत्राची फलश्रुति दिलेली आहे. त्या विषयी आपण पुढील भागात जाणून घेऊ.

असो.

सहस्रार चक्रातील कैलासात विराजमान होणारा भगवान सांब सदाशिव सर्व अजपा योग साधकांना "पिंडी ते ब्रह्मांडी" ची अनुभूति प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भगवान शिव प्रणीत योग विद्येचे आणि अजपा गायत्रीचे उपासक आणि मार्गदर्शक आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 17 February 2025