Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


अष्टसात्विक भाव दाटून भक्तियोग समाधीची प्राप्ती

लेखमालेच्या मागील भागात आपण घेरंड मतानुसार समाधीचे सहा प्रकार जाणून घेतले आहेत. घेरंड मुनींनी दिलेल्या समाधी प्रकारांत पाचच्व्या स्थानावर असलेली भक्तियोग समाधी मी येथे प्रथम घेणार आहे कारण भक्ती हा अनेकांच्या परिचयाचा आणि आवडीचा विषय आहे. विशेषतः महाराष्ट्रातील संत परंपरेत भक्तिमार्गाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आधी भक्तियोग समाधी जाणून घेऊ आणि मग इतर समाधी प्रकारांकडे वळू.

भक्तियोग समाधी विषयी सांगतांना घेरंड मुनी म्हणतात --

स्वकीयहृदये ध्यायेदिष्टदेवस्वरूपकम् ।
चिन्तयेद्भक्तियोगेन परमाह्लादपूर्वकम् ॥
आनन्दाश्रुपुलकेन दशाभावः प्रजायते ।
समाधिः सम्भवेत्तेन सम्भवेच्च मनोन्मनी ॥

याचा अर्थ असा की -- आपल्या हृदयात आपल्या इष्ट देवाचे ध्यान करावे. अत्यंत आल्हादपूर्वक भक्तियुक्त होऊन आपल्या इष्ट देवतेचे चिंतन करावे. असे केल्याने आनंदाश्रू दाटून येतात, शरीर पुलकित होते, सात्विक भावदशा जागृत होते. असे झाल्यानंतर समाधी लागते. मनोन्मनी अवस्था घटीत होते.

घेरंड मुनींनी येथे भक्तियोग समाधीचे थोडक्यात वर्णन केले आहे परंतु विषय समजण्यासाठी त्याकडे अधिक विस्ताराने पहाणे आवश्यक आहे.

भक्तियोग हा द्वैताधारीत मार्ग आहे. भक्त आणि भगवान असे द्वैत त्यामध्ये असतेच. जशी जशी भक्ती दृढावते तसं तसं द्वैताच्या भूमीवरून साधक अद्वैताच्या भूमीकडे गमन करतो. आपल्या लाडक्या इष्ट देवतेच्या चरणी लीन होतो.

भक्तिमार्गावर चालणाऱ्या साधकाला आपले इष्ट दैवत कोण ते नीट ओळखावे लागते आणि त्याची "अव्याभिचारी" भक्ती साधावी लागते. ही इष्ट देवतेची निवड फार महत्वाची असते. ती जर चुकली तर तर वर्षोनवर्षे साधना करून सुद्धा काही उपयोग होत नाही. सर्व देवी-देवता अंततः जरी एकाच ब्रह्म स्वरूपाशी मिळत असले तरी तुमच्यासाठी कोणाला इष्ट मानणे आवश्यक आहे ते माहित करून घ्यावे. कुणाला शिव आवडतो, कुणाला विष्णू आवडतो, कुणाला गणपती आवडतो तर कुणाला जगदंबा आवडते. ज्या कोणाला तुम्ही "इष्ट" म्हणून स्वीकाराल त्याला सर्वोपरी मानून त्याची भक्ती करता आली पाहिजे. आज शिव, उद्या विष्णू, परवा गणपती आणि अगदीच काही नाही तर जगदंबा आहेच अशी चंचलता असेल तर मग भक्ती दृढावत नाही. भक्ती दृढ असल्याशिवाय घेरंड मुनींनी सांगितलेली लक्षणे ध्यानात कदापि प्रकट होत नाहीत.

इष्ट दैवत ठरवल्यानंतर त्या सिःत देवतेची उपासना प्रत्यक्ष करून पहावी. स्तोत्र, मंत्र, लीलाग्रंथ इत्यादी मार्गांनी सोप्या-सोप्या उपासना करून काय अनुभव येतो ते पहावे. या उपासनेने मन प्रफुल्लीत रहातेय का ते पाहावे. आयुष्यातील कष्ट कमी होतात का ते पहावे. आयुष्यातील चढउतारांत ही उपासना मनोधैर्य प्रदायक ठरत आहे का ते पहावे.

एकदा का इष्ट दैवत ठरले की त्या इष्ट देवतेचे ध्यान कुठे करायचे आहे तर "स्वकीय हृदये" अर्थात स्वतःच्या हृदयात. हृदयस्थान हे अनाहत चक्राचे क्षेत्र आहे. तुम्हाला आठवत असेल की स्थूल ध्यान विषद करताना सुद्धा घेरंड मुनींनी असाच काहीसा विधी सांगितला होता. अनाहत चक्र हे पंचमहाभूतांतील वायुतत्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर ते मानस अर्थात भाव-भावनांचे स्थान आहे. भक्ती ही सुद्धा मनाची एक उच्च स्तरावरची भावना आहे. वायुतत्वाशी जवळीक असल्याने सर्वसामान्य माणसाचे मन हे वाऱ्याप्रमाणे चंचल असते. भक्तीत दृढता आणण्यासाठी वायुतत्वाला स्थिरता आणणारा अजपा जप किंवा हठयोगोक्त प्राणायाम अप्रत्यक्षरीत्या उपयोगी पडतो तो असा.

मनात आपल्या इष्ट देवतेची भक्ती दृढ असेल तर अनाहत चक्रात त्या देवतेचे केलेले ध्यान परम आल्हाद प्रदान करणारे असते. हा ध्यानानंद एवढा उच्च कोटीचा असतो की आनंदाश्रू दाटून येतात. अंगावर रोमांच उभे रहातात. योगी जणू आपल्या इष्ट देवतेशी एकरूप होतो.

भक्तिमार्गावर वाटचाल करत असतांना अष्टसात्विक भावांचा उदय होणे ही एका स्वाभाविक प्रक्रिया असते. किंबहुना भक्ती दृढ असल्याची ती चिन्हे असतात. हे अष्टसात्विक भाव कोणते तर स्तंभवृत्ती, स्वेदन, रोमांच, स्वरभेद, कंपन, वैवर्ण्य किंवा वर्ण परिवर्तन, अश्रुपात आणि प्रलय.

आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करत असताना शरीर एखाद्या शिळेप्रमाणे जड, अचल आणि स्थिर होणे म्हणजे स्तंभवृत्ती. आपल्या इष्ट देवतेचे चिंतन करत असतांना शरीर घामाने अलगद आच्छादले जाणे म्हणजे स्वेदन. आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जपत असताना अंग अंग पुलकित होणे म्हणजे रोमांच. आपल्या इष्ट देवतेची स्तुती करत असताना वाणी गदगद होणे, कंठ दाटून येणे, स्वर बदलणे म्हणजे स्वरभेद. आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करत असताना गात्रांना हलका हलका कंप सुटणे म्हणजे कंपन. भक्तीच्या आवेगाने शरीराचा रंग बदलणे (आरक्त होणे, फिका पडणे इत्यादी) म्हणजे वैवर्ण्य. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण होताच नेत्रांतून आनंदाश्रू ओघळू लागणे म्हणजे अश्रुपात. अतीव भक्तीने भान हरपणे आणि मूर्च्छा सदृश्य अवस्था प्राप्त होणे म्हणजे प्रलय.

असे काही साधक असतात की ज्यांना त्यांच्या इष्ट देवतेच्या स्तोत्रांचा किंवा लीलाग्रंथांचा एवढा लळा लागलेला असतो की त्या स्तोत्रांचा पाठ करत असतांना त्याना अश्रुपात किंवा कंठ दाटून येणे अशी लक्षणे दिसून येतात. मग अशा साधकाना स्वतंत्र ध्यानसाधनेची गरज असते का? अर्थातच असते. स्तोत्रे किंवा लीलाग्रंथ हे भक्तीवर्धनाचे कार्य जरी अतिशय उत्तम रीतीने पार पाडत असले तरी त्याना ध्यानाची सर येऊ शकत नाही. जर भिंतीत खिळा ठोकायचा असेल तर करवत उपयोगी पडणार नाही आणि एखादी फळी कापायची असेल तर हातोडी उपयोगी पडणार नाही. कोणत्या उपासनेची उपयोगिता काय आहे हे साधकाने ओळखायला हवे. त्यामुळे स्तोत्रपाठ, लीलाग्रंथ वगैरे करावेतच पण घेरंड मुनींनी सांगितलेली मनाची परमात्म्यात विलीनाता साधण्यासाठी ध्यानसाधना आवश्यक आहेच.

भक्तिमार्गावर वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या ध्यानसाधनेत असे अष्टसात्विक भावांचे प्रकटन होत आहे का ते अवश्य पडताळून पहावे. भक्ती हे सुद्धा एक शास्त्र आहे. केवळ एखाद्या देवतेची पूजा-अर्चा करणे म्हणजे भक्ती नाही. भक्ती ही एक अत्यंत तरल, सूक्ष्म आणि पवित्र भावना आहे. क्रियात्मक (Technique) स्तरावर भक्ती जरी वरकरणी सोप्पी वाटत असली तरी गौणी भक्तीतून पराभक्तीत प्रवेश करणे अत्यंत कठीण आहे. घेरंड मुनींनी कथन केलेली भक्तियोग समाधी ही अशाच पराभक्तीतून उगम पावलेली आहे. उठसुठ इष्ट देवतेकडे भौतिक सुखासाठी साकडे घालणारी भक्ती आणि ध्यानात अष्टसात्विक भाव जागवणारी आल्हाद प्रदायीनी भक्ती यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

एकदा का अशी उच्च कोटीची भक्ती मनामध्ये ठसली की ती समाधी अवस्था प्रदान करते. येथे घेरंड मुनींनी समाधी अवस्थेला समानार्थी अजून एक शब्द वापरला आहे -- मनोन्मनी. मनाला उन्मन केल्यानंतरची अवस्था ती मनोन्मनी. समाधीत चित्तवृत्तींचा पूर्णतः निरोध झाल्याने मन हे जणू अ-मन होते आणि ही उन्मनी अवस्था प्राप्त होते. भक्त स्वतःला आपल्या इष्ट देवतेच्या चरणाशी विलीन करतो आणि द्वैतातून अद्वैताकडे प्रयाण करतो. आत्तापर्यंत जो "अहं" असतो तो आता "सोहं" झालेला असतो. "जीव" आता "शिव" बनलेला असतो.

असो.

श्वासांमध्ये शक्ती आणि प्रश्वासांमध्ये शिव असा "सोहं" चा उद्घोष करणाऱ्या भक्तांमध्ये अष्टसात्विक भाव जागृत करणारा सांब सदाशिव सर्व कुंडलिनी योगसाधकांना भक्तिमार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 19 June 2023